‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा कॉन्शियसनेस’ (इस्कॉन) या धार्मिक संस्थेने स्थापन केलेली अनेक सुंदर व भव्य मंदिरे जगभरात आहेत. त्यातीलच एक सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात वसलेले अनोखे मंदिर म्हणजे राधा वृंदावनबिहारी मंदिर. पालघरमधील गलतरे येथे सुमारे १०० एकर परिसरात वसलेल्या गोवर्धन इको व्हिलेजमध्ये हे मंदिर स्थित आहे. भगवान कृष्णाच्या वृंदावनाची छोटी प्रतिकृती म्हणूनही हे पर्यावरणस्नेही खेडे ओळखले जाते. अत्यंत शांत, सुंदर अशा या मिनी वृंदावनास भेट देण्यासाठी आणि राधाकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी येथे दररोज शेकडो भाविक येत असतात.
इस्कॉन ही गौडीय वैष्णव तत्त्वविचारांचे पालन करणारी धार्मिक संस्था आहे. या तत्त्वविचारांत कृष्णभक्ती केंद्रस्थानी आहे. ‘हरे कृष्ण हरे राम’ या महामंत्राचा जप ही प्रमुख साधना असलेल्या इस्कॉनने जगभरात श्रीमद्भगवद्गीतेतील तत्त्वज्ञानाचा आणि वैदिक धर्माचा प्रचार-प्रसार केला. ‘श्रीमद्भगवद्गीते’च्या ‘राज विद्या राज गुह्ययोग’ या नवव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णाने अन्य देव-देवतांची पूजा करणे हे अज्ञानपूर्ण असल्याचे म्हटले आहे. हा श्लोक असा आहे – ‘येsप्यन्यदेवा भक्ता
यजन्ते श्रद्धयान्विताः। तेsपि मामेव कोन्तेय यजन्त्यविधिपूर्वकम्।।२३।।’ याचा अर्थ असा की ‘हे कुंतीपुत्रा, जे मनुष्य श्रद्धापूर्वक भक्तिभावाने अन्य देवी-देवतांची पूजा करतात, ते निश्चित रूपाने माझीच पूजा करीत असतात; परंतु त्यांची ती पूजा अज्ञानतापूर्ण असते. माझ्या प्राप्तीसाठी करण्यात येणाऱ्या विधीहून ती वेगळी व त्रुटीपूर्ण असते.’ याच अध्यायात पुढे असे म्हटले आहे की ‘यान्ति देवव्रता देवान्पितृन्यान्ति पितृव्रताः। भूतानि यान्ति भूतेज्या यान्ति मग्याजिनोsपि माम् ।।२५।।’ म्हणजे ‘जे लोक देवतांची पूजा करतात त्यांना देवता प्राप्त होतात. जे आपल्या पूर्वजांची पूजा करतात त्यांना पूर्वज प्राप्त होतात. जे जीवित मनुष्यांची पूजा करतात ते त्या मनुष्याच्या कुळास प्राप्त करतात; परंतु जो मनुष्य माझी (म्हणजे श्रीकृष्णाची) पूजा करतो तो मलाच प्राप्त होतो.’ यामुळे इस्कॉनमध्ये केवळ कृष्णाची उपासना केली जाते. ए. सी. भक्तिवेदांत स्वामी प्रभूपाद हे इस्कॉनचे संस्थापक आहेत. श्रील प्रभूपाद या नावानेही ते ओळखले जातात. त्यांचे शिष्य राधानाथ स्वामी यांनी कृष्णभक्ती आणि पर्यावरस्नेही अध्यात्ममय जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पालघर जिल्ह्यात गोवर्धन इको व्हिलेजची स्थापना केली.
राधानाथ स्वामी यांचे मूळचे नाव रिचर्ड स्लॅव्हिन. अमेरिकेतील शिकागो येथे ७ डिसेंबर १९५० रोजी एका यहुदी धर्मिय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांना अध्यात्माची ओढ होती. अमेरिकेतील साठचे दशक हे तरुणाईच्या बंडाचे आणि सांस्कृतिक क्रांतीचे दशक मानले जाते. त्या काळात ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज, विख्यात बीटल संगीतकार जॉर्ज हॅरिसन यांच्यासारखे अनेक तरुण मनशांतीच्या शोधात हिंदू धर्माकडे वळले होते. रिचर्ड स्लॅव्हिन हे त्यांपैकीच एक. येथे त्यांनी अनेक गुरूंचा शोध घेतला. याच शोधात त्यांना श्रील प्रभूपाद हे भेटले. त्यांच्या तत्त्वविचाराने भारलेल्या रिचर्ड स्लॅव्हिन यांनी कृष्णभक्तीचा मार्ग स्वीकारला व राधानाथ स्वामी हे नाव धारण केले. आपल्या या आध्यात्मिक शोधयात्रेवर त्यांनी ‘द जर्नी होम’ (२००८) आणि ‘द जर्नी विदिन’ (२०१६) ही पुस्तके लिहिली आहेत. त्यांच्याच प्रेरणेतून इस्कॉनतर्फे गोवर्धन इको व्हिलेज स्थापन करण्याचे कार्य सुरू झाले. गलतरे या आदिवासी खेड्यातील १०० एकर जमीन त्यासाठी निवडण्यात आली. २००३ मध्ये तेथे प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. ते २०११ मध्ये या पर्यावरणस्नेही खेड्याचे महाराष्ट्राचे माजी कृषी सचिव नानासाहेब पाटील यांच्या हस्ते अधिकृतरीत्या उद्घाटन करण्यात आले.
गोवर्धन इको व्हिलेजच्या १०० एकर जागेपैकी ५० एकर परिसर हा मंदिर भाग आहे व उर्वरित ५० एकर परिसर कॉटेज भाग म्हणून ओळखला जातो. मंदिर भागातील १३ एकर परिसरात एकूण २० मंदिरे आहेत. त्यातील राधा वृंदावनबिहारी मंदिर, राधा मदनमोहन मंदिर आणि गौरांग मंदिर ही तीन मुख्य मंदिरे आहेत. हा सर्व परिसर श्रीकृष्णाच्या वृंदावनासारखा उभारण्यात आला आहे. येथे अन्य १७ मंदिरे आहेत. त्यामुळे हा सर्वच परिसर मिनी वृंदावन या नावाने लोकप्रिय आहे. श्रीकृष्णाच्या जीवन चरित्रातील विविध प्रसंग जेथे घडले, ते गोकुळ, वृंदावन, कंसाने वासुदेव-देवकीला जेथे बंदीवान केले होते ते कारागृह, वृंदावनातील नंद-यशोदेचे घर, यमुना नदी, तेथील कालियाचा डोह अशा सर्व गोष्टी येथे पाहावयास मिळतात. या ठिकाणी कृष्ण जीवनातील विविध प्रसंग सुंदर पुतळ्यांच्या साह्याने साकारलेले आहेत. हिरवीगार वृक्षराजी, बगिचे, छोटी तळी, ओढे, तेथे तयार केलेले सुंदर घाट, तेथील मंदिरे यामुळे हा परिसर अत्यंत रमणीय बनलेला आहे.
मिनी वृंदावन परिसरात प्रवेश केल्यानंतर प्रथम दर्शन होते ते राधा वृंदावनबिहारी मंदिराचे. हे मंदिर प्राचीन नागर मंदिर स्थापत्य शैलीत बांधलेले आहे. त्याचा प्रत्येक स्तंभ, छत, भिंती या सुबक कोरीव कामाने सुशोभित केलेल्या आहेत. उंच अशा जगतीवर हे मंदिर वसलेले आहे. काही प्रशस्त पायऱ्या चढून मंदिराच्या सभामंडपात प्रवेश होतो. लाकडी चौकोनी स्तंभ आणि त्यावर उतरत्या छपराचे छत असा हा अर्धखुल्या प्रकारचा सभामंडप आहे. या छतावर कृष्णजीवनातील विविध प्रसंग नयनसुखद अशा रंगात चितारलेले आहेत. हा मंडप मंदिराहून विलग आहे. दर्शनमंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. गर्भगृहातील वेदीवरील लाकडी मखरामध्ये इस्कॉन मंदिरांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील राधा-कृष्णाच्या नृत्यमुद्रेतील संगमरवरी व अलंकारांनी सुशोभित अशा मूर्ती आहेत. त्यामध्ये काळ्या पाषाणातील बन्सीधर कृष्णाची मूर्ती आहे. राधा वृंदावनबिहारी मंदिराचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या मंडोवर म्हणजे अधिष्ठानाच्या वरच्या भागात कोरण्यात आलेली विविध उठावशिल्पे. विष्णूचे विविध अवतार, त्यांच्याशी संबंधित पौराणिक कथा, कृष्णजीवनातील प्रसंग यांचे चित्रण तेथे पाहावयास मिळते.
या परिसरात राधा मदनमोहन मंदिर हे आणखी एक उंच मंदिर आहे. एका उंच हिरव्यागार टेकाडासारख्या भागावर, खालून वरपर्यंत एखाद्या सलग शिखरासारखे असे हे मंदिर आहे. मंदिराची उंची सुमारे १०० फूट आहे. लांबून पाहता जणू जमिनीतून उगवल्यासारखे भासणारे हे मंदिर पूर्णतः लाल पाषाणात बांधलेले आहे. मंदिराच्या चारी बाजूंनी फरशा बसवलेले प्रांगण आहे. काही पायऱ्या चढून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. छोटे अंतराळ आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. गर्भगृहात उंच चंदेरी वेदीवर राधा मदनमोहनाची मनमोहक मूर्ती आहे. या शिवाय मिनी वृंदावन परिसरात गौरांग मंदिरही आहे. येथे चैतन्य महाप्रभूंची मूर्ती आहे. चैतन्य महाप्रभू हे सोळाव्या शतकातील बंगालमधील एक लोकोत्तर वैष्णव संत होते. ब्रह्मज्ञानापेक्षा भगवद्भक्ती श्रेष्ठ आहे. सर्वांना सहजसुलभ असलेल्या भक्तीमार्गाने परमेश्वराची प्राप्ती करता येईल असे सांगून त्यांनी हरिमानाचे माहात्म्य प्रतिपादन केले. त्यांनी प्रतिपादलेल्या गौडिय वैष्णव तत्त्वज्ञानावर इस्कॉन आधारलेले आहे.
गोवर्धन इको व्हिलेजमध्ये योग, आयुर्वेदिक उपचार याशिवाय नृत्यकीर्तन, भगवद् संकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मंदिरातर्फे मोठी गोशाळाही चालवली जाते. याशिवाय इस्कॉनतर्फे येथे गोवर्धन अन्नक्षेत्रही चालवले जाते. तेथे भाविकांना मोफत अन्नदान केले जाते. येथे येणाऱ्या धार्मिक-पर्यटकांसाठी मंदिरातर्फे खास फॉरेस्ट टूरचे आयोजन करण्यात येते. त्यात मिनी वृंदावनाची सैर घडवली जाते.