परभणी जिल्ह्यातील ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले मानवत शहर पूर्वी पाथरी तालुक्याचा भाग होते. पुढे १ मे १९९९ रोजी प्रशासकीय कामाच्या सोयीसाठी मानवत हा स्वतंत्र तालुका म्हणून घोषित करण्यात आला. या भागातील हवामानात कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे हा तालुका कापूस जिनिंग उद्योगासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. येथील लोकांची मारुतीवर विशेष श्रद्धा आहे. या तालुक्यातील गावागावांमध्ये मारुतीची मंदिरे पाहायला मिळतात. त्यात या तालुक्याचे ठिकाण असलेल्या मानवत शहराच्या सीमेवर असलेले अंधारवड मारुती मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथील हे स्थान जागृत मानले जाते. येथील मारुती नवसाला पावतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. मंदिराबाबत परिसरात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळी हा भाग पूर्णपणे घनदाट वनाने वेढलेला होता. या वनातील वडाच्या झाडांचा घेर आणि विस्तार इतका दाट होता की सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचणेही कठीण होते. या अंधाऱ्या वडाच्या झाडाखाली मारुतीच्या मूर्तीचे स्थान होते. त्यामुळे या मंदिरास अंधारवड मारुती मंदिर असे नाव पडले. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार, प्राचीन काळात या घनदाट अरण्यात चोर-लुटारूंचा फार सुळसुळाट होता.
वनातील वाटेवरून जाणारे व्यापारी, वाटसरू तसेच शेतकऱ्यांना हे चोर-लुटारू त्रास देत असत. त्यावेळी रात्रीचा प्रवास टाळण्यासाठी सर्व वाटसरू आणि व्यापारी या वडाच्या झाडाखाली असलेल्या मारुतीच्या मंदिराजवळ मुक्काम करत असत. येथील मारुती जागृत असल्यामुळे कोणताही चोर किंवा लुटारू येथे थांबलेल्या वाटसरूंना त्रास देण्याचे धाडस करत नसे. येथून प्रवास करणाऱ्या व्यापारी आणि वाटसरूंना वडाखाली असलेल्या या मारुतीचा मोठा आधार वाटत होता. त्यामुळे या मंदिरास सुरुवातीला आधारवड मारुती मंदिर असे नाव प्राप्त झाले. पुढे या शब्दाचा अपभ्रंश होऊन मंदिरास अंधारवड मारुती मंदिर असे नाव मिळाले.
मुख्य मार्गापासून मंदिराकडे येणाऱ्या रस्त्यावर मंदिराची पहिली स्वागतकमान आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कमानदार तोरणाने जोडलेले दोन स्तंभ आहेत. या स्तंभांवर सज्जा बांधलेला आहे. स्वागतकमानीतील सज्जावरील मेघडंबरीमध्ये हनुमानाची मूर्ती आहे. स्वागतकमानीपासून काही अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराच्या समोर भाविकांच्या वाहनांसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. हे मंदिर संगमरवरी फरशांनी नटलेल्या एका मोठ्या चौथऱ्यावर आणि प्राचीन वटवृक्षाच्या सावलीत वसलेले आहे.
मंदिराच्या सभोवताली लहान खांब आणि स्टेनलेस स्टीलचे कठडे असलेली तटबंदी आहे. केवळ गाभारा हेच या मंदिराचे मूळ स्वरूप आहे. गाभाऱ्याच्या सभोवताली सुमारे चार फूट उंचीचा स्टेनलेस स्टीलचा सुरक्षित कठडा आहे. मंदिरात चारही कोनांवर एकमेकांना कमानदार तोरणाने जोडलेले चार गोलाकार स्तंभ आहेत. या स्तंभांवरील तुळईवर मंदिराचे छत तोललेले आहे. गाभाऱ्यामध्ये जमिनीवर मारुतीची तांदळा स्वरूपातील पाषाणमूर्ती प्रतिष्ठित आहे. गाभाऱ्याच्या बाहेरील बाजूस तोरणावर काचेचे नक्षीकाम काम केलेले आहे. गाभाऱ्याच्या छतावर घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर उभ्या धारेची नक्षी कोरलेली पाहायला मिळते. शिखराच्या शीर्षभागावर स्तूपिका व कळस आहे. मंदिराला लागून असलेल्या विशाल वटवृक्षांच्या फांद्याना भाविकांनी नवसाच्या शेकडो पितळी घंटा टांगलेल्या आहेत.
हनुमान जयंती हा येथील वार्षिक उत्सव मानला जातो. या उत्सवासाठी परभणी आणि आसपासच्या जिल्ह्यांतील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येथे येतात. या दिवशी मंदिरात देवाचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. देवाची उत्सवमूर्ती पाळण्यात ठेवून भाविक भक्तीभावाने पारंपरिक पाळणे गातात.
त्यानंतर देवाची पालखी मिरवणूक काढून गावाला प्रदक्षिणा केली जाते. उत्सवाच्या वेळी नवसाचे एकाला एक जोडलेले बारा गाडे ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो. हे गाडे ओढण्यासाठी आणि हा सोहळा पाहण्यासाठी परिसरात मोठी गर्दी जमते. जन्मोत्सवाच्या निमित्ताने मंदिरात होम-हवन, भजन, कीर्तन, रामकथा वाचन तसेच सुंदरकांड ग्रंथपठण इत्यादी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मंदिरात रामनवमी, चैत्र नवरात्री, दसरा, दिवाळी, गुढीपाडवा आणि श्रावण मास इत्यादी सर्व सण व उत्सव नेमाने साजरे केले जातात. सर्व उत्सवांच्या वेळी हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. दर शनिवारी सुमारे चार ते पाच हजार भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. शनिवारी आणि सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी सुद्धा मंदिरात भाविकांची वर्दळ असते. हे मंदिर भाविकांना दर्शनासाठी २४ तास खुले असते.
मारुती मंदिरापासून काही अंतरावर भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्र आहे. भक्कम तटबंदी आणि विशाल प्रवेशद्वार असलेल्या या संस्कृती केंद्राच्या आवारात अनेक देवीदेवतांची लहान-मोठी मंदिरे तसेच काही समाधी मंदिरे आहेत. यातील फक्त गाभारा असलेले एक विशेष मंदिर सुमारे चाळीस फूट उंच आहे. हे मंदिर षटकोनी आकाराचे आहे. या मंदिराच्या छतावर सहा थरांचे अष्टकोनी शिखर बांधलेले आहे. शिखराच्या प्रत्येक थरात आठ कोनाडे तयार केलेली आहेत. त्यांमध्ये विविध देवीदेवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिखराच्या शीर्षभागावर एकावर एक असे दोन आमलक आहेत. या आमलकांवर कळस व ध्वजपताका आहे. या केंद्रात स्वाध्यायी गुरू, सेवेकरी आणि महंत यांची निवासस्थाने, साठवण कक्ष, स्वयंपाकघर, स्वाध्यायी पाठशाला यांच्यासह इतर वास्तू आहेत.