पंचमुखी अमृतेश्वरी गायत्रीदेवी मंदिर

गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड

आद्यशक्ती प्रकृतीच्या पाच स्वरूपापैकी गायत्री देवी एक आहे. वेदमाता वा वेदांची जननी असलेल्या गायत्री देवीची मंदिरे महाराष्ट्रात दुर्मिळ आहेत. त्यातही देवीची पंचमुखी मूर्ती ही अधिक दुर्मिळ समजली जाते. देवीची एकमुखी अथवा त्रिमुखी मूर्ती अनेक ठिकाणी पहावयास मिळतात. रायगड जिल्ह्यातील माणगाव जवळील गोरेगाव या ठिकाणी देवीच्या पंचमुखी मूर्ती असलेले सुमारे शंभर वर्षांहून अधिक प्राचीन मंदिर आहे. येथील देवी शक्ती बुद्धीची दात्री असल्याची मान्यता आहे. जिल्ह्यातील हे गायत्री देवीचे एकमेव मंदिर असल्याचे सांगितले जाते.

शतपथब्राह्मणग्रंथात (१४..१५.) गायत्रीचा अर्थ असा दिला आहे – ‘सा हैषा गयाँस्तत्रे। प्राणा वै गयास्तत्प्राणाँस्तत्रे तद् गयाँस्तत्रे तस्माद् गायत्री नाम।याचा अर्थ असा की गायत्रीने गयांची म्हणजे प्राणांचे रक्षण केले होते. प्राणांना गय म्हटले जाते. गायत्रीने त्या गयांचे रक्षण केले होते म्हणून तिला गायत्री असे नाव पडले. ‘बृहद्‌ योगियाज्ञवल्क्यस्मृतीया ग्रंथात (.१६) असे म्हटले आहे की यथा मधुपुष्पेभ्यो घृतं दुग्धाद्रसात्पयः। एवं हि सर्ववेदानां गायत्रीसार उच्यते।।म्हणजे ज्या प्रमाणे फुलांचे सार मध, दुधाचे सार तूप आणि सर्व रसांचे सार दूध असते, त्याच प्रमाणे वेदांचे सार गायत्रीस म्हटले जाते. स्कंदपुराणातहीगायत्री वेदजननी गायत्रीब्राह्मणप्रसू:’ म्हणजे गायत्री ही वेदांची ब्राह्मणांची माता आहे, असे म्हटलेले आहे

टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने १९६८ साली प्रसिद्ध केलेल्याआदिशक्तीचे विश्वस्वरूप अर्थात देवीकोशया प्रल्हाद कृष्ण प्रभुदेसाई लिखित ग्रंथाच्या पहिल्या खंडात गायत्री देवीची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार, ब्रह्मा, विष्णु महेश हे गायत्रीचे त्रिपाद समजले जातात. या देवीची उपासना शैव वैष्णव या दोन्ही पंथांचे लोक करतात. गायत्री त्रिकाळरूपी आहे. सकाळी गायत्री, दुपारी सावित्री रात्री सरस्वती असे तिचे त्रिकाळरूप आहे. या प्रत्येकाची स्वरूपे वेगवेगळी आहेत. ही देवी पंचमुखी मानलेली आहे. शिव गायत्री, विघ्नेश गायत्री, गरूड गायत्री, दुर्गा गायत्री, विष्णु गायत्री असे गायत्रीचे पाच प्रकार सांगितले आहेत. यावरून कदाचित गायत्री पंचमुखी झाली असावी, असे प्रभुदेसाई यांनी म्हटले आहे. पं. वेणीराम शर्मा गौड वेदाचार्य यांच्यागायत्रीरहस्यम्या ग्रंथात असे म्हटले आहे कीगायत्री ही वैदिक देवता आहे. ती केवळ द्विजांनाच उपास्य असून स्त्री शूद्रांना नाही. त्यामुळे गायत्रीची मंदिरे सर्वत्र आढळत नाहीत.’ 

अशा या देवीचे रायगडमधील प्रसिद्ध मंदिर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माणगावजवळील लोणेरे गावापासून सुमारे किमी अंतरावर गोरेगाव येथेत स्थित आहे. हे मंदिर लक्ष्मणशास्त्री सदाशिव रानडे यांनी १९०४ साली बांधले असल्याचे गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीवर लिहिलेले आहे. आज १२० वर्षाहून अधिक काळ उलटून गेल्यानंतरही लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर मूळ स्वरुपात सुस्थितीत आहे. रस्त्यालगत असलेल्या या मंदिराभोवती आवारभिंत आहे. मंदिराच्या प्रांगणात फरसबंदी आहे. मंदिरासमोर प्राचीन दीपमाळा आहेत. त्यांच्या खाली असलेल्या देवकोष्टकात पोवळे या रत्नात घडवलेली लहान गणेश मूर्ती आहे. दीपमाळेवर १२० वर्षापूर्वीचा संगमरवरी शिलालेख आहे.

मुखमंडप, सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. संपूर्ण सागवानी लाकडात बांधलेले हे दुमजली मंदिर आजही उत्तम स्थितीत आहे. उंच जगतीवर असलेल्या या मंदिराच्या मुखमंडपात जाण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. तिन्ही बाजूने कठडा असलेल्या मुखमंडपास लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात हवा प्रकाश येण्यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपात मध्यभागी यज्ञकुंड आहे. नवरात्रीत या कुंडात होमहवन आदी विधी केले जातात. सभामंडपात प्रत्येकी पाच चौकोनी लाकडी स्तंभांच्या दोन रांगा आहेत. स्तंभांना मध्यभागी लाकडी हस्त त्यावर तुळया आहेत. येथील सर्व स्तंभ खालील बाजूने लाकडी कठड्याने जोडलेले आहेत. सभामंडपात भिंतीलगत भाविकांना बसण्यासाठी कक्षासने आहेत.

पुढे सभामंडपापेक्षा उंचावर असलेल्या अंतराळात जाण्यासाठी दोन पायऱ्या आहेत. अंतराळाच्या समोरील बाजूस चार लाकडी स्तंभ, त्यांमध्ये प्रवेशद्वार दोन्ही बाजूस लाकडी कठडे आहेत. पुढे लाकडी बांधणीचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे येथील लाकडी झडपांना पारदर्शक काचा आहेत. त्यामुळे बंद दारातूनही आतील मूर्तीचे दर्शन घेता येते. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस नक्षीदार लाकडी खिडक्या आहेत. खिडक्यांच्या झडपांवर चौकोनी वर्तुळाकार नक्षी आहे मध्यभागी काचा लावलेल्या आहेत.

गर्भगृहात वज्रपीठावर गायत्री देवीची पंचमुखी दशभुज मूर्ती आहे. ही मूर्ती जयपूरहून येथे आणल्याचे सांगितले जाते. पूर्वाभिमुख देवी पद्मफुलावर आसनस्थ आहे. तिने उजवा पाय खाली सोडलेला आहे. पाच मुखांपैकी मध्यभागी असलेले मुख हे गायत्रीदेवीचे आहे. उजवीकडील पहिले केशरीवर्ण मुख गणेश स्वरूपातील, दुसरे मौतिकवर्ण मुख सूर्य स्वरूपाचे आहे. डावीकडील पहिल्या नीलवर्ण मुखात देवी यम स्वरूपात आहे, तर दुसऱ्या शुभ्रवर्ण मुखात देवी विष्णू स्वरूपात आहे. देवीने हातात पाश, अंकुश, सुत्रबंध, कपाल, शंख, चक्र आदी शस्त्रे धारण केली आहेत. देवीचा एक हात अभय मुद्रेत एक वरदायी मुद्रेत आहे. मूर्तीस उंची वस्त्रे अलंकार परिधान केलेले आहेत. देवीच्या बाजूला पितळी गणेशमूर्ती आहे. रोज सकाळी येथे देवीची विधिवत पूजा होते. संध्याकाळी आरती केली जाते. शारदीय नवरात्रौत्सव हा मंदिरातील मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दहा दिवस मंदिरात होम हवन, भजन, कीर्तन, प्रवचन, जागरण, गोंधळ, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावेळी मुंबईपुण्यासह जिल्ह्यातील शेकडो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, संगीत आदी कला शिबिरे अभ्यासवर्ग चालवले जातात. मंदिरात नित्य अभिषेक आरती साठी येणाऱ्या भाविकांची संख्याही मोठी आहे

उपयुक्त माहिती

  • माणगावपासून १३ किमी, तर महाडपासून २१ किमी अंतरावर
  • गोरेगाव एसटी स्थानकापासून पायी दहा मिनिटांवर
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home