म्हसोबा महाराज मंदिर

सिल्लोड, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर


महाराष्ट्रासोबतच कर्नाटक, गुजरात, आंध्र आणि मध्य प्रदेशातील काही भागांत पूजला जाणारा म्हसोबा हा एक क्षेत्रपाळ देव आहे. म्हसोबा म्हणजेच महिषासुर असे मानले जाते. यातील महिष या शब्दास आदरार्थी बा हा प्रत्यय लागून महिषोबा हे नाम तयार झाले त्याचाच अपभ्रंश `म्हसोबाअसा झाला. मुळची अनार्य देवता असलेल्या म्हसोबाची मंदिरे गावोगावी लोकदेवता वा ग्रामदेवता म्हणून आढळतात. म्हसोबा हे सिल्लोड तालुक्याचेही ग्रामदैवत असून येथे सुमारे ७०० वर्षे जुने म्हसोबा महाराज मंदिर आहे.

राज्याच्या विविध भागांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. चैत्र महिन्यात होणाऱ्या देवाच्या वार्षिकोत्सवानिमित्त येथे मोठी यात्रा भरते. या यात्रेस सुमारे दीड ते दोन लाख भाविक येतात. छत्रपती संभाजीनगर ते सिल्लोड मार्गावर म्हसोबा महाराज मंदिराची कमान नजरेस पडते. या कमानीतून थेट मंदिरापर्यंत येता येते. प्रथमदर्शनी जुना वाडा भासावा, अशी या दुमजली मंदिराची रचना आहे. मंदिराला दोन प्रवेशद्वारे आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारातून काही पायऱ्या चढून पहिल्या मजल्यावरील सभामंडपात येता येते, तर उत्तर दिशेला असलेल्या प्रवेशद्वारातून थेट सभामंडपात प्रवेश होतो. येथील खुल्या सभामंडपात अनेक खांब आहेत. मंदिराचे शिखर गर्भगृहावर नसून सभामंडपावर आहे. असे सांगितले जाते की येथील म्हसोबा महाराजांच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारचे छत बांधलेले चालत नाही.

सभामंडपापासून काहीशा उंचीवर असलेल्या येथील गर्भगृहात जाण्यासाठी सहा पायऱ्या आहेत. येथील गर्भगृह म्हणजे लिंबाच्या झाडाशेजारी असलेले संगमरवरी वज्रपीठ म्हणजेच देवाचा चौथरा होय. या चौथऱ्यावरील चार स्तंभ कमानीसदृश्य कलाकुसरीने एकमेकांशी जोडलेले आहेत. या कमानीदार भिंतीवर फुले वेलींचे सुंदर नक्षीकाम आहे. चौथऱ्याच्या मध्यभागी म्हसोबा महाराजांची शेंदूरचर्चित तांदळा स्वरूपातील मूर्ती आहे. या मूर्तीचे मुकुट डोळे चांदीचे आहेत. गर्भगृहामागे झाडाखाली आणखी काही देवतांच्या तांदळा स्वरूपातील लहानलहान मूर्ती आहेत. दररोज सकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात येऊन म्हसोबा महाराजांचे दर्शन घेता येते.

राज्यात ठिकठिकाणी म्हसोबा महाराजांची स्थाने असून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील म्हसा येथील म्हसोबा देवस्थान महत्त्वाचे मानले जाते. त्याच प्रमाणे सिल्लोड येथील या लोकदेवतेचे स्थानही प्रसिद्ध आहे. म्हसोबा महाराजांच्या आरतीत याबाबतचा उल्लेख आढळतो. त्यात असे म्हटले आहे कीमारोती तुल्य गावोगांवी म्हसोबा आहे सर्व ठायी परंतु एक शिवनीतापुरात स्थान प्रख्यात’. सिल्लोडचे प्राचीन नाव शिवनीतापूर असे होते.

लोकश्रद्धेनुसार, म्हसोबा हा भुतांचा अधिपती असून त्याचे सामर्थ्य वेताळबाबाएवढे असते. विदर्भात तेलाचा घाणा सुरू करण्यापूर्वी म्हसोबाची स्थापना करण्याची रीत आहे. तसे केल्यास अधिक तेल मिळते, अशी श्रद्धा आहे. म्हसोबाबाबतची एक पौराणिक कथा अशी आहे की रंभ नावाचा दानवराज आणि एक म्हैस यांचा महिषासुर हा पुत्र होता. त्याने कठोर तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते. तुला देव, दानव आणि पुरुष यांच्या हातून मृत्यू येणार नाही, असा वर त्याला मिळाला होता. त्यामुळे उन्मत्त होऊन त्याने देवांशी युद्ध केले. त्यात पराभूत होऊन देव पळाले. त्यांनी वैकुंठात जाऊन विष्णूला प्रार्थना केली. तेव्हा विष्णूने सर्व देवतांच्या तेजाने एक दिव्य शक्ती निर्माण होईल ती महिषासुराचा पराभव करील असे सांगितले. त्यानुसार कात्यायन ऋषींच्या आश्रमात देवीची उत्पत्ती झाली. या १८ भुजा असलेल्या देवीने युद्धात महिषासुराचा वध केला. सुदर्शनचक्राने त्याचे मस्तक धडापासून वेगळे केले. ही देवी महिषासुर मर्दिनीरूपात पूजली जाते. मृत्युपूर्वी त्याने तुझ्या नावापुढे माझे नाव धारण करावे माझीही पुजा व्हावी, असा वर देवीकडे मागितला. त्यानुसार देवीने दिलेल्या वरामुळे पृथ्वीलोकावर महिषासुराचीही पूजा करण्यात येऊ लागली. हा महिषासुर म्हणजेच म्हसोबा असे मानले जाते. मात्र धर्मशास्त्र देवताशास्त्राच्या अभ्यासकांनुसार, म्हसोबा ही मूळची अनार्य देवता असून तो सुरुवातीपासून पूजला जात असे. आजही म्हसोबा हा अनघड तांदळाच्या रूपातच पूजला जातो.

सिल्लोड येथे दरवर्षी चैत्र कृष्ण सप्तमीला म्हसोबा महाराजांची यात्रा भरते. ही सिल्लोड तालुक्यातील सर्वात मोठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक समजली जाते. या यात्रेमध्ये पहिल्या दिवशी सकाळी म्हसोबा महाराजांच्या मूर्तीला शेंदूरलेपन अभिषेक करण्यात येतो. त्यानंतर दुपारी बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम असतो. सायंकाळी पाच वाजता तगतराव मिरवणूक असते. तगतराव या शब्दाचा मूळ शब्दकोशातील अर्थउंच बुजगावणे किंवा पोळ्याच्या दिवशी वाद्य नाच यासह मिरवला जाणारा मनुष्याकृती पुतळाअसा आहे. मात्र खानदेश, मराठवाड्याच्या काही भागांत तगतराव हा एक प्रकारचा लाकडी रथ असतो. त्यावर तमाशा फडातील कलावंत बसतात. हे कलावंत त्यांचे साजसामान हे सरस्वतीचे रूप मानून त्यांची मिरवणूक काढली जाते. ग्रामदेवतेच्या मंदिरानजीक ही मिरवणूक आल्यानंतर ते तेथे आपली कला सादर करतात. अनेकदा तगतराववरून मिरवणुकीदरम्यानही हे कलाकार आपली कला सादर करतात. त्यावरून लोकांना त्यांच्या तमाशा फडाचा दर्जा कळतो लोक रात्री त्यात्या तमाशास जातात. सायंकाळी ही तगतराव मिरवणूक झाल्यानंतर येथे रात्री वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत दशावतारी सोंगांचा कार्यक्रम असतो. दुसऱ्या दिवशी पहाटे वाजता म्हसोबा महाराजांच्या स्वारीचा कार्यक्रम असतो. त्यानंतर सकाळी वाजता हजेरीचा कार्यक्रम झाल्यानंतर या यात्रोत्सवाचा समारोप होतो. देवाच्या या वार्षिकोत्सवादरम्यान अनेक भाविक म्हसोबा महाराजांना नवस बोलतात तसेच पूर्ण झालेले नवस फेडले जातात.

म्हसोबा महाराज मंदिरापासून काही अंतरावर असलेले दुर्गामातेचे मंदिर प्रसिद्ध आहे. नवरात्रीचे नऊ दिवस येथे मोठा उत्सव असतो. या मंदिराचा परिसर शांत, सुंदर निसर्गरम्य असा आहे. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. मंदिराच्या प्रांगणात मोठी दीपमाळ आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना गजराजांच्या मूर्ती आहेत. गर्भगृहात संगमरवरी चौथऱ्यावर दुर्गादेवीची प्रसन्न मूर्ती असून समोर तिच्या पादुका आहेत. सकाळी .३० ते सायंकाळी वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात जाऊन दर्शन घेता येते. याशिवाय सिल्लोड शहरात पूर्णेश्वर गणपती मंदिर, प्राचीन ओंकारेश्वर महादेव मंदिर संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर ही मंदिरे प्रसिद्ध आहेत.

उपयुक्त माहिती:

  • सिल्लोड बस स्थानकापासून . किमी, तर छत्रपती संभाजीनगरपासून ६२ किमी अंतरावर
  • छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक  भागांतून सिल्लोडसाठी एसटीची सेवा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : मंदिर कार्यालय, मो. ९४०४९८३१२४
Back To Home