नागनाथ मंदिर

नरंदे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर

धर्मातील भेदाभेद, कर्मकांडे नाकारणारे अनेक संप्रदाय बाराव्या शतकात उदयास आले. नागनाथ वा नागेश महाराजांनी प्रवर्तित केलेलानागेश संप्रदायहा त्यापैकीच एक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकात नागेश संप्रदायाशी संबंधित अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रात मानुर, देगाव, मोहोळ, वडवळ, मार्डी, केंदुर, पाबळ, कांहुरमेसाई, निमगाव, त्याच प्रमाणे नरेंद आदी स्थाने नागेश महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ठिकाणे म्हणून अधिक महत्वाची मानली जातात. नरेंद येथील नागनाथ मंदिरात आजही नागेश महाराजांचा साक्षात्कार घडतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

नागनाथ महाराजांविषयी अशी आख्यायिका सांगण्यात येते की सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ (चंद्रमौळी) येथे राहणाऱ्या हेग्रस नावाच्या भारद्वाज गोत्री ब्राह्मणास मानस सरोवराकाठी नागनाथांनी प्रथम दर्शन दिले. त्यांच्या अंगावर अनेक नाग खेळत असत म्हणून त्यांचे नागनाथ किंवा नागेश असे नाव प्रसिद्ध झाले. पुढे ते हेग्रस यांच्या समवेत मोहोळला आले. तेथे गावातील समाजकंटकांच्या त्रासाला कंटाळून ते एका अरण्यात हेग्रस अन्य भक्तगणांसह गेले. तेथे एका वठलेल्या वडाखाली बसले असता, त्यांनी शिष्यास त्या झाडाला पाणी घालण्यास सांगितले. पाणी घालताच त्या वडास पालवी फुटली. म्हणून त्यांना वडवाळसिद्ध नागनाथ असे म्हटले जाऊ लागले. नागनाथ महाराज हे सिद्ध पुरूष बाराव्या शतकात होऊन गेले. महाराष्ट्र कर्नाटक ही त्यांची कार्यभूमी होती

नागनाथ महाराजांनी स्थापन केलेला हा पंथ योगसाधनेला महत्त्व देणारा शिवपूजक असा आहे. कर्मकांडे, कडक वैराग्य, संन्यास यांवर भर देता सामान्य माणसाला भक्तिप्रवण करणारा अध्यात्मविचार या पंथाने मांडला. सहिष्णुता उदारता ही हिंदू धर्मातील शिकवण अंगिकारून या पंथाने नेहमीच हिंदू मुस्लिम धर्म, तसेच विविध पंथांना आस्थेने जवळ केले. असे सांगण्यात येते की मोहोळ येथे नागेशांनी एकदा फकीर वेषात हेग्रसांना दर्शन दिले होते. त्याच प्रमाणे दिल्ली येथे शेख नसरूद्दीन यास पैगंबर रुपात दर्शन दिले होते. नसरूद्दीन, आलमखान हे नागेशांचे भक्त होते. आजही मोहोळ येथील उत्सवात मशिदीजवळ हिंदूमुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून कानात बोटे घालण्याचा रिवाज आहे. याच बरोबर या पंथावर वारकरी संप्रदायाचाही प्रभाव आहे. अज्ञानसिद्ध हे या संप्रदायाचे आद्य आचार्य मानले जातात. त्यांच्या नावावरसंकटहरणी’, ‘वरदनागेश’, ‘स्वरूपनिर्माण’, ‘जीवब्रह्माभेदलक्षणआदी तात्विक ग्रंथ आहेत

नरंदे येथील नागनाथांच्या स्थानाबद्दल अशी कथा आहे की हेग्रस यांच्या मुलीला तीन पुत्र होते. अज्ञानसिद्ध हे त्यांपैकी एक. ते लहानपणापासून वडवाळ येथे राहून नागनाथांची सेवा करीत असत. पुढे नागनाथांनी त्यांना दृष्टांत देऊन पंथप्रसारासाठी नरंदे या गावी पाठवले. गावाबाहेरील एका बनात ते राहत असत. एकदा गुरूदर्शनाची आस लागल्याने त्यांनी चारही दिशांना नागनाथांना हाक मारली. तेव्हा चारी दिशांनी त्यांनाअसा प्रतिसाद मिळाला अखेरीस अज्ञानसिद्धांच्या देहातूनचअसा आवाज आला. नागनाथांशी आपण एकरूप झाल्याचे पाहून अज्ञानसिद्धांनी यानंतर या ठिकाणी संजीवन समाधी घेतली. या घटनेची साक्ष म्हणून येथे चार दिशांना मध्यभागी अशी मिळून पाच शिवलिंगे आहेत. मध्यभागी असलेल्या नागनाथ मंदिरातील पिंडी स्वयंभू असल्याचे सांगण्यात येते. हे मंदिर .. १३९१ साली बांधले असल्याचे येथील पुजारी सांगतात

मंदिराकडे जाताना सर्वप्रथम स्वागतकमान आहे. येथून मंदिरापर्यंत जाणारा रस्ता पेव्हर ब्लॉक आच्छादित आहे. मंदिरासमोर दीपमाळ आहे. पुढे स्वयंभू शिवपिंडी असलेले नागनाथ मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी रचना असलेल्या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दर्शनी भिंतीवर गजराज शिल्पे आहेत. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबस्थानी गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला सभामंडपात देवकोष्टके आहेत. प्रवेशद्वारासामोर जमिनीवर कासव शिल्प त्यापुढे वज्रपिठावर नंदीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. येथे नंदीला तेल मोहरी वाहण्याची प्रथा आहे. सभामंडपात गोलाकार स्तंभ त्यावरील तुळयांवर छत आहे. सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. त्यात प्रकाश हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात भिंतींवर अज्ञानसिद्ध महाराजांचे जीवन चरित्र दर्शविणारी चित्रे लावलेली आहेत. अन्नपूर्णा देवी अंबाबाई यांची येथे स्वतंत्र गर्भगृहे आहेत

पुढे सभामंडपापेक्षा अंतराळ उंचावर असल्यामुळे अंतराळाच्या प्रवेशद्वारास तीन पायऱ्या आहेत. अंतराळ प्राचीन बांधणीचे आहे. येथे देवाचा शयनमंच आहे. अंतराळातील डाव्या उजव्या बाजुच्या देवकोष्टकांत देवप्रतिमा आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशव्दार आहे. गर्भगृह अंतराळापेक्षा उंच आहे. द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबावर गणपतीची मूर्ती आहे. गर्भगृहात स्वयंभू शिवपिंडी चांदीचा मुखवटा आहे. मुखवट्यावर फेटा त्यावर छत्र धरलेला चांदीचा नाग आहे. गर्भगृहात मागील भिंतीलगत वज्रपिठावर पाषाणी मखरात नागशिल्प आहेत. मंदिराच्या छतावर चौकोनी निमुळते पिरॅमिड सारखे उतरत्या पायरीचे शिखर आहे. शिखरावर चारही बाजूंना नागशिल्पे आहेत. शीर्षभागी आमलक त्यावर कळस आहे

नागनाथ मंदिरासमोर अज्ञानसिध्द महाराजांचे समाधी मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. सभामंडपात चार कोनांवर असलेले चार गोलाकार स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. गर्भगृहात अज्ञानस्वामींची समाधी आहे. येथे स्वामींचा चांदीचा मुखवटा त्यावर वस्त्रे अलंकार असा शृंगार आहे. गर्भगृहाच्या बाह्यबाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. या गर्भगृहाच्या छतावर उंच निमुळते शिखर आहे

नागनाथ मंदिर अज्ञानसिद्ध समाधी मंदिर या दोन मंदिरांना स्थानिक भाविक नागोबाशिदोबा मंदिर म्हणतात. नागेश्वर मंदिराच्या चार दिशांना चार शिवमंदिरे आहेत. या चारही मंदिरांच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी ललाटबिंबावर गणपतीच्या मूर्ती आहेत. मंदिरांत शिवपिंडी आहेत. भाविक या मंदिरांच्या समोर खड्यांच्या लगोऱ्या लावून आपल्या सुखी संसाराचा आशीर्वाद मागतात.

येथे प्रांगणात असलेल्या वारुळाची पूजा करण्याचीही प्रथा आहे. मंदिराच्या परिसरात असलेल्या तलावास प्रतिकाशी किंवा भागीरथी तीर्थ म्हणून संबोधले जाते. या तलावाची आख्यायिका अशी की एकदा अज्ञानसिद्धांना काशीला जाण्याची इच्छा झाली. नागेश महाराजांची परवानगी नसतानाही त्यांनी काशीस जाण्याचा हट्ट केला. तेव्हा नागेश महाराजांनी अज्ञानसिद्धांना खड्ग देवून यास काशी स्नान घडवून आणावे, असे सांगितले. परत आल्यावर, काशीस्नान करताना ते खड्ग गंगेत बुडाल्याचे अज्ञानसिद्धांनी आपल्या गुरूंना सांगितले. तेव्हा येथील तलावात बुडी मारून खड्ग काढावे, अशी गुरूआज्ञा होताच अज्ञानसिद्धाने तलावात बुडी मारून खड्ग काढले. तेव्हाज्याला घडे काशी, त्याने यावे नरंदेसी’, असे वचन अज्ञानसिद्ध महाराजांच्या मुखातून प्रकट झाले.

मंदिराच्या प्रांगणात भक्तनिवास, अन्नछत्र, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आदी इमारती आहेत. मंदिरांत रोज सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. मंदिरात नागपंचमी हा मुख्य वार्षिक उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. माघ पंचमी ते माघ नवमी हा दहा दिवसांचा वार्षिक जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. पहिल्या दिवशी गावातून ग्रामदेवाची पालखी बनात म्हणजे नागनाथ मंदिरात येते. पालखी येथे मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी नागनाथ, अज्ञानसिध्द ग्रामदेव एकाच पालखीत बसून ग्रामप्रदक्षिणा करतात. तिसऱ्या चौथ्या दिवशी देवांचा महाअभिषेक महापूजा केली जाते. पाचव्या दिवशी उत्सव साजरा केला जातो. सर्व उत्सवांच्या वेळी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक आदी राज्यातील अनेक भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. मंदिरात दर गुरुवारी देवाची पालखी मिरवणूक काढण्यात येते.

दर सोमवार, गुरुवार, पौर्णिमा अमावस्या या दिवशी महाआरतीचे आयोजन केले जाते. मंदिरात पहाटे पाच वाजता संध्याकाळी पाच वाजता नित्य अभिषेक पूजा केली जाते

उपयुक्त माहिती

  • हातकणंगलेपासून १० किमी, तर कोल्हापूरपासून २६ किमी अंतरावर
  • हातकणंगले येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ८३०८०९१६५०
Back To Home