इंग्रजीत सायन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराचे मूळ नाव शीव आहे. या भागावर सत्ता गाजवणारे पोर्तुगीज त्यास ‘सिवा’ (Siva) किंवा ‘सायव्हा’ (Syva) असे म्हणत असत. येथील एका मोठ्या तलावाच्या काठी शिवशंकरास समर्पित असलेले मंदिर असणे हा एक वैशिष्ट्यपूर्ण योगायोग आहे. जुन्या पद्धतीच्या दगडी बांधकामात उभारलेल्या या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पार्वती शंकर आणि भवानी शंकर यांचे दोन स्वतंत्र गाभारे आहेत. शीव परिसरातील असंख्य भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या या मंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा केला जातो.
शीव म्हणजे विशिष्ट भागाची सीमा किंवा मर्यादा होय. मुंबई बेट आणि साष्टी (सालसेत) या बेटांमधील भौगोलिक सीमेवर असलेला हा एक बेटसदृश भाग आहे. सोळाव्या शतकात हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. शीव हे माहीम कसब्याच्या प्रशासकीय अधिकारक्षेत्रात येत असे. इतिहासकार जे. गेर्सन दा कुन्हा यांच्या ‘द ओरिजिन ऑफ बॉम्बे’ (१९००) या ग्रंथानुसार, इ.स. १५४५ ते १५४८ दरम्यान येथे डी. जोआओ डी कास्ट्रो हा पोर्तुगीज व्हाइसरॉय होता. त्याच्या काळात परळ, वडाळा आणि वरळीसह शीव हे गाव मॅन्युएल सेराओ नामक पोर्तुगीज धनिकाला वार्षिक भाडेपट्टीने देण्यात आले होते. पोर्तुगीज हे अत्यंत धर्मांध होते.
त्यांच्यासोबत आलेल्या धर्मगुरूंनी येथे बंदुकांच्या जोरावर धर्मप्रसाराचे काम चालवले. त्यांनी येथील देवालये उद्ध्वस्त केली. तसेच अनेकांची सक्तीने धर्मांतरे केली. सोळाव्या शतकाच्या अखेरीस शीव आणि त्याच्या सभोवतालच्या भागावर जेसुइट पंथीयांची मालकी निर्माण झाली होती.
ब्रिटिश राजघराण्याने मुंबईचा ताबा मिळवल्यानंतरही पोर्तुगीजांनी शीव, वरळी, धारावी आणि वडाळा ही गावे ब्रिटिशांना देण्यास नकार दिला होता. मात्र ब्रिटिश गव्हर्नर हम्फ्रे कुक याने मुत्सद्देगिरीच्या जोरावर या भागांचा ताबा मिळवला. ब्रिटिशांनी येथे मुंबईच्या संरक्षणासाठी लहान तटबंदी, बुरूज तसेच पहारेकऱ्यांच्या चौक्या उभारल्या होत्या. शीवचा किल्ला ही ब्रिटिशांचीच निर्मिती होय. १७६० मध्ये कर्नल किटिंग याच्या देखरेखीखाली हा किल्ला अधिक अभेद्य बनवण्यात आला. गोविंद नारायण माडगावकर यांनी त्यांच्या ‘मुंबईचें वर्णन’ (१८६३) या पुस्तकात तेव्हाच्या शीवचे वर्णन दिले आहे. त्यांच्या मते शीव व माटुंगा येथे मिठाची आगारे होती. शीव येथे काही ठिकाणी वाडवळ लोकांची वस्ती होती. या बेटाच्या शेवटास एक सरकारी चौकी होती. त्याच्या पुढील डोंगरावर शीवचा किल्ला आहे.
तेथे एक इंग्रज सरदार आणि काही संत्री (Sentry) राहत असत. या किल्ल्याच्या खाली थोड्या अंतरावर दुसरा एक लहानसा भुईकोट होता. त्याला ‘रीवाचा किल्ला’ म्हणत अशी माहितीही माडगावकर देतात. माडगावकर आणि जे. गेर्सन दा कुन्हा यांनी शीव येथील मंदिरांचा उल्लेख केला आहे. माडगावकर यांनीही येथील मंदिराचा केवळ उल्लेख केला आहे. या बेटाच्या शेवटास असलेल्या चौकीच्या बाजूला एक मोठा तलाव आणि देवालय आहे, असे माडगावकरांनी ‘मुंबईचें वर्णन’ या पुस्तकात नमूद केले आहे. या वर्णनावरून हे मंदिर म्हणजेच आजचे पार्वती – भवानी शंकर मंदिर होय.
या मंदिराच्या स्थापनेचा नेमका इतिहास अज्ञात आहे. पोर्तुगीज काळात अनेक मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली होती. इतिहास अभ्यासकांच्या मते पोर्तुगीज जेसुइटांची धार्मिक असहिष्णुता पाहता त्यांची सत्ता गेल्यानंतरच्या काळातच येथे जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार किंवा नवी देवालये उभारणे शक्य झाले असावे. इसवी सनाच्या सहाव्या शतकापासून म्हणजेच कलचुरी आणि त्रैकुटकांच्या काळापासून मुंबई बेटांवर शैव संप्रदायाचा प्रभाव असल्याचे दिसते.
घारापुरी येथील लेणी तसेच परळ येथे सापडलेले दीड हजार वर्षांपूर्वीचे शिवशिल्प (बारादेव) यावरून त्याची कल्पना येते. यामुळे शीव येथेही प्राचीन काळी शंकराची मंदिरे असावीत. जलाशयांच्या काठावर शिवशंकराची स्थापना करण्याची परंपरा प्राचीन आहे. त्यानुसार येथेही प्राचीन काळी शंकराचे स्थान असावे. अभ्यासकांच्या मते पुढे कधीतरी याचा जीर्णोद्धार करून येथे मोठे मंदिर बांधले गेले असावे किंवा ब्रिटिश वसाहतकाळात हे मंदिर नव्याने उभारले असावे. १८६३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मुंबईचें वर्णन’ या पुस्तकात या तलावाकाठच्या देवालयाचा उल्लेख असल्याने या मंदिराला किमान १६३ वर्षांचा इतिहास असल्याचे स्पष्ट होते.
मुंबई महापालिकेने ग्रेड २-ए वारसा वास्तू म्हणून घोषित केलेल्या शीव तलावाच्या काठावर हे मंदिर वसलेले आहे. मंदिराची वास्तू मराठा स्थापत्यशैलीतील दगडी भक्कम बांधकामाची आहे. उंच जोत्यावर उभारण्यात आलेल्या या मंदिरासमोर मोठे प्रांगण आहे. सात पायऱ्या चढून तेथे प्रवेश होतो. फरसबंदी केलेल्या या प्रांगणात मंदिराच्या समोरच्या बाजूला असलेल्या भिंतीवर घारापुरी येथील त्रिमुखी महेशमूर्तीची प्रतिकृती कोरलेली आहे.
या महेशमूर्तीचा मधला चेहरा हा सृष्टीचा निर्माणकर्ता असलेल्या तत्पुरुषाचा आहे. उजवीकडील चेहरा शिवाचे शांत व सौम्य रूप दर्शवतो तर डावीकडील चेहरा हा शिवाचे भैरव किंवा रुद्र रूप दर्शवतो. या शिल्पापासून काही अंतरावर तुळशीवृंदावन आहे. मंदिराच्या सभामंडपाला दोन प्रवेशद्वारे आणि एक अर्धप्रवेशद्वार आहे. सभामंडपावर सुवर्णरंगी पत्र्याचे आच्छादन असलेले शिखर आहे. त्यावर दाक्षिणात्य पद्धतीचा आमलक आणि उंच कलश आहे. सभामंडपात मध्यभागी भरजरी वस्त्रांनी आच्छादलेल्या आसनावर विविध देवदेवतांच्या छोट्या मूर्ती तसेच तसबिरी आहेत. मंदिरात पार्वती शंकर आणि भवानी शंकर यांचे दोन गाभारे आहेत. या दोन्ही गाभाऱ्यांससमोर संगमरवरी चौथऱ्यावर नंदी व कासवमूर्ती विराजमान आहेत. संगमरवरी फरशांनी सुशोभित केलेल्या गाभाऱ्यांमध्ये जमिनीच्या पातळीवर शिवपिंड आहे. या पिंडीला संगमरवरी पाषाणाची शाळुंका असून त्यात पाषाणाचे लिंग आहे. त्यावर नागाचे छत्र आणि अभिषेकपात्र आहे. गाभाऱ्यांतील देवकोष्ठकात गणेशाच्या आणि हनुमानाच्या मूर्ती विराजमान आहेत.
पार्वती – शंकराच्या गाभाऱ्यात पार्वतीमातेची तर भवानी – शंकराच्या गाभाऱ्यात भवानीमातेची मूर्ती प्रतिष्ठापित आहे. या दोन्ही गाभाऱ्यांच्या मधोमध उंच अधिष्ठानावर शिवपुत्र गणेशाची काळ्या पाषाणातील मूर्ती प्रतिष्ठापित आहे. येथे दोन गाभारे असल्यामुळे त्यावर दोन शिखरे आहेत. मराठा पद्धतीच्या या दगडी शिखरांवर दाक्षिणात्य शैलीतील आमलक आहे. येथील आमलक आणि कलश सुवर्णरंगी पत्र्याने मढवलेले आहेत.
शेठ भाईदास सखिदार चॅरिटी ट्रस्टतर्फे या मंदिराचा कारभार पाहिला जातो. येथे सकाळी ७ ते १२.३० आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या काळात भाविक देवदर्शनाचा लाभ घेऊ शकतात. मंदिरात रोज सकाळी व सायंकाळी ७.३० वाजता देवाची साग्रसंगीत आरती केली जाते. दुपारी १२ व रात्री ८ वाजता देवास भोग लावला जातो. या मंदिरात रोज सकाळी आणि सायंकाळी दर्शनासाठी परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी येथील भाविकांच्या गर्दीत मोठी वाढ होते. महाशिवरात्र हा या मंदिरातील सर्वांत मोठा उत्सव आहे. हा उत्सव येथे विविध धार्मिक कार्यक्रम आणि अनुष्ठानांद्वारे साजरा केला जातो. या दिवशी येथे शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.