नारायण सरस्वती महाराज समाधी मंदिर

रानअंत्री, ता. चिखली, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेले रानअंत्री हे गाव नाथसंप्रदायातील एक महत्त्वाचे शक्तिपीठ मानले जाते. या पावन भूमीला परमपूज्य परमहंस नारायण सरस्वती महाराज यांच्या वास्तव्याने आणि त्यांच्या प्रदीर्घ तपश्चर्येने एक विशेष आध्यात्मिक वलय प्राप्त झाले आहे. ‘सोऽहं’ महामंत्राचा जप करत ध्यानातून जीवनातील आनंदाची कला आत्मसात करण्याचा मार्ग दाखवणाऱ्या महाराजांनी येथे वयाच्या ११४ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. देश-विदेशातील हजारो अनुयायांचे श्रद्धास्थान असलेल्या या क्षेत्राला राज्य सरकारने ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे. दरवर्षी कार्तिक वद्य द्वादशीला भरणारी मोठी जत्रा आणि त्यावेळी देण्यात येणारा चटणी-पुरीचा महाप्रसाद सर्वत्र प्रसिद्ध आहे.

नारायण सरस्वती महाराजांचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांचे मूळ नाव परमानंद होते. मात्र गुरूंनी दिलेल्या आज्ञेनुसार त्यांनी नारायण सरस्वती हे नाव धारण केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बोरगाव बाजार येथे त्यांचे गुरू वास्तव्यास होते. महाराजांचा जन्म पैठणजवळील दहिठण या गावी झाला. बालपणीच त्यांच्यावर दुःखाचे डोंगर कोसळले. वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले आणि अवघ्या १२ व्या वर्षी त्यांच्या मातेचेही निधन झाले. आईच्या अस्थींचे विसर्जन नाशिकच्या गोदावरी पात्रात केल्यानंतर त्यांनी प्रापंचिक ओढ सोडून दिली आणि ते तपश्चर्या करण्यासाठी थेट पंजाबमध्ये निघून गेले. पंजाबमधील १६ वर्षांच्या वास्तव्यात त्यांनी तेथील गुरुमुखी भाषा आणि संस्कृती आत्मसात केली. आजही पंजाब प्रांतात त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे. पंजाबमधील तपश्चर्या पूर्ण झाल्यावर त्यांनी सहा वर्षे भारतभ्रमण करत चारधाम यात्रा केली आणि त्यानंतर ते महाराष्ट्रात परतले.

महाराष्ट्रात परतल्यानंतर त्यांनी विविध ठिकाणी दीर्घकाळ वास्तव्य केले. यामध्ये करतवाडी, जाफराबाद, वरुड, साठेगाव सावंगी, कसबाखेड, आमसरी, जळगाव सपकाळ, पालखेड आणि जांभोरा यांसारख्या अनेक गावांचा समावेश होतो. त्यांच्या आयुष्यातील शेवटची १३ वर्षे त्यांनी रानअंत्री येथे व्यतीत केली. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी वास्तव्य केले, त्या सर्व ठिकाणी आपले शिष्य घडवले. त्यांच्या शिष्यपरंपरेमध्ये रामानंद महाराज, प्रेमानंद महाराज, स्वात्मानंद महाराज, प्रकाशानंद महाराज, गजानन महाराज गुप्ते आणि अशा अनेक थोर विभूतींचा समावेश होतो. विशेष म्हणजे, शेगावचे संत गजानन महाराज देखील नारायण सरस्वती महाराजांची भेट घेण्यासाठी रानअंत्री येथे येत असत, अशा आठवणी स्थानिक भाविकांकडून सांगितल्या जातात. १२ नोव्हेंबर १९१० रोजी कार्तिक वद्य द्वादशीच्या मुहूर्तावर त्यांनी वयाच्या ११४ व्या वर्षी संजीवन समाधी घेतली.

रानअंत्री गावाचा इतिहासही तितकाच रंजक आहे. प्राचीन काळी या गावाला राजअंत्री या नावाने ओळखले जात असे. देवगिरीहून आलेल्या चव्हाण सरदारांनी हे गाव वसवले होते. त्यांच्यासोबत आलेल्या बारा बलुतेदारांमुळे गावाला एक पूर्णत्व प्राप्त झाले. चव्हाण सरदारांच्या वंशजांनी पुढे ‘झाल्टे’ हे आडनाव स्वीकारले आणि आजही गावात त्यांचा ऐतिहासिक ‘झाल्टेवाडा’ दिमाखात उभा आहे. या वाड्याच्या परिसरातच नारायण सरस्वती महाराज ध्यानधारणा करत असत. महाराजांच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या जागेवर त्यांचे शिष्य बी. के. सुबय्या यांनी एक तीनमजली ध्यानगृह उभारले आहे. या ध्यानगृहात महाराजांचे विश्रांतीस्थान आहे. तेथे त्यांची गादी, प्रतिमा आणि पादुका जतन करून ठेवल्या आहेत. या वास्तूच्या तळघरात महाराजांचे मूळ ध्यानस्थळ आहे. येथील भिंतीवर असलेले ब्रह्मयंत्र या जागेच्या आध्यात्मिक महत्त्वात भर घालते.

समाधी मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. काळ्या पाषाणाचे बांधकाम असलेल्या या मंदिराचे स्वरूप खुला सभामंडप, गर्भगृह व त्याखाली समाधी स्थान असे आहे. प्रांगणातून सहा पायऱ्या चढून मंदिराच्या खुल्या सभामंडपात प्रवेश होतो. १९१२ मध्ये हा सभामंडप उभारला आहे. या सभामंडपातील लोखंडी खांब विशेष लक्ष वेधून घेतात. हे खांब त्या काळी कोलकात्याहून रेल्वेने शेगावपर्यंत आणि तिथून बैलगाड्यांमधून रानअंत्रीला आणण्यात आले होते. सभामंडपातून तीन पायऱ्या चढल्यानंतर गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपाल शिल्पे असून ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. या गर्भगृहात वज्रपीठावर श्रीदत्ताची शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. या गर्भगृहाच्या दोन्ही बाजूंनी, सभामंडपातून खाली तळमजल्यावरील समाधी स्थानाकडे जाण्यासाठी पायऱ्या आहेत. समाधीकडे जाण्याआधी नारायण सरस्वती महाराजांचा ध्यानकक्ष लागतो. समाधीस्थळी नारायण सरस्वती महाराजांची अष्टधातूपासून बनवलेली भव्य मूर्ती प्रतिष्ठापित आहे. सुमारे सहा टन वजनाची ही मूर्ती नाशिकचे प्रसिद्ध शिल्पकार विजय बुऱ्हाडे यांनी साकारली आहे. ही मूर्ती नाशिकहून मोठ्या दिंडी सोहळ्याने रानअंत्री येथे आणण्यात आली होती. बैठ्या अवस्थेतील या मूर्तीचा एक हात गुडघ्यावर तर एक हात मांडीवर आहे. मूर्तीवर मुकुट आहे. मूर्तीसमोर पादुका आहेत. याच मंदिर परिसरात गजानन महाराज गुप्ते यांच्याही पादुका आहेत. गर्भगृहावर वरच्या दिशेने निमुळत्या होत जाणाऱ्या शिखरावर चार चौकोनी स्तर आहेत. त्यावर असलेल्या देवकोष्टकांमध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती आहेत. वरच्या बाजूस द्विस्तरीय आमलक व कळस आहे. या मंदिराच्या मागे दगडी दीपस्तंभ व तुळजाभवानीचेही छोटे मंदिर आहे. नजीकच नारायण सरस्वती महाराजांच्या काही शिष्यांच्या समाध्या आहेत.

येथील उत्सवांची परंपरा खूप जुनी आहे. रानअंत्री येथे महाराष्ट्रासह फ्रान्स, अमेरिका आणि जपान यांसारख्या देशांतूनही अनेक लोक साधनेसाठी येतात. महाशिवरात्रीला येथे सात दिवसांचा मोठा उत्सव साजरा होतो. त्यात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. येथील सर्वात मुख्य सोहळा कार्तिक वद्य द्वादशीचा असतो.

तीन दिवस चालणाऱ्या या जत्रेत अभिषेक आणि काल्याच्या कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात. या यात्रेत शंभर वर्षांपासून चालत आलेली चटणी-पुरीच्या महाप्रसादाची परंपरा हे एक प्रमुख आकर्षण आहे. पूर्वीच्या काळी वाहतुकीची साधने कमी असल्यामुळे भाविकांना घरी परतण्यासाठी खूप वेळ लागत असे.

प्रवासात अन्न खराब होऊ नये आणि ते जास्त वेळ टिकावे, या उद्देशाने चटणी आणि पुरी देण्यास सुरुवात झाली. ही साधी परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे.

उपयुक्त माहिती

  • चिखली येथून २० किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ४४ किमी अंतरावर
  • चिखली व बुलडाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

नारायण सरस्वती महाराज समाधि मंदिर

रणंत्री, ताल। चिखली, जिला. बुलढाणा

Back To Home