छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील मुर्डेश्वर मंदिर हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिरातील शिवलिंगाची स्वतः श्रीरामांनी स्थापना केल्याची मान्यता आहे. मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवर निसर्गसमृद्ध परिसरातील या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती स्थापत्यशैलीतील आहे. येथील वैशिष्ट्य असे की अजिंठा डोंगररांगेतील सुमारे दीड हजार फूट खोल दरीच्या टोकावर हे मंदिर आहे. त्यामुळे भाविकांसोबत येथे पर्यटकांचीही नेहमी गर्दी असते. राज्य सरकारनेही या मंदिराचा तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देऊन गौरव केला आहे.
या मंदिराची आख्यायिका अशी की पूर्वी हा परिसर दंडकारण्याचा भाग होता. एके दिवशी श्रीराम सीतेसह खानदेशातून या परिसरात आले. सीता ही शंकराची निस्सीम भक्त होती. शंकराच्या पूजेसाठी तिला स्वतः श्रीरामांनी येथे शिवलिंग तयार करून दिले होते. शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर त्यांनी खानदेशकडे मुरडून (वळून) पाहिले म्हणून या क्षेत्राला मुरुडेश्वर हे नाव पडले. शिवपिंडीची स्थापना केल्यानंतर श्रीराम हे सीतेसह चार दिवस येथे राहिले होते. पुढे यादवकाळात कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. आग्रा येथे जाताना छत्रपती शिवाजी महाराजही या मंदिरात दर्शनासाठी आल्याचे सांगितले जाते.
सिल्लोड–चाळीसगाव मार्गावर भराडी हे गाव आहे. येथून आणथाना–धावडा मार्गावर एक घाट लागतो. येथून काही अंतरावर केळगाव आहे. या गावापासून दीड किमी अंतरावर मुर्डेश्वर महादेवाचे मंदिर आहे. मंदिर परिसर अजिंठा पर्वतरांगांतील डोंगर–दऱ्या व विपुल वनराईने समृद्ध आहे. मंदिराच्या तटबंदीजवळील मुख्य प्रवेशद्वाराजवळ पूजा साहित्य विक्रीची दुकाने आहेत. येथील तटबंदी पाहिल्यावर आतमध्ये एखादा किल्ला असावा, असा भास होतो. जमिनीपासून दहा पायऱ्या चढून येथील प्रवेशद्वारातून मंदिराच्या प्रांगणात प्रवेश होतो. भाविकांची येथे दररोज गर्दी होत असल्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रवेशद्वार व प्रांगणात स्टिलचे रेलिंग बसविण्यात आले आहेत. या प्रांगणात लहान–मोठी झाडे असून एका चाफ्याच्या झाडाजवळ दत्ताचे छोटे मंदिर आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारानजीक डोक्यावर तुळस घेतलेल्या स्त्रीचे शिल्प आहे. या शिल्पाच्या बाजूला नागशिल्प आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात शिवपंचायतन आहे. याशिवाय या प्रवेशद्वाराच्या खांबांवर विविध शिल्पे आहेत.
सभामंडप, गर्भगृह असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील दगडी खांबांवर कलश, कळ्या–फुलांचे नक्षीकाम, सूर्य–चंद्र, गरुड, कुबेर, यक्ष तसेच किन्नरांच्या मूर्ती आहेत. काही खांबांवर प्राचीन कोरीव लेखही आहेत. सभामंडपात नंदीची दगडी मूर्ती व त्यापुढे कासवमूर्ती आहे. नंदीच्या मागील भिंतीच्या कठड्यावर काही देव–देवतांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे, तसेच खालील बाजूला कीर्तिमुख आहे. गर्भगृहात मुर्डेश्वराचे प्राचीन शिवलिंग आहे. मंदिराच्या शिखरावरील देवळ्यांमध्ये अनेक देव–देवतांच्या मूर्ती आहेत. प्राचीन वास्तुकलेची साक्ष देणाऱ्या, भक्कम बांधकाम असलेल्या या मंदिराची उभारणी पूर्णपणे दगडात केलेली आहे.
श्रावण महिन्यात येथे भाविकांची गर्दी असते. दर श्रावणी सोमवारी परिसराला यात्रेचे स्वरूप येते. त्या दिवशी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दीचे नियोजन करण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त तैनात केलेला असतो. गुरुपौर्णिमेलाही येथे अनेक भाविक येतात.
खोल दरीच्या टोकावरच हे मंदिर असल्याने येथे प्रदक्षिणा घालता येत नाही. कातळकड्यावर बांधकाम असलेल्या या मंदिराला सर्व बाजूंनी दगडी तटबंदी आहे. या मंदिराच्या प्रांगणातून खानदेशातील अनेक गावांचे विहंगम दृश्य दिसते. असे सांगितले जाते की या परिसरात अनेक साधू–संतांनी तपश्चर्या केलेली आहे. मंदिर परिसरात श्रीराम–सीता, हनुमान, बबळेश्वर, गणपती, शनिदेव, रोहिदास महाराज, शिवराम महाराज यांची मंदिरे आहेत. त्यापैकी बबळेश्वराचे मंदिर बबळा नदीच्या उमगस्थानी आहे. येथे अनेक प्राचीन वटवृक्ष तसेच रानकेळी, वेळू, जाई, साग, जांभूळ, पळस तसेच अनेक औषधी वनस्पती आहेत. मंदिरामागील खोल दरीत पूर्णा नदीची उपनदी असलेल्या हिरणा नदीचा उगम होतो.