रामेश्वर मंदिर

वझूर, ता. पूर्णा, जि. परभणी

परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात वझूर हे गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर वसलेले एक ऐतिहासिक गाव आहे. येथे असलेले रामेश्वर महादेव मंदिर प्राचीन मंदिर स्थापत्यशैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्रेतायुगात प्रभू रामचंद्र यांनी स्वतः येथील शिवलिंगाची प्रतिष्ठापना केली होती, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यामुळेच मंदिराला ‘रामेश्वर मंदिर’ असे नामाभिधान प्राप्त झाले आहे. या ऐतिहासिक मंदिराची उभारणी १२ व्या शतकात हेमाडपंती स्थापत्यशैलीत करण्यात आली होती. मंदिरातील एका स्तंभावर कोरलेला देवनागरी लिपीतील स्तंभलेख या मंदिराच्या प्राचीनतेची साक्ष देतो. येथील रामेश्वराचे शिवलिंग अत्यंत जागृत आहे आणि ते नवसाला पावणारे आहे अशी असंख्य भाविकांची श्रद्धा आहे.

या प्राचीन मंदिराबाबत अनेक महत्त्वपूर्ण आख्यायिका प्रसिद्ध आहेत. त्रेतायुगात वनवासादरम्यान प्रभू रामचंद्र यांचे पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह दंडकारण्यात वास्तव्य होते. त्यावेळी त्यांनी गोदावरी नदीच्या उत्तर तीरावर या शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचे सांगण्यात येते. या मंदिराशी संबंधित आणखी एक स्थानिक कथा सांगितली जाते. अनेक वर्षांपूर्वी येथून काही अंतरावर असलेल्या एका गावातील एक विवाहिता शिवशंकरांची निस्सीम भक्त होती. ती दररोज मध्यरात्री कोणालाही न सांगता या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी येत असे. तिच्या पतीचा स्वभाव संशयी होता. आपली पत्नी रोज मध्यरात्रीच्या वेळेस कोठे जाते हे पाहण्यासाठी त्याने एके दिवशी तिचा पाठलाग केला. त्यावेळी त्याच्या हातात धारदार शस्त्र होते. शिवलिंगाचे दर्शन घेतल्यानंतर माघारी वळत असताना आपला पती पाठलाग करत येथे आल्याचे तिच्या लक्षात आले. पतीच्या हातातील शस्त्र पाहून तिने आपल्या बचावासाठी शिवशंकरांचा धावा केला. भक्ताची हाक ऐकून त्यावेळी येथील जमीन अचानक दुभंगली आणि शिवशंकरांनी तिला धरणीमध्ये जिवंतपणे सामावून घेतले. ती जमिनीत जात असताना तिला बाहेर काढण्यासाठी पतीने धावत जाऊन तिच्या साडीचा पदर खेचला, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्या महिलेच्या साडीच्या पदराचा काही भाग आजही येथील उत्सवांदरम्यान काढण्यात येणाऱ्या पालखीत भाविकांच्या दर्शनासाठी ठेवला जातो, असे सांगितले जाते.

१२ व्या शतकात येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आले. या मंदिरातील एका स्तंभावर देवनागरी लिपीतील एक स्तंभलेख आहे. दोन ओळींचा हा लेख जुन्या मराठी भाषेत आहे. या स्तंभलेखाच्या पहिल्या ओळीत “स्वस्ति स्त्री माधवबा सुतारचा लेंकु हेमो। तयाचा सांघेडी सोंगैआ” असे कोरलेले आहे. दुसऱ्या ओळीत “दोघी मेलौनी। सामीग्री षांभा घंडिऐला। ऐवं या षांभेयासि गद्द १०” असे लिहिलेले आहे. हा लेख आजही सुस्थितीत आहे आणि त्याचे सहजपणे वाचन करता येते. या लेखात सुरुवातीला ‘स्वस्ति स्त्री’ म्हणजेच ‘श्री’ हे मंगलवचन दिलेले आहे. माधवबा या सुताराचा पुत्र हेमो आणि त्याचा सांघेडी म्हणजेच सवंगडी सोंगैआ या दोघांनी मिळून सामग्री आणि खांब घडविले म्हणजेच तयार केले, असा या लेखाचा आशय आहे. हे खांब तयार करण्यासाठी एकूण १० गद्दाणक एवढा खर्च लागला होता. गद्दाणक हे यादवकालीन ४८ गुंजांच्या भाराचे सोन्याचे नाणे होते आणि यादवकालीन लेखांमध्ये त्याचा प्रामुख्याने उल्लेख आढळतो. या लेखात काळाचा उल्लेख नसल्यामुळे त्याचा लेखनकाळ ठरवण्यासाठी निश्चित साधन उपलब्ध नाही. मात्र, या लेखातील भाषिक वैशिष्ट्यावरून तो यादवकालीन कसा ठरतो, याची सखोल चर्चा इतिहास अभ्यासक ब्रह्मानंद देशपांडे यांनी आपल्या ‘शोधमुद्रा खंड ४’ या ग्रंथातील ‘वझूर येथील यादवकालीन स्तंभलेख’ या स्वतंत्र लेखात केली आहे.

वझूर या गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. तसेच येथे पुरातन शिलालेख, जुने वाडे, मौल्यवान मूर्ती आणि अंतर्गत भुयारी मार्ग आढळले आहेत. येथील रामेश्वर मंदिरात वसलेल्या शिवलिंगावर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या पश्चिम दिशेने गोदावरी नदी वाहते. या नदीच्या पात्रानजीक असलेल्या घाटावर अनेक लोक दशक्रिया विधी करतात. असे सांगितले जाते की पूर्वी मंदिर परिसरात अनेक संतांचे वास्तव्य होते. त्यापैकी नारायणतीर्थ स्वामी, रंगनाथतीर्थ स्वामी, पुरुषोत्तमतीर्थ स्वामी आणि हरिमहाराज यांच्या पवित्र समाध्या नदीच्या पात्रात पाहायला मिळतात. मंदिराभोवती दगडांची तटबंदी आहे. दगडी फरसबंदी केलेल्या प्रांगणात एका उंच जोत्यावर म्हणजेच चौथऱ्यावर हे मंदिर उभारण्यात आलेले आहे. मंदिराच्या समोरील भागात नंदीच्या दोन पाषाणमूर्ती आहेत. त्यांपैकी एक मूर्ती सध्या भग्नावस्थेत आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात एकूण २४ स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ स्तंभपादावर उभे आहेत आणि त्यावर विविध आकार कोरलेले आहेत. सभामंडपात दोन देवकोष्टके आहेत. त्यामध्ये नागदेवता आणि नृसिंहांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाचे प्रवेशद्वार पंचशाखीय पद्धतीचे आहे. त्यावर काही शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या पायथ्याशी कीर्तिमुखे कोरलेली आहेत. द्वारशाखेच्या द्वारपट्टीच्या मध्यมาชागी असलेल्या ललाटबिंबावर गणपतीची प्रतिमा कोरलेली आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये रामेश्वराची पिंड स्थापित आहे. मागील बाजूला असलेल्या देवकोष्टकात नागधारी शिवमुखवटा ठेवलेला असतो. उत्सवांच्या वेळी हा मुखवटा पिंडीवर ठेवून देवाची महापूजा केली जाते. गर्भगृहावर शिखर अलीकडच्या काळात नव्याने बांधलेले आहे. मंदिरातून बाहेर पडल्यावर पश्चिमेकडून नदीपात्राकडे जाताना देवीचे एक छोटेखानी मंदिर लागते. या मंदिराच्या बाहेरच एक प्राचीन वीरगळ उभा आहे. नदीकाठावर काही प्राचीन शिळांचे अवशेष आणि एक गधेगळ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेला आहे.

परभणी, हिंगोली, जालना आणि नांदेड आदी शेजारील जिल्ह्यांतील हजारो भाविक रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी येत असतात. येथे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या मंदिरात दररोज पहाटे ५ वाजता देवाची मुख्य पूजा आणि अभिषेक किया जातो. त्यानंतर सायंकाळी ६ च्या सुमारास आरती केली जाते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते. असंख्य भाविक दूरवरून पायी चालत येतात आणि येथील पिंडीवर कावडीने आणलेल्या पाण्याचा जलाभिषेक करतात. महाशिवरात्री हा या मंदिरातील सर्वात मोठा उत्सव मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या लांब रांगा लागतात. या दिवशी पहाटे ५ वाजता शिवलिंगाची अभिषेक-पूजा झाल्यावर भव्य महाआरती केली जाते आणि त्यानंतर सार्वजनिक दर्शनाला सुरुवात होते. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हरिकीर्तनाचा कार्यक्रम होतो. कीर्तन संपल्यानंतर सर्व भाविकांना फराळाचे वाटप केले जाते. रात्री ९ च्या सुमारास गावामध्ये नगरप्रदक्षिणेसाठी मंदिरातून रामेश्वराची पालखी काढण्यात येते. पालखीच्या मार्गावर गावकऱ्यांनी सुंदर रांगोळ्या काढलेल्या असतात आणि रस्ते विविधरंगी पताक्यांनी सजवलेले असतात. वाटेत सुवासिनींकडून पालखीची पूजा केली जाते. या उत्सवाच्या निमित्ताने गावातील प्रत्येक घरासमोर दिवे लावून रोषणाई करण्यात येते. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही पालखी मंदिरात परत येते. चैत्र पौर्णिमेच्या दिवशीही येथे जत्रा भरते. या उत्सवादरम्यानही रामेश्वराचा पालखी सोहळा आणि गावात गाडा ओढण्याचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार जातो. यात्रेच्या निमित्ताने मंदिर परिसरात कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाते. येथे येणाऱ्या सर्व भाविकांच्या निवासाची तसेच फराळाची व्यवस्था मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे केली जाते. मंदिर परिसरात भाविकांसाठी एक छोटी धर्मशाळा आणि दोन सभागृह बांधण्यात आली आहेत. दररोज सकाळी पाच वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • पूर्णा येथून ३० किमी आंतरावर
  • परभणी शहरापासून ३३ किमी अंतरावर
  • पूर्णा व परभणी येथून वझूरसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९८६०९०४६८५, ८३९०३४४३८३

रामेश्‍वर मंदिर

वज़ूर, तालुका पूर्णा, जिला परभणी

Back To Home