अष्टभुजा मंदिर

नवा मोंढा, परभणी, ता. जि. परभणी

परभणी जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्यालय असलेल्या परभणी शहरात नवा मोंढा परिसरात अष्टभुजा मंदिर स्थित आहे. दोन हजार वर्षांपेक्षा अधिक प्राचीन इतिहास असलेल्या या शहराला जुन्या काळात ‘प्रभावती नगरी’ म्हणून ओळखले जात होते. या नगरीत मौर्य, सातवाहन, वाकाटक या राजघराण्यांनी आणि पुढे मुघल, निजाम व ब्रिटिश यांनी सत्ता चालवली. या समृद्ध वारशामुळे परभणी शहरात सोमेश्वर महादेव मंदिर, ललिता देवी मंदिर, बालाजी मंदिर, गोडी पार्श्वनाथ श्वेतांबर जैन मंदिर, रंगनाथ महाराज मंदिर, पेडा हनुमान मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर आणि उघडा महादेव मंदिर अशी अनेक देवस्थाने आहेत. या सर्व धार्मिक स्थळांमध्ये अष्टभुजा देवीचे हे मंदिर भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धाकेंद्र मानले जाते. येथील देवी नवसाला पावणारी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे.

भारतीय पुराणे आणि मूर्तीशास्त्रामध्ये अष्टभुजा देवीला महत्त्वाचे स्थान आहे. अष्टभुजा म्हणजे आठ हात असलेली देवी होय. हे तिच्या शक्तीचे आणि वैश्विक कार्याचे प्रतीक मानले जाते. या देवीचा पौराणिक संदर्भ ‘मार्कंडेय पुराण’ अंतर्गत असलेल्या ‘देवी माहात्म्य’ म्हणजेच ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथात आढळतो. जेव्हा महिषासुर नावाच्या राक्षसाने देवांचा पराभव करून स्वर्गावर ताबा मिळवला, तेव्हा सर्व देवांच्या तेजातून एका महाशक्तीची निर्मिती झाली. या शक्तीला विविध देवतांनी आपली शस्त्रे प्रदान केली आणि त्यातून अष्टभुजा धारण केलेल्या दुर्गेचे रूप प्रकट झाले. या संदर्भाला जोडूनच हरिवंश पुराण आणि शिव पुराणातही देवीच्या या पराक्रमी रूपाचे वर्णन येते. तेथे तिला महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचे एकत्रित रूप मानले गेले आहे.

मूर्तीशास्त्राच्या आणि स्थापत्यकलेच्या दृष्टीने विचार केल्यास, अष्टभुजा देवीच्या आठ हातांमध्ये असलेली शस्त्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. साधारणपणे तिच्या उजव्या हातांमध्ये चक्र, गदा, तलवार आणि बाण असतात, तर डाव्या हातांमध्ये शंख, धनुष्य, ढाल आणि त्रिशूळ किंवा घंटा असते. ही शस्त्रे विष्णू, शिव, इंद्र, वरुण आणि इतर प्रमुख देवतांनी तिला असुरांचा संहार करण्यासाठी दिलेली असतात. देवीचे वाहन सिंह आहे आणि ती अनेकदा महिषासुराचे निर्दालन करताना, म्हणजेच महिषासुरमर्दिनीच्या रूपात दाखवली जाते. भारतामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळापासून अष्टभुजा देवीच्या मूर्ती असल्याचे पुरावे मिळतात. मध्य प्रदेशातील उदयगिरी गुहा आणि भुमरा येथील गुप्तकालीन मंदिरांमध्ये याचे सुरुवातीचे अवशेष पाहायला मिळतात.

मध्ययुगीन काळात मंदिर स्थापत्यकलेचा विकास झाला तेव्हा अष्टभुजा देवीच्या मूर्तींना मंदिरांच्या बाह्य भिंतींवर आणि प्रवेशद्वारांवर विशेष स्थान दिले गेले. बदामी आणि ऐहोळे येथील चालुक्यकालीन मंदिरांमध्ये, तसेच एलोरा येथील राष्ट्रकूटकालीन कैलास मंदिरामध्ये अष्टभुजा देवीची प्रमाणबद्ध शिल्पे कोरलेली आहेत. विविध शिलालेखांनुसार व्यापारी मार्ग आणि किल्ल्यांच्या संरक्षणासाठी अष्टभुजा देवीची मंदिरे उभारली जात असत. तिचे आठ हात हे आठ दिशांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जात असल्यामुळे तत्कालीन राजे आणि योद्धे युद्धावर जाण्यापूर्वी या देवीची पूजा करत असत. हे विविध ताम्रपटांमधील आणि शिलालेखांमधील ऐतिहासिक उल्लेखांवरून सिद्ध होते.

स्थानिक रहिवाशांच्या मतानुसार देवीचे हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षे जुने आहे. काही भाविक या स्थानाचा संबंध थेट पुराणकाळाशी जोडतात. या मंदिराविषयी स्थानिक पातळीवर काही आख्यायिका प्रचलित आहेत. एका आख्यायिकेनुसार प्राचीन काळात या भागावर एका राक्षसाचे राज्य होते. सत्तेने उन्मत्त झालेल्या त्या राक्षसाच्या अत्याचारामुळे सामान्य जनतेचे जीवन कष्टमय झाले होते. त्यावेळी नागरिकांनी देवीची प्रार्थना केली. आपल्या भक्तांना संकटातून सोडवण्यासाठी देवी अष्टभुजा रूपात प्रकट झाली. देवीने युद्धात त्या राक्षसाचा वध करून भक्तांना संकटमुक्त केले. युद्धानंतर देवीने विश्राम केलेल्या ठिकाणी तिची स्थापना करून भक्तांनी हे मंदिर बांधले. दुसरी आख्यायिका इतिहासकाळाशी जोडलेली आहे. या आख्यायिकेनुसार परकीय सत्तेच्या काळात या भागावर एका शासकाचे राज्य होते. त्याच्या राजवटीमुळे सामान्य जनतेला सतत अन्याय आणि अत्याचाराचा सामना करावा लागत होता. शेवटी अन्याय असह्य झाल्यामुळे जनतेने एकत्रित येऊन त्या शासकाविरुद्ध उठाव केला. ही सत्ता जनतेने उलथवून टाकली. या लोकविजयाचे आणि एकतेचे प्रतीक म्हणून येथे अष्टभुजा देवीचे मंदिर स्थापन करण्यात आले.

परभणी शहरातील नवा मोंढा या व्यापारी परिसरात हे दुमजली मंदिर मुख्य रस्त्यालगत स्थित आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना पूजासाहित्याची दुकाने आहेत. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. हे मंदिर रस्त्याच्या पातळीपेक्षा काहीसे उंच चौथऱ्यावर बांधलेले आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात पुरेसा प्रकाश आणि खेळती हवा राहण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात भिंतीलगत पीठ-मिठाच्या पारंपरिक परड्या ठेवलेल्या असतात. भाविक त्यामध्ये घरून आणलेले धान्य, पीठ, मीठ आणि मिरची या वस्तू अर्पण करतात. सभामंडपातील डाव्या बाजूच्या वज्रपीठावरील मखरामध्ये हनुमान, गणपती तसेच विठ्ठल-रखुमाई यांच्या मूर्ती प्रतिष्ठित आहेत. उजव्या बाजूच्या वज्रपीठावरील मखरात श्रीदत्तात्रेयांची मूर्ती आहे. सभामंडपामध्ये डाव्या बाजूला चार पायऱ्यांचे एक तळघर आहे. या तळघरात शिवपिंड स्थापित आहे. शिवपिंडीच्या मागे भिंतीलगत देवी पार्वतीची मूर्ती आहे. सभामंडपाच्या मध्यभागात असलेल्या वज्रपीठावरील मखरामध्ये गोस्वामी गिरीजी महाराज यांची ध्यानस्थ मुद्रेतील मूर्ती आहे.

सभामंडपाच्या पुढील भागात सुमारे दोन फूट खोलीवर गर्भगृह आहे. या गर्भगृहात खाली उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना कोरीव दगडी स्तंभ आहेत आणि त्यावर महिरपी तोरण कोरलेले आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी, वज्रपीठावरील चांदीच्या नक्षीकाम केलेल्या मखरामध्ये, अष्टभुजा देवीची पाषाणमूर्ती आहे. देवीने आपल्या हातांमध्ये विविध आयुधे धारण केलेली आहेत. युद्धरत मुद्रेतील देवीचा एक हात आशीर्वाद मुद्रेत आहे. देवीची मान काहीशी कलती असल्यामुळे या मूर्तीला एक विशिष्ट रूप प्राप्त झालेले आहे. या सालंकृत मूर्तीला मौल्यवान दागिने व वस्त्रे परिधान करण्यात आलेली आहेत. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचे छत्र आहे.

सभामंडपाच्या छतावर एक घुमटाकार शिखर आहे. या शिखरावर उभ्या रेषांची कोरीव नक्षी आहे आणि त्याच्या शीर्षभागावर आमलक आहे. या आमलकावर कलश आणि ध्वजपताका आहे. गर्भगृहाच्या छतावरील शिखर देखील घुमटाकार स्वरूपाचे आहे. हे शिखर सभामंडपाच्या शिखरापेक्षा आकाराने मोठे आहे. या शिखरावर उभ्या धारेची नक्षी कोरलेली आहे. त्याच्या शीर्षभागावर एकावर एक असे दोन आमलक व त्यावर कळस आहे.

शारदीय नवरात्रोत्सव हा या देवस्थानाचा प्रमुख वार्षिक उत्सव आहे. या काळात सलग नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपांमध्ये पूजा बांधली जाते. नवरात्रात मंदिरात महायज्ञाचे आयोजन करण्यात येते. या नऊ दिवसांत मंदिरात भजन, कीर्तन, जागरण आणि गोंधळ यांसारखे विविध कार्यक्रम पार पडतात. परिसरातील असंख्य भाविक दर्शनासाठी येथे येतात. ते देवीची खणा-नारळाने ओटी भरून साडी-चोळी अर्पण करतात. याशिवाय मंदिरात चैत्रोत्सव, हनुमान जयंती, आषाढी व कार्तिकी एकादशी, कोजागिरी पौर्णिमा, दत्त जयंती, महाशिवरात्री, श्रावण मास आणि गुरुपौर्णिमा हे सण पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. उत्सवांच्या वेळी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. सकाळी ७ व सायंकाळी ७.३० वाजता देवीची आरती होते. प्रत्येक मंगळवारी व शुक्रवारी आरतीनंतर येथे भाविकांना महाप्रसाद दिला जातो. दररोज सकाळी ७ ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात अष्टभुजा देवीचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • परभणी रेल्वे स्थानक व मध्यवर्ती बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून परभणीसाठी एसटी व रेल्वेची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

अष्टकोणीय मंदिर

नवा मोंधा, परभणी, टी. जिला. परभनी

Back To Home