नागनाथ मंदिर / जहागीरदार मठ

मानूर, ता. शिरूर कासार, जि. बीड

नागनाथ हे नाथ संप्रदायातील एक रससिद्ध नाथयोगी होते. अनेक ग्रंथांत त्यांचा उल्लेख ‘नागार्जुन’ असा केलेला आढळतो. ‘नवनाथ भक्तिसार’ ग्रंथात त्यांना नारायणाचे अवतार म्हणजेच ‘अविर्होत्र’ म्हटले आहे. सांख्य विहार, वर्णरत्नाकर, तत्त्वसार आणि शिवदिन मठ संग्रह सूची अशा अकराव्या ते अठराव्या शतकातील विविध ग्रंथांत त्यांचे नाव आढळते. या सर्व ग्रंथांत त्यांना नागार्जुन म्हटले असले, तरी सामान्य भाविक त्यांचा उल्लेख नागनाथ म्हणूनच करतात. या नागनाथांचे प्राचीन व प्रसिद्ध मंदिर शिरूर तालुक्यातील मानूर या गावात आहे. येथील हे जागृत दैवत नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.नागनाथ मंदिर हे ‘जहागीरदार मठ’ म्हणून अधिक प्रसिद्ध आहे. हे मंदिर वीरशैव लिंगायत पंथाचे एक मोठे श्रद्धास्थान आहे. सोळाव्या शतकात येथे मन्मथस्वामींचे वास्तव्य होते, असे मानले जाते. या मठाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू छत्रपती शाहू महाराज यांनी जमीन दान दिल्याची सनद आजही मठात उपलब्ध आहे. मंदिराच्या परिसरात १३व्या शतकातील प्राचीन सिद्धेश्वर मंदिर विखंडित अवस्थेत आहे; तसेच येथे दोन गधेगाळ व प्राचीन मंदिराचे काही अवशेष सापडले आहेत. नागनाथ मंदिर हे पांडवकालीन असल्याचे जहागीरदार मठाचे महंत सांगतात; परंतु ऐतिहासिक संदर्भांनुसार या दाव्याला कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नाही.

मंदिरास दुहेरी तटबंदी आहे. बाहेरील तटबंदी उत्तरकालीन बांधलेली आहे आणि त्यात एक साधे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन स्तंभ व वर अर्धचंद्राकार कमान दिसते. येथे लोखंडी जाळीदार झडपा बसविण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारातून आत जाताच उजव्या बाजूला देवस्थान ट्रस्टचे कार्यालय आहे तर डाव्या बाजूला उद्यान आहे. पुढे काही पावलांवर मंदिराची दुसरी सुमारे वीस फूट उंच भक्कम तटबंदी आहे. या तटबंदीत दुमजली प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दोन चौकोनी स्तंभ एकमेकांना महिरपी तोरणाने जोडलेले आहेत. तोरणाच्या वरील बाजूस चक्र व गजराज शिल्पे कोरलेली आहेत. प्रवेशद्वाराच्या वरील मजल्यावर नगारखाना आहे. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर वेलबुट्टीची नक्षी आणि ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आत दोन्ही बाजूंना पहारेकरी कक्ष आहेत व त्यापुढे प्रशस्त प्रांगण आहे. प्रांगणात तटबंदीला लागून एक दुमजली इमारत आहे. त्यामध्ये भाविकांसाठी विश्रामस्थान व भक्तनिवास यांची सोय करण्यात आली आहे. प्रांगणात मंदिरासमोर गोरखचिंचेचा एक प्राचीन वृक्ष आहे. मंदिराच्या बाजूला प्रांगणामध्ये महंत, पुजारी व सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. याशिवाय प्रांगणात शिक्षण संस्थेची इमारतही आहे.

सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची मूळ रचना आहे. सभामंडपाचे बांधकाम अलीकडील काळातील असल्याने ते पूर्णतः सिमेंट काँक्रीटचे आहे. सभामंडपात नाथपंथीय सत्पुरुषांच्या प्राचीन समाध्या आहेत. सर्व समाध्यांवरील शिवलिंगे पाषाण पुष्पमाला व अलंकारांनी सुशोभित केलेली आहेत. सभामंडपात डाव्या बाजूच्या कक्षात भिंतीलगत वज्रपीठावर सिंहासनारूढ विरूपाक्ष स्वामींची मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर पाचफणी नागाने छत्र धरलेले आहे. पुढे अंतराळाचे प्रवेशद्वार आहे. अंतराळात दोन्ही बाजूंना सुमारे तीन फूट उंच चौथरे आहेत व त्यांच्या मधून चार फूट रुंदीची वाट गर्भगृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. अंतराळात प्रत्येकी चार चौकोनी स्तंभांच्या चार रांगा आहेत. सर्व स्तंभ एकमेकांना अर्धचंद्राकार कमानीने जोडलेले आहेत व ते चौथऱ्यावर उभे आहेत. येथील वितानावर सुंदर नक्षी आहे. अंतराळात काही समाधी चौथरे आहेत.

पुढे गर्भगृहाचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वाराच्या शाखांवर पानाफुलांची व स्तंभ नक्षी आहे आणि खालील बाजूस द्वारपाल शिल्पे कोरलेली आहेत. ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प आहे. गर्भगृहात वज्रपीठावर पाच शिवलिंगे स्थापित आहेत व त्यांवर पितळी मुखवटे आहेत. मुखवट्यांवर नागछत्र आहे. मंदिराच्या छतावर चोहोबाजूंनी सुरक्षा कठडा आहे आणि गर्भगृहाच्या छतावर चौकोनी व वर निमुळते होत गेलेले शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी स्तूपिका आहे. या स्तूपिकेवर कळस व ध्वजपताका आहेत.

श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी मंदिरात वार्षिक जत्रोत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. संपूर्ण श्रावण महिन्यात मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आश्विन शुद्ध त्रयोदशी या दिवशी मठात ‘भाकणूक’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. यावेळी परिसरातील शेकडो भाविक भाकणूक ऐकण्यासाठी उपस्थित राहतात. गुढीपाडवा, शारदीय नवरात्रौत्सव, दसरा, दिवाळी, कोजागिरी पौर्णिमा, मकरसंक्रांत, दत्त जयंती, गुरुपौर्णिमा आदी सण व उत्सव या मंदिरात साजरे करण्यात येतात. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.

उपयुक्त माहिती:

  • शिरूर कासार येथून २१ किमी अंतरावर
  • बीड येथून ६० किमी अंतरावर
  • शिरूर कासार येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीची सुविधा आहे
  • संपर्क : गुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज, मो. ८९७५१५१००८

नागनाथ मंदिर / जागीरदार मठ

मनुर, शिरूर कसार, जिला। बीड

Back To Home