मुरलीधर मंदिर

चंद्रपूर शहर, ता. जि. चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये प्राचीन स्थापत्य वैभव वास्तुशिल्पांची रेलचेल असून प्रसिद्ध महाकाली मंदिर, अंचलेश्वर मंदिर, गोंड राजा बीरशाह समाधी स्थान अशा एकाहून एक वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यकलेच्या वास्तू येथे आहेत. त्या सर्वांवर कळस म्हणजे नागपूरकर भोसले यांनी आपल्या वाड्याजवळ उभारलेले श्री मुरलीधर मंदिर! राजे व्यंकोजी ऊर्फ नानासाहेब भोसले यांच्या काळात उभारलेले हे मुरलीधराचे मंदिरविदर्भाचे वेरूळठरावे असे असून ते नखशिखांत कोरीव शिल्पांनी सजलेले आहे.

चंद्रपूर शहरातील नेताजी नगर भवनाच्या मागे गांधी चौकाजवळ मुरलीधर मंदिर आहे. आजूबाजूला अनेक इमारतींच्या मध्ये असलेले हे मंदिरनानासाहेबांचे देऊळम्हणूनही प्रसिद्ध आहे. चंद्रपूर ही पूर्वी गोंड राज्याची राजधानी होती. पुढे नागपूरकर भोसले यांनी चंद्रपूर जिंकून तेथे आपले वर्चस्व निर्माण केले. त्यानंतर नानासाहेब भोसले यांनी आपल्या कुटुंबासाठी जेथे महाल (वाडा) बांधला, त्या महालाच्या अंगणातील हे मंदिर होय. नागपूर शहरात असलेले भोसलेकालीन प्राचीन शिव मंदिर (भोंडा महादेव) आणि चंद्रपूरमधील हे मुरलीधर मंदिर यांवर असलेल्या शिल्पांमध्ये बरेचसे साम्य आहे.

आज जेथे चंद्रपूरमधील शहर पोलिस ठाणे आहे, त्या जागेवर पूर्वी नानासाहेब भोसले यांचा महाल होता. . . १८१७ मध्ये झालेल्या सीताबर्डीच्या लढाईनंतर इंग्रजांनी नागपूरवर ताबा मिळविला. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली. . . १८१८ मध्ये इंग्रजांनी नानासाहेबांचा महाल जाळून टाकला. या महालाच्या शेजारी असलेल्या कचेरीचे रूपांतर त्यांनी पोलीस ठाण्यात केले. कालौघात नानासाहेबांचा वाडा नष्ट झाला असला तरी त्यांनी बांधलेले मुरलीधर मंदिर २०० वर्षांनंतरही त्याच जागेवर अढळ असून त्यावरील शेकडो वैशिष्ट्यपूर्ण शिल्पे आजही शाबूत आहेत.

चंद्रपूर महापालिका इमारतीच्या शेजारी असलेले मुरलीधर मंदिर पूर्वाभिमुख असून ते फार मोठे नाही. मंदिरात जाण्यासाठी अरुंद रस्ता आहे. मंदिराभोवती तारेचे कुंपण असून मुख्य द्वारासमोर प्रशस्त ओटा आहे. या ओट्याच्या चारही बाजूला नक्षीकाम आहे. ओट्याच्या एका बाजूला लहानसे मारुतीचे मंदिर, तर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर नंदी आहे. या मंदिरापुढे सभामंडप नाही. मोकळा ओटा, अंतराळ गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. अंतराळातून गर्भगृहात जाताना जी द्वारशाखा आहे त्यावर अतिशय बारकाईने नक्षीकाम केल्याचे दिसते. हे मंदिर मुरलीधर मंदिर म्हणून प्रसिद्ध असले तरी येथील गर्भगृहात मात्र शिवपिंडी आहे. शिवपिंडीच्या मागील बाजूस श्रीगणेश, अन्नपूर्णा देवी नागशिल्प कोरलेली आहेत. गर्भगृहातील शिवपिंडीतून जाणाऱ्या तीर्थाच्या मार्गावर बाहेरील बाजूस वराहमुखाचे शिल्प आहे.

हे मंदिर म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना असून मंदिराची बाहेरील भिंत फक्त आणि फक्त कोरीव शिल्पांनी व्यापलेली आहे. मंदिराचे बांधकाम खालच्या बाजूने काळ्या पाषाणात, तर वरचा भाग या परिसरात उपलब्ध असणाऱ्या लालसर पिवळ्या वालुकामय दगडांनी केलेले आहे. मंदिरावरील शिल्पांमध्ये रासक्रीडेत रममाण श्रीकृष्ण, बासरी वाजविणारे वेणुगोपाल, साक्षीगोपाल, कालियामर्दन, वृक्षावर लपून बसलेला गोपाळ, लोणी चोरणारा श्रीकृष्ण, आपली वस्त्रे मागणाऱ्या गवळणी, समुद्रमंथन, श्रीकृष्णांच्या लीला, श्रीविष्णू, श्रीमहादेव, धनुर्धारी श्रीराम, नारद मुनी, सिंहारूढ दुर्गादेवी, गरुडारूढ श्रीनारायण, हरणाच्या रथात बसलेला चंद्र, याशिवाय मकर, हत्ती, विविध प्राणी, व्याल, कमलपुष्प, बंदूकधारी द्वारपाल, सावकार, नृत्यांगना, सुरसुंदरी, योद्धे अशी अनेक कोरीव शिल्पे आहेत. हत्तीवर स्वारी करणारा सिंह ही शिल्पे येथे अनेक ठिकाणी कोरलेली आहेत. खालच्या बाजूला असलेल्या काळ्या दगडांवर कीर्तिमुखांची पट्टी कोरलेली आहे. या मंदिराच्या शिखराची काहीअंशी पडझड झाल्यामुळे पुरातत्त्व विभागाकडून त्यावर पत्र्याची शेड उभारण्यात आली आहे. चंद्रपूरमधील हे मंदिर म्हणजे पाषाण शिल्पांचा खजिना असून सरकारकडून ते संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे.

उपयुक्त माहिती:

  • चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागातील मंदिर
  • चंद्रपूर बस स्थानकापासून . किमी अंतरावर
  • जिल्ह्याचे ठिकाण असल्याने राज्यातील अनेक भागांतून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिर परिसरात जाऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home