मोरेश्वर मंदिर

गंगामसला, ता. माजलगाव, जि. बीड

महाराष्ट्र राज्याच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पटलावर मराठवाड्याचे स्थान अनन्यसाधारण आहे. संत आणि महंतांची भूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रदेशात अनेक प्राचीन मंदिरे विखुरलेली आहेत, जी धार्मिक महत्त्वासोबतच तत्कालीन इतिहासाची आणि प्रगत वास्तुशास्त्राची साक्ष देतात. यातीलच एक मंदिर माजलगाव तालुक्यातील, गंगामसला या गावात, गोदावरी नदीच्या पात्रात वसलेले आहे. पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथील अष्टविनायकापैकी आद्यपीठ असलेल्या मयूरेश्वराशी नामसाधर्म्य आणि पौराणिक साधर्म्य असलेले गंगामसला येथील हे मंदिर ‘प्रति मोरेश्वर मंदिर’ म्हणून ओळखले जाते.

मोरेश्वर गणपतीची कथा अशी की प्राचीन काळी सिंधू नावाच्या दैत्याने पृथ्वीवर प्रचंड उच्छाद मांडला होता. सर्व भक्तगण व अगदी देवादिकांच्या वाट्यालाही हा त्रास येऊ लागला, तेव्हा सर्व देवांनी गणपतीचा धावा केला. गणपतीने मोरावर आरूढ होऊन सिंधू दैत्याचा वध केला, म्हणून या गणपतीला मोरेश्वर हे नाव पडले. या मोरेश्वराची देशात अनेक मंदिरे आहेत. या गणेशाचे दुसरे नाव भालचंद्र असेही आहे. त्याबाबत अशी मान्यता आहे की या ठिकाणी चंद्राने तपश्चर्या करून गणपतीस प्रसन्न केले व येथे त्याची स्थापना केली, म्हणून त्यास भालचंद्र असे नाव पडले.

गणपती हे पेशव्यांचे कुलदैवत होय. हरिपंत फडके हे पेशवाईतील एक अत्यंत धुरंधर राजकारणी आणि शूर सेनापती होते. नाना फडणवीस यांचे ते उजवे हात मानले जात. मराठा साम्राज्याची घडी बसवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. हरिपंत फडके हे स्वतः मोठे गणेशभक्त होते. त्यांच्या भक्तीची साक्ष देणारी अनेक मंदिरे महाराष्ट्रात आढळतात. त्यापैकी पुण्यातील रविवार पेठेत असलेले फडके गणपती मंदिर, अष्टविनायकांपैकी एक असलेल्या सिद्धटेकच्या मंदिराचा सभामंडप आणि नगारखाना त्यांनी बांधल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत. मराठवाड्यातील मोहिमेवर असताना वा या भागाचा कारभार पाहत असताना, १७७० ते १७९० या काळात त्यांनी या प्राचीन स्थानावर या मंदिराची उभारणी केली. एका लोकआख्यायिकेनुसार, युद्धासाठी जात असताना माधवराव पेशव्यांचा हत्ती या ठिकाणी नदीच्या गाळात अडकला. तेव्हा नदीपात्रात असलेल्या मोरेश्वर गणपतीला त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा नवस केला व त्यांचा हत्ती गाळातून सुखरूप बाहेर पडला. त्यामुळे माधवराव पेशव्यांनी येथे मराठा शैलीतील दगडी मंदिर बांधले.

गंगामसला हे गाव बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या सीमेवर आहे. गोदावरी नदी या ठिकाणी विस्तीर्ण पात्रातून वाहते आणि या पात्राच्या मधोमध एका उंचवट्यावर (River Island) हे मंदिर आहे. गावापासून जवळ गोदावरी नदीच्या काठावर मंदिराचे प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारासमोरील पेव्हर ब्लॉकने आच्छादित मैदानात पूजा साहित्याची व खाद्यपदार्थांची दुकाने आहेत. प्रवेशद्वारात दोन्ही बाजूला दोन चौथरे आणि त्यावर नक्षीदार स्तंभ आहेत. या प्रवेशद्वाराच्या सज्जावर तीन मेघडंबरी व त्यात देवमूर्ती आहेत. सज्जावर दोन्ही बाजूला मयूर शिल्पे आहेत. संपूर्ण प्रवेशद्वार धातूच्या पत्र्याने आच्छादित आहे. त्यावर पानाफुलांची नक्षी आहे.

प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंतच्या मार्गावर सुरुवातीला ४५ पायऱ्या उतरून पुढे नदीपात्रातून यावे लागते. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला लोखंडी सुरक्षा कठडे आहेत. मंदिर पाषाणी चौथऱ्यावर उभे आहे. मंदिराचे प्रवेशद्वार नदीपात्राकडे आहे. चौथऱ्यास पात्राकडील बाजूला सुमारे सात पायऱ्या आहेत. चौथऱ्याचा प्रवेशद्वारासमोरील सुमारे पाच फूट रुंद भाग काही इंच खोलगट आहे. येथे मध्यभागी कासव शिल्प आहे. मंदिराच्या दर्शनी भिंतीत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला देवकोष्ठके आहेत. त्यात शेंदूरचर्चित प्राचीन मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या द्वारशाखांवर उभ्या धारेची नक्षी आहे, तर ललाटबिंबावर गणपती शिल्प आहे. मंडारकावर मध्यभागी चक्र आहे व दोन्ही बाजूला सिंह शिल्पे आहेत.

मंदिराचा आतील भाग प्रवेशद्वारापेक्षा खोलगट आहे. आत उतरण्यासाठी तीन पायऱ्या आहेत. मंदिरात चारही भिंतीत देवकोष्ठके आहेत व त्यामध्ये विविध देवतांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या चारही कोपऱ्यांत अर्धचंद्राकार लघू कमानी आहेत. मंदिरात मागील भिंतीलगत वज्रपीठावर गणेशाची शेंदूरचर्चित स्वयंभू पाषाण मूर्ती आहे. मूर्तीचे नेत्र, सोंड आणि चंद्रटिळा चांदीचे आहेत. ही मूर्ती कोरीव नक्षीदार पाषाणी मखरात विराजमान आहे. मखरात दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ आहेत आणि त्यावर महिरपी तोरण आहे. तोरणावर दोन्ही कोपऱ्यांत चक्र नक्षी आहे. मंदिराचे छत भिंतींवर तोलले गेले आहे. हे छत एकावर एक ठेवलेल्या वर्तुळाकार पाषाणांनी साकारले आहे. वितानावर चक्राकार नक्षी आहे. मंदिराच्या छतावर चौकोनी उताराचे शिखर आहे. शिखरावर कळस व ध्वजपताका आहे.

देशातील अनेक मंदिरे ही नदीच्या काठावर आहेत. नदीच्या प्रवाहाच्या आतमध्ये, पात्राच्या मध्यभागी मंदिर उभारणे ही वास्तुशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. गंगामसला येथील या मंदिराचे हेच सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर गोदावरीच्या प्रवाहाच्या मध्यभागी आहे. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा नदीला पूर येतो, तेव्हा मंदिराचा खालचा भाग आणि अनेकदा गर्भगृहापर्यंतचा भाग पाण्याखाली जातो. तरीही, हे मंदिर मागील अनेक शतकांपासून नैसर्गिक आपत्तींना तोंड देत भक्कम उभे आहे.

माघ शुद्ध चतुर्थी, ज्याला तिलकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात, या दिवशी गणपतीच्या जन्माचा सोहळा अर्थात गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यावेळी परिसरातील हजारो भाविक देवाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. यावेळी मंदिराला रोषणाई करून परिसर सजवला जातो. मंदिरात भजन, कीर्तन, संगीत, महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नदीपात्र कोरडे असते तोपर्यंत चतुर्थी, मंगळवार व इतर सण-उत्सवांच्या वेळी मंदिरात भाविकांची गर्दी होते. उन्हाळ्यात कोरडेठाक असलेले नदीचे पात्र पावसाळ्यात तुडुंब भरते आणि मंदिर पाण्याखाली जाते. त्यामुळे भाद्रपद मासातील गणेशोत्सव व पावसाळ्यातील कोणतीही चतुर्थी व इतर सण, उत्सव मंदिरात साजरे केले जात नाहीत.

उपयुक्त माहिती:

  • माजलगाव येथून २१ किमी अंतरावर
  • बीड येथून ९६ किमी अंतरावर
  • माजलगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीच्या सुविधा आहेत
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९३२५८६७३९९
Back To Home