जावळी तालुक्यात डोंगरमाथ्यावर वसलेल्या मेरुलिंग येथील महादेवाचे मंदिर प्रसिद्ध आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर पांडवकालीन असून पांडवांनी स्वतः मोठ्या शिळा आणून या मंदिराची उभारणी केली होती. येथील ग्रामस्थ या महादेवाला ‘मेरुंबा’ असे म्हणतात. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की येथील शिवलिंगातून झिरपणाऱ्या धारांमुळे येथील शाळुंका नेहमी पाण्याने भरलेली असते. याशिवाय येथील गर्भगृहात काही बोललो की त्याचा प्रतिध्वनी चार ते पाच वेळा पुन्हा ऐकू येतो.
ऐतिहासिक नोंदींनुसार, १७०२ मध्ये रत्नागिरी तालुक्यातील चिपळूण येथे श्री ब्रह्मेंद्रस्वामी यांचे वास्तव्य होते. हबशी राजाच्या कार्यकाळात तेथील रयतेला त्यांना त्रास दिला जात असे. स्वामींच्या तपसाधनेत वारंवार व्यत्यय येऊ लागल्यामुळे जावळीतील घनदाट अरण्यात असलेल्या मेरुलिंग येथे येऊन ते तपसाधना करू लागले. मंदिराच्या शेजारी मोठ्या दगडात कोरलेली एक गुहा आहे. तेथे स्वामी भक्तांना दर्शन देऊ लागले. १७२८ मध्ये श्री ब्रह्मेंद्र स्वामींनी मेरुलिंग मंदिराची पुनर्बांधणी केली होती.
सातारा संस्थानचे छत्रपती शाहू महाराज यांनीही ब्रह्मेंद्र स्वामींचे शिष्यत्व पत्करले होते. राजकीय सल्लामसलतीसाठी ते अनेकदा मेरुलिंग येथे स्वामींकडे येत असत. १७५६ मध्ये वसईचा किल्ला जिंकण्यासाठी जाणारे चिमाजी आप्पा आपल्या सेनेसह मेरुलिंग महादेवाचा आशीर्वाद व ब्रम्हेंद्र स्वामींचा सल्ला घेण्यासाठी मंदिरात आले होते. वसईची स्वारी फत्ते झाल्यानंतर त्यांनी मेरुलिंग मंदिरात होमहवन करण्यासाठी १२ मण तीळ, तूप, तांदूळ, चार तोळे केसर असे साहित्य व नऊ मण वजनाची घंटा आणली. त्यावेळी त्यांनी या मंदिराच्या गर्भगृहात घंटानाद केला होता. आजही ही घंटा या मंदिरात आहे.
संपूर्ण नागमोडी वळणाचा, तीव्र चढ व काहीशा कठीण असलेल्या घाटावरून मेरुलिंग डोंगर माथ्यावर खासगी वाहनांनी येता येते. या प्राचीन मंदिराच्या सर्व बाजूंनी १८ ते २० फूट उंचीची तटबंदी असून एखाद्या किल्ल्याप्रमाणे ती भासते. तटबंदीच्या चारही कोपऱ्यांत बुरूज असून काही ठिकाणी असलेल्या देवड्यांमध्ये काही शिल्पे व देवी–देवतांच्या मूर्ती आहेत. यामधील मारुतीने आपल्या डोक्यावर श्रीगणेशाला घेतले आहे, अशा स्वरूपाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे. या तटबंदीच्या दक्षिण आणि उत्तर दिशेला प्रवेशद्वारे आहेत. प्रवेशद्वारातून मंदिरात येण्यासाठी सुमारे ३० ते ३५ पायऱ्या आहेत. हे मंदिर यादवकाळातील असल्याचे सांगितले जाते. मंदिरासमोर दीपमाळ आणि नंदीमंडप आहे. काही वर्षांपूर्वी केलेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आले आहे. कलात्मक व वैशिष्ट्यपूर्ण बांधणीचे हे मंदिर तीन टप्प्यांत असून पहिला मंडप, दुसरा मंडप व गर्भगृह असे त्याचे स्वरूप आहे. या क्रमानेच मंदिरावर तीन गोल व घुमटाकार शिखरे असून ती एकापेक्षा एक असे उंच बांधलेले आहेत.
मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर एका मोठ्या चौथऱ्यावर काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. पहिल्या मंडपामधून दुसऱ्या मंडपात जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ एक प्राचीन गणेशमूर्ती असून प्रवेशद्वाराच्या दोन बाजूला मारुती व देवी यांची शिल्पे आहेत. मधल्या मंडपामध्ये चिमाजी आप्पा यांनी आणलेली मोठी पोलादी घंटा आहे. गर्भगृहात मध्यभागी स्वयंभू शिवलिंग आहे. या शिवलिंगावरील शाळुंका ओबड–धोबड असून त्यावर सात छिद्रे आहेत. अशी आख्यायिका आहे की वनवासाच्या काळात भीमाने आपल्या भावांची आणि द्रौपदीची तहान शमविण्यासाठी येथील शाळुंकेला बोटांनी छिद्रे पाडली आणि त्यातून पाणी काढले. आजही या छिद्रांमधून अखंड पाणी पाझरत असते. शिवलिंगाच्या मागे एका चौथऱ्यावर शंकर आणि पार्वती यांच्या पितळी मुखवटे लावलेल्या मूर्ती आहेत.
मंदिराशेजारी असणाऱ्या बावडीतील पाणी येथे पिण्यासाठी वापरले जाते. अनेक भाविक या बावडीच्या पाण्याने स्नान करतात. दर सोमवारी येथे भाविकांची गर्दी असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसाद दिला जातो. मेरुलिंगावर चैत्र शुद्ध दशमीला यात्रा भरते. दुसऱ्या दिवशी म्हणजेच चैत्र शुद्ध एकादशीला येथे शंकर व पार्वती यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटाने पार पाडला जातो. महाबळेश्वर व वाई परिसरातील सर्वात डोंगरमाथ्यावर हे स्थान असल्यामुळे येथून दूर दूरपर्यंतच्या डोंगर व दऱ्या, तसेच गावांचे विहंगम दृश्य दिसते. असे सांगितले जाते की पुराणात मेरू पर्वताचा जो उल्लेख आहे तो म्हणजे हाच मेरुलिंग डोंगर होय. धार्मिक क्षेत्रासोबतच पर्यटन क्षेत्र म्हणूनही हा परिसर आता प्रसिद्ध आहे.
या मंदिराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या बाहेर रामवरदायणी देवीचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराच्या बाहेरील बाजूस नंदी असून गर्भगृहात शिवपिंडी व रामवरदायणी मातेची मूर्ती आहे.