पेडा हनुमान मंदिर

न्यू मोंढा, परभणी, ता. जि. परभणी

महाराष्ट्रातील मराठवाडा प्रांतात वसलेल्या परभणी शहराला मोठा प्राचीन इतिहास लाभलेला आहे. प्राचीन काळी ‘प्रभावतीनगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहराला महानुभाव पंथ, वारकरी संप्रदाय आणि विविध सूफी संतांचा समृद्ध वारसा आहे. महाराष्ट्रातील इतर प्रांतांप्रमाणेच येथेही शक्तिउपासनेची प्राचीन परंपरा पाहायला मिळते. यामुळेच या परिसरात अनेक प्राचीन आणि प्रसिद्ध हनुमान मंदिरे उभारण्यात आली आहेत. या मंदिरांपैकी परभणी शहराच्या न्यू मोंढा भागात असलेले पेडा हनुमान मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. येथील हनुमान जागृत असून तो भाविकांच्या हाकेला नेहमी धावून येतो, अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे.

हे मंदिर सुमारे तीनशे ते चारशे वर्षे प्राचीन आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हा संपूर्ण परिसर पूर्वी निजामांच्या हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता. त्या काळापासून या मंदिराचे अस्तित्व येथे आहे. मंदिराच्या नावाबाबत आणि स्थापनेबाबत स्थानिक पातळीवर अनेक आख्यायिका प्रचलित आहेत. यातील एका आख्यायिकेनुसार पूर्वी या भागात व्यापाऱ्यांच्या मोठ्या पेढ्या होत्या. त्या काळी येथील स्थानिक व्यापारी मारुतीला पेढ्यांचा नवस करत असत. आपले मनोरथ पूर्ण झाल्यावर ते मारुतीच्या मुखात पेढा भरवत असत. या प्रथेमुळे या मारुतीला ‘पेडा हनुमान’ असे नाव पडले.

या मंदिराविषयी एक दुसरी आख्यायिका सांगितली जाते. परभणीपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या पेडगाव येथे प्रसिद्ध ‘त्रिमूर्ती इच्छापूर्ती हनुमान मंदिर’ आहे. परभणीतील एक परम हनुमानभक्त दर पौर्णिमेला या देवाच्या दर्शनासाठी पेडगाव येथे पायी चालत जात होते. पुढे वृद्धापकाळामुळे त्यांनी देवाच्या दर्शनासाठी एवढ्या दूर जाणे अशक्य झाले. त्यामुळे त्यांनी देवाला आपल्या गावी म्हणजेच परभणी येथे येण्याची विनंती केली. त्यांची भक्ती पाहून हनुमान प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितले, “मी तुमच्या मागोमाग चालत येतो. चालत असताना तुम्ही मागे वळून पाहायचे नाही. तुम्ही मागे वळून पाहिलेल्या ठिकाणीच मी स्थापित होईन.” या अटीनुसार हनुमान त्या भक्ताच्या मागोमाग परभणीच्या दिशेने पायी निघाले. भक्त पुढे आणि देव त्यांच्या मागोमाग चालत होते. न्यू मोंढा परिसरातील या विशिष्ट ठिकाणी पोहोचल्यावर भक्ताच्या मनातील विश्वास थोडा डळमळला. देव खरोखरच आपल्या मागोमाग येत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याने उत्सुकतेने मागे पाहिले. त्याच क्षणी देव मूर्तीरूपात येथे स्थापित झाला. पुढे याच जागेवर मंदिर उभारण्यात आले. सुरुवातीला या मारुतीला ‘पेडगावचा हनुमान’ म्हटले जाऊ लागले. त्यानंतर लोक त्याला ‘पेढ्या हनुमान’ म्हणू लागले. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘पेडा हनुमान’ हे नाव कायमचे पडले.

हे मंदिर न्यू मोंढा परिसरातील एका गजबजलेल्या चौकात स्थित आहे. अलीकडील काळात या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. यातील सभामंडपाला समोरील बाजूस दोन तसेच डाव्या व उजव्या बाजूस प्रत्येकी एक अशी एकूण चार प्रवेशद्वारे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या या सभामंडपामध्ये पुरेसा उजेड आणि हवा यावी यासाठी खिडक्या आहेत. सभामंडपाच्या भिंतींमध्ये भक्कम स्तंभ उभारलेले आहेत. या स्तंभांवरील मजबूत तुळईवर सभामंडपाचे छत आधारलेले आहे. छताला एका आडव्या रांगेत सहा मोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. या सभामंडपाच्या भिंतींवर विविध देवीदेवतांची चित्रे लावलेली आहेत.

सभामंडपातून पुढे जाताना गर्भगृहाच्या प्रवेशद्वारासमोर लहान खांब असलेल्या एका लाकडी कठड्याची रचना दिसते. या जागेचा उपयोग अंतराळ म्हणून होतो. गर्भगृहाच्या द्वारशाखेवर उभ्या धारेची पारंपरिक रचना आहे. या प्रवेशद्वारात मजबूत लाकडी कवाडे बसवलेली आहेत. मंदिराच्या गर्भगृहामध्ये एका वज्रपीठावर मखर उभारलेले आहे. या मखराच्या समोरील बाजूस चार लहान खांब आहेत. या खांबांवर महिरपी तोरण बनवलेले आहे.

मखराच्या अगदी मध्यभागी हनुमानाची शेंदूरचर्चित पाषाणमूर्ती आहे. या हनुमानमूर्तीच्या उजव्या बाजूला गणपतीची पांढऱ्या संगमरवरी मूर्ती आहे. मखराच्या डाव्या बाजूला प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि माता जानकी यांच्या मूर्ती स्थापित केलेल्या आहेत. मखरामधील या सर्व मूर्तींना वस्त्रे तसेच पारंपरिक अलंकारांनी सुहोभित केलेले असते. या सर्व मूर्तींच्या मस्तकावर मुकुट चढवलेले आहेत. मखराच्या छताला एक छत्र टांगलेले आहे.

मंदिराच्या छतावर सभोवताली सुरक्षा कठडा बांधलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर तीन थरांचे शिखर उभारलेले आहे. या शिखरामधील खालील दोन थर अष्टकोनी आकाराचे आहेत. त्यावर विविध देवीदेवतांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. शिखराच्या सर्वात वरच्या म्हणजेच तिसऱ्या वर्तुळाकार निमूळत्या थरात उभ्या धारेची नक्षी कोरलेली आहे. शिखराच्या शीर्षभागी दगडी आमलक आहे. या आमलकावर कळस आणि मंदिराची ध्वजपताका आहे.

चैत्र पौर्णिमेला होणारा हनुमान जयंती उत्सव हा या मंदिरातील वार्षिक उत्सव आहे. या उत्सवाच्या वेळी हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी येतात. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानाची विशेष उत्सवमूर्ती पाळण्यात ठेवून जन्मोत्सव सोहळा साजरा केला जातो. यावेळी उपस्थित सर्व भाविक पारंपरिक पाळणे गातात. यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण तयार होते.

या सोहळ्याच्या निमित्ताने मंदिरात मारुती यज्ञ, भजन, कीर्तन, ग्रंथपठण आणि रामकथा वाचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

मंदिरात रामनवमी, चैत्र नवरात्र आणि गणेश जयंती इत्यादी प्रमुख उत्सवांच्या बरोबरीनेच दसरा, दिवाळी, श्रावण महिना, मार्गशीर्ष महिना आणि अधिक महिन्याच्या निमित्ताने विशेष धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.

या उत्सवांच्या वेळी दर्शनासाठी हजारोच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या गर्दीमुळे या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. दर शनिवारी देखील या मंदिरात भाविकांची गर्दी असते.

नवस पूर्ण झालेले भाविक देवाला पेढ्यांचा प्रसाद अर्पण करतात. दररोज सकाळी सहा ते साडेअकरा व सायंकाळी चार वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना येथे दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • परभणी रेल्वे स्थानकापासून ३ किमी अंतरावर
  • परभणी बस स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • शहराच्या विविध भागांतून खासगी वाहने व एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

पेद्दा हनुमान मंदिर

न्यू मोंधा, परभणी, टी. जिला. परभनी

Back To Home