नागनाथ महादेव मंदिर

हातनूर, ता. सेलू. जि. परभणी

हातनूर येथील नागनाथ महादेवाचे मंदिर प्राचीन स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना आहे. उत्तर चालुक्य काळात भूमीज शैलीत उभारलेल्या या मंदिराचा यादवकाळात जीर्णोद्धार झाल्याचा संदर्भ या मंदिरातील एका स्तंभावर कोरलेल्या लेखात आढळतो. त्रिदल पद्धतीच्या या शिवालयातील नागनाथ महादेवाचे शिवलिंग हे हातनूरचे ग्रामदैवत आहे. ते जागृत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. उत्तरायणादरम्यान मार्च महिन्यात सूर्याची पहिली किरणे या पूर्वाभिमुख मंदिराच्या प्रवेशद्वारातून थेट गर्भगृहातील शिवलिंगावर पडतात. सुमारे पाऊण तास चालणाऱ्या या किरणोत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी शेकडो भाविक येथे उपस्थित असतात. महाशिवरात्रीनिमित्त येथे दरवर्षी तीन दिवसांची जत्रा असते.

शिवपुराणातील कोटिरुद्र संहितेमध्ये बारा ज्योतिर्लिंगांच्या उत्पत्तीची कथा दिली आहे. या संहितेनुसार, प्राचीन काळात दारुकावनात दारुक नावाचा राक्षस आणि दारुका नावाची त्याची पत्नी राहत होते. त्यांनी तेथील लोक आणि ऋषीमुनींवर अत्याचार सुरू केले होते. या राक्षसांनी सुप्रिय नावाच्या एका शिवभक्त व्यापाऱ्याला आणि इतर अनेक लोकांना बंदी बनवले होते. सुप्रिय हा कारागृहातही महादेवाची अखंड पूजा आणि नामस्मरण करत असे. जेव्हा दारुक राक्षसाला हे कळाले, तेव्हा तो सुप्रियला मारण्यासाठी धावला. आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी महादेव तेथे एका भुयारातून प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसांचा संहार केला. भक्तांच्या विनंतीवरून महादेव तेथेच लिंगरूपाने स्थायिक झाले. या स्थानाला ‘नागेश’ किंवा ‘नागनाथ’ असे नाव मिळाले. या नावाचा दुसरा संदर्भ महादेवाच्या स्वरूपाशी जोडलेला आहे. महादेव हे आपल्या शरीरावर आणि गळ्यात नाग धारण करतात म्हणून त्यांना नागांचे स्वामी म्हणजेच ‘नागनाथ’ म्हटले जाते. शिवपुराणात ‘नागेशं दारुकावने’ असा श्लोक आढळतो. महादेवाने नागलोकातील नागांना आणि त्यांच्या राजाला अभय दिले होते, असाही उल्लेख ‘उपमन्यू शिवभक्त’ कथेत येतो.

हातनूर गावात अनेक मंदिरे आहेत. अंदाजे अडीच हजार चौरस फूट क्षेत्रफळात वसलेले नागनाथ महादेवाचे मंदिर हे त्यापैकीच एक आहे. गावातील मंदिराच्या कमानीपासून काही अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ डाव्या बाजूला गणेशाचे स्थान आहे. प्रवेशद्वाराच्या भिंतीवर गणेशाची व इतर देवतांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना द्वारपालांची चित्रे आहेत. या दगडी प्रवेशद्वाराच्या चारही बाजूंनी तटबंदी आहे. प्रवेशद्वारातून आत आल्यावर प्रांगणात समोरच नागनाथ महादेवाचे मंदिर दिसते.

उंच जोत्यावर हे मंदिर बांधण्यात आलेले आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला नंदीची प्राचीन मूर्ती आहे. या मूर्तीचे धड व शिर एकमेकांपासून वेगळे करता येते. त्याच्या आत सदैव पाणी असते. मंदिरासमोरही नंदीचे शिल्प आहे. चार-पाच पायऱ्या चढून मंदिरात यावे लागते. मुखमंडप, सभामंडप, दोन उपगर्भगृहे, अंतराळ व मुख्य गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. मुखमंडपाच्या समोरील दोन स्तंभांपैकी उजव्या बाजूच्या (दक्षिणेकडील) स्तंभावर एक लेख कोरलेला आहे. त्यातील माहितीवरून या प्राचीन मंदिराचा शके १२२३ मध्ये प्रथम जीर्णोद्धार झाल्याचे समजते. सभामंडपाचे प्रवेशद्वार पंचशाखीय आहे. त्यावर उत्तम कलाकुसर आहे. सोनेरी रंग दिलेल्या द्वारशाखेच्या द्वारपट्टीवर मध्यभागी गणेशाचे शिल्प आहे. सतत खेळती हवा व प्रकाश आत यावा, अशा पद्धतीने मंदिरातील गवाक्ष व जलवातायनांची, तसेच मुख्य प्रवेशद्वाराची रचना करण्यात आलेली आहे. सभामंडपात बारा स्तंभ आहेत. स्तंभपादांवर उभ्या असलेल्या या स्तंभांवर विविध आकार कोरलेले आहेत. येथील तुळयांच्या कोपऱ्यांवरील चार झुंबरांवर उलटे नाग आहेत. चार तुळयांच्या मध्यभागी प्राण्यांचे खूर भासावेत, अशी कोरीव रचना आहे. वितानाच्या मध्यभागी चौरस रचना असून त्या रचनेत पद्म कोरलेले आहे. सभामंडपातील भिंतींवर काही देवकोष्टके कोरलेली आहेत. डावीकडील उपगर्भगृहात पालखी ठेवण्यात आली आहे. उजवीकडील उपगर्भगृहात शिवलिंग आहे. असे सांगितले जाते की सभामंडपातून एक गुप्त रस्ता औंढा नागनाथ येथे जात असे. तसेच मंदिराखाली एक भुयार आहे. पूर्वी भाविक येथे ध्यान करत. अंतराळातील भिंतींवर लक्ष्मी तसेच गजानन महाराजांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या मध्यभागी असलेल्या ललाटबिंबावर गणेशाचे स्थान आहे. गर्भगृहात मोठ्या शाळुंकेमध्ये नागनाथ महादेवाचे शिवलिंग आहे. त्यावर पंचधातूचा मुखवटा बसवण्यात आलेला आहे. गर्भगृहात दोन रिक्त देवकोष्टके आहेत. मार्च महिन्यात, उत्तरायणादरम्यान सकाळी ६.३० ते ७.१५ या वेळेत शिवलिंगावर किरणोत्सव होतो. मुख्य गर्भगृहावर वरच्या दिशेने निमुळते होत जाणारे उंच शिखर आहे. त्यावर आमलक व कळस आहे. हे शिखर नव्याने बांधण्यात आलेले आहे. सभामंडपावर घुमटाकार शिखर आहे. मंदिराच्या पीठावरूनच प्रदक्षिणा घालता येते. मुखमंडपातील स्तंभावर कोरलेल्या लेखाचे प्रथम वाचन प्राध्यापक र. म. भुसारी यांनी १९४८ मध्ये केले. त्यानंतर संशोधक शं. गो. तुळपुळे यांनी या लेखाचे पुनर्वाचन केले. आठ ओळींचा हा लेख यादवकालीन आहे. या लेखातील “शकु १२२३ प्लव संवत्सरे” या उल्लेखानुसार इ. स. १३०१ हा या लेखाचा काळ निश्चित करण्यात आलेला आहे. ‘पुरुषदेव पंडित’ नावाच्या व्यक्तीने शके १२२३ मध्ये नागनाथाचा प्रसाद, म्हणजे धर्म करून त्याची वृद्धी (जीर्णोद्धार) केल्याचे त्यात नमूद आहे. हे काम ‘हरिदेव’ नामक सुताराने केल्याचाही त्यात उल्लेख आहे. शेवटी नागनाथाला “नमस्तु” करून हा लेख संपवण्यात आला आहे. या गावात नागनाथाचे मूळ मंदिर होते. मात्र, ते मोडकळीस आल्याने पुरुषदेव पंडिताने या मंदिराचा जीर्णोद्धार केला, असा या लेखाचा आशय आहे. यात उल्लेख असलेला पुरुषदेव पंडित म्हणजेच ‘पुरुषोत्तमपुरी’ ताम्रपटातील उल्लेखित ‘रामदेवराय यादव’ यांचा मुख्य प्रधान असण्याची शक्यता तुळपुळे यांनी वर्तवली आहे. मंदिर परिसरात या लेखासंदर्भात मराठी भाषेतील माहिती देणारा फलक लावण्यात आलेला आहे. या मंदिरासमोरच अंदाजे सहा हजार चौरस फूट क्षेत्रफळ असलेली प्राचीन बारव आहे. कालौघात ही बारव जीर्ण झाल्याने ग्रामस्थांनी अलीकडेच लोकवर्गणीतून या बारवेचा जीर्णोद्धार केला. प्राचीन स्थापत्यशैलीचा सुंदर नमुना असलेल्या या बारवेच्या चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. बारवेत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. बारवेच्या काठावर काही प्राचीन मूर्ती आहेत. या मंदिरासमोर एक विठ्ठल मंदिरही आहे.

हातनूर येथील ग्रामस्थांनी लोकसहभागातून या मंदिराच्या परिसरात अनेक कामे केली आहेत. आपल्या उत्पन्नातील एक टक्का रक्कम ग्रामस्थ येथील विकासकामांसाठी देतात. या निधीतूनच येथील बारवेचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. ग्रामस्थांनी परिसरात एक मंगल कार्यालयही बांधले आहे. ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून या मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावरील एका प्राचीन देवालयाचाही जीर्णोद्धार केला.

नागनाथ महादेवावर अनेक भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील अनेक भाविक येथे दर्शनासाठी व नवस करण्यासाठी येतात. महाशिवरात्र हा येथील मुख्य उत्सव असतो. या उत्सवादरम्यान येथे तीन दिवसांचा जत्रोत्सव असतो. महाशिवरात्रीनिमित्त गावातील अनेक महिला व पुरुष पाच दिवसांचा उपवास करतात. या उत्सवानिमित्त येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. माघ वद्य त्रयोदशीला मंदिरात रुद्राभिषेक करण्यात येतो. महाशिवरात्रीच्या दिवशी दुपारी अनेक भाविक गाड्या ओढण्याचा कार्यक्रम करतात. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. रात्री मंदिरातून पालखी मिरवणूक काढण्यात येते. पालखीत शिवशंकरांचा मुखवटा ठेवण्यात येतो. या उत्सवादरम्यान येथे कुस्तीच्या स्पर्धाही होतात. यावेळी मंदिरासमोरील बारवेभोवती दीपोत्सव केला जातो. गुढीपाडवा तसेच दिवाळी पाडव्यानिमित्तही येथे दीपोत्सव होतो. मंदिर परिसरात सेवालाल महाराजांचेही मंदिर आहे. येथे रामनवमीला जत्रा असते. त्यावेळी पंचक्रोशीतील वंजारा समाजातील अनेक भाविक येथे उपस्थित असतात. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • सेलू येथून १५ किमी अंतरावर
  • परभणी येथून ६२ किमी अंतरावर
  • सेलू शहरापासून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

नागनाथ महादेव मंदिर

हटनूर, सेलू. जिला. परभनी

Back To Home