नाईकबा मंदिर

बनपुरी, ता. पाटण, जि. सातारा

पाटण तालुक्यात बनपुरी येथील डोंगरावर असलेले नाईकबा मंदिर महाराष्ट्र कर्नाटकातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. नाईकबा हा महादेवाचा एक अवतार मानला जातो. जागृत नवसाला पावणारा, अशी ख्याती असणाऱ्या नाईकबाची गुढीपाडव्याला भरणारी यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक असून अडीच ते तीन लाख भाविक यावेळी दर्शनासाठी येतात. नाईकबा देवस्थानावर असणारी लोकांची श्रद्धा येथे येणाऱ्या भाविकांच्या संख्येवरून राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचादर्जा देऊन गौरव केला आहे.

नाईकबा देवाची आख्यायिका अशी की बनपुरी गावाच्या पायथ्याशी जानुगडेवाडी नावाचे गाव आहे. तेथील कृष्णामाई नावाची गुराखी मुलगी नाईकबा देवाची निस्सीम भक्त होती. ती दररोज गुरांना डोंगरावर चरायला सोडल्यावर नाईकबांच्या भक्तीत रममाण होत असे. एकदा तिच्या निदर्शनास आले की कळपातील एक गाय कळप सोडून डोंगरात जात असते. असे वारंवार होऊ लागल्याने कृष्णामाईने तिचा पाठलाग केला, तेव्हा ती गाय एका पाषाणावर दुधाची धार सोडत असल्याचे तिला दिसले. कधीही व्यायलेली गाय दुधाची धार सोडत असल्याचे पाहून कृष्णामाईला खात्री पटली की येथे देवाचे वास्तव्य आहे. तिने देवाला विनंती केली की देवा मला तुझे दर्शन दे. कृष्णामाईच्या विनंतीवरून साक्षात नाईकबा त्या दगडातून प्रगट झाले त्यांनी तिला आशीर्वाद देऊन सांगितले की तू मागे पाहता पुढे चालत राहा, तुझा उद्धार होईल.

काही अंतर पुढे गेल्यावर कृष्णामाईला जाणवले की तिच्या मागच्या बाजूच्या गडावरून एक मोठा दगड तिच्या दिशेने गडगडत येत होता. दगड तिच्या अंगावर येणार इतक्यात नाईकबाचे नामस्मरण करून तिने त्या दगडाला हात लावला तोच दगड त्या जागेवर स्थिर झाला; परंतु मागे वळल्यामुळे कृष्णामाई त्याच दगडामध्ये गुप्त झाली. जेथे कृष्णामाई गुप्त झाली, तेथे आज तिचे मंदिर आहे. ज्या दगडावर गाय दूध सोडत होती, तो मोठा दगड नाईकबाचे प्रतीक म्हणून नाईकबा मंदिराच्या गर्भगृहात आहे. नाईकबाच्या दर्शनाआधी पायथ्याशी असलेल्या कृष्णामाईचे दर्शन घेण्याची पद्धत आहे.

नाईकबा मंदिरात येण्यासाठी दोन मार्ग आहेत. त्यापैकी एक जुना पायरी मार्ग आहे आणि आता नव्याने डांबरी रस्ता करण्यात आला आहे. पायरी मार्ग जानुगडेवाडी या गावातून सुरू होतो. तेथे प्रवेशाची कमान असून त्याखाली नाईकबा देवाचा पितळी घोडा आहे. तेथून साधारणतः ५० मीटर अंतरावर कृष्णामाईचे मंदिर आहे. येथे एका मोठ्या दगडाच्या पुढे कृष्णामाईची मूर्ती आहे. या दगडावर कृष्णामाईचे चित्र रेखाटलेले आहे. असे म्हटले जाते की कृष्णामाईचे दर्शन घेतल्याशिवाय नाईकबाचे दर्शन पूर्ण होत नाही. कृष्णामाई मंदिरापासून थोडे पुढे आल्यानंतर पायरी मार्गावर जिवेश्वर महाराजांचे मंदिर लागते. महादेवांच्या जिभेपासून त्यांची निर्मिती झाल्याची मान्यता आहे. जिवेश्वर महाराज हे येथील साळी समाजातील अनेक कुटुंबीयांचे कुलदैवत आहेत. या मंदिरापासून काही अंतरावर एक पुरातन नाईकबा मंदिर आहे. येथील काही खडकांवर शेंदूर लावलेले असून ते नाईकबाचे प्रतीक म्हणून पुजले जातात.

नाईकबाचे मुख्य मंदिर बनपुरी येथील डोंगरमाथ्यावर आहे, त्यामुळे हा परिसर नाईकबा नगर म्हणून प्रसिद्ध आहे. येथून मंदिराकडे जाताना रस्त्याच्या दुतर्फा अनेक पूजासाहित्याची दुकाने लागतात. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे. मंदिर दुमजली मोठे असून बांधकामात राजस्थानी लालसर दगडांचा वापर करण्यात आलेला आहे. मंदिरासमोर दर्शन रांगेची व्यवस्था आहे. उत्सव, यात्रा श्रावण महिन्यात त्याचा वापर होतो. दर्शनमंडप, सभामंडप गर्भगृह असे मंदिराचे स्वरूप आहे. दर्शनमंडपात काळ्या दगडातील नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात दर्शन रांगेची व्यवस्था केलेली आहे. सभामंडपाच्या दुसऱ्या मजल्यावरून मुखदर्शनाची (खाली असलेल्या गर्भगृहातील नाईकबाच्या मूर्ती दर्शनाची) सुविधा आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार सागवानी लाकडात बनविलेले आहे त्याच्या द्वारपट्टीवर नक्षीकाम केलेले आहे. द्वारपट्टीच्या वरील बाजूस कमानीचा आकार आहे, तर उंबऱ्यावर कासवाचे शिल्प कोरलेले आहे. गर्भगृहात एका मोठ्या संगमरवरी मखरामध्ये असणारा स्वयंभू खडक हाच नाईकबाचे प्रतीक म्हणून पूजला जातो.

चैत्र पाडव्यापासून दोन दिवसांच्या यात्रेला सुरुवात होते. यावेळी कराड येथील काका शिंदे यांची मानाची सासनकाठी नाईकबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विलासराव जानुगडेपाटील यांच्या जानुगडेवाडी येथील निवासस्थावर येते. त्याठिकाणी पूजन केल्यानंतर ही काठी बनपुरी येथील नाईकबा डोंगरावर प्रस्थान करते त्यामागोमाग अनेक गावांतील सासनकाठ्या नाईकबा डोंगरावर येतात. यात कोल्हापूर, सांगली तसेच कुरुंदवाड परिसरातील ४० ते ५० सासनकाठ्या पालख्यांचा समावेश असतो. ‘नाईकबाच्या नावानं चांगभलं…’ या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांसह नाईकबाचा छबिना (पालखी) निघतो. यात्रेच्या पहिल्या दिवशी होणारे कुस्तींचे फड प्रसिद्ध आहेत. स्पर्धेत आपले कौशल्य दाखविण्यासाठी अनेक राज्यांतील नामांकित कुस्तीपटू यात भाग घेतात. यात्राकालावधीत सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणांहून नाईकबा मंदिरासाठी एसटीची विशेष सुविधा असते. पाटण कऱ्हाड येथून दर दहा मिनिटांनी यात्रा विशेष गाड्या सोडल्या जातात.

उपयुक्त माहिती:

  • पाटणपासून ३५ किमी, तर साताऱ्यापासून ८२ किमी अंतरावर
  • पाटण कऱ्हाड येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • नाईकबा मंदिर संस्थानतर्फे भक्त निवासाची सुविधा
Back To Home