रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील मिठगवाणे गावाच्या पूर्वेला डोंगरपायथ्याशी असलेले श्री अंजनेश्वराचे भव्य मंदिर हे कोकणातील मोठ्या व प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. सुमारे ८०० वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर परिसरातील बारा गावचे जागृत व स्वयंभू देवस्थान म्हणून ओळखले जाते. त्रिपुरारी पौर्णिमेला भरणारी यात्रा हे येथील मुख्य आकर्षण आहे. येथे नवस फेडण्याची अनोखी पद्धत आहे. त्यानुसार पुरुषांना नवसपूर्तीसाठी लोटांगण घालत मंदिर परिक्रमा करावी लागते, तर स्त्रियांना पदराने पालखीमार्ग साफ करावा लागतो. त्यास ‘दरबार झाडणे’ असे म्हणतात.
मंदिराची अख्यायिका अशी की आज जेथे शिवपिंडी आहे त्या जागेभोवती अंजन वृक्षांचे रान होते. या रानातील एका दगडावर गावातील एका ब्राह्मणाची गाय पान्हा सोडत असे. ती तेथे पान्हा का सोडते हे पाहण्यासाठी तो ब्राह्मण गेला व त्याने तो दगड फोडण्याचा प्रयत्न केला. दगडावर घाव बसताच त्यातून रक्त वाहू लागले. ग्रामस्थांनी बाजूने खोदकाम करून पाहिले असता त्यांना तेथे शिवपिंडी आढळली. तेव्हापासून या पिंडीची पूजा–अर्चा करण्यास सुरुवात झाली. काही काळाने याच ब्राह्मणाने तेथे घुमटीवजा लहान मंदिर बांधले होते. अंजन वृक्षांच्या रानात ही शिवपिंड सापडल्याने या देवाला ‘अंजनेश्वर’ हे नाव पडले.
दुसऱ्या अख्यायिकेनुसार, एका मुस्लिम व्यक्तीचे गलबत गावानजीकच्या समुद्रात आलेल्या वादळात सापडले. गलबत सुखरूप किनाऱ्याला लागल्यास मोठे मंदिर बांधेन, असा नवस त्याने अंजनेश्वराला केला. काही वेळाने वादळ शांत होऊन त्याचे गलबत किनाऱ्याला लागले. अंजनेश्वराच्या कृपेने आपले गलबत व जीव वाचल्याने त्याने लहान घुमटीवजा मंदिराच्या जागेवर प्रशस्त मंदिर बांधले. त्यावेळच्या बांधकामाचे काही अवशेष आजही या मंदिरात पाहायला मिळतात. काही वर्षांनंतर याच मुस्लिम व्यक्तीने मंदिराच्या शिखरावरून उडी घेत प्राणत्याग केला. त्याचे स्मारक म्हणून मंदिराच्या डाव्या बाजूस एक दर्गा बांधण्यात आला आहे. त्यास गैबी पिर दर्गा असे संबोधले जाते. मंदिरासोबतच या दर्ग्यातही रोज दिवा लावला जातो. काळाच्या ओघात अनेकदा मंदिराचा जीर्णोद्धार झाला. १८२२ मध्ये जानशी येथील नरसिंह जोशी यांनी मंदिराचा भव्य सभामंडप बांधल्याची नोंद आहे. १९५८ मध्ये केलेल्या नूतनीकरणानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. तशी नोंद मंदिराच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलेली आहे.
गावात प्रवेश केल्यावर एका कमानीखालून जाणारा रस्ता थेट मंदिरापाशी जातो. प्रशस्त जागेत हे मंदिर असून मंदिराच्या बांधकाम शैलीवर गोमंतकीय प्रभाव जाणवतो. मंदिराच्या चारही बाजूंनी चिरेबंदी तट व प्रांगणाची फरसबंदीही जांभ्या दगडाची आहे. मंदिराचे चिरेबंदी मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस नगारखाना आहे, तेथे जाण्यासाठी खालून पायरी मार्ग आहे. या नगारखान्यातून गाभाऱ्यातील देवाचे सरळ रेषेत दर्शन घडते. प्रवेशद्वाराजवळ व मंदिराच्या समोर जांभ्या दगडाच्या आठ उंच दीपमाळा आहेत.
सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडप व अंतराळात भक्कम लाकडी खांब असून त्यावर देवदेवतांची शिल्पे व इतर कलाकुसर आहे. हे खांब गावातील खोतमंडळींच्या नावावर असून उत्सवकाळात ते या खांबांजवळ बसतात. खुल्या रचनेच्या या सभामंडपात व अंतराळात आकर्षक नक्षीकाम केले आहे. एका स्तंभावर ब्रह्मदेवाचे शिल्प आहे. सभामंडपात देवाचे सिंहासन असून कार्तिक महिन्यात होणाऱ्या उत्सवकाळात देवाला येथे बसवले जाते. याशिवाय येथे अंजनेश्वराची लाकडी पालखीही आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वाराबाहेर काळ्या पाषाणातील नंदी असून उजवीकडे उत्सवकाळात वापरला जाणारा देवाचा पितळी मुखवटा आणि नागफणा ठेवलेला आहे. गर्भगृहातील ललाटबिंबावर छोटी गणेशमूर्ती आहे. गाभाऱ्यात भव्य शिवपिंडी असून त्यावर चांदीचा पंचमुखी नागफणा आहे. गर्भगृहावरील कौलारू शिखर वेगळ्या धाटणीचे व अष्टकोनी आकाराचे आहे.
मंदिर परिसरात कालभैरवाचे छोटे मंदिर आहे. हा कालभैरव गावाचा रक्षणकर्ता असल्याची ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांपासून बाधा टाळण्यासाठी त्याला नारळ वाहिला जातो. मंदिराच्या प्रांगणात असलेल्या एका पायविहिरीच्या वरच्या बाजूला गणेशमूर्ती आहे. याशिवाय आणखी एक छोटी विहीर असून त्यातील पाण्याने त्वचारोग नाहीसे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या विहिरीचे पाणी मंदिरातील दैनंदिन पूजाविधीसाठी वापरले जाते.
कार्तिकी पौर्णिमा (त्रिपुरारी पौर्णिमा) आणि महाशिवरात्रीला येथे मोठे उत्सव होतात. महाशिवरात्रीचा उत्सव तीन दिवसांचा, तर कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव पाच दिवसांचा असतो. त्रिपुरारी पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेत मोठ्या संख्येने भाविक येतात. विजयादशमीलाही येथे उत्सव असतो. अंजनेश्वर हे येथील देसाई, ढमढेरे, नेने, गोखले, भुस्कुटे आदी कुटुंबांचे कुलदैवत आहे. या कुलस्वामीच्या दर्शनासाठी राज्यभरातून अनेक भाविक येतात. भाविकांनी आगाऊ कल्पना दिल्यास येथे अभिषेक, आवर्तने, एकादष्णी (रुद्राच्या स्तोत्राची अकरा आवर्तने म्हणजे एक एकादष्णी) अभिषेक आदी धार्मिक विधी करता येतात. (संपर्क : विजय भुस्कुटे, मो. ९८२०६७५०८५, शेखर फडके, मो. ९३२६६२१४०४) मंदिराजवळ भक्त निवासात भाविकांना निवास, भोजन व चहा–नाश्त्याची सुविधा आहे. (संपर्क : सदानंद लिंगायत, मो. ७२६२९१९५१४) सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत येथील अंजनेश्वराचे दर्शन घेता येते.