नृसिंह मंदिर

चांडोळ, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील चांडोळ येथील नृसिंह मंदिर हा ११व्या – १२व्या शतकातील एक समृद्ध ऐतिहासिक वारसा आहे. यादव कालखंडात उभारलेले हे मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैलीचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते. या मंदिराचे अष्टकोनी स्वरूप आणि प्रवेशद्वारावरील १३ शिवलिंगांचे दुर्मिळ शिल्प यामुळे या वास्तूला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या मंदिरात नृसिंहाच्या मुख्य मूर्तीसोबतच दोन शिवलिंगांचीही स्थापना केलेली आहे. हे मंदिर शैव-वैष्णव समन्वयाचे एक उत्तम प्रतीक मानले जाते. चांडोळ गावाची एकेकाळी मंदिरांचे गाव अशी ओळख होती. येथे आजही हेमाडपंती शैलीतील इतर तीन मंदिरे अस्तित्वात आहेत. त्यांपैकी प्रसिद्ध असलेले खोल महादेवाचे मंदिर नृसिंह मंदिराच्या शेजारीच आहे.

हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याच्या संहारासाठी आणि भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूंनी नृसिंह अवतार धारण केला, असा उल्लेख विविध पौराणिक कथांमध्ये आढळतो. या अवताराचे महत्त्व अधोरेखित करताना श्रीमद्भागवत, महाभारत, लिंगपुराण, मत्स्यपुराण, पद्मपुराण, ब्रह्मांडपुराण, वायुपुराण आणि देवी भागवत यांसारख्या अनेक ग्रंथांनी या रूपाचे सविस्तर वर्णन केले आहे. संपूर्ण भारतात नृसिंहाच्या विविध प्रकारच्या मूर्ती आहेत. यामध्ये प्रामुख्याने हिरण्यकश्यपूचा वध करतानाचे रौद्र रूप अधिक प्रचलित असले, तरी काही ठिकाणी लक्ष्मीच्या सान्निध्यात असलेले शांत रूप किंवा योगासनात बसलेले नृसिंहही आढळतात. भारतात नृसिंहांची मोजकीच मंदिरे असली, तरी विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद आणि मेहकर येथे या देवतेची प्राचीन मंदिरे आहेत. त्यांपैकी मेहकर येथील मूर्तीचा उल्लेख स्कंदपुराण आणि गीतामहात्म्यामध्येही येतो. या उल्लेखामुळे या क्षेत्राचे धार्मिक महत्त्व अधोरेखित होते.

चांडोळ येथील नृसिंह मंदिराबाबत असे सांगितले जाते की हे मंदिर पूर्वी शिवालय होते. सुमारे पाचशे वर्षांपूर्वी येथे उपासना करणाऱ्या एका वैराग्याला भगवान नृसिंहाने दृष्टांत दिला. या दृष्टांतात भगवंताने सांगितले की ‘मी मंदिरासमोर असलेल्या बारवेमध्ये आहे, मला तेथून काढून माझी प्रतिष्ठापना कर’. या दैवी आदेशानुसार बारवेतून मूर्ती बाहेर काढून तिची मंदिरात स्थापना करण्यात आली. मात्र, ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मधील नोंदीनुसार, सध्या गाभाऱ्यात असलेली मूर्ती ही मूळ मूर्ती नाही. काळाच्या ओघात जुन्या मूर्तीचे भंजन झाल्यामुळे तिथे नवीन मूर्ती बसवण्यात आली असावी, असे त्यात नमूद केले आहे. पूर्वी मंदिर परिसरात असलेली ती बारव आता बुजवण्यात आली आहे. त्या बारवेमध्ये महत्त्वाचे शिलालेख आणि काही मूर्ती होत्या. याच गॅझेटियरमधील नोंदीनुसार, १९१० च्या सुमारास मंदिराच्या दिवाबत्तीच्या आणि दैनंदिन खर्चासाठी वार्षिक सहा रुपयांची इनाम जमीन भाडेपट्ट्याने देण्यात आली होती.

मंदिराची मुख्य वास्तू उत्तराभिमुख आहे. तिचा अष्टकोनी तलविन्यास वास्तुशास्त्राच्या त्यावेळच्या प्रगत स्वरूपाची साक्ष देतो. या मंदिराची संरचना अत्यंत नियोजनबद्ध आहे. त्यामध्ये दर्शनमंडप, सभामंडप, अंतराळ, मुख्य गर्भगृह तसेच दोन उपगर्भगृह यांचा समावेश होतो. दर्शनमंडपाच्या दर्शनी भागात चार स्तंभ असून ते स्तंभपादांवर उभे आहेत. या स्तंभांच्या दंडावर विविध भौमितिक आकार कोरलेले आहेत. त्यामध्ये मंगलकलश आणि कीर्तीमुखांची नक्षीही दिसते. दर्शनमंडपात दोन्ही बाजूंना बसण्यासाठी कक्षासने आहेत. येथे असलेल्या चार देवकोष्टकांमध्ये सध्या मूर्ती नाहीत, परंतु भिंतीवरील एका देवकोष्टकात आजही एक प्राचीन मूर्ती कोरलेली दिसते.

सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. त्यानजीकच एका मोठ्या दगडी पट्टीवर आडव्या आणि उभ्या ओळींमध्ये विविध देवदेवतांच्या मूर्तींचे कोरीव काम केलेले आहे. या शिल्पाच्या सर्वात खालच्या पट्टीत १३ शिवलिंगे कोरलेली आहेत. हे मंदिराचे एक वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ अंग मानले जाते. प्रवेशद्वाराच्या स्तंभशाखांवर कलाकुसर आहे आणि खालच्या बाजूस द्वारपाल कोरलेले आहेत. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावरही नक्षीकाम आहे. द्वारपट्टीच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आणि खालील बाजूस राक्षसाचे कीर्तीमुख कोरलेले आहे.

मंदिराच्या चौकोनी सभामंडपात चार स्तंभ आहेत. या स्तंभांवरही कलश आणि कीर्तीमुखांचे कोरीव काम आहे. हे मंदिर त्रिकूट स्वरूपाचे असल्याने, यामध्ये मुख्य गर्भगृहाव्यतिरिक्त दोन उपगर्भगृहे आहेत. या दोन्ही उपगर्भगृहांच्या द्वारशाखांवर वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसर आहे आणि त्यात विविध देवदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. या दोन्ही उपगर्भगृहांमध्ये शिवपिंडी आहेत. मुख्य गर्भगृहाबाहेरील अंतराळात असलेल्या दोन देवकोष्टकांपैकी एका कोष्टकात प्राचीन मूर्ती आहे. येथील द्वारशाखांवरही कोरीव काम आहे. या गर्भगृहामध्ये भगवान नृसिंहाची मूर्ती विराजमान आहे. ही मूर्ती साध्या स्वरूपाची आणि उभ्या स्थितीतील आहे. ती भगवान नृसिंह हिरण्यकश्यपू राक्षसाचा वध करत असल्याचे रौद्र रूप दर्शवते. मूर्तीच्या वरच्या आणि खालच्या बाजूस इतर लहान मूर्ती कोरलेल्या आहेत. या मुख्य मूर्तीच्या मागे एक दगडी चौकट आहे. त्यामागे एक भुयारी मार्ग असल्याची लोकवदंता आहे. असे म्हटले जाते की हा मार्ग काही अंतरावर असलेल्या महालक्ष्मी मंदिराच्या टेकडीपर्यंत जातो. मात्र सध्या सुरक्षेच्या कारणास्तव ही चौकट कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहे.

मंदिराच्या बाह्य रचनेत काळाच्या ओघात अनेक बदल झाले आहेत. मंदिराच्या गर्भगृहावरील मूळ शिखर नष्ट झाले असावे; कारण सध्याचे शिखराचे काम हे नंतरच्या काळात विटा आणि चुन्याचा वापर करून पूर्ण करण्यात आले आहे. मंदिर परिसरातील एका जुन्या झाडाखाली काही प्राचीन जैन मूर्ती आहेत.असे सांगितले जाते की या परिसरात पूर्वी मंदिरांचे मोठे संकुल होते. या मंदिराजवळच पेव्हर ब्लॉकची फरसबंदी असलेल्या प्रांगणात महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. हे मंदिर खोल महादेव मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेले हे मंदिर नृसिंह मंदिराच्या समकालीन असावे, असा अंदाज वर्तवला जातो. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिरासमोर अखंड पाषाणातील नंदीची मोठी मूर्ती आहे. या मूर्तीच्या मागील बाजूस एक जुनी मूर्ती आणि छोटे शिवलिंग आहे. मंदिरासमोर यज्ञकुंड आहे, मात्र सध्या येथे सभामंडप नाही. येथील दगडी फरसबंदीच्या अवशेषावरून येथे पूर्वी सभामंडप असावा, सांगितले जाते.

या मंदिराच्या गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. त्यात खालच्या भागात कीर्तीमुख कोरलेले आहे. हे गर्भगृह जमिनीच्या पातळीपेक्षा खोल असल्याने पायऱ्या उतरून खाली जावे लागते, म्हणूनच याला खोल महादेव किंवा खोलेश्वर महादेव असे म्हटले जाते. गर्भगृहात उतरण्यासाठी असलेल्या पायऱ्या उंच आणि एकदम सरळ असल्यामुळे काळजीपूर्वक उतरावे लागते. गर्भगृहाच्या मध्यभागी एका मोठ्या शाळुंकेत लंबगोलाकार शिवलिंग आहे. या मंदिराचे बांधकामही अर्धे दगडी तर अर्धे विटांचे आहे.

चांडोळ येथे दरवर्षी वैशाख शुद्ध चतुर्दशीला नृसिंह जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. वैशाख शुद्ध सप्तमीपासून या उत्सवाची सुरुवात होते. दहा दिवसांच्या या काळात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन आणि अभिषेकाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. नृसिंह जयंतीच्या दिवशी भगवंताच्या रौद्र मूर्तीला शांत करण्यासाठी शीतल चंदनाचा लेप लावण्याची एक विशेष प्रथा येथे जपली गेली आहे. या दिवशी भाविक उपवास करतात आणि सायंकाळी भगवंताचा प्रकट दिन साजरा करतात. उत्सवाच्या शेवटी देवाची पालखी संपूर्ण गावातून काढली जाते. त्यामध्ये पंचक्रोशीतील भाविक सहभागी होतात.

उपयुक्त माहिती

  • बुलडाणा येथून ३६ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवासाची सुविधा आहे

नरसिम्हा मंदिर

चंदोल, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा

Back To Home