नंदीकेश्वर / तिळसेश्वर मंदिर

तिळसे, ता. वाडा, जि. पालघर

महर्षी वेदव्यासांनी वैतरणा नदीस पापनाशिनी असे म्हटलेले आहे. महाभारतामधील वनपर्वात असा उल्लेख आहे की ‘ततस्त्रिविष्टपं गच्छेत् त्रिषु लोकेषु विश्रुतम् । तत्र वैतरणी पुण्या नदी पापप्रणाशिनी ।।’ याचा अर्थ असा की ‘त्यानंClear cacheतर तिन्ही लोकांत विख्यात अशा त्रिवष्टपतीर्थास (लोकांनी) जावे. तेथे वैतरणी ही पापनाशिनी नदी आहे.’ अशा या नदीच्या पात्रातच एका मोठ्या खडकावर तिळसे गावातील नंदीकेश्वर महादेव मंदिर वसलेले आहे. या प्राचीन मंदिराजवळील नदीपात्रातच वास्तव्य करणारे दीड ते दोन फूट लांबीचे हजारो देवगुणी मासे हे येथील वैशिष्ट्य समजले जाते.

वैतरणी या नदीनामाचा अर्थ ‘वै’ म्हणजे खरोखर आणि ‘तरणी’ म्हणजे वाचवणारी असा सांगितला जातो. महाभारतामध्ये व्यासऋषींनी वैतरणीबाबत पुढे असेही म्हटले आहे की या नदीत स्नान करून शंकराची पूजा करणारा मनुष्य शुद्धचित्त होऊन परमगतीस प्राप्त करतो. (‘तत्र स्नात्वार्चयित्वा च शूलपाणिं वृषध्वजम्। सर्वपापविशुद्धात्मा गच्छेत परमां गतिम्।।’ – महाभारत, वनपर्व, तीर्थयात्रापर्व, अध्याय ८३, श्लोक ८५). यामुळे येथील नंदीकेश्वर महादेव मंदिरात पूजा करण्यासाठी असंख्य भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. भारतात अन्यत्र कुठेही न आढळणारे व नदीला कितीही पूर आला तरी मंदिराजवळील डोहातून कुठेही न जाणारे देवगुणी मासे पाहण्यासाठीही येथे भाविक व पर्यटक कायम येत असतात.

येथील नंदीकेश्वर मंदिराची पौराणिक आख्यायिका अशी की पांडव वनवासात असताना जेथे जेथे त्यांना स्वयंभू शिवलिंगाचे दर्शन झाले, तेथे त्यांनी एका रात्रीत मंदिर उभारून शिवाची आराधना केली. त्यापैकीच हे एक मंदिर आहे. या मंदिरापासून पांडवांचा रथ वैतरणा नदी पात्रातून त्र्यंबकेश्वरच्या दिशेने गेला. त्या रथाच्या खुणाही नदीपात्रानजीक असल्याचा श्रद्धायुक्त दावा करण्यात येतो. या मंदिराचा संबंध १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील शिवशंकराशी असल्याचेही सांगण्यात येते. या मंदिराचे मूळ नाव नंदीकेश्वर महादेव मंदिर असे आहे. मात्र, तिळसा गावात हे मंदिर असल्याने ते तिळसेश्वर महादेव मंदिर म्हणूनही ओळखले जाते. ठाणे गॅझेटियरमधील नोंदीनुसार येथे पूर्वी मोठे मंदिर होते; परंतु १८८० मध्ये ते आगीत भस्मसात झाले. त्याचा केवळ मोठा पाया उरला. मात्र नंतर ते पुन्हा उभारण्यात आले. येथे त्यावेळी नदीपात्रात रामकुंड आणि लक्ष्मणकुंड अशी दोन कुंडे होती. तसेच मंदिराच्या ईशान्येस एका मोठ्या खोल कुंडात मोठमोठे मासे असल्याचे या नोंदीत नमूद केले आहे. या मंदिरास १.१० पौंड आणि ८ शिलिंग एवढे वर्षासन मिळत असे, तसेच मंदिरासाठी सव्वा बावीस एकर जमीन इनाम देण्यात आली होती. या मंदिराचा अनेकदा जीर्णोद्धार झाला आहे. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

हे मंदिर मोठ्या खडकावर बांधलेले आहे. असे सांगितले जाते की ज्या खडकावर मंदिर उभे आहे तो आतून पोकळ आहे. तरीही त्याने वर्षानुवर्षे मंदिराचे वजन पेलून धरले आहे. मंदिरासमोरच्या पुलापासून बांधलेल्या पादचारी मार्गाने मंदिरापर्यंत येता येते. या मार्गावर भाविकांच्या सोयीसाठी पत्र्याचे छत उभारले आहे. मंदिराबाहेर नंदीची पांढऱ्या रंगाची मूर्ती आहे. सभामंडपातही नंदीची आणखी एक मूर्ती आहे. गर्भगृहाला कमानीच्या आकाराचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे व त्यावर नागाने छत्र धरलेले आहे. त्यावरील गलंतिकेतून पिंडीवर अभिषेक होत असतो. शिवपिंडीनजीक मोठा त्रिशूळ आहे. असे सांगितले जाते की पूर्वी या शिवलिंगाला एक भोक होते. त्यातून नाणे टाकल्यास ते पाण्यात पडल्याचा आवाज येत असे. कालांतराने हे भोक बुजवण्यात आले. शिवलिंगाच्या मागील भिंतीवर शिवशंकराचे मोठे चित्र आहे. या भिंतीवरील खालच्या भागातील डावीकडील देवकोष्टकात गणेशाची तर उजवीकडे पार्वतीची मूर्ती आहे. गर्भगृहाच्या मागील बाजूला असलेल्या भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या गोमुखातून शिवलिंगावर केलेल्या अभिषेकाचे जल थेट नदीपात्रात पडते.

या मंदिरात दररोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठी जत्रा भरते. १८८२ च्या गॅझेटियरमधील नोंदीनुसार त्यावेळी वाडा, शाहपूर, भिवंडी, जव्हार या भागांतून सुमारे २०० भाविक या यात्रेस आले होते. आता मात्र यात्रेच्या वेळी नंदीकेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या तीन लाखांवर गेल्याचे सांगण्यात येते. महाशिवरात्रीच्या दिवशी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. तीन दिवस अखंड हरिनाम सोहळा होतो. यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मंदिर प्रशासनातर्फे फराळाचे वाटप करण्यात येते. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारीही येथे दर्शनासाठी शेकडो भाविक येतात.

मंदिरातून नदीपात्रात उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. खाली उतरल्यावर जवळच एक छोटे शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे. एकदा महादेवांनी आपल्या जटा नदीपात्रात आदळल्या होत्या. त्याच्या खुणा येथे आढळतात, असा भाविकांकडून दावा केला जातो. एका पौराणिक आख्यायिकेनुसार, एकदा पार्वती महादेवाला दही-भाताचा घास भरवत होती. त्यातील भाताची काही शिते वैतरणा नदीच्या पात्रातील खडकावर पडली. या पात्रातील काही खडकांवर दिसणारे पांढरे डाग या दहीभाताचे असल्याचे श्रद्धाळू लोक मानतात.

या नदीपात्रातील कपारींमध्ये आढळणारे देवगुणी मासे हे येथील वैशिष्ट्य आहे. या माशांबाबतची आख्यायिका अशी, की या परिसरातील बहुसंख्य लोकांचा मासेमारी हा परंपरागत व्यवसाय आहे. प्राचीन काळी एका कोळी दाम्पत्याने या पात्रातील मासा पकडून घरी नेला. मात्र, कापल्यानंतर त्याचे तुकडे पुन्हा जोडले जाऊन तो जिवंत झाला. असे अनेकदा झाले. त्यामुळे हा देवाचा मासा असल्याच्या भावनेतून या दाम्पत्याने त्याची पूजा करून त्याला पुन्हा नदीपात्रात सोडले. तेव्हापासून या नदीपात्रातील मासे देवाचे असल्याच्या श्रद्धेमुळे त्यांना कोणीही पकडत नाही.

येथे आढळणारे मासे हे महसीर प्रजातीचे आहेत. मोठे शिर असणारा मासा म्हणून त्यास महसीर म्हणतात. त्याचे शास्त्रीय नाव ‘टॉर टॉर’ असे आहे. हे मासे महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील जलाशयांत आढळतात. अनेक ठिकाणी ते पुजले जातात. मात्र हे मासे खाण्यास रुचकर असल्याने त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार केली जाते. येथे मात्र देवाचे मासे म्हणून त्यांना अभय आहे. किंबहुना तिळसे येथील हा भाग मत्स्य अभयारण्य म्हणूनच ओळखला जातो. या ठिकाणी तुकडी मासा, देव मासा आणि नथनी मासा या महसीरच्या तीन प्रजाती आढळतात. नदीपात्रातील मोठमोठ्या खडकांच्या खोबणीत तसेच खडकांमध्ये तयार झालेल्या छोट्या कपारींमध्ये ते आहेत. त्यामुळे नदीला कितीही मोठा पूर आला तरी हे मासे आपली जागा सोडत नाहीत. महसीर माशांची वाढ पाच ते सहा फुटांपर्यंत, तर वजन १५० ते २०० पौंडापर्यंत जाऊ शकते.

उपयुक्त माहिती

  • वाडा शहरापासून ९ किमी तर पालघरपासून ५४ किमी अंतरावर
  • वाडा शहरापासून एसटीची सु्विधा
  • खासगी वाहने नदीपात्रापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा नाही
Back To Home