प्रतापगडावरील भवानी मंदिर

किल्ले प्रतापगड, ता. महाबळेश्वर, जि. सातारा

प्रतापगड हे नाव घेतल्यावर आठवतो तो शिवाजी महाराजांचा प्रताप आणि त्यांनी या किल्ल्याच्या पायथ्याशी केलेला अफझल खानाचा वध! प्रचंड फौजेनिशी चालून आलेल्या अफझल खानाला वाघनखांच्या साह्याने मारून त्याच्या फौजेची मावळ्यांनी धुळदाण उडविली होती. या अफझल खानाने महाराष्ट्रात येताना दहशत माजविण्यासाठी महाराष्ट्राची मायभवानी असलेल्या तुळजापूरच्या तुळजा भवानी मंदिराचा विध्वंस केला होता. या कुलदेवीची स्थापना प्रतापगडावर करण्याची इच्छा शिवाजी महाराजांच्या मनात आली आणि १६६१ मध्ये अष्टभुजा महिषासुरमर्दिनी भवानी देवीच्या मूर्तीची प्रतापगडावर प्रतिष्ठापना झाली.

शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेल्या काही मोजक्या किल्ल्यांपैकी प्रतापगड हा एक महत्त्वाचा किल्ला होय. स्वराज्यात सामील होण्यास नकार देणारे आणि सतत कुरापती काढणाऱ्या जावळीच्या चंद्रराव मोरे यांचा महाराजांनी बंदोबस्त केल्यानंतर जावळीचा परिसर स्वराज्यात आला. या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी येथील भोरप्या डोंगरावर किल्ला बांधण्याचे महाराजांनी ठरविले आणि त्याची जबाबदारी दुर्गरचनाकार मोरोपंत पिंगळे यांच्याकडे सोपविली. १६५६ ते १६५८ या दोन वर्षांच्या कालावधीत मोरोपंतांनी आपले कसब पणाला लावून किल्ला उभा केला. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण प्रतापगड असे केले.

प्रतापगडाच्या उभारणीच्या वेळी या गडावर भवानी मातेचे मंदिर नव्हते. आपल्याला उदंड यश देणाऱ्या प्रतापगडावर भवानी मातेचे मंदिर असावे, असे महाराजांच्या मनात आल्यावर त्यांनी आपले विश्वासू मंबाजी नाईक गोमाजी नाईक पानसरे यांना नेपाळात पाठविले. तेथून श्वेतगंडकी, त्रिशूलगंडकी आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरून तेव्हाचे नेपाळचे राजे लिलादित्य यांच्या अनुमतीने गंडकी शिळा आणली. त्या शिळेतून अष्टभुजा महिषासुरमर्दिनीची मूर्ती घडविल्यावर ती जुलै राजगडावर शिवाजी महाराजांना दाखविण्यासाठी नेण्यात आली होती. ती आखीवरेखीव मूर्ती पाहून महाराज खूष झाले या मूर्तीची त्वरित प्रतापगडावर प्रतिष्ठापना करावी, असे त्यांनी सुचविले. महाराजांच्या अनुमतीनंतर मोरोपंत पिंगळे यांच्याबरोबर पालखीत ही मूर्ती प्रतापगडावर आणण्यात आली होती. . . १६५७ रोजी ललिता पंचमीच्या (अश्विन शुक्ल पंचमी) शुभमुहूर्तावर या मूर्तीची मोरोपंतांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रतिष्ठापना झाली. आज प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात हीच मूर्ती प्रतिष्ठापित आहे.

ऐतिहासिक नोंदींनुसार, रायगडावर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना १९ मे १६७४ या दिवशी स्वतः शिवाजी महाराज प्रतापगडावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी भवानी देवीला तीन मण सोन्याचे सुवर्णछत्र अर्पण केले होते (पूर्वीच्या हिशेबाप्रमाणे २४ तोळे म्हणजे एक शेर. जुना तोळा सध्याच्या ११.७५ ग्रॅमचा असे. म्हणजेच एक शेराचे वजन : ११.७५ ग्रॅम x २४ तोळे = २८२ ग्रॅम. १६ शेर म्हणजे एक मण. एक मणाचे वजन : २८२ ग्रॅम x १६ = ,५१२ ग्रॅम होते. या हिशेबाप्रमाणे तीन मणाचे वजन १३,५३६ ग्रॅम म्हणजेच सुमारे साडेतेरा किलो इतके होते). यावेळी शिवाजी महाराज प्रतापगडावर दोन दिवस वास्तव्यास होते. महाराजांनी प्रतापगड सोडल्यावर २१ मे १६७४ रोजी ते रायगडावर दाखल झाले. पुढे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके १५९६ (शुक्रवार जून १६७४) रोजी शिवरायांचा रायगडावर राज्याभिषेक होऊन ते हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले.

प्रत्यक्ष शिवाजी महाराजांची श्रद्धा असलेले त्यांनी निर्मिती केल्यामुळे प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे. या मंदिराभोवती तटबंदी आहे. एका उंच जगतीवर (पाया) हे मंदिर आहे. सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. मंदिराच्या दर्शनी भागात दोन उंच दगडी दीपमाळा आहेत. त्यांचे वेगळेपण असे की त्यावर दिवे ठेवण्यासाठी असलेल्या जागांचा आकार हा हत्तीच्या तोंडासारखा असून वर केलेल्या सोंडेच्या टोकावर दिवा ठेवता येतो.

पूर्वाभिमुख असणाऱ्या मंदिरात जाण्यासाठी पूर्व, उत्तर दक्षिण अशा तिन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. येथील सभामंडप प्रशस्त असून त्याच्या पुढे गर्भगृहात अष्टभुजा भवानी देवीची काळ्या गंडकी पाषाणातील अतिभंग प्रकारातील (एका बाजूला झोक देऊन प्रहार करण्याच्या पवित्र्यातील) महिषासुरास मारीत असलेली मूर्ती आहे. मूर्तीच्या मुकुटावर शिवलिंग असून दोन्ही कानांच्या वरील बाजूस चंद्रसूर्य कोरलेले आहेत. उजवीकडील तीन हातांमध्ये चक्र, बाण खड्ग, तर चौथ्या हातातील त्रिशूळ महिषासुराच्या शरीरात खुपसलेला आहे. डावीकडील तीन हातांत शंख, ढाल आणि धनुष्य असून चौथ्या हातात महिषासुराची शेंडी आहे. या मूर्तीच्या शेजारी ऐंद्रिय भवानीची मूर्ती आहे. असे सांगितले जाते की ऐंद्रिय भवानीची ही मूर्ती तुळजापूरच्या मूळ भवानी मूर्तीची प्रतिकृती आहे.

भवानी देवी मूर्तीच्या उजवीकडे समोरील बाजूस नितळ पारदर्शक असे स्फटिकाचे शिवलिंग आहे. असे सांगितले जाते की शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा मोहिमांवर जात असत तेव्हा हे शिवलिंग ते सोबत ठेवत असत. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य असे की गर्भगृहात अंधार करून या शिवलिंगासमोर कापूर पेटविल्यानंतर काळजीपूर्वक पाहिल्यास त्यात बिल्वपत्र (बेलाचे पान), तुलशीपत्र वाहणारी गंगा असे दृश्य दिसते. स्फटिकाचे हे शिवलिंग महाराजांकडे कसे आले, याबाबत इतिहासात कोणतीही नोंद नाही. याच गर्भगृहाच्या एका भिंतीवर सेनापती हंबीरराव मोहिते यांची एक तलवार आहे. या तलवारीच्या पात्याला सहा भोके आहेत. त्यावेळी शंभर शत्रूंना मारल्यावर तलवारीच्या पात्यावर एक भोक पाडले जात असे.

भवानी देवीला दररोज तीन वेळा नैवेद्य दाखविला जातो. सकाळचा संध्याकाळचा नैवेद्य भोपे सोनवणी करतात, तर दुपारचा नैवेद्य हडप पुजारी करतात. शिवाजी महाराजांनी केलेल्या नेमणुकांनुसार आजही या प्रथा कायम आहेत. या देवीच्या रोजच्या वस्त्रांबाबतही पूर्वीचेच नियम पाळले जातात. त्यानुसार सोमवारी पांढऱ्या रंगाची साडी, मंगळवारी लाल, बुधवारी हिरवी, गुरुवारी पिवळी, शुक्रवारी आकाशी, शनिवारी काळी रविवारी गुलाबी रंगाची साडी देवीला नेसविली जाते. अक्षय्य तृतीयेला हिरवी साडी येवल्याच्या कापडाची चोळी परिधान केली जाते. ललिता पंचमीला प्रतापगडावर मोठा उत्सव असतो. दररोज सूर्योदयापूर्वी आणि सूर्यास्तानंतर येथे चौघडा वाजविला जातो. प्रत्येक पौर्णिमेला गोंधळ, आरती, नैवेद्य असतो. यावेळी मशालींच्या उजेडात, संबळ झांजांच्या गजरात गडावर देवीची पालखी फिरविली जाते.

भवानी मातेच्या मंदिरासोबत या गडावर केदारेश्वर महादेवाचे मंदिर आहे. गडाच्या बांधकामाच्यावेळीच हे मंदिर बांधण्यात आले होते. बांधकाम सुरू असताना मोरोपंत पिंगळे यांना येथे शिवलिंग सापडले होते. या स्वयंभू शिवलिंगाभोवतीच त्यांनी मंदिर उभारले. तोच हा प्रतापगडावरील श्रीकेदारेश्वर महादेव होय. असे सांगितले जाते की अफजल खान भेटीच्या दिवशी शिवाजी महाराजांनी केदारेश्वराची यथासांग पूजा केली होती. या पूजेनंतर दानविधी करण्यात आला होता त्यानंतर महाराज अफझल खानाच्या भेटीसाठी गडाखाली उतरले होते.

उपयुक्त माहिती:

  • साताऱ्यापासून ७० किमी, तर महाबळेश्वरपासून २४ किमी अंतरावर
  • प्रतापगडाच्या पायथ्यापर्यंत एसटीची सुविधा
  • खासगी वाहने पायथ्यापर्यंत जाऊ शकतात
  • पायथ्यापासून गडावर जाण्यासाठी सुमारे ४५० पायऱ्या
  • निवासाची सुविधा नाही, न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home