पद्मावती मंदिर

ओझर्डे, ता. वाई, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई शहरापासून जवळ असणाऱ्या ओझर्डे या गावात माता पद्मावतीचे प्राचीन जागृत देवस्थान आहे. मंदिरातील पद्मावती देवीची मूर्ती ही स्वयंभू असून ही देवी नवसाला पावणारी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. ओझर्डे पंचक्रोशीची ग्रामदेवता, अशी या मंदिराची ख्याती आहे. येथील वैशिष्ट्य असे की प्रत्येक आठवड्यात मंगळवारी प्रत्येक पौर्णिमेला पद्मावती देवीचा पालखी सोहळा पार पडतो. शिवपूर्वकाळापासून ही प्रथा असून शेकडो वर्षांनंतर आजही ती पाळली जाते.

पद्मावती देवीबाबत आख्यायिका सांगितली जाते की येथील एक न्हावी समाजातील भाविक दररोज राजापुरी येथे देवीच्या दर्शनाला पायी जात असे. एके दिवशी देवी त्याच्या भक्तीवर प्रसन्न झाली तिने मी तुझ्या गावापर्यंत येते, असे सांगितले. त्यानुसार देवी ओझर्डे गावाजवळील चंद्रगंगा नदीच्या तीरापर्यंत आली तेथे ती लुप्त होऊन त्या जागेवर तिची मूर्ती प्रकट झाली. या जागेवर देवीला वास्तव्य करायचे आहे, असे समजून त्या भाविकाने येथे या स्वयंभू मूर्तीभोवती मंदिराची स्थापना केली. या मंदिराच्या बांधणीचा निश्चित काळ माहिती नसला तरी येथील स्थानिकांच्या माहितीनुसार शिवपूर्वकाळापासून हे मंदिर अस्तित्वात होते.

ओझर्डे गावाच्या मध्यवर्ती भागात पद्मावती देवीचे मंदिर आहे. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार संपूर्ण दगडी बांधकामाचे असून त्याची उंची ५० ते ६० फूट इतकी आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या डाव्या बाजूला दोन चौथरे असून त्यांच्या खालच्या भागात गणेशमूर्ती आहेत. या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावरही गणेशमूर्ती असून द्वारपट्टीच्या वरील भागात काही शिल्पे कोरलेली आहेत. या द्वारपट्टीच्या वरच्या बाजूला नगारखाना आहे. प्रवेशद्वारावर असलेल्या नगारखान्यात जाण्यासाठी एक निमुळती दगडी पायऱ्यांची वाट आहे. त्यातून वर चढल्यावर नगारखान्यात प्रवेश होतो. नगारखान्यात अनेक वाद्यांसोबतच सुमारे २५० किलो वजनाची मोठी घंटा आहे. उत्सवाच्या वेळी येथे नगारा घंटा वादन होते. नगारखान्याला मंदिराकडे असलेल्या लहानशा खिडकीतून संपूर्ण मंदिर परिसराचे तसेच प्रवेशद्वाराच्या बाहेरील बाजूकडे तीन कमानीवजा खिडक्या आहेत, त्यातून ओझर्डे गावाचे विहंगम दृश्य दिसते.

प्रवेशद्वारातून पाच ते सहा पायऱ्या उतरून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. या संपूर्ण परिसरात फरसबंदी असून मध्यभागी पद्मावती देवीचे प्राचीन हेमाडपंती रचनेचे मंदिर आहे. मंदिराच्या शेजारी दोन दगडी दीपमाळा आहेत़, तर मंदिराच्या समोरील बाजूस तुळशी वृंदावन आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात अखंड पाषाणातील नंदी देवीची पालखी आहे. गर्भगृहात मोठ्या चौथऱ्यावरील मखरामध्ये पद्मावती देवीची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे. देवीचा मुकुट डोळे चांदीचे आहेत.

दर मंगळवारी पौर्णिमेला पद्मावती देवीची पालखी जवळच असणाऱ्या तुकाई देवी, लक्ष्मीमाता मारुतीच्या भेटीला जाते. दर आठवड्याला निघणाऱ्या या पालखीत शेकडो ग्रामस्थ सहभागी होतात. अशी आख्यायिका आहे की या गावच्या मुख्य ग्रामदेवतेचा मान पूर्वी तुकाई देवीकडे होता. तुकाई देवीने तो मान स्वतःहून पद्मावती देवीला दिला. तेव्हापासून पद्मावती देवी हीच पंचक्रोशीचे ग्रामदैवत आहे.

चैत्र शुद्ध चतुर्थी आणि पंचमीला येथील वार्षिक यात्रा असते. पहिल्या दिवशी रात्री वाजता पद्मावती आईची मूर्ती चांदीच्या पालखीत ठेऊन पालखी विविध फुलांनी सजविली जाते. या पालखीचे दर्शन घेण्यासाठी ओझर्डे गावच्या रस्त्यांवर भाविक गर्दी करतात. ढोल, लेझीम आणि झांजांच्या तालावर भाविक तल्लीन होतात. यात्रेच्या दोन दिवसांत नवस बोलण्यासाठी फेडण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी या मंदिरात होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी येथे कुस्त्यांचे फड रंगतात. त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक नामांकित मल्ल सहभागी होतात.

फाल्गुन शुद्ध चतुर्थीला येथे सोंगे काढली जातात. ओझर्डे येथील सोंगांचा सोहळा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या सोंगांमध्ये कोणी देवीचा पेहराव करतो तर कोणी श्रीराम, श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज आदी देवीदेवतांचा. या सर्व सोंगांची येथे मिरवणूक काढली जाते. सोंगांचा हा सोहळा रात्रभर चालतो तो पाहण्यासाठी येथे मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • वाईपासून किमी, तर सातारा शहरापासून ३२ किमी अंतरावर
  • वाई येथून ओझर्डेसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
Back To Home