इच्छापूर्ती त्रिमूर्ती हनुमान मंदिर

यशवाडी, ता. मानवत, जि. परभणी

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यात यशवाडी गावाजवळ प्राचीन व प्रसिद्ध इच्छापूर्ती त्रिमूर्ती हनुमान मंदिर स्थित आहे. हे मंदिर परिसरातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथील हनुमान भाविकांच्या मनोकामना पूर्ण करतो, या श्रद्धेमुळे या देवाला इच्छापूर्ती त्रिमूर्ती हनुमान म्हणून ओळखले जाते. सुमेरू पर्वताचा राजा केसरी आणि राणी अंजनी यांचे पुत्र असलेले हे रामभक्त हनुमान किष्किंधेचे वानरराज सुग्रीव यांचे अमात्य होते. यशवाडी येथील या मंदिरात हनुमानाची रामभक्त, यक्षरूप आणि रुद्ररूप अशा तीन वेगवेगळ्या रूपांत पूजा केली जाते. या तिन्ही रूपांच्या एकत्रीकरणामुळे या मूर्तीला त्रिमूर्ती हनुमान असे संबोधतात. उत्तर भारतात त्रिमूर्ती हनुमानाची अनेक मंदिरे आहेत. महाराष्ट्रातील हे मंदिर त्याचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण आहे.

या मंदिराच्या स्थापनेचा अचूक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध नाही, परंतु रचना आणि परंपरेनुसार हे मंदिर सुमारे चारशे ते पाचशे वर्षे प्राचीन मानले जाते. या देवालयाविषयी आणि गावाच्या नामांतराविषयी स्थानिक पातळीवर अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. त्यानुसार, प्राचीन काळी या ठिकाणी एक समृद्ध गाव होते. गावाच्या वेशीवर प्रतिष्ठित असलेली हनुमानाची ही त्रिमूर्ती /sLrn ग्रामदैवत होती. सुमारे तीनशे ते चारशे वर्षांपूर्वी या गावात एक पाहुणा आला. त्याने वेशीवरील हनुमानाच्या या त्रिमूर्ती रूपाची थट्टा केली आणि देवाविषयी अनुद्गार काढले. तो पाहुणा त्या रात्री गावातच मुक्कामाला थांबला, परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर गावाबाहेरून आलेली कोणतीही व्यक्ती जर रात्री गावात वस्तीला थांबली, तर तिचा मृत्यू होऊ लागला. हा प्रकार वारंवार घडू लागल्यामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी हळूहळू गाव सोडण्यास सुरुवात केली. त्यांनी आसपासच्या गावांमध्ये आणि जवळच असलेल्या मानवत शहरात आश्रय घेतला. संपूर्ण गाव रिकामे झाल्यामुळे हे गाव ओस पडले. त्यानंतर लोक या गावाला ‘ओसवाडी’ या नावाने ओळखू लागले. काही काळाने एक साधू या निर्जन मंदिरात राहण्यास आले. त्यांनी मंदिरात या हनुमानाची सेवा सुरू केली. साधूंच्या वास्तव्यामुळे लोकांच्या मनातील भीती हळूहळू कमी झाली आणि परिसरातील भाविक दर्शनासाठी मंदिरात येऊ लागले. या हनुमानाच्या दर्शनाने लोकांच्या इच्छा पूर्ण होऊ लागल्या. त्यामुळे भाविकांनी या हनुमानाला इच्छापूर्ती त्रिमूर्ती हनुमान हे नाव दिले. हनुमानाच्या आराधनेमुळे भाविकांच्या प्रयत्नांना यश मिळू लागले आणि गावात पुन्हा समृद्धी आली. या यशामुळेच ओसवाडी या गावाला पुढे ‘यशवाडी’ हे नाव मिळाले.

यशवाडी गावापासून काही अंतरावर हे मंदिर वसलेले आहे. गावापासून मंदिरापर्यंत येण्यासाठी पक्का रस्ता आहे. मंदिराच्या संरक्षणासाठी चारही बाजूंनी दगडी तटबंदी बांधलेली आहे. या तटबंदीला लोखंडी जाळ्या लावलेल्या आहेत. तटबंदीच्या परिसरात आणि मंदिराच्या प्रांगणात वृक्ष आहेत. या वृक्षांना आणि लोखंडी जाळ्यांना भाविकांनी लाल कापडात गुंडाळलेले नारळ बांधलेले असतात. या मंदिरात आपली इच्छा पूर्ण व्हावी म्हणून नवस बोलून नारळ बांधण्याची प्रथा आहे. भाविकांचे मनोरथ पूर्ण झाल्यानंतर ते पुन्हा मंदिरात येतात आणि स्वतः बांधलेले नारळ सोडून ते देवाच्या चरणी अर्पण करतात. मंदिराच्या प्रांगणामध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पूजासाहित्याची दुकाने, साठवण कक्ष आणि अन्नछत्रासाठी स्वयंपाकघर बांधलेले आहे. याच प्रांगणात पुजारी आणि येथे नियमित सेवा करणाऱ्या सेवेकऱ्यांची निवासस्थाने आहेत. मंदिराच्या समोरील बाजूस एक सभागृह उभारलेले आहे. वार्षिक उत्सवकाळात या सभागृहात कीर्तन, प्रवचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवाच्या वेळी याच ठिकाणी महाप्रसादाच्या पंगती बसतात. भाविकांना विश्रांती घेण्यासाठी आणि बसण्यासाठी प्रांगणात जागोजागी आसनांची व्यवस्था केलेली आहे.

या मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. नवीन मंदिराचे संपूर्ण बांधकाम राजस्थानी लाल वाळूच्या दगडात केलेले आहे. हे मंदिर एका उंच अधिष्ठानावर उभारलेले आहे. या अधिष्ठानाच्या दगडी भिंतींवर वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम केलेले आहे. त्यावर विविध प्रकारची संयुक्त नक्षी, पानाफुलांचे थर म्हणजेच पर्णथर व पुष्पथर आणि प्राण्यांच्या आकृत्या असलेले पशुथर कोरलेले आहेत. मंदिर जमिनीपासून उंचावर असल्यामुळे सभामंडपामध्ये प्रवेश करण्यासाठी सहा पायऱ्या आहेत. सभामंडपात वीस स्तंभ आहेत. हे सर्व स्तंभ चौकोनी आकाराच्या स्तंभपादावर उभे आहेत. स्तंभांच्या मध्यभागावर विविध प्रकारची नक्षी कोरलेली आहे. छताच्या आतील भागास म्हणजेच वितानाला चक्राकार नक्षीने कोरीव काम केलेले आहे. स्तंभांवरील कणी, हस्त आणि तुळई या सर्व भागांवर नक्षीकाम केलेले आहे.

सभामंडपाच्या पुढे मंदिराचे गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर पानाफुलांचे कोरीव काम आहे. द्वारचौकटीच्या ललाटबिंबावर गणपतीचे शिल्प कोरलेले आहे. प्रवेशद्वाराच्या वरच्या तोरणावर दोन्ही बाजूंना शिखरशिल्पे कोरलेली आहेत, तर तोरणाच्या मध्यभागी नक्षीदार बाशिंग कोरलेले दिसते. गर्भगृहाच्या आत वज्रपीठावर त्रिमूर्ती हनुमानाची काळ्या पाषाणातील त्रिमुखी मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आहे. मूर्तीच्या शेजारीच हनुमानाचे शस्त्र असलेली पितळी गदा आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणामार्ग आहे. मंदिराच्या बाह्य भिंतींवर म्हणजेच मंडोवरावर विविध प्रकारची कोरीव नक्षी आहे. मंदिराच्या छताची रचनाही स्थापत्यकलेचा सुंदर नमुना आहे. सभामंडपाच्या छतावर एक घुमटाकार शिखर उभारलेले आहे. शिखराच्या माथ्यावरील दगडी आमलकावर कळस आहे. गर्भगृहाच्या छतावर दोन थरांचे चौकोनी शिखर बांधलेले आहे. या शिखराचा पहिला थर पंचरथ प्रकारचा व सपाट आहे. शिखराच्या दुसऱ्या थरामध्ये चारही बाजूंना आणि कोनांवर लहान अंगशिखरांची रचना आहे. शिखरावर कुंभथर आणि इतर भौमितिक नक्षीकाम केलेले आहे. शिखराच्या चारही दिशांना देवकोष्टके आहेत.

या देवालयात वर्षभर विविध धार्मिक सण आणि उत्सव साजरे केले जातात. हनुमान जयंती हा येथील मुख्य वार्षिक उत्सव मानला जातो. या जन्मोत्सवासाठी परभणी जिल्ह्यासह आजूबाजूच्या इतर जिल्ह्यांमधूनही भाविक दर्शनासाठी यशवाडीत येतात. हनुमान जयंतीच्या दिवशी मंदिरात हनुमानाच्या उत्सवमूर्तीला पाळण्यात घालून जन्मोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. या निमित्ताने मंदिर प्रशासनातर्फे आणि भाविकांच्या वतीने मंदिरात होमहवन, भजन, कीर्तन, अखंड ग्रंथवाचन, रामकथा आणि महाप्रसाद अशा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. हनुमान जयंतीव्यतिरिक्त मंदिरात रामनवमी, दसरा, दिवाळी आणि संपूर्ण श्रावण महिन्यात विशेष पूजा आणि उत्सवांचे आयोजन केले जाते. या सर्व सणांच्या वेळी मंदिरात विविध पारंपरिक धार्मिक विधी पार पाडले जातात. दर शनिवारी या मंदिरात भाविकांची गर्दी असते. प्रत्येक शनिवारी सुमारे चार ते पाच हजार भाविक देवाच्या दर्शनासाठी, नवस करण्यासाठी आणि फेडण्यासाठी येथे हजेरी लावतात. नवस बोलणारे भाविक एका लाल कापडामध्ये नारळ गुंडाळून ते मंदिराच्या परिसरात किंवा वृक्षांना बांधून ठेवतात. नवस पूर्ण झालेले भाविक येथे येऊन स्वतः बांधलेला तो नारळ सोडतात आणि देवाच्या चरणी अर्पण करून दर्शन घेतात. दररोज सकाळी ६ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात त्रिमूर्ती हनुमानाचे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • मानवत येथून १२ किमी अंतरावर
  • परभणी शहरापासून २५ किमी अंतरावर
  • मानवत येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, मो. ९०११२४१०७२, ९९६०००८९४७

इच्छापूर्ति त्रिमूर्ति हनुमान मंदिर

यशवाड़ी, तालुका मानवत, जिला परभणी

Back To Home