प्रतिकैलास अशी ओळख असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मार्लेश्वर मंदिर हे राज्यातील प्राचीन व प्रसिद्ध शिवमंदिरांपैकी एक आहे. देवरुख तालुक्यातील मार्लेश्वर गावात, सह्याद्री पर्वतरांगांमधील एका गुहेत, मार्लेश्वराचे जागृत व स्वयंभू स्थान आहे. मकर संक्रांतीला होणारा मार्लेश्वर आणि साखरपा येथील गिरिजादेवीचा विवाह सोहळा हा येथील प्रमुख उत्सव असून त्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक उपस्थित असतात. या तीर्थक्षेत्राला लागून असलेला, सुमारे दोनशे फुटांवरून बारमाही कोसळणारा येथील धारेश्वर धबधबा भाविकांसोबतच पर्यटकांचेही आकर्षण आहे.
मंदिराची अख्यायिका अशी की संगमेश्वरमधील देवरुख परिसरात पूर्वी हे दैवत होते व त्याची स्थापना भगवान परशुराम यांनी केली होती; परंतु शिलाहार राजवटीला उतरती कळा लागल्यावर परकीयांनी येथे अनाचार माजवला होता. दररोज होणाऱ्या हत्या, चकमकी, लुटालूट यामुळे येथील जनता त्रस्त झाली होती. देवरुख येथील शंकरास हे सारे असह्य झाल्याने सह्याद्रीच्या दिशेने त्याने प्रवासाला सुरुवात केली. मंदिरातील देव नाहीसा झाल्याचे जेव्हा समजले तेव्हा ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना यश आले नाही. देव निघून गेल्यामुळे गावात रोगराई वाढली, त्यासोबतच परकीय आक्रमणांतही वाढ होऊ लागली. मात्र, आलेल्या या संकटाविरोधात येथील नागरिकांनी एकत्रपणे लढा उभारला आणि परकीय शत्रूचा खातमा केला. ज्या ठिकाणी हा संग्राम झाला, शत्रूला ज्या ठिकाणी ‘मारलं’, ती जागा मारळ नावाने ओळखली जाऊ लागली.
पुढे येथील सरदार आणेराव साळुंके मारळजवळील सह्याद्रीतील जंगलात शिकारीसाठी गेले असता त्यांना हुलकावणी देत एक शिकार पळत होती. पळत पळत ती एका गुहेत शिरली आणि अचानक वरून एक दगड गुहेच्या मुखापाशी पडून ती गुहा बंद झाली. आणेरावांनी तो दगड बाजूला सारल्यावर त्यांना या नैसर्गिक गुहेत स्वयंभू शिवपिंडीचे दर्शन झाले. मारळ गावाचे दैवत म्हणून या स्थानास मार्लेश्वर हे नाव पडले.
देवरुख येथून मारळ गावातून मार्लेश्वर देवस्थानापर्यंत जाण्यासाठी मार्ग आहे. या मार्गावरून मंदिराच्या भव्य कमानीयुक्त प्रवेशद्वारापर्यंत जाता येते. तेथून पुढे डोंगरावरील मंदिरापर्यंत जाण्यासाठी नागमोडी पायरीमार्ग आहे. या मार्गात सुमारे ५०० पायऱ्या असून पायऱ्या चढताना आकाशासोबत स्पर्धा करणाऱ्या सह्याद्रीच्या डोंगररांगा, गर्द हिरवाई आणि डोंगरांमधून कोसळणारे धबधबे नजरेस पडतात. या मार्गावरून मंदिरापर्यंत येण्यासाठी अर्धा तास लागतो. पायरी मार्गावर पूजा साहित्य, चहा, नाश्ता व जेवणाची अनेक हॉटेल्स आहेत.
डोंगरावरील लहानशा पठाराला लागून मार्लेश्वराची नैसर्गिक गुहा आहे. या गुहेच्या समोर फरसबंदी करून त्यावर पत्र्याची शेड व सुरक्षिततेसाठी बाजूने लोखंडी कठडे लावण्यात आलेले आहेत. या कठड्यांजवळून पाहिले असता धारेश्वर धबधब्याचे दर्शन होते. गुहेच्या प्रवेशद्वाराजवळ गणपतीचे छोटे मंदिर आहे. तेथून काही दगडी पायऱ्या चढून गुहेतील मार्लेश्वराच्या गर्भगृहात जाता येते. या गुहेला दरवाजा नाही. गर्भगृहात एकावेळी १५ व्यक्ती दर्शन घेऊ शकतील, अशी जागा आहे. येथे समई व पणत्यांशिवाय अन्य प्रकाशसाधने वापरली जात नाहीत. गुहेतील गर्भगृहात आठ फूट बाय पाच फूट चौथऱ्यावर मल्लिकार्जुन आणि मार्लेश्वराच्या शिवपिंडी आहेत. असे सांगितले जाते की मल्लिकार्जुन हे मार्लेश्वरांचे मोठे बंधू आहेत. डावीकडे मल्लिकार्जुन, तर उजवीकडे मार्लेश्वराचे लिंग आहे. दोन्ही शिवलिंगांसमोर अखंड दगडांत कोरलेले नंदी आहेत. मार्लेश्वराच्या लिंगाजवळ शिवमुखवटा, तर मल्लिकार्जुनाच्या लिंगाजवळ पंचधातूच्या नागदेवतांच्या प्रतिमा आहेत.
पावसाळ्याच्या दिवसांत या गुहेच्या वरील खडकातून अनेक ठिकाणी पाणी टपकत असते. येथे अनेक सापही आढळतात. गुहेतील काळोखामुळे ते सहजासहजी नजरेस पडत नाहीत. डुरक्या घोणस या बोआ जातीचे हे साप बिनविषारी आहे. त्यांनी आजवर कोणालाही दंश केलेला नाही, असे येथील पुजाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवशंकर नागाच्या रूपात येथे दर्शन देतात, अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. गुहेला लागूनच लहानसे गंगाकुंड आहे. त्याला चार पायऱ्या आहेत. बाराही महिने या कुंडातील पाण्याची पातळी सारखीच असते.
सरदार आणेरावांना मार्लेश्वराच्या शिवलिंगाचे दर्शन झाले तो दिवस मकर संक्रांतीचा होता. तेव्हापासून दरवर्षी येथे संक्रांतीला मोठी यात्रा भरते. या गुहेत केवळ शंकराचे स्थान होते, पार्वतीचे नव्हते. त्यामुळे साखरपा येथील गिरिजादेवी आणि मार्लेश्वराचा येथे विवाह लावण्याची प्रथा आहे. या सोहळ्यासाठी साखरपा येथून गिरिजादेवीला पालखी मिरवणुकीतून वाजतगाजत येथे आणले जाते. मार्लेश्वर ते साखरपा हे अंतर सुमारे १६ किमी आहे. डोंगरवाटेतून हे अंतर चालत भाविक पालखी आणतात. असे सांगितले जाते की देवरुखवरून निघाल्यानंतर मार्लेश्वराने काही काळ आंगवली येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे ही पालखी आंगवली गावात काही काळ थांबते. पालखी मार्लेश्वराला आल्यावर लिंगायत पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडतो. यावेळी परिसरातील अनेक गावांतूनही येथे पालख्या येतात. येथील नोंदींनुसार, हा सोहळा पाहण्यासाठी दोन लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. याशिवाय प्रत्येक सोमवारी, शनिवारी, महाशिवरात्र व श्रावणी सोमवारीही मोठ्या संख्येने भाविक येथे येतात.
मार्लेश्वर मंदिराच्या खाली पांडवकालीन करंबेळी डोह लागतो. हा डोह खूप खोल आहे. येथे येणाऱ्या भाविक व पर्यटकांचे आणखी एक आकर्षण म्हणजे मंदिरासमोर असलेला धारेश्वर धबधबा. बारमाही वाहणाऱ्या धबधब्याच्या भोवतीचा भाग निसरडा असल्याने कठडे लावत तो सुरक्षित करण्यात आला आहे. सुमारे २०० फुटांवरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे पाहिल्यावर शंकराच्या जटेतून गंगा कोसळत असल्याचा भास होतो. या धबधब्याला बारा छोटे–मोठे धबधबे येऊन मिळतात. त्याचे पाणी खळाखत जाऊन पुढे बावनदी तयार होते. माघ महिन्यात धबधब्याखाली स्नान करणे पवित्र समजले जाते. धबधब्याच्या वरच्या बाजूस, मंदिराच्या समोरील उंच डोंगरावर आणखी चार धबधबे आहेत. या डोंगराच्या टोकावर शंकराचे लिंग असल्याने त्याला लिंगा डोंगर म्हणतात. मोठ्या जंगलातून खडतर वाटेवरून तीन–चार तासांची पायपीट करत त्याच्या माथ्यावर जाता येते.