परभणी जिल्ह्यातील दुर्गम व कृषीप्रधान असलेल्या पाचलेगाव येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा उदय झाला व त्यांच्या कार्याने ही भूमी हजारो भाविकांचे श्रद्धास्थान बनली. या समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व आध्यात्मिक विचारवंताने अध्यात्माची सांगड राष्ट्रभक्ती व समाजसेवेशी घालून राष्ट्रहितासाठी समाजजागृती केली. त्यांनी अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद निर्मूलन, वंचितांचे हक्क व शिक्षणासाठी आपले जीवन समर्पित केले. मराठवाडा मुक्ती संग्रामात हैदराबादच्या निजामाविरुद्ध व रजाकारांच्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी जनतेला संघटित केले आणि तरुणांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्यासाठी ‘राष्ट्रीय मुक्ती सेना’ स्थापन करून अन्यायाविरुद्ध प्रत्यक्ष लढा उभारला. त्यांच्या याच अतुलनीय राष्ट्रकार्यामुळे व सामाजिक योगदानामुळे त्यांना ‘राष्ट्रसंत’ म्हणून ओळखले जाते.
परभणी जिल्ह्याच्या उत्तर दिशेला प्रसिद्ध अजिंठा डोंगररांगा आणि दक्षिण दिशेला बालाघाट डोंगररांगा पसरलेल्या आहेत. गॅझेटिअरमधील नोंदीनुसार परभणी हे नाव पूर्वीच्या ‘प्रभावतीनगर’ या नावावरून विकसित झाले आहे. प्राचीन काळात हा भूप्रदेश मगध साम्राज्य आणि मौर्य राजवटीचा भाग होता. अर्जुनपुत्र बभ्रुवाहन राजाने पाथरी शहर वसवल्याचा संदर्भ देखील पुराणात आढळतो. महान गणिती भास्कराचार्य यांचे मूळ गाव बोरी आणि संत नामदेव महाराजांचे जन्मस्थान ‘नर्सी नामदेव’ हे याच परभणी जिल्ह्यात मोडतात.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात दळणवळण तसेच उच्च शिक्षणाची कोणतीही सोय उपलब्ध नसलेल्या या दुर्गम क्षेत्रात पाचलेगाव हे एक छोटे कृषीप्रधान गाव होते. अशा दुर्गम सामाजिक व राजकीय वातावरणात पाचलेगाव येथे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा जन्म झाला.
‘श्री पाचलेगावकर महाराज चरित्रामृत’ या ग्रंथातील नोंदीनुसार पाचलेगावचे राजारामपंत कुलकर्णी (पांडे) आणि सौ. कृष्णाबाई हे दाम्पत्य सात्त्विक व देवभक्त होते. अपत्य नसल्यामुळे ते नेहमी काळजीग्रस्त असायचे. संन्यास घेण्याची अनुमती मिळवण्यासाठी राजारामपंत लोणी येथील सखाराम महाराजांना भेटले. त्या वेळी सखाराम महाराजांनी राजारामपंत यांना संन्यास घेण्यास नकार दिला आणि “देवाला घरी येऊ द्या” असा आशीर्वाद दिला. त्याच रात्री राजारामपंतांच्या स्वप्नात भगवी वस्त्रे परिधान केलेले एक साधू आले. त्यांनी आपण तुमच्या घरी जन्म घेणार असल्याचे सांगितले. शके १८३४ आश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच ८ नोव्हेंबर १९१२ रोजी नरक चतुर्दशीला कृष्णाबाईंच्या पोटी नृसिंह यांचा जन्म झाला. नृसिंह बाळ असतानाच दत्तवाडीचे तपस्वी श्री माधवाश्रम स्वामी पाचलेगावी आले. त्यांनी आपल्या आध्यात्मिक शक्तीने नृसिंह यांचे भावी कार्य ओळखून त्यांना ‘संचारेश्वर’ असे नाव दिले.
नृसिंह खोडकर आणि हुशार बालक होते. प्राथमिक शाळेतील औपचारिक अभ्यासात त्यांचे मन कधीही रमले नाही. ते शाळेतून पळ काढून पाचलेगावाजवळील मुक्तेश्वर येथील स्वयंभू महादेवाची पिंड असलेल्या डोंगरावर ध्यान लावून बसत असत. नागपंचमीच्या दिवशी अवघ्या आठ वर्षांच्या नृसिंह यांनी जिवंत नाग पकडून घरात आणला होता. त्यांनी स्वतः त्या नागाची पूजा केली आणि त्याला सुरक्षितपणे सोडून दिले.
विसाव्या शतकात हैदराबाद संस्थानात राहणाऱ्या हिंदूंवर निजामाकडून अत्याचार व सक्तीने धर्मांतर केले जात होते. या सक्तीने चालणाऱ्या धर्मांतराच्या लाटेला तोंड देण्यासाठी आणि हिंदू संघटन मजबूत करण्यासाठी महाराजांनी १९२५ व १९२६ च्या दरम्यान ‘मुक्तेश्वर दल’ स्थापन केले. या दलाच्या माध्यमातून हजारो तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम जागृत झाले. १९३२ सालापर्यंत मुंबईपासून ते हैदराबादच्या सीमावर्ती भागापर्यंत आणि अहमदनगरपासून ते कुरुंदवाडपर्यंत ‘मुक्तेश्वर दलाच्या’ तब्बल १५० शाखा उघडल्या गेल्या. ख्रिस्ती मिशनऱ्यांनी बळजबरीने धर्मांतरित केलेल्या हिंदू कुटुंबांना स्वधर्मात आणण्यासाठी महाराजांनी शुद्धीकरणाची मोठी मोहीम राबवली.
त्यांनी खांडवा व जबलपूर जिल्ह्यातील १२०२ गावांमधील हजारो लोकांना पुन्हा हिंदू धर्मात समाविष्ट करून घेतले.
३० जानेवारी १९४८ रोजी झालेल्या महात्मा गांधींच्या निधनामुळे महाराजांना अतिशय दुःख झाले. ३१ जानेवारी १९४८ रोजी आर्य समाजाच्या वतीने प्रा. इंद्रदेव सिंह यांच्या निवासस्थानी शोकसभा पार पडली. या सभेत महाराजांनी महात्माजींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. आयुष्यभर राष्ट्रधर्म आणि हिंदू समाजसुधारणेसाठी स्वतःचा देह झिजवणाऱ्या राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचे देहावसन १६ ऑगस्ट १९८६ रोजी श्रावण शुद्ध एकादशीला सकाळी ७ वाजता मुंबईतील ‘जे. जे. रुग्णालय’ येथे झाले. महाराजांचा पार्थिव देह खामगावच्या मुक्तेश्वर आश्रमात अंत्यदर्शनासाठी आणण्यात आला. येथे हजारो भाविक आणि अनुयायांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.
पाचलेगावकर महाराजांची गुरुपरंपरा प्राचीन आणि आदरणीय मानली जाते. श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांच्यापासून सुरू झालेली ही परंपरा स्वामी नारायण दत्तानंद सरस्वती आणि त्यानंतर श्री माधवाश्रम स्वामी यांच्याकडे आली. ‘नारायण दत्तानंद स्वामींचे चरित्र’ या ग्रंथातील संदर्भानुसार स्वामी नारायण दत्तानंद सरस्वती हे ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण होते.
त्यांनी इंग्रज राजवटीत एमए पर्यंतचे उच्च शिक्षण पूर्ण केले होते. एका संस्थानात तपासणी अधिकारी म्हणून काम करत असताना शृंगेरी पीठाच्या पीठाधिकाऱ्यांच्या दर्शनानंतर स्वामींची पूर्वअवतारांची स्मृती जागृत झाली. त्यांनी तात्काळ आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि लोककल्याणासाठी संन्यास मार्ग निवडला. ‘टेंबे स्वामी चरित्र’ या ग्रंथातील नोंदींनुसार व्यंकटगिरी पर्वतावर श्री नारायण दत्तानंद स्वामींची भेट श्री वासुदेवानंद सरस्वती यांच्याशी झाली. तेथेच त्यांना दंडदीक्षा मिळाली. स्वामी नारायण दत्तानंद यांनी महाराष्ट्रात आणि वऱ्हाडात अनेक गुप्त मंदिरे व प्राचीन तीर्थांचा शोध लावला. घटनांदूर येथील प्रसिद्ध सोमेश्वर मंदिरात त्यांनी तीर्थाची स्थापना केली. तेथील त्यांची वास्तव्य खोली आजही जतन केली गेली आहे. आपल्या अवतारकार्याच्या समाप्तीपूर्वी त्यांनी आपले शिष्य माधवाश्रम स्वामी यांना सांगितले होते, “आपण हा देह संपवून पाचलेगाव येथे नृसिंह म्हणून जन्म घेणार आहोत.”
पाचलेगावाच्या मध्यवर्ती भागात मुक्तेश्वर आश्रम आणि राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे मंदिर आहे.
या मंदिर संकुलाभोवती असलेल्या तटबंदीतील प्रवेशद्वारातून एका बंदिस्त प्रांगणात प्रवेश होतो. या प्रांगणात डावीकडे मुक्तेश्वर महादेव मंदिर आणि उजवीकडे राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे मंदिर आहे. येथील प्राचीन मुक्तेश्वर मंदिर हे हेमाडपंती शैलीचे आहे. या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ उजवीकडे एक प्राचीन शिवपिंड आहे आणि त्याशेजारी शिव-पार्वतीची प्राचीन पाषाणमूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडील भिंतीवर सरस्वती आणि डावीकडे शिवशंकरांची प्रतिमा आहे. प्रवेशद्वाराच्या उत्तरांगावर दोन्ही बाजूला दीपकोष्टके आहेत. मंदिरात प्रवेश केल्यावर चारही नक्षीदार दगडी स्तंभांच्या मध्यभागी जमिनीवर मोठी अनघड पाषाणी शिळा आहे. या शिळेचीच येथे मुक्तेश्वर महादेव म्हणून पूजा केली जाते. या मुक्तेश्वर महादेवांच्या दर्शनासाठी पुरुष भाविकांना कमरेच्या वरील सर्व कपडे काढूनच गर्भगृहात प्रवेश करता येतो. या मंदिराच्या समोरील बाजूला राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज यांचे छोटे मंदिर आहे. या मंदिरातील वज्रपीठावर पाचलेगावकर महाराजांची भगवी वस्त्रे परिधान केलेली शुभ्र संगमरवरी मूर्ती आहे. या मूर्तीच्या डोक्यावर मुकुट आणि मूर्तीवर एक छत्र आहे.
मंदिरात वर्षभरातील अनेक सण आणि उत्सव उत्साहात पार पडतात. वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आश्विन कृष्ण चतुर्दशीला म्हणजेच नरक चतुर्दशीला साजरा होणारा महाराजांचा जन्मोत्सव सोहळा होय. या जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने पाचलेगाव येथील ग्रामस्थ मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करतात. सप्ताहाच्या काळात ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘श्रीमद्भागवत’ या ग्रंथांचे सामूहिक पारायण केले जाते. महाशिवरात्री हा मंदिरातील दुसरा महत्त्वाचा वार्षिक सण मानला जातो. महाशिवरात्रीला पहाटेपासूनच मुक्तेश्वराच्या स्वयंभू पिंडीवर रुद्राभिषेक करण्यासाठी हजारो भाविक पाचलेगावला येतात. दरवर्षी श्रावण शुद्ध एकादशीला राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराजांचा पुण्यतिथी सोहळा येथे साजरा केला जातो. पुण्यतिथीच्या निमित्ताने मंदिरात भजन, कीर्तन आणि ‘श्रीमद् संचारेश्वर चरित्रामृत’ ग्रंथाचे पारायण होते. सोहळ्याच्या सांगतेनंतर भंडाऱ्याचे म्हणजेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. हजारो भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. मार्गशीर्ष वद्य द्वादशीला निर्गुण पादुका स्थापना दिनाचा सोहळा देखील मंदिरात मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. आषाढ शुद्ध अष्टमी आणि ‘गुरुपौर्णिमा’ उत्सव देखील मंदिरात सामूहिक उपासना व व्याख्यानांसह आयोजित केले जातात.