शिलाहार राजांपासून पेशव्याच्या काळापर्यंत गुहागर या गावाला खास तीर्थस्थानाचा दर्जा आहे. भक्ती आणि निसर्गसौंदर्य यांचा सुंदर मिलाफ येथे पाहायला मिळतो. दुर्गम वाटणारे हे गाव येथील प्रसिद्ध तीर्थस्थाने व पर्यटनामुळे आता समृद्ध होत चालले आहे. या समृद्ध भूमीत अतिप्राचीन असे घारंभटाचा (गारमठ) नारायण मंदिर प्रसिद्ध आहे. शरण आलेल्यांच्या वेदना हरण करणारा, सर्पदंश व विंचू दंशाच्या पिडेपासून त्वरित आराम देणारा हा नारायण आहे, अशी परिसरात या देवाची ख्याती आहे.
व्याडेश्वर माहात्म्यात या देवस्थानाचा उल्लेख गारमठ व घारंभट नारायण असा केलेला आहे. या पोथीमध्ये उल्लेख केल्यानुसार, प्राचीन काळी आजाराने ग्रस्त असलेल्या एका महान तपस्वीने श्रीकृष्णाला प्रसन्न करून घेण्यासाठी येथे खडतर तपश्चर्या केली होती. त्याच्या तपावर संतुष्ट झालेल्या श्रीकृष्णाने त्याला पूर्ण निरोगी केले. तेव्हापासून हे स्थान सर्व व्याधींवर मुक्ती मिळणारे ठिकाण म्हणून प्रसिद्ध झाले. घारे आडनावाच्या एका ब्राह्मणाने येथे मठ स्थापन करून त्यात कृष्णाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. तेव्हापासून कृष्णाच्या पूजा–अर्चेची परंपरा येथे सुरू झाली. त्यानंतर हे स्थान घारेमठ वा घारंभटाचे देऊळ म्हणून प्रसिद्ध झाले. पुढे घारेमठाऐवजी गारमठ हे नाव प्रचलित झाले.
‘मोठमोठ्या विषरोगांवर जो नियंत्रण ठेवतो, तो देव येथे विराजमान आहे. शरणागतांच्या वेदना हरण करणाऱ्या या गारमठ देवाचा महिमा लोकांत प्रसिद्ध आहे. जे लोक या देवाला शरण येतात, त्या क्षणापासून त्यांची पापांपासून, रोगांपासून, सर्पदंश वा वृश्चिकदंश (विंचू दंश) यांच्या पिडेतून सुटका होते. ज्या ठिकाणी हा गारमठाचा नारायण उपस्थित आहे, ते परशुरामक्षेत्र धन्य आहे आणि गारमठ नारायणाची उपासना करतात ते मानवदेखील धन्य होत. तो फुललेल्या कमलाप्रमाणे नेत्र व मुख धारण करणारा, कौमोदकी गदा, कमळ, शंख व चक्र बाळगणारा देवाधिपती भगवान गारमठ या संपूर्ण त्रिभुवनाचे अपायापासून रक्षण करो’, असा या मंदिराबाबतचा उल्लेख इ. स. १६३७ मध्ये कवी विश्वनाथ यांनी लिहिलेल्या व्याडेश्वर माहात्म्य या पोथीत आहे. त्यावरून हे स्थान खूप प्राचीन असावे, याची खात्री पटते.
गुहागर गावापासून काही अंतरावर एकांतात व निसर्गसमृद्ध परिसरात घारंभटाचे मंदिर आहे. मंदिराच्या प्रशस्त आवारात मोठे बांधीव तळे असून त्यात विविधरंगी कमळे फुललेली असतात. साधारणतः तीन फूट उंचीच्या चौथऱ्यावर हे दुमजली कौलारू मंदिर आहे. खुला दर्शनमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. चार ते पाच पायऱ्या चढून दर्शमंडपात प्रवेश होतो. दर्शनमंडपात सुमारे दोन फूट उंचीच्या चिऱ्याच्या अर्धभिंती व बसण्यासाठी कट्टे बांधलेले आहेत. मंदिराच्या संपूर्ण बांधकामात चिऱ्याचे दगड व लाकडांचा वापर केलेला आहे. येथील सभामंडप पारंपरिक जुन्या पद्धतीच्या मंदिरात असतो तसा आहे; परंतु त्यातील चार मोठ्या लाकडी खांबांवरील केलेली अतिशय कोरीव व वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर हे येथील वैभव समजले जाते. असे लाकडावरील कोरीव काम कोकणातील मंदिरांमध्ये अभावानेच आढळते.
गर्भगृहाचे प्रवेशद्वार कमानीच्या आकाराचे असून त्यावर वेली, फुले व वरील बाजूस मुरली वाजविणारा श्रीकृष्ण कोरलेला आहे. गर्भगृहात सुमारे तीन ते साडेतीन फूट उंचीची नारायणाची अखंड दगडीतील मूर्ती आहे. या मूर्तीवरही सुबक कोरीवकाम केलेले दिसते. नारायणाचा मुकुट व अलंकार हे सोनेरी रंगात रंगविल्यामुळे मूर्तीचे सौंदर्य आणखी वाढते. डोक्यावर मुकुट, कानात कर्णकुंडले, गळ्यात माळ, कमरपट्टा, चार हातांपैकी उजवीकडील वरील हात आशीर्वाद देताना, खालील हातात शंख, डावीकडील वरील हातात गदा व खालील हातात सुदर्शन चक्र आहे. नारायणाच्या पायाशी उजवीकडे गरुडदेवता व डावीकडे देवी लक्ष्मी आहे. हे मंदिर पूर्वीपासून खरे कुटुंबीयाच्या मालकीचे आहे. आता ते येथील प्रसिद्ध व्याडेश्वर देवस्थानाकडून दत्तक घेण्यात आले आहे.
या मंदिराच्या शेजारी गणपतीचे मंदिर आहे. या गणेश मंदिराची रचनाही घारंभटाच्या मंदिराप्रमाणे आहे. खुला सभामंडप, अंतराळ व गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. येथील गर्भगृहात गणपतीची बैठी मूर्ती असून त्या बाजूला रिद्धी आणि सिद्धी आहेत. घारंभट देवस्थानातील पूजाविधीसाठी पेशव्यांकडून दरवर्षी पाच रुपये खरे कुटुंबाला मिळत असत, तशी सनद उपलब्ध आहे. त्यानंतर इंग्रजांनीही कै. शिवराम गोविंद खरे (जन्म १८४६ व मृत्यू १८९६) यांच्या नावे ही सनद कायम ठेवली होती. कृष्णजन्माष्टमीला (श्रावण वद्य अष्टमी) येथे मोठा उत्सव साजरा केला जातो. दररोज सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.