रत्नागिरी जिल्ह्यातील आबलोली आणि खोडदे या शेजारी गावांमधील नवलाई देवीची तीन स्वतंत्र मंदिरे पंचक्रोशीतील भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. कोकणातील प्रमुख उत्सव असलेल्या शिमगोत्सवादरम्यान गावच्या सहाणेवर देवीच्या पालखीसमोर गावचे मानकरी एका विशिष्ट प्रकारे उघड्या अंगावर धारदार शस्त्राने स्वतःवर घाव मारतात. ‘हाणून घेणे’ अशी ही प्रथा येथे वर्षानुवर्षे सुरू आहे. यादरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारची इजा होत नाही, हे येथील वैशिष्ट्य असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे.
गुहागर तालुक्यातील बाजारपेठेचे ठिकाण असलेले आबलोली हे गाव निसर्गरम्य परिसरात वसलेले आहे. आजूबाजूला असलेली हापूस आंब्यांची झाडे, फणस, काजूच्या बागा, पारंपरिक कोकणी पद्धतीची कौलारू घरे अशा सुंदर वातावरणात ग्रामदेवता नवलाई देवीचे मंदिर आहे. काहीशा उंचावरील या मंदिरात येण्यासाठी चिरेबंदी पाखाडी चढून यावे लागते. आता या मंदिरापर्यंत येण्यासाठी रस्ता बनविण्यात आल्यामुळे वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात. निसर्गसमृद्ध परिसरात वसलेल्या या मंदिरासमोरील एका चौथऱ्यावर अखंड काळ्या दगडात घडवलेली नंदीची मूर्ती आहे. जमिनीपासून तीन फूट उंचीच्या जोत्यावर हे मंदिर आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. येथील सभामंडप अर्धमंडप प्रकारातील आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळच शिवपिंडी आहे. येथील चौथऱ्यावर नवलाई देवी, केदार, वरदान देवी, चंडिका देवी, कालिका देवी, लबाई देवी आणि मानाई देवी या सप्तदेवता आहेत.
या मंदिरात शिमगोत्सवाबरोबरच वर्षभर अनेक उत्सव होतात. फाल्गुन शुद्ध पंचमीला पहिली होळी पेटवल्यानंतर शिमगोत्सवाला सुरुवात होते. फाल्गुन पौर्णिमेला सकाळी होम (होळी) लागतो. दुपारनंतर येथील सहाणेवर (होमाचे मैदान) जत्रा भरते. येथे होणाऱ्या हाणून घेण्याच्या विधीसाठी मानकरी नऊ दिवस देवीचा उपवास करतात. याच दिवशी देवीचे विडेही भरले जातात. शिमगोत्सवादरम्यान मंदिरातील सर्व देवतांची पालखी घरोघर जाते. सुमारे २० दिवस पालखी गावात फिरते. पालखीच्या स्वागतासाठी घरोघरी सडासंमार्जन, रांगोळ्या, रोषणाई, गोडधोडाचे जेवण केले जाते. पालखी घरी आल्यावर भाविक देवीची खणा–नारळाने ओटी भरतात. यावेळी नवस बोलले जातात, तसेच फेडलेही जातात. कुटुंबीयांच्या कल्याणासाठी देवीकडे साकडेही घातले जाते. पालखी देवळात जाताना देवीची मिरवणूक काढण्यात येते. यावेळी सर्वांना प्रसाद देण्यात येतो. देवदिवाळीला सर्व ग्रामस्थ मंदिरात जमतात. त्यावेळी प्रथम देवाला रूपे लावून दिवा ओवाळला जातो. त्यानंतर मानकरी आणि पाहुण्यांनाही दिवा ओवाळून मान दिला जातो. दरवर्षी घातल्या जाणाऱ्या देवीच्या गोंधळाला ग्रामस्थांसह चाकरमानीही आवर्जून येतात. या दिवशी येथे जत्रेचे स्वरूप आलेले असते. रक्षाबंधन (पोते), देवदिवाळी, जागर, गोंधळाच्या उत्सवादरम्यान देवीला रूपे लावून सजवले जाते.
या गावाला लागूनच असलेल्या खोडदे गावात सहाणवाडी आणि गणेशवाडी येथे नवलाईची दोन मंदिरे आहेत. देऊळवाडीतील मंदिराचा मे २०१७ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. या मंदिराला जांभ्या दगडाची तटबंदी आहे. विस्तीर्ण प्रांगणात फरसबंदी करण्यात आलेली आहे. दर्शनमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. येथे एका चौथऱ्यावर डावीकडून केदार, नवलाई देवी, वरदान देवी, सोनसाखळी देवी, त्रिमुखी आणि चंडिका देवी यांच्या मूर्ती आहेत. येथे शिमगोत्सव, नवरात्रोत्सवासह वर्षभर अनेक उत्सव होतात.
खोडदे गावातील या दोन्ही बहिणींची आबलोलीतील तिसऱ्या बहिणीशी होणारी गळाभेट हा येथील मोठा सोहळा असतो. या बहिणी येथे असलेल्या भाऊ गोपाळजीला भेटून आल्यानंतर तिन्ही पालख्या येथील होळीच्या मैदानावर नाचवल्या जातात. नंतर पहिली पालखी भेटून गेल्यानंतर दुसरी पालखी आबलोलीतील देवीला भेटते. एक पालखी आबलोलीतील देवीला भेटत असताना एका बाजूला ग्रामस्थ दुसरी पालखी नाचवत असतात. या भेटीसाठी दोन्ही गावांतील लोक पालखी नाचवणाऱ्या भक्तांना उचलून घेतात. त्यांच्या खांद्यावरील पालख्यांची सनईचे सूर, ढोल–ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत गळाभेट घडवण्यात येते. असे सांगितले जाते की आबलोलीत होणाऱ्या या तिन्ही बहिणींच्या गळाभेटीदरम्यान पालख्यांमधील नारळांची आपोआप अदलाबदल होते.