पावन गणेश मंदिर

दिवाण देवडी, ता. जि. छत्रपती संभाजीनगर


छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यावर असलेल्या दिवाण देवडी या निजामकालीन वसाहतीतील पावन गणेश मंदिर हे शहरवासीयांचे श्रद्धास्थान आहे. मराठवाड्यातील पहिली सर्वात उंच मूर्ती असा येथील गणेशमूर्तीचा लौकिक आहे. या गणेशमूर्तीची उंची २१ फूट आहे, तर या मंदिराची उंची ५० फूट आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन करता आल्याने गणेशोत्सवासाठी उभारलेल्या मंडपाच्या जागीच हे मंदिर उभारण्यात आले आहे. नवसाला पावणारा गणेश, अशी ख्याती असल्याने दररोज शेकडो भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात.

हे मंदिर असलेल्या परिसरात निजामकाळात दिवाण राहत. त्यामुळे या वसाहतीला दिवाण देवडी असे नाव पडले. येथील पावन गणेश मंडळातर्फे अनेक वर्षांपासून गणेशोत्सव जल्लोषात साजरा होतो. १९९२ मध्ये गणेशोत्सवादरम्यान मंडळाने मराठवाड्यातील सर्वात उंच मूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. मात्र एवढी भव्य मूर्ती साकारणे सोपे नसल्याने अनेक मूर्तिकारांनी हे आव्हान टाळले. अखेर शहरातील प्रख्यात मूर्तिकार रतन बगले यांनी हे आव्हान स्वीकारले. भल्या मोठ्या मूर्तीचे वजन पेलू शकेल, अशा लोखंडी ट्रॉलीवरच त्यांनी मूर्ती साकारण्यास सुरुवात केली. अथक प्रयत्नांतून त्यांनी मंडळाला हवी तशी २१ फुटांची भव्य मूर्ती साकारली.

दिवाण देवडी परिसर त्या काळात अनेक वाडे आणि तटबंदी असलेला होता. त्यामुळे अरुंद जागेतून वाट काढत मूर्तिशाळेतून ही मूर्ती मंडपात आणणे जिकीरीचे काम होते. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आपल्या घरांच्या भिंती तोडून मूर्तीसाठी वाट करून दिली होती. ही मूर्ती मंडपात आणण्यासाठी दोन दिवस लागले. मराठवाड्यात प्रथमच एवढी भव्य मूर्ती स्थापन करण्यात येणार असल्याने ती सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरली होती. ही मूर्ती पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी उसळली होती. ३१ ऑगस्ट १९९२ रोजी मंडपात मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या कालावधीत भक्तिभावाने तसेच जल्लोषात विविध कार्यक्रम झाले. या कालावधीत या गणेशासोबत भक्तांच्या भावना जोडल्या गेल्याने श्रींना निरोप देणे अनेकांना जड झाले होते. त्यातच विसर्जनाच्या वेळी ही मूर्ती जागची हलेनाशी झाली. त्यासाठी केलेले अनेक प्रयत्न फोल ठरल्याने येथेच गणेशाचे मंदिर उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला. विधिवत पूजा करून मूर्तीची त्याच जागेवर प्रतिष्ठापना करण्यात आली. पहिल्या वर्षी मूर्तीवर छप्पर नव्हते. काही काळाने येथे पत्र्याची शेड टाकण्यात आली. कालांतराने छोटेखानी मंदिर उभारण्यात आले. मंदिराचा दर्शनी भाग हा आकर्षक असून त्यावरील शिखर कलात्मक पद्धतीने बांधलेले आहे. या शिखरावर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात शंकराची मूर्ती असून त्याखालील भागातील मखरात गणेशासह रिद्धी सिद्धी यांच्या मूर्ती आहेत. या मखराच्या दोन्ही बाजूंकडील देवळ्यांमध्ये गणेशाची दोन रूपे असलेल्या मूर्ती आहेत. पावन गणेशाची ही मूर्ती डाव्या सोंडेची असून या भव्य मूर्तीला चार भुजा आहेत. एका हातात परशू, दुसऱ्या हातात कमळ, तिसरा हात वरद मुद्रेत असून चौथ्या हातात चांदीचा मोदक आहे. चांदीच्या आभूषणाने मढवलेल्या या मुकुटधारी मूर्तीच्या कमरेभोवती असलेला नागही भाविकांचे लक्ष वेधून घेतो.

पावन गणेश मंदिरात दररोज सकाळी सायंकाळी पूजा, आरती होते. संकष्टी तसेच विनायक चतुर्थीला येथे दर्शनासाठी गर्दी होते. या उत्सवादरम्यान दहाही दिवस येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. मंडपात छोट्या मूर्तीची प्रतिष्ठापना होते. अनंत चतुर्दशीला मिरवणूक काढून तिचे विसर्जन करण्यात येते. उत्सव काळात रोज अन्नदान करण्यात येते. या मंडळाचे ढोल पथक शहरात प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील पहिले ढोल पथक असलेल्या या पथकात महिलांची संख्याही लक्षणीय आहे. येथे माघी गणेशोत्सवही उत्साहात होतो. गणेश जयंतीला येथे गणेश याग होतो. या यागासाठी अनेक जोडपी तसेच नवदाम्पत्य बसतात. सध्या या मंदिरातील मूर्ती छत्रपती संभाजीनगरमधील दुसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती आहे. पहिला क्रमांक चौराहा येथे १९९४ मध्ये स्थापन झालेल्या गणेश मूर्तीचा लागतो. या मूर्तीची उंची २३ फूट आहे. तिसऱ्या क्रमांकाची उंच मूर्ती कुंवार फल्ली परिसरातील जागृत गणेश मंदिरात आहे. या मंदिरातील सुमारे १३. फूट उंचीची मूर्तीही मूर्तिकार रतन बगले यांनी साकारली आहे.

उपयुक्त माहिती:

  • छत्रपती संभाजीनगर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी मंदिर
  • शहराच्या अनेक भागांतून शहर परिवहन सेवा उपलब्ध
  • महाराष्ट्राच्या अनेक शहरांतून छत्रपती संभाजीनगरसाठी एसटी सेवा उपलब्ध
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : प्रमोद नरावडे पाटील, अध्यक्ष, मो. ९८९०१७७६६१
Back To Home