मारुती मंदिर संस्थान

वाघळी, ता. खामगाव, जि. बुलडाणा

भारतीय संस्कृती आणि पौराणिक साहित्यातील एक अत्यंत लोकप्रिय दैवत म्हणजे संकटमोचन मारुती. अंजनी आणि वायूचा पुत्र असलेला मारुती हा अष्टसिद्धी आणि नवनिधींचा दाता मानला जातो. श्रीरामाचा निस्सीम भक्त असलेल्या मारुतीने आपल्या अतुलनीय शक्तीचा आणि बुद्धीचा वापर सदैव धर्माच्या रक्षणासाठी केला. चिरंजीवी मानला जाणारा हा पवनपुत्र आजही भक्तांच्या संकटात धावून येतो, अशी लोकमानसात दृढ श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत समर्थ रामदास स्वामींनी हनुमानाचे महत्त्व जनमानसात विशेषत्वाने रुजवले. बलशाली समाज आणि राष्ट्र निर्माण करण्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाची मंदिरे स्थापन केली. त्यापैकीच एक असलेले वाघळी येथील मंदिर हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे.

महाराष्ट्रात भक्ती आणि शक्तीचा अपूर्व संगम घडवून आणण्याचे महान कार्य समर्थ रामदास स्वामींनी केले. समर्थांच्या मते, केवळ नामस्मरण करून समाज समर्थ होणार नाही, तर त्यासाठी मन आणि शरीर दोन्ही बलवान असणे आवश्यक होते. म्हणूनच त्यांनी शक्तीचे आणि बुद्धीचे प्रतीक असलेल्या मारुतीला आपले आराध्य दैवत मानले आणि गावोगावी त्याची मंदिरे स्थापन केली. समर्थांच्या काळात परकीय आक्रमणांमुळे समाज हताश झाला होता. या समाजात चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘बलोपासना’ हा मंत्र दिला. ‘शक्तीने मिळे राज्य, युक्तीने यत्न होतसे’ हा विचार मांडताना त्यांनी मारुतीच्या रूपाने एक असा आदर्श समाजासमोर ठेवला, जो अतुलनीय पराक्रमी असतानाही कमालीचा संयमी आणि स्वामीभक्त होता. सातारा, सांगली आणि कोल्हापूर परिसरात त्यांनी स्थापन केलेले ‘अकरा मारुती’ हे त्यांच्या संघटन कौशल्याचे आणि दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.

समर्थांनी रचलेले ‘भीमरूपी महारुद्रा’ हे मारुती स्तोत्र आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घरोघरी म्हटले जाते. या स्तोत्रातून हनुमानाच्या महाकाय रूपाचे आणि त्याच्या सामर्थ्याचे जे वर्णन त्यांनी केले आहे, त्यातून आजही तरुणांना आत्मबळ मिळते. हनुमानाची उपासना ही केवळ वैयक्तिक मोक्षासाठी नसून राष्ट्रनिर्माणासाठी असावी, हा समर्थांचा दृष्टिकोन मराठी संस्कृतीचे अविभाज्य अंग बनला आहे. असे सांगितले जाते की विदर्भात पदभ्रमण करत असताना समर्थ वाघळी येथे आले होते. त्यांनी इ.स. १६४५ मध्ये येथे त्यांनी मारुतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. पूर्वी हा परिसर घनदाट अरण्याचा भाग होता. आजही वाघळी येथे या मंदिराशिवाय अन्य वस्ती नाही. खोलगट जागेत वसलेल्या या मंदिराच्या परिसरात असलेल्या घनदाट झुडपांच्या जाळ्यांमध्ये पूर्वी वाघ रात्री वास्तव्यास असत, त्यामुळे या स्थानाला वाघळी असे नाव पडले. पूर्वी हे मंदिर लहान होते. मंदिराच्या प्राचीनतेचा उल्लेख ‘सेंट्रल प्रॉव्हिन्सेस अँड बेरार डिस्ट्रिक्ट गॅझेटियर्स – अकोला डिस्ट्रिक्ट, व्हॉल्यूम ए’ (१९१०) मध्ये आढळतो. मात्र मंदिराला सध्याचे भव्य स्वरूप हे १९८७ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मिळाले आहे.

खामगाव-बुलडाणा मार्गावर वाघळी हे मंदिर आहे. मंदिर परिसरात विपुल वृक्षसंपदा आहे. मंदिराला चारही बाजूंनी आवारभिंत आहे. आकर्षक प्रवेशद्वारातून प्रांगणात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस एक प्राचीन विहीर दिसते. संपूर्ण प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी करण्यात आली आहे. प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी बाकांची सुविधा आहे. प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत येणाऱ्या मार्गिकेवर पत्र्याचे छत बसविले आहे. या मार्गिकेवर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला एक चौथरा आहे व त्यावर कालभैरवाची शेंदूरचर्चित शिळा आहे. भाविक या मूर्तीला रुईच्या पानांचा हार घालतात तसेच तेल अर्पण करतात. सभामंडप, गर्भगृह व प्रदक्षिणा मार्ग अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाच्या चारही बाजूंना मोठा मंडप आहे. या मंडपातून मंदिराला प्रदक्षिणा घालता येते. त्यापुढे सभामंडप व गर्भगृह अशी रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या ललाटबिंबावर गणेशाची मूर्ती आहे. सभामंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून असलेल्या गर्भगृहासमोर लाकडी रेलिंग बसवण्यात आले आहे. येथूनच भाविकांना गर्भगृहातील मारुतीचे दर्शन घ्यावे लागते. गर्भगृहातील संगमरवरी देवकोष्ठकात हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती विराजमान आहे आणि तिच्या मुखाला चांदीचा मुखवटा लावला आहे. मूर्तीच्या डाव्या हातात गदा आहे. सभामंडपातील भिंतींवर समर्थ रामदास स्वामींच्या प्रतिमा तसेच जुन्या मंदिराची छायाचित्रे लावली आहेत.

वाघळी येथील मारुती नवसाला पावणारा व जागृत असल्याची श्रद्धा असल्याने तालुक्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. दर शनिवारी भाविकांची संख्या अधिक असते. भाविकांकडून वांग्याची भाजी व रोडग्यांचा महाप्रसाद येथील हनुमानाला अर्पण करण्यात येतो आणि या प्रसादाचे भाविकांना वाटपही करण्यात येते. या मंदिरात हनुमान जयंती, रामनवमी, गुढीपाडव्यासह विविध सण-उत्सव साजरे होतात. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिर परिसरात मोठी यात्रा भरते. या यात्रेनिमित्त परिसरात प्रसाद, फुले तसेच अन्य वस्तूंची विविध दुकाने लागतात.

उपयुक्त माहिती:

  • खामगाव येथून ११ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ४१ किमी अंतरावर
  • खामगाव येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिराच्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा नाही

मारुति मंदिर संस्थान

वाघली, खामगांव, जिला बुलढाणा

Back To Home