पनवेलपासून पेणकडे जाताना प्रसिद्ध खारपाडा पूल ओलांडण्याआधी रावे गावाकडे जाण्यासाठी मार्ग आहे. याच गावात पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेले ग्रामदेवता रायबादेवीचे मंदिर वसलेले आहे. स्थानिक बोलीभाषेत या गावाच्या नावाचा उच्चार ‘रायवे’ असा केला जातो, तर ‘बा’ या एकाक्षरी शब्दाचा अर्थ ‘आई’ असा होतो. त्यामुळे रायवे गावाची आई या अर्थाने या देवीला रायबादेवी असे संबोधले जाते. ही देवी अत्यंत जागृत असून ती नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. उत्सवकाळात येथे उभारण्यात येणाऱ्या दोनशे ते तीनशे फूट उंचीच्या देवकाठ्या व त्यांची अप्रतिम सजावट यासाठी जिल्ह्यात रावे गाव व येथील रायबादेवी मंदिर प्रसिद्ध आहे.
हे मंदिर नेमके किती प्राचीन आहे याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नसली, तरी या देवालयाची स्थापना गाव वसल्यापासून असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो. या तर्कानुसार हे देवस्थान शेकडो वर्षे प्राचीन असल्याचे मानले जाते. सन १९५० पूर्वी हे मंदिर अतिशय छोटे आणि साध्या कौलारू छताचे होते. जुन्या काळात या गावात अनेक भांडणतंटे होत असत. परंतु या देवीच्या सेवेसाठी सर्व गावकरी एकत्र आल्यानंतर गावातील तंटे पूर्णपणे थांबले, असे ग्रामस्थ सांगतात. काही वर्षांपूर्वी झालेल्या जिर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झालेले आहे.
खुला मंडप, सभामंडप आणि प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. प्रांगणातून पाच पायऱ्या चढून उंच जगतीवर असलेल्या मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. नव्याने बांधण्यात आलेल्या या सभामंडपाला समोरून,
तसेच डाव्या आणि उजव्या बाजूने प्रवेशद्वारे आहेत. सभामंडपात गोलाकार स्तंभ असून त्यांवर तुळई व छत आहे. हे सर्व स्तंभ एकमेकांना महिरप कमानीने जोडलेले आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. बंदिस्त स्वरूपाच्या गर्भगृहात हवा आणि सूर्यप्रकाश येण्यासाठी खिडक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
गर्भगृहात मध्यभागी असलेल्या वज्रपीठावर रायबादेवीची प्राचीन व प्रसन्न मूर्ती विराजमान आहे. विविध वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या देवीला चांदीचा मुखवटा लावलेला आहे. देवीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीच्या मागील चांदीच्या प्रभावळीत मध्यभागी पद्मपुष्प आणि दोन्ही बाजूंना पर्णलतेची नक्षी आहे. मूर्तीच्या बाजूला मोरपिसांचा गुच्छ ठेवलेला असून समोर उत्सवाचा मुखवटा आणि चांदीची पावले आहेत. वज्रपीठावर डाव्या बाजूला शिवपिंड, तर उजव्या बाजूला दगडात कोरलेली श्री गणेशाची मूर्ती आहे. गणेशाच्या मूर्तीवरही वस्त्रे व अलंकार आहेत आणि मूर्तीला चांदीचा मुखवटा आहे. या मूर्तीच्या मागे चांदीची नक्षीदार प्रभावळ आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी आकाराचे शिखर आहे. या शिखराच्या चारही कोनांना उभ्या धारेची नक्षी असून चारही भिंतींवर उपशिखरे आहेत. मुख्य शिखराच्या शीर्षभागी आमलक, त्यावर कळस व ध्वजपताका आहे.
मंदिरात दरवर्षी चैत्र अमावस्येला देवीचा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या उत्सवादरम्यान उभारल्या जाणाऱ्या दोनशे ते तीनशे फूट उंचीच्या देवकाठ्या, त्यांची अप्रतिम सजावट आणि त्या उभारणाऱ्या तरुणांची वेशभूषा हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यावेळी गावातील एकूण सहा आळ्यांमधील भाविक तीन गटांत विभागले जातात. प्रत्येक गट गावातील किंवा गावाजवळच स्थान असलेल्या म्हसोबा, खंडोबा आणि श्रीराम या तीन देवतांच्या मानाच्या देवकाठ्या ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळीत मिरवणुकीने रायबादेवीच्या मंदिरात आणतो. मंदिरात तयार केलेल्या विशिष्ट रचनेच्या ठेवणीवर या देवकाठ्या मोठमोठ्या दोरांच्या साहाय्याने उभ्या केल्या जातात. या तीन काठ्यांची सजावट वेगवेगळी असते. आपल्या गटाची काठी सर्वात उंच आणि आकर्षक दिसावी यासाठी तरुणांमध्ये एक सुप्त स्पर्धा असते. ज्या समूहाची काठी सर्वाधिक उंच उभी राहते, त्या समूहाला विजेते घोषित केले जाते. यावेळी प्रत्येक समूह आपल्या गटाचे प्रतीक म्हणून एकाच रंगाचे कपडे परिधान करतो. त्यामुळे संपूर्ण मंदिर परिसरात तीन रंगांची मनोहारी उधळण पाहावयास मिळते. या उत्सवात पारंपरिक आगरी-कोळी पेहराव केलेले आणि अंगावर भरपूर सुवर्णालंकार घातलेले भाविक लक्ष वेधून घेतात. ही देवकाठ्यांची जत्रा पाहण्यासाठी आणि देवीचे दर्शन घेऊन नवस फेडण्यासाठी मुंबईतील वर्सोवा, वांद्रे, खार, तसेच ठाणे, पुणे आणि आजूबाजूच्या अलिबाग, पेण परिसरातून हजारो भाविक येतात. या सर्व भाविकांच्या भोजनाची व्यवस्था गावकऱ्यांतर्फे केली जाते. या मुख्य जत्रोत्सवाव्यतिरिक्त मंदिरात नऊ दिवसांचा नवरात्रोत्सवही अत्यंत भक्तिभावाने साजरा केला जातो. नवरात्रीत देवीचे तेजस्वी रूप पाहण्यासाठी आणि गरब्यात सहभागी होण्यासाठी दूरवरून लोक येतात. तसेच दर पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार आणि शुक्रवारी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. दररोज सकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत भाविकांना येथे रायबा देवीचे दर्शन घेता येते.