नागेश्वर महादेव मंदिर

रहिमाबाद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर 

देशामध्ये शंकराची १२ ज्योतिर्लिंगे आहेत. त्यातील एक ज्योतिर्लिंग नागेश्वर या नावाने सुप्रसिद्ध आहे. हे ज्योतिर्लिंग नेमके कोठे याबाबत एकवाक्यता नाही. काहींच्या मते ते गुजरातमधील द्वारकेजवळ आहे, तर काही शास्त्र अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रातील औंढा नागनाथ येथील नागेश्वर मंदिर हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. या नागेश्वराची पुरातन स्थाने महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी असून रहिमाबाद येथील पुरातन नागेश्वर महादेव मंदिर हे त्यातीलच एक आहे. अनेक अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करीत, प्राचीन स्थापत्यशैलीचा अप्रतिम वारसा सांगत हे मंदिर उभे आहे.

या मंदिरातील नागेश्वराची जागृत नवसाला पावणारा देव, अशी ख्याती आहे. याबाबत अनेक आख्यायिका आहेत. त्यातील एक कथा अशी आहे की हैदराबाद संस्थानच्या निजामानेही नागेश्वरास पुत्रप्राप्तीसाठी नवस केला होता. शिल्पकलेचा अजोड नमुना म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे. सिल्लोडपासून काही अंतरावर असलेल्या रहिमाबाद गावाच्या वेशीतून आत आल्यावर गावाच्या मध्यवर्ती भागात हे हेमाडपंती वा भूमीज शैलीने, कृष्णपाषाणात बांधलेले मंदिर नजरेस पडते. या मंदिराचा नेमका इतिहास ज्ञात नसला तरी हे मंदिर तेथील स्तंभांवर असलेल्या कीचकमूर्ती पाहता चालुक्य कालोत्तर असल्याचे दिसते. यादवांच्या .. ११७८ ते .. १३७८ या काळात या भागामध्ये बांधण्यात आलेली भूमीज वा हेमाडपंती शैलीतील मंदिरे त्यांचे प्रमाण पाहता नागेश्वर मंदिरही याच काळातील असावे असा कयास बांधण्यात येतो.

हे मंदिर सर्व बाजूंनी तटबंदीयुक्त आहे. याच्या पूर्वेस दक्षिणेस अशी दोन प्रवेशद्वारे आहेत. मंदिरप्रांगणात सर्वत्र पेव्हर ब्लॉकची फरसबंदी आहे. विविध झाडे स्वच्छ परिसर यामुळे हे प्राचीन मंदिर अधिक खुलून दिसते. नंदीमंडप, दर्शनमंडप, सभामंडप, सभामंडपात दोन उपगर्भगृहे, अंतराळ मुख्य गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मुख्य मंदिरासमोर प्रांगणात जमिनीपासून उंच चौथऱ्यावर नंदीमंडप आहे. चार बाजूंस चार गोलाकार स्तंभ, त्यांना जोडणारी महिरपी कमान, वर समतल वितान (छत) आणि त्यावर घुमटाकृती बसके शिखर अशी या नंदीमंडपाची रचना आहे. त्यावर फुलांची मोठी उठावदार नक्षी कोरण्यात आलेली आहे. मंडपात मधोमध एका चौथऱ्यावर अखंड दगडातून कोरलेली नंदीची मोठी मूर्ती आहे. कृष्णपाषाणातील मंडप आणि त्यातील नंदीची शुभ्र मूर्ती यामुळे तेथे विरोधाभासी सौंदर्य निर्माण झाले आहे. नंदीमंडप मंदिराच्या दरम्यान जमिनीवर कासवाची छोटीशी दगडी मूर्ती आहे.

नंदीमंडपाच्या तीन पायऱ्या उतरून काही पावले पुढे जाताच मुख्य मंदिराच्या अधिष्ठानाच्या (जोते) तीन पायऱ्या लागतात. जमिनीपासून दोन ते अडीच फूट उंचीच्या अधिष्ठानावर (जोते) हे मंदिर उभे आहे. अधिष्ठानास अनेक कोन असून त्याप्रमाणे मंदिराच्या कोनाकृती भिंती पायापासून शिखरापर्यंत गेलेल्या आहेत. या अधिष्ठानावरून दोन ते अडीच फूट रुंदीचा प्रदक्षिणा मार्ग सोडून मंदिराचे संपूर्ण दगडी बांधकाम आहे. अधिष्ठानावरून पुन्हा एक पायरी चढल्यानंतर मंदिराच्या दर्शनमंडपात प्रवेश होतो. येथील दर्शनमंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना दगडी कक्षासने आहेत. त्यामध्ये चार एकसंध पाषाणात घडविलेले स्तंभ आहेत. कक्षासनांच्या वरील बाजूस असलेल्या या स्तंभांवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम आहे. या सर्व स्तंभांच्या वरच्या बाजूसतरंगहस्तआहेत. स्तंभ जेथे तुळयांच्या खांबांना जोडला जोतो तेथे एकाच बिंदूवर भार केंद्रीत व्हायला नको म्हणून खांबाच्या वर अधिकच्या खुणेसारखे दिसणारे अगदी छोटे खांब लावले जातात. त्यांनाच तरंगहस्त असे म्हणतात. त्यावर कीचक मूर्ती कोरलेल्या आहेत. कीचक हे बुटके, ढेरपोटे, मोठ्या डोळ्यांचे कुरळ्या केसांचे यक्ष असतात. त्यांनी दोन्ही हातांनी वरची तुळई पेलली आहे, असे या शिल्पांमध्ये दाखवण्यात आलेले आहे. या कीचकांमुळेच हे मंदिर चालुक्य काळानंतरचे असल्याचे स्पष्ट होते. या दर्शनमंडपाच्या शिखरावर नागछत्र असलेली मोठी शिवपिंडी आहे. पिंडीच्या खालील बाजूसही दोन नागमूर्ती आहेत. दर्शनमंडपावर शिखराऐवजी शिवपिंडीची रचना ही दुर्मिळ मानली जाते.

मंदिराच्या सभामंडपात अनेक दगडी स्तंभ आहेत. त्यांची रचनाही दर्शनमंडपातील स्तंभांप्रमाणे आहे. हे खांब प्रमाणबद्ध नक्षीकामांनी सुशोभित आहेत. खांबांवर सुंदर शिल्पेही आहेत. या सभामंडपाच्या छतावरही पौराणिक प्रसंग कोरलेले आहेत. सभामंडपास लागून आणखी दोन उपगर्भगृहे आहेत. त्यात उजवीकडे श्रीरामपंचायतन तर डावीकडे विठ्ठलरुक्मिणी यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या मुख्य गर्भगृहासमोर अंतराळ आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार चार शाखीय आहे. प्रवेशद्वाराच्या चौकटीस बाहेरच्या बाजूने लावण्यात आलेल्या पट्ट्यांना शाखा असे म्हटले जाते. येथे अशा चार शाखा आहेत. त्यातील एका शाखेवर अश्वाकृती कोरण्यात आल्या असून एक शाखा अन्य शाखांच्या तुलनेत काहीशी पुढे आहे. द्वारशाखांच्या तळाकडील बाजूस स्तंभपुत्तलिका वा उपदेवताकृती कोरण्यात आल्या आहेत. हे गर्भगृह सभामंडपापेक्षा काहीसे खालच्या बाजूस आहे. या चौकोनी गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणातील नागेश्वराची पिंडी आहे. काही वर्षांपूर्वी एका भाविकाने या शिवपिंडीला पाच किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला होता. उत्सवकाळात हा मुकुट या शिवपिंडीवर ठेवला जातो. या मंदिरावर एक मुख्य दोन उपशिखरे आहेत. या तीनही शिखरांवर अनेक लहानलहान शिखरांच्या प्रतिकृती एकावर एक अशा पद्धतीने बसवण्यात आल्या आहेत. मुख्य शिखराच्या वरच्या बाजूला आमलक त्यावर कळस आहे.

या पुरातन मंदिरात दर सोमवारी हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी तर या परिसराला यात्रेचे स्वरूप येते. महाशिवरात्रीला येथे यात्रा भरते. त्या दिवशी मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या तलावातील पाण्याने नागेश्वराला जलाभिषेक करण्यात येतो. दुपारी यज्ञसोहळा सायंकाळी नागेश्वराची पालखी मिरवणूक निघते. या पालखी मिरवणुकीसाठी पंचक्रोशीतील हजारो भाविकांची उपस्थिती असते. शिवभक्तांप्रमाणेच या मंदिराचे अनोखे स्थापत्य येथील अप्रतिम कोरीवकाम पाहण्यासाठी दररोज अनेक पर्यटकही येथे येत असतात.

उपयुक्त माहिती:

  • सिल्लोडपासून १० किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ७३ किमी अंतरावर
  • सिल्लोडपासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : योगेश तोंगल, मो. ८८०६३९२३०७शंकर नवले, मो. ९९२३३०१२४२
Back To Home