मुंबई हे शहर जितके आधुनिक आणि वेगवान आहे, तितकेच ते आपल्या जुन्या सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाशी जोडलेले आहे. मुंबईच्या मध्यवर्ती उपनगरातील कुर्ला पूर्व येथील कामगार नगर भागात, डी. एन. रोडजवळ असलेले नंदिकेश्वर मंदिर हे याच सांस्कृतिक परंपरेचा एक भाग होय. हे मंदिर या भागातील अत्यंत महत्त्वाचे आणि प्रसिद्ध धार्मिक स्थळ म्हणून ओळखले जाते. कुर्ला परिसराला ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा लाभलेला आहे. ऐतिहासिकदृष्ट्या साष्टी (सालसेत) बेटाचा भाग असलेला हा परिसर पुढे मुंबईच्या मुख्य बेटांशी जोडला गेला. या परिसराच्या स्थित्यंतराची साक्ष हे मंदिर देत आहे.
मुंबई हे शहर एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयास आले. या प्रक्रियेत मुंबईतील गिरणगावाचा आणि औद्योगिक क्षेत्राचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला. सुरुवातीला दक्षिण आणि मध्य मुंबईतील भायखळा, परळ, लालबाग, चिंचपोकळी, प्रभादेवी आणि दादर या भागांमध्ये कापड गिरण्यांची मोठी केंद्रे उभी राहिली. हा भाग गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला. मात्र, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला जागांची टंचाई,
जमिनीचे वाढते भाव आणि व्यवसायाचा वाढता विस्तार यामुळे हे औद्योगिक क्षेत्र उपनगरांकडे सरकू लागले. या काळात कुर्ला आणि परिसरात अनेक कापड गिरण्या आणि कारखाने सुरू झाले. परिणामी, महाराष्ट्रभरातून आलेला कामगार वर्ग या भागात स्थायिक झाला. हा बदल मुंबईच्या भौगोलिक आणि आर्थिक इतिहासाला मोठी कलाटणी देणारा ठरला.
कुर्ला हे ठिकाण भौगोलिक आणि वाहतुकीच्या सोयींमुळे एक अत्यंत महत्त्वाचे औद्योगिक स्थान म्हणून विकसित झाले होते. ग्रेट इंडियन पेनिन्शुला रेल्वे म्हणजेच आजच्या मध्य रेल्वेवरील कुर्ला हे एक प्रमुख जंक्शन बनले. येथून हार्बर मार्गाची जोडणीदेखील उपलब्ध झाली. मिठी नदीजवळ असल्यामुळे कच्च्या मालाची वाहतूक करणे, तसेच तयार झालेला माल बंदरांपर्यंत पोहोचवणे कारखानदारांसाठी सोपे झाले होते. कुर्ला भागातील औद्योगिक इतिहासाचा सर्वांत मोठा आणि ऐतिहासिक पुरावा म्हणजे ‘स्वदेशी मिल्स’ होय. सन १८८६ मध्ये प्रसिद्ध उद्योगपती जमशेटजी टाटा यांनी कुर्ला येथे या कापड गिरणीची स्थापना केली. या एकाच गिरणीने कुर्ला गावाला एका मोठ्या औद्योगिक शहराचे स्वरूप प्राप्त करून दिले. स्वदेशी मिल्सव्यतिरिक्त या भागात इतरही अनेक लहान-मोठे कारखाने, रासायनिक कंपन्या, तेल गिरण्या आणि लोखंडाचे कारखाने सुरू झाले.
या औद्योगिक स्थानामुळे कुर्ला हे मुंबईतील श्रमिकांचे मुख्य केंद्र बनले.
आर. एम. लाला यांच्या ‘काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या फॉर द लव्ह ऑफ इंडिया: द लाईफ अँड टाईम्स ऑफ जमशेटजी टाटा’ या पुस्तकात कुर्ला येथील कापड गिरणी आणि कामगारांच्या स्थितीबद्दल माहिती आहे. त्यानुसार, जमशेटजी टाटा यांनी १८८६ मध्ये कुर्ला येथील डबघाईला आलेली ‘धरमसी मिल’ विकत घेतली. त्यांनी या गिरणीचे नाव बदलून ‘स्वदेशी मिल्स’ असे ठेवले. त्या काळी कुर्ला हा भाग मुंबई शहराबाहेर असलेला आणि दलदलीचा परिसर होता. मुंबई शहरापेक्षा येथे कर कमी होते आणि रेल्वेची उत्तम सोय होती. याच कारणांमुळे जमशेटजींनी या जागेची निवड केली होती. जमशेटजींनी येथे कामगारांना राहण्यासाठी चांगल्या वसाहती निर्माण करण्यावर भर दिला. या औद्योगिक विस्तारामुळे कुर्ला परिसराची लोकसंख्या वेगाने वाढू लागली. गिरण्यांमध्ये आणि कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मानवी श्रमाची गरज निर्माण झाली होती. हा श्रमिक वर्ग प्रामुख्याने महाराष्ट्रातील कोकण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि मराठवाडा या भागांतून मुंबईत आला. या कामगारांच्या वास्तव्यासाठी गिरण्यांच्या आसपास मोठ्या चाळी आणि वस्त्यांची निर्मिती करण्यात आली. कुर्ला पूर्व भागातील कामगार नगर हे याचे एक उत्तम उदाहरण मानले जाते.
येथील कामगारांचे जीवन संघर्षाचे आणि कष्टाचे होते. त्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी विविध कामगार संघटना देखील या भागात सक्रिय झाल्या. या संघटनांनी पुढे अनेक ऐतिहासिक लढे दिले. या कामगार वर्गाला एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्या आध्यात्मिक गरजा पूर्ण करण्यासाठी कामगार नगर भागात नंदिकेश्वर मंदिराची स्थापना झाली.
सुरुवातीच्या काळात हे मंदिर अत्यंत छोट्या आणि साध्या स्वरूपात होते. कामगार नगर आणि कुर्ला परिसरातील हे औद्योगिक वातावरण केवळ आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्याला एक विशिष्ट सामाजिक आणि सांस्कृतिक परिमाण लाभले होते. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आलेल्या कामगारांनी एकत्र येऊन आपली संस्कृती येथे टिकवून ठेवली. हे मंदिर त्यांच्या संस्कृतीचे मुख्य केंद्रबिंदू बनले. गिरणी कामगारांच्या या वस्त्यांमध्ये भजन मंडळे, कामगार कल्याण केंद्रे, नाट्य उत्सव, व्याख्यानमाला आणि सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. जसजसा कुर्ला परिसराचा नागरी विकास होत गेला आणि येथील लोकसंख्या वाढत गेली, तसतसे या मंदिराचे रूपही बदलत गेले. स्थानिक रहिवाशांनी आणि मंदिर व्यवस्थापनाने एकत्र येऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याला आजचे भव्य स्वरूप प्राप्त करून दिले.
नंदिकेश्वर मंदिर हे शंकरास समर्पित आहे. नंदिकेश्वर या नावावरूनच मंदिरातील नंदीचे प्रत्यक्ष महत्त्व स्पष्ट होते. महादेवाचे वाहन असलेला नंदी भक्ती आणि शक्तीचे प्रतीक समजले जाते. शिवपुराणानुसार, भैरव, वीरभद्र, मणिभद्र, चंडिस, शृंगी, भृंगिरिटी, शैल, गोकर्ण, घंटाकर्ण, जय आणि विजय या शंकराच्या गणांप्रमाणेच नंदी हा एक प्रमुख गण आहे. हा शंकराचा प्रमुख द्वारपाल मानला जातो. नंदीश, नंदीश्वर या नावांनीही तो ओळखला जातो. शिवसहस्रनामात नंदी हे शिवाचे नाव असल्याचे म्हटले आहे. शिवपुराणातील शतरुद्रखंडाच्या २२व्या अध्यायात भगवान शंकराने नंदीचा अवतार धारण केल्याचे म्हटले आहे. समुद्रमंथनानंतर सुरासुरांमध्ये झालेल्या युद्धात देवतांचा विजय झाला, अशी या संदर्भातील पौराणिक कथा आहे. त्यानंतर भगवान विष्णूंनी सर्व असुरांना पाताळलोकात जाण्याची आज्ञा केली. ते स्वतः असुरांना घेऊन पाताळात गेले, परंतु तेथे असुरांनी त्यांना बंदी बनवले. तेव्हा सर्व देवतांनी भगवान शंकरांना साकडे घातले. त्या वेळी असुरांचा नाश करण्यासाठी शंकरांनी वृषभावतार धारण केला.
नंदी हा शिलाद ऋषींचा पुत्र असल्याचे मानले जाते. शिलाद ऋषींनी शंकराची घोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना नंदी हा पुत्र झाला, अशी याविषयीची आख्यायिका आहे. नंदीला त्यांनी चारही वेदांचे ज्ञान प्रदान केले. एकदा त्यांच्याकडे वरुण आले असता, त्यांनी शिलाद ऋषींना दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला, परंतु नंदीला दिला नाही. याबाबत ऋषींनी विचारले असता, त्यांनी नंदी अल्पायुषी असल्याचे सांगितले. हे ऐकून शिलाद ऋषी काळजीत पडले. यानंतर नंदीने शंकराची तपश्चर्या केली. त्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकराकडे त्याने आयुष्यभर आपले सान्निध्य मिळावे, असा वर मागितला. त्या वेळी शंकरांनी त्यास वृषभाचा चेहरा देऊन आपले वाहन बनवले. ध्यानमग्न असताना एखाद्या भक्ताने आपली इच्छा तुझ्या कानात सांगितली तरी ती माझ्यापर्यंत पोहोचेल, असा वर महादेवांनी नंदीला दिला होता. म्हणून आजही अनेक भाविक आपल्या इच्छा महादेवाच्या पिंडीसमोर बोलण्याऐवजी नंदीच्या कानात सांगतात. नंदीच्या कानात सांगितलेली इच्छा महादेव पूर्ण करतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात प्रवेश करताना आवर्जून नंदीची पूजा केली जाते. या नंदीचा ईश्वर म्हणून महादेवांचे नंदिकेश्वर हे नाव प्रसिद्ध आहे.
कुर्ला येथील कामगार नगर या वर्दळीच्या भागात नंदिकेश्वर मंदिर स्थित आहे. प्रशस्त सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपात अंतराळाच्या समोर तीन लहान मंदिरे आहेत. त्यामध्ये उजवीकडे मारुती व शनिदेव आणि डावीकडे साईबाबा विराजमान आहेत. अंतराळाच्या प्रवेशद्वाराजवळ सभामंडपात एका उंच चौथऱ्यावर नंदीची मूर्ती आहे. येथून तीन पायऱ्या चढून काहीसे उंचावर असलेल्या अंतराळात प्रवेश होतो. अंतराळात प्रदक्षिणा मार्ग सोडून गर्भगृहाची रचना आहे. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी नंदिकेश्वर महादेवाची पिंड आहे.
या पिंडीवर महादेवांचा पितळी मुखवटा आहे. त्या मुखवट्यावर महादेवाचे दाढी, मिशी व जटा केलेले मुख कोरलेले आहे. शिवपिंडीजवळ त्रिशूळ व डमरू आहे. गर्भगृहाच्या भिंतींमध्ये असलेल्या देवकोष्टकात अंबा माता, राधा-कृष्ण, विठ्ठल-रखुमाई, राम-लक्ष्मण-सीता व गणपती या मूर्ती आहेत. प्रदक्षिणा मार्गावरही देवकोष्टकांत काही देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या मागील भिंतीला लागून बासरी वाजवणाऱ्या कृष्णाची मोठी मूर्ती आहे. गर्भगृहावर अष्टकोनी आकाराचे वर निमुळते होत जाणारे शिखर आहे.
नंदिकेश्वर मंदिरात दरवर्षी महाशिवरात्रीचा उत्सव अत्यंत मोठ्या प्रमाणावर आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटेपासूनच नंदिकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागतात.
या दिवशी मंदिरावर विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली जाते. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे विशेष पूजेचे आयोजन केले जाते. संपूर्ण महिनाभर विविध धार्मिक प्रवचने आणि कीर्तने होतात. याशिवाय, नंदिकेश्वर सेवा मंडळाच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जाणारा अखंड हरिनाम सप्ताह हा येथील सर्वात मोठा सोहळा मानला जातो.
या सप्ताहादरम्यान सात दिवस २४ तास भजन आणि नामस्मरण चालते. यात स्थानिक नागरिक अत्यंत उत्साहाने सहभागी होतात. या मुख्य उत्सवांसोबतच या मंदिरामध्ये संकष्ट चतुर्थी, अंगारकी चतुर्थी, विनायक चतुर्थी, श्रीगणेश जयंती आणि माघी गणेशोत्सव हे सणसुद्धा उत्साहाने साजरे केले जातात. भाविक दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत मंदिरात नंदिकेश्वराचे दर्शन घेऊ शकतात.