मुकुंदराज समाधी मंदिर

अंबाजोगाई, ता. अंबाजोगाई, जि. बीड

मराठी साहित्य शारदेचे पहिले नूपुर ज्यांनी बांधले आणि मराठी भाषेला ग्रंथरूपाने पहिले अधिष्ठान मिळवून दिले, ते महात्मे म्हणजे ‘आद्यकवी मुकुंदराज’ होय. संत ज्ञानेश्वरांच्याही सुमारे शंभर वर्षे आधी, म्हणजेच बाराव्या शतकात मुकुंदराजांनी मराठी साहित्याची मुहूर्तमेढ रोवली. संस्कृत भाषेचे वर्चस्व असलेल्या त्या काळात (इ.स. ११८८) त्यांनी ‘विवेकसिंधू’ हा ग्रंथ लिहिला. हा मराठीतील पहिला ग्रंथ मानला जातो. या मुकुंदराज यांची समाधी अंबाजोगाई शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. हे समाधीस्थळ मराठी सारस्वतांचे प्रेरणास्थान आहे.

हे समाधी मंदिर सुमारे नऊशे वर्षांपूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. मुकुंदराज यांच्या समाधीबाबत आख्यायिका अशी की अंबाजोगाई येथील राजा जैतपाल हा नास्तिक होता. त्याने सर्व साधू-संन्यासी व ब्राह्मणांना ‘देव दाखवा किंवा कष्ट करून खा,’ असे सांगून कष्टाची कामे करायला लावली. सतत बारा वर्षे राज्यातील साधू-संन्यासी राजाला भिऊन कष्टाची कामे करत राहिले. ही गोष्ट काशी येथे शिक्षण घेत असलेल्या मुकुंदराज यांच्या कानी पडली. ते गुरूंची आज्ञा घेऊन अंबानगरीत आले व राजाला देव दाखवतो असे म्हणाले. त्यांनी राजाला घोड्यासहीत मैदानात नेले व घोड्याच्या पाठीवर आसूड ओढला. घोडा चौखूर उधळला. राजाला ब्रह्मसमाधी लागली. आठव्या दिवशी समाधी अवस्थेतून बाहेर पडल्यानंतर राजाने सर्व साधू-संन्याशांची मुक्तता केली व आपल्याला या ब्रह्मावस्थेचा पुन्हा अनुभव घ्यायचा आहे, असे मुकुंदराजांना सांगितले. त्यावेळी मुकुंदराजांनी राजाला आपल्या मागे येण्यास सांगितले व डोंगरकड्यावरून खाली उडी मारली. मुकुंदराज यांच्या मागोमाग राजानेही घोड्यासहीत दरीत उडी मारली व तिघेही ब्रह्मलीन झाले.

अंबाजोगाई शहरातून मुकुंदराज समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्वागतकमान आहे. समाधीस्थळ डोंगरकड्याला लागून आहे. येथून डोंगरमाथ्यावरील वाहनतळापर्यंत रस्ता आहे. येथून खाली समाधीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. पायरीमार्गाच्या प्रारंभी दुसरी स्वागतकमान आहे. स्तंभपादांवर तीन चौकोनी स्तंभ व त्यावर सज्जा असे स्वागतकमानीचे स्वरूप आहे. हे स्तंभ एकमेकांना महिरपी कमानीने जोडलेले आहेत. येथून १३० पायऱ्या उतरून समाधी मंदिराच्या प्रांगणात पोहोचता येते. पायरीमार्गाच्या एका बाजूला उंच डोंगरकडा व दुसऱ्या बाजूला सुरक्षा कठडा आहे. पायऱ्यांच्या बाजूला प्रांगणात समाधी मंदिर संस्थानचे कार्यालय आहे.

समाधी मंदिराच्या समोर एका बाजूला खोल दरी व दुसऱ्या बाजूला उंच डोंगरकडा आहे. या ठिकाणी लोखंडी स्तंभांवर पत्र्याचे छत असा अर्धखुल्या स्वरूपाचा सभामंडप आहे. सभामंडपात दरीच्या बाजूने पाषाण बांधणीचा कठडा आहे. पुढे तुळशी वृंदावन व त्यापुढे गर्भगृह आहे. गर्भगृह सभामंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे सुमारे दहा पायऱ्या चढून वर जावे लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे आहेत. यामध्ये दीपकोष्ठके आहेत.

दगडी बांधणीच्या गर्भगृहाच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला दीपकोष्ठके आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूस नक्षीदार स्तंभ आहेत, तसेच वर महिरपी तोरण आहे. प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात मागील बाजूला डोंगरकड्यातील नैसर्गिक गुफेत मुकुंदराज यांच्या समाधीचा चौथरा आहे. प्रवेशद्वारापेक्षा चौथरा उंचावर आहे. त्यावर चढण्यासाठी पाच पायऱ्या आहेत. चौथऱ्यावर स्टेनलेस स्टीलच्या जाळीदार मखरात समाधीचे शिवपाषाण आहे. शिवपाषाण वस्त्रे व अलंकारांनी सुशोभित आहे. गर्भगृहात छताला पितळी घंटा टांगलेल्या आहेत.

मंदिराच्या परिसरात वाहनतळाजवळ पुजाऱ्यांचे निवासस्थान आहे. याच बाजूला लहान देवळीत पाषाणी पादुका आहेत. त्या संत ज्ञानेश्वरांच्या पादुका असल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर महाराज मुकुंदराज स्वामींच्या दर्शनाला आले होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. येथे काही प्राचीन समाध्या व मुकुंदराज भजनी मंडळाची विशाल वास्तू आहे. त्यात विठ्ठल-रखुमाई मंदिर आहे. येथेच दगडी बांधणीच्या तीन ओवऱ्या तसेच दोन मजल्यांचे भक्तनिवास आहे. याच मैदानात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सभागृह आहे. येथे डोंगरातून वाहणारा झरा आहे. या झऱ्याची नयनरम्य शोभा फक्त पावसाळ्यात पहावयास मिळते. मंदिराचा परिसर दाट वनराईने नटलेला आहे. येथे विविध प्रकारचे वृक्ष आहेत.

मुकुंदराज समाधीस्थळी विशेष उत्सवांचे आयोजन केले जात नसले तरी विशेष प्रसंगी भजन, कीर्तन, संगीत आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मराठीतील आद्य कवी म्हणून मुकुंदराज यांचे मराठी भाषिकांमध्ये विशेष कौतुक आहे. समाधीच्या दर्शनासाठी राज्यभरातील अनेक भाविक, पर्यटक व भाषा अभ्यासक येतात.

उपयुक्त माहिती:

  • अंबाजोगाई बस स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • बीड येथून ९७ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून अंबाजोगाईसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय

मुकुंदराज समाधि मंदिर

अम्बाजोगाई, ताल. अम्बाजोगाई, जिला. बीड

Back To Home