रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पळसदरी येथील श्री स्वामी समर्थांचा मठ वसलेला आहे. हे स्थान आध्यात्मिक शांततेचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. पळसदरी हे नाव या भागात आढळणारी पळस ही वनस्पती आणि डोंगररांगांमधील दरी या शब्दांच्या संयोगातून तयार झाले आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या या मठाला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ पुण्याहून मुंबईला जात असताना येथे २२ दिवस थांबले होते, त्यामुळे या भूमीला विश्राम स्थान किंवा पुण्यनगरी असेही संबोधले जाते. या वास्तव्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ आणि स्वामींच्या प्रत्यक्ष दृष्टांतानुसार या मठाची स्थापना करण्यात आली आहे.
‘अशक्य ही शक्य करतील स्वामी’ अशी असंख्य भाविकांची श्रद्धा असलेल्या स्वामी समर्थ यांचे पूर्वचरित्र अज्ञात आहे. ‘श्री स्वामी चरित्र सारामृता’त अशी आख्यायिका आहे की दत्ताचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती हे अवतार समाप्तीवेळी, इ.स. १४५८मध्ये आंध्र प्रदेशातील श्रीशैल कर्दलीबनात गेले. तेथे त्यांनी ३५० वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एके दिवशी एका लाकूडतोड्याची कुऱ्हाड चुकून या वारुळावर पडली. त्या वारुळातून स्वामी समर्थ प्रकट झाले. अक्कलकोट येथे स्थिर होण्यापूर्वी स्वामींनी भारतभ्रमण केले होते. त्यांनी हिमालयापासून रामेश्वरमपर्यंत प्रवास केला. या प्रवासात स्वामी पुण्याहून मुंबईला जाताना पळसदरीत २२ दिवस थांबले.
हे २२ दिवस या मठाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण काळ मानला जातो. मुंबईतील फलज्योतिष अभ्यासक नारायण ऊर्फ दादा दरेकर यांना स्वामींनी स्वप्नात दृष्टांत दिला. या दृष्टांतात स्वामींनी त्यांना या जागेचे महत्त्व सांगितले आणि तिथे आपला ध्वज फडकवण्याचा आदेश दिला. दादा दरेकर यांनी या सूचनेला ध्येय मानले आणि मठाच्या उभारणीसाठी स्वतःला वाहिले. या मठाचे संपूर्ण बांधकाम स्वामींच्या कृपेने केवळ २२ दिवसांत पूर्ण झाले. ज्याप्रमाणे स्वामींनी येथे २२ दिवस मुक्काम केला, त्याच आकड्याचा मेळ बसवत ही वास्तू वेगाने उभी राहिली.
स्थानिक माहितीनुसार, मठाच्या स्थापनेपूर्वी दादा दरेकर यांनी १ मे ते ७ मे १९९३ या काळात पळसदरी येथील रेल्वेच्या तळ्याकाठी १०८ हवनयुक्त गुरुचरित्राचे पारायण आयोजित केले होते. या सात दिवसांच्या काळात पहिले तीन दिवस स्वामी महाराज प्रत्यक्ष या मंडपात वावरत होते आणि महाप्रसाद घेत होते. मात्र, एका व्याधिग्रस्त व्यक्तीच्या रूपातील स्वामींना ओळखता न आल्याने काही लोकांच्या तक्रारीवरून सेवकांनी त्यांना मंडपाबाहेर काढले. त्यानंतर मठाधिपतींना स्वामींनी दृष्टांत देऊन सांगितले की ‘मी तीन दिवस मंडपात होतो, पण आज मला महाप्रसाद बाहेर देण्यात आला.’ शोध घेऊनही ती व्यक्ती कोठेही आढळली नाही.
पारायणाच्या सांगतेवेळी ७ मे १९९३ रोजी विजेच्या कडकडाटासह मोठा आवाज झाला आणि स्वामींच्या फोटोला घातलेला हार आरतीला उभ्या असलेल्या मुलांच्या गळ्यात येऊन पडला. ही स्वामींच्या वास्तव्याचीच एक खूण मानली जाते. त्याच काळात पारायणासाठी आलेल्या काही तरुणांवर काही कायदेशीर आरोप झाले होते, पण स्वामींच्या कृपेने पारायण समाप्तीला ते सर्व आरोपमुक्त झाले. याबाबत आणखी एक कथा अशी सांगितली जाते की १९९६ मध्ये दत्तजयंतीच्या दिवशी मुंबईचे काही भक्त मठात मुक्कामास होते. त्यावेळी केवळ लंगोटी घातलेल्या एका विचित्र वयोवृद्ध व्यक्तीने मठात प्रवेश केला. त्यावेळी मठात तीव्र दुर्गंधी पसरली होती, मात्र मठाधिपतींच्या सांगण्यावरून एका भक्ताने त्यांच्या अंगावर चादर टाकताच तिथे सुगंध दरवळू लागला. पहाटे ती व्यक्ती तिथून निघून गेली आणि तिथे झेंडूची फुले आढळली. खोपोली-कर्जत मार्गालगत पळसदरी गावाजवळ असलेल्या नक्षीदार कमानीतून मंदिराकडे येण्यासाठी मार्ग आहे. या कमानीवर वरच्या बाजूला मध्यभागी एक मेघडंबरी, तिच्या दोन्ही बाजूला हत्ती आणि त्यांच्या शेजारी तुतारी वाजवणारे मावळे आहेत. येथून काही अंतरावर असलेल्या मठासमोर प्रशस्त वाहनतळ आहे.
मठाच्या चहुबाजुने भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारलेला आहे व त्यावर पत्र्याची शेड आहे. मुख्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या मंडपात प्रवेश होतो. या मंडपात पूजा साहित्य व प्रसाद विक्रीची दुकाने आहेत. याच मंडपात मठाच्या प्रवेशद्वाराजवळ तीर्थरूप दादा दरेकर यांची समाधी आहे. एका पाषाणी बांधणीच्या चौथऱ्यावर त्यांच्या पादुका व त्यापुढे भिंतीत असलेल्या देवळीत त्यांची प्रतिमा आहे. दादा महाराजांचा जन्म १४ ऑगस्ट १९४८ रोजी झाला आणि १० जुलै २०१० रोजी ते दिवंगत झाले. या समाधीच्या मागील बाजूला औंदुंबर वृक्षाखाली असलेल्या लहान मंदिरात स्वामींची उत्सवमूर्ती आहे. मुख्य प्रवेशद्वारातून मठाच्या प्रशस्त सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडपात भाविकांच्या सोयीसाठी दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पुढच्या बाजुला मध्यभागी एक व्यासपीठ आहे. या व्यासपिठाच्या पुढे व गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ गणेशाची एक सुंदर मूर्ती व त्यावर छत्र धरलेला धातूचा मोठा नाग आहे. अंतराळाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर लाकडात कोरलेला नाग आहे. या प्रवेशद्वाराच्या उजवीकडील देवकोष्टकात गणेशाची व डावीकडील देवकोष्टकात स्वामींची उभी मूर्ती आहे. येथून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश होतो.
गर्भगृहात वज्रपीठावर स्वामी समर्थांची चांदीची तेजस्वी मूर्ती प्रतिष्ठित आहे. मूर्तीच्या मागे असलेल्या भिंतीवर स्वामी वटवृक्षाखाली उभे असल्याचे चित्र आहे.
मठातील उत्सवांची परंपरा शिस्तबद्ध आहे. दरवर्षी दत्त जयंती आणि श्री स्वामी समर्थ प्रकट दिन हे दोन मुख्य उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरे होतात. स्वामींची पुण्यतिथी, गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जयंती आणि कोजागिरी पौर्णिमा हे सणही येथे साजरे केले जातात. समाजसेवेचा भाग म्हणून मठाने एक शाळाही दत्तक घेतली आहे.
दर गुरुवारी मठात मोफत अन्नदान आणि रात्री पालखी सोहळा पार पडतो. मठात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दररोज दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत महाप्रसाद दिला जातो. दररोज सकाळी ८ व सायंकाळी ७.३० वाजता येथे आरती होते. आरतीच्या वेळी होणारा शंखनाद आणि टाळांचा आवाज संपूर्ण दरीत प्रतिध्वनित होतो.
मठात स्वामींचे ‘शेजघर’ आहे आणि तिथे स्वामींच्या विश्रांतीची संपूर्ण व्यवस्था अक्कलकोटप्रमाणे केलेली आहे. दररोज सकाळी ७ ते रात्री ८.३० या वेळेत भाविकांना येथे दर्शन घेता येते.