हेमाडपंती स्थापत्यशैली ही महाराष्ट्रातील आणि भारतातील अनेक प्राचीन मंदिरांची प्रमुख ओळख आहे. रूढार्थाने या शैलीच्या कालखंडाचे दोन भाग पडतात. अकराव्या ते तेराव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत मंदिरांवर विपुल मूर्तिकला पाहायला मिळते. मात्र, तेराव्या शतकाच्या उत्तरार्धानंतर मंदिरांतील मूर्तिकला जवळपास नाहीशी झालेली दिसते. चालुक्य, यादव व त्यानंतरच्या काळात देखील या मंदिरांची उभारणी होत राहिली. बीड जिल्ह्यात अशी अनेक प्राचीन मंदिरे आहेत, ज्यांपैकी पाली गावातील नागनाथ मंदिर प्रसिद्ध आहे.
हेमाडपंती स्थापत्यशैलीतील हे मंदिर यादव राजा सिंहण देव (दुसरा) यांच्या काळातील असल्याचे सांगितले जाते. नागनाथ मंदिराच्या प्रांगणात एक प्राचीन शिलालेख आहे, ज्यात या मंदिराच्या कालखंडाचा उल्लेख असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंदिराची रचना, नक्षीकाम व शिल्पशैली पाहता ती यादव काळातीलच असावी, यावर काही अभ्यासक ठाम आहेत. प्राचीन काळी नागनाथ मंदिरातील शिवपिंडीवर सोन्याचा पंचफणी नाग होता, असेही सांगण्यात येते.
नागनाथ मंदिर बीड-सोलापूर मार्गावर बीडपासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर महामार्गाला लागून आहे. मंदिराभोवती तटबंदी आहे आणि त्यात मुख्य प्रवेशद्वार आहे. मंदिराच्या पेव्हर ब्लॉकने आच्छादलेल्या प्रांगणात विविध प्रकारचे महावृक्ष आहेत; तसेच काही वीरगळ, सतीशिळा, नंदीशिल्पे, शिवपिंडी व मारुतीचे एक लहानसे मंदिर आहे. मंदिरासमोर अष्टकोनी चौथरा आहे आणि त्या चौथऱ्यावर मध्यभागी तुलसीवृंदावन आहे.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी रचना असलेल्या या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारासमोर शिलालेख आहे. हा शिलालेख यादव राजा सिंहण यांच्या कारकिर्दीतील सुमारे तेराव्या शतकातील असल्याचे सांगितले जाते.
३६ ओळींचा हा अस्पष्ट शिलालेख संस्कृत भाषेत व देवनागरी लिपीत आहे. शिलालेखात शीर्षभागी सूर्य व चंद्र कोरलेले आहेत. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांची व स्तंभ-नक्षी कोरलेली आहे. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. मंडारकास चंद्रशिला व कीर्तीमुख आहे. सभामंडपाच्या दर्शनी भिंतीवर सिमेंटचा गिलावा करून रंगरंगोटी करण्यात आली आहे. सभामंडपात प्रत्येकी चार नक्षीदार स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत. त्यांच्या स्तंभदंडात चौकोन, षट्कोन, अष्टकोन, वर्तुळ असे विविध भौमितिक आकार पाहायला मिळतात. वितानावर चक्राकार नक्षी आहे. सभामंडपात मधल्या चार स्तंभांच्या मधील जागेत नंदीची मूर्ती आहे. सभामंडपात डाव्या व उजव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. प्रदक्षिणा मार्गावर अंतराळाच्या डाव्या व उजव्या बाजूला देखील दोन दरवाजे आहेत. सभामंडपाची मूळ रचना अर्धखुल्या स्वरूपाची होती, परंतु पुनरुज्जीवनानंतर सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा करण्यात आला आहे. येथे हवा व सूर्यप्रकाश येण्यासाठी वातायने आहेत.
पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. द्वारशाखांवर पानाफुलांची व स्तंभ-नक्षी आहे.
ललाटबिंबावर गणेशाचे शिल्प आहे. मंडारकास चंद्रशिळा आहे आणि त्यावर कीर्तीमुख आहे. अंतराळ अरुंद असल्याने त्यापुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळाच्या व गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराची रचना एकसारखीच आहे. गर्भगृह अंतराळापेक्षा खोल असल्याने काही पायऱ्या उतरून खाली जावे लागते. गर्भगृहात जमिनीवर मध्यभागी शिवपिंडी आहे. शिवपिंडीवर छत्र धरलेला पितळी नाग आहे आणि जलधारा धरलेले तांब्याचे अभिषेक पात्र छताला टांगलेले आहे. प्राचीन काळी शिवपिंडीवर सोन्याचा पंचफणी नाग होता, असे मानले जाते. गर्भगृहात मागील भिंतीला आरसा लावला असल्याने भाविकांना अंतराळातून सहजपणे शिवपिंडीचे दर्शन घेता येते. गर्भगृहाच्या वितानावर चक्राकार नक्षी आहे.
मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे आणि गर्भगृहाच्या छतावर पाच थरांचे शिखर आहे. शिखरातील खालचा पहिला थर चौकोनी आहे, तर त्यावरील चार अष्टकोनी थरांत प्रत्येकी आठ देवकोष्ठके व त्यांत विविध देवतांच्या मूर्ती आहेत. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आणि त्यावर कळस आहे. प्रांगणात, मंदिराच्या मागील बाजूस प्राचीन पुष्करणी आहे. पुष्करणीच्या चारही बाजूंनी पाषाणी भिंती आहेत आणि खाली उतरण्यासाठी चारही बाजूंना पायऱ्या आहेत. उजव्या बाजूच्या पायऱ्यांवर गोमुख आहे. पुष्करणीच्या भिंतीत रिकामी देवकोष्ठके आहेत. पूर्वी या देवकोष्ठकांत देवतांच्या मूर्ती होत्या. या पुष्करणीतील जलसाठा अक्षय असल्याचे सांगितले जाते.
नागनाथ महादेव मंदिरात महाशिवरात्री हा मुख्य वार्षिक जत्रोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येथे येतात. खंडोबा हे परिसरातील अनेक भाविकांचे कुलदैवत आहे. खंडोबा मंदिरात पौष महिन्यात चंद्राच्या मृग नक्षत्रावर खंडोबा व म्हाळसा देवी यांच्या विवाह सोहळ्याची जत्रा भरते. उत्सवांच्या वेळी देव पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणेला निघतात. हजारो भाविक ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत पालखी सोहळ्यात सहभागी होतात. मंदिरात चैत्रपाडवा, चंपाषष्ठी, दसरा, दिवाळी, श्रावणमास, नागपंचमी, मकरसंक्रांत यांसारखे सण व उत्सव साजरे केले जातात. सोमवार, पौर्णिमा, अमावस्या, प्रदोष, एकादशी, षष्ठी यांसारख्या दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.