महाराष्ट्रात प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी पुजली जाणारी देवता म्हणजेच श्रीगणेशाची अनेक जागृत स्थाने आहेत. त्यातील काही गणपतींची ख्याती नवसाला पावणारा गणपती म्हणूनही आहे. कातपूर येथील पावन गणेश हा त्यापैकीच एक प्रसिद्ध गणपती आहे. या गणपतीकडे मनोभावे केलेल्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मोठ्या श्रीफळाच्या आकारात बसविलेली गणेशमूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. छोटेखानी असलेले हे मंदिर पैठण तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.
मूर्तीशास्त्रानुसार गणेशमूर्तीचे सिद्धिविनायक, ऋद्धिविनायक, बुद्धिविनायक व शक्तिविनायक असे प्रकार आहेत. गणपतीच्या सोंडेचे अग्र उजव्या वरील हाताकडे वळले असल्यास तो सिद्धिविनायक समजला जातो, तर सोंडेचे अग्र वरील डाव्या हाताकडे वळले असल्यास त्यास ऋद्धिविनायक असे म्हणतात. तसेच ज्या गणेशाच्या सोंडेचे टोक त्याच्या उजव्या बाजूस खालच्या हाताच्या दिशेने वळलेले असते तो बुद्धिविनायक, तर टोक डाव्या बाजूस खालच्या हाताच्या दिशेने वळलेले असल्यास तो शक्तिविनायक मानला जातो. पावन गणेश मंदिरातील गणपतीच्या मूर्तीची सोंड उजव्या बाजूला खालच्या दिशेने वळलेली आहे. त्यामुळे येथील पावन गणपती हा बुद्धिविनायकाच्या स्वरूपात असल्याचे मानले जाते.
गावातील मुख्य रस्त्यास लागून अनेक घरे व दुकानांच्या दाटीवाटीत हे मंदिर आहे. प्रवेशद्वारावर मोठे स्वस्तिक चिन्ह बसवण्यात आले आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला प्रसाद व पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. मुख्य मंदिरासमोर मंडप उभारण्यात आला असून त्यात एका चौथऱ्यावर अखंड शिळेपासून बनविण्यात आलेला मूषकराज आहे. दोन पायांवर बसलेल्या मूषकाच्या हातात मोठा लाडू आहे. मंदिरात समोरच एका उंच ओट्यावर मोठ्या नारळाच्या आकारामध्ये गणपतीची मूर्ती बसवण्यात आलेली आहे. ही मूर्ती शेंदूरचर्चित असून मूर्तीस चांदीचा मुकुट व चांदीचे डोळे आहेत. मूर्तीच्या खालच्या बाजूला मूषकराज आहे. तसेच नारळाच्या मागे सुवर्णरंगाची प्रभावळ तयार करण्यात आलेली आहे. या गणेशमूर्तीच्या समोरील बाजूस पूजेसाठी गणपतीच्या पादुका ठेवण्यात आल्या आहेत. या मंदिराच्या दरवाजातून गणेशमूर्तीचे दर्शन घ्यावे लागते. या मंदिराला प्रदक्षिणा मार्गही आहे.
पावन गणपती हा नवसाला पावणारा असल्याची मान्यता आहे. त्यामुळे पैठण तालुक्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक भाविक या गणपतीच्या दर्शनाला येतात. नवस पूर्तीनंतर या गणपतीला ५, ११, २१ व ५१ नारळांची माळ देण्याची प्रथा आहे. भाविक आपल्या ऐपतीप्रमाणे या गणपतीला नारळाची माळ अर्पण करतात. त्यामुळे या मूर्तीच्या समोरील बाजूस असलेल्या जाळीवर भाविकांकडून बांधलेल्या शेकडो नारळांच्या माळा दिसतात.
पावन गणेश मंदिरात दररोज सकाळी व सायंकाळी आरती होते. या आरतीसाठी अनेक भाविक उपस्थित असतात. दर मंगळवारी, रविवारी, प्रत्येक संकष्टी चतुर्थीला येथे भाविकांची गर्दी असते. अंगारकी चतुर्थीला पावन गणेश मंदिरात हजारो भाविक दर्शनाला येत असल्याने या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. गणेशोत्सव हा येथे मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. यावेळी मंदिर व परिसरात रोषणाई केली जाते. गणेशोत्सवाच्या दहा दिवसांत येथे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये नामांकित कीर्तनकार व प्रवचनकारांकडून येथे कीर्तन व प्रवचन होते. या मंदिरात भाविकांना दैनंदिन अभिषेक, लघुरुद्र, सहस्रावर्तने, संकल्प पूजा व वाहन पूजा अशा विधी व पूजा करता येतात. (संपर्क : मो. ९४२०४०७३९६) दररोज पहाटे ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना या मंदिरातील पावन गणपतीचे दर्शन घेता येते.