मर्दडी देवी मंदिर

दुधा, ता. बुलडाणा, जि. बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील दुधा येथे अजिंठा पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले मर्दडी देवी मंदिर हे विदर्भातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. माहूरच्या रेणुकादेवीचे उपपीठ मानल्या जाणाऱ्या या स्थानाची प्रतिष्ठापना भगवान परशुरामांनी केल्याची आख्यायिका प्रचलित आहे. बाराव्या शतकातील हेमाडपंती स्थापत्यशैलीत बांधलेल्या या मंदिरात शिव आणि शक्तीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. मंदिराच्या गर्भगृहात देवीचा शेंदूरचर्चित तांदळा असून समोरच स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. निसर्गरम्य परिसरात असलेल्या या मंदिराला राज्य सरकारने ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. शारदीय व चैत्री नवरात्रोत्सवासह येथे वर्षातून तीन वेळा मोठ्या यात्रा भरतात.

मर्दडी मंदिर आणि या परिसराचे सांस्कृतिक महत्त्व स्कंद पुराण तसेच पद्म पुराण यांसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये वर्णिलेले आहे. या ग्रंथांत डोंगररांगांमधील पवित्र झरे आणि देवींच्या स्थानांचा उल्लेख आढळतो. सोळाव्या शतकात अबुल फजल याने लिहिलेल्या ‘आइन-इ-अकबरी’ मध्येही या परिसरातील निसर्ग आणि डोंगररांगांची नोंद आहे. मंदिराच्या हेमाडपंती स्थापत्यशैलीवरून ते बाराव्या शतकातील असल्याचे स्पष्ट होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या जीर्णोद्धारानंतर या पुरातन मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले. स्थानिक रहिवासी आणि पुजाऱ्यांच्या मते मर्दडी देवीचे हे स्थान साधारणतः तीन हजार वर्षांपूर्वीचे असून ते त्रेतायुगातील असावे, असा समज आहे.

या मंदिराची आख्यायिका अशी की जमदग्नी ऋषी आणि रेणुका माता यांच्यामध्ये ज्यावेळी वैचारिक मतभेद झाले, त्यावेळी माता रेणुका या डोंगरकुशीत विसावल्या होत्या. या ठिकाणी देवीने आपल्या जाज्वल्य रूपाचे दर्शन घडवले, म्हणून या स्थानाला ‘मर्दडी’ हे नाव पडले. हे स्थान माहूरच्या रेणुका मातेचे उपपीठ मानले जाते. दुसऱ्या कथेनुसार, प्राचीन काळी या परिसरात एका दुष्ट राक्षसाचा मोठा दरारा होता. त्याच्या त्रासामुळे स्थानिक जनता आणि ऋषीमुनी हैराण झाले होते. या नराधमाचा संहार करण्यासाठी देवीने उग्र रूप धारण केले आणि याच डोंगराच्या कड्यावर त्या राक्षसाचे ‘मर्दन’ केले, म्हणजेच त्याचा पूर्णतः नाश केला. राक्षसाचे मर्दन करून धर्माची स्थापना केल्यामुळे या जागृत स्थानाला आणि येथे वास्तव्यास असलेल्या देवीला मर्दडी देवी असे संबोधले जाऊ लागले.

अजिंठा डोंगररांगांच्या कुशीत वसलेल्या या मंदिराचे स्थान भौगोलिकदृष्ट्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. हे मंदिर जिल्ह्यातील सर्वात उंच समजल्या जाणाऱ्या दुधा गावाच्या सानिध्यात आहे. हिरवाईचा शालू पांघरलेली वनराई, नदीनाल्यांचे खळाळून वाहणारे पाणी आणि सतत कानावर पडणारे पक्ष्यांचे कूजन यामुळे मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत प्रसन्न वाटते. मंदिराच्या परिसरात पूजासाहित्य, प्रसाद तसेच विविध वस्तूंची विक्री करणारी दुकाने आहेत. या मंदिरात येण्यासाठी ८१ पायऱ्या उतराव्या लागतात. पायऱ्या उतरत असताना वाटेत भैरवबाबाचे छोटे मंदिर लागते आणि येथूनच मंदिराचे शिखर नजरेस पडते.

सभामंडप आणि तीन गर्भगृहे अशी या मंदिराची संरचना आहे. सभामंडपाबाहेर मोठा मंडप आहे. सभामंडपात सहा कोरीव दगडी स्तंभ आहेत. स्तंभपादावर उभ्या असलेल्या या स्तंभांतील स्तंभदंडांवर चौकोनी आकार कोरलेले आहेत. गर्भगृहात उंच चौथऱ्यावरील दगडी मखरात देवीचा मोठा शेंदूरचर्चित तांदळा आहे. पश्चिमेकडे मुख असलेल्या या तांदळ्यावर भुवया, डोळे, नाक आणि जीभ कोरलेली आहे. देवीच्या नाकात नथ आणि तिच्या कपाळावर असलेल्या मोठ्या टिळ्यावर तांदूळ लावलेले असतात. शृंगारपूजेनंतर देवीचे रूप अधिकच खुलून दिसते. मूर्तीच्या डाव्या बाजूस तलवार व उजवीकडे परशुरामाची खड्गधारी मूर्ती आहे. परशुराम हे रेणुका मातेचे पुत्र असल्याने या ठिकाणी आई आणि मुलाचे एकत्रित दर्शन घडते.

देवीच्या गर्भगृहासमोरच महादेवाचे गर्भगृह आहे व त्यात मोठ्या शाळुंकेमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. नजीकच तेलीमातेचे गुहावजा गर्भगृह आहे. या गर्भगृहाचे प्रवेशद्वार छोट्या आकाराचे असल्याने नतमस्तक होऊन आत यावे लागते. गर्भगृहात तेलीमातेची पाषाणी मूर्ती आहे. ‘तेलियामाता’ असेही संबोधण्यात येणाऱ्या या देवीच्या मूर्तीवर भाविक तेलाभिषेक करतात. हे तेल मूर्तीच्या समोर असलेल्या एका लहानशा जागेत जमा होते. हे तेल अंगावर लावल्यास गजकर्ण, खरूज आणि नायट्यासारखे त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. या मंदिरात गणेश व सरस्वती देवीच्याही प्राचीन मूर्ती आहेत. मंदिरात छोटे यज्ञकुंड आहे व नवरात्रोत्सवादरम्यान येथे हवन केले जाते. नजीकच असलेल्या एका मोठ्या मंडपात दक्षिणमुखी हनुमानाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. एका भाविकाने काही वर्षांपूर्वी बांधून दिलेल्या या मंडपात विवाहासारखी मंगलकार्ये पार पडतात.

मर्दडी देवीच्या मंदिरावर उंच शिखर आहे. शिखराच्या सर्वात तळाशी असलेल्या चौकोनी स्तरावर तीन गोलाकार स्तर असून प्रत्येक स्तराच्या मध्ये कमलपुष्पाची रचना केलेली आहे. गोलाकार स्तरांमध्ये असलेल्या देवकोष्टकांमध्ये देवदेवता व ऋषीमुनींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. वरच्या बाजूस निमुळत्या होत जाणाऱ्या या शिखरावर द्विस्तरीय आमलक व कळस आहे. मंदिराजवळ दोन दीपस्तंभ आहेत आणि नजीकच बालगणेशाचे छोटे मंदिर आहे.

मंदिराच्या उजव्या बाजूस दगडी बांधकाम केलेले कुंड आहे. हे कुंड परशुरामाने बाण मारून उत्पन्न केल्याची आख्यायिका आहे. या कुंडात असलेल्या गोमुखातून सतत पाण्याची धार वाहत असते. तीव्र उन्हाळ्यातही त्यातून पाणी कमी होत नाही. या ठिकाणाहूनच बाणगंगा नदीचा उगम होतो, अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोमुखातून कितीही पाणी पडले तरी कुंडातील जलपातळी वाढत नाही, असे सांगितले जाते. या गोमुखाच्या वरच्या बाजूस असलेल्या भुयारातून गोमुखात पाणी येते. हे पाणी पैनगंगा नदीचे असल्याचा समज प्रचलित आहे. नवरात्रोत्सवादरम्यान येथील गोमुखाखाली स्नान केल्याने अनेक व्याधी दूर होतात, अशी श्रद्धा असल्याने येथे स्नान करण्यासाठी असंख्य भाविक येतात.

जागृत देवता असा लौकिक असलेल्या मर्दडी देवीच्या दर्शनासाठी विदर्भ, खानदेश व मराठवाड्यातील असंख्य भाविक येतात. चैत्र पौर्णिमा आणि पोळ्याचा पाडवा या दिवशी येथे मोठ्या यात्रा भरतात. येथे चैत्री, पौष तसेच शारदीय नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. शारदीय नवरात्रोत्सवापेक्षा चैत्र तसेच पौष महिन्यातील नवरात्रोत्सवांचे स्वरूप तुलनेने छोटे असते. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवकाळात मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या काळात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीने संपूर्ण परिसर गजबजलेला असतो.

उपयुक्त माहिती

  • बुलडाणा येथून १९ किमी अंतरावर
  • जिल्ह्यातील अनेक शहरांतून बुलडाणा येथे एसटीची सुविधा
  • बुलडाणा येथून दुधा गावात येण्यासाठी एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यत येऊ शकतात
  • परिसरात न्याहारीची सुविधा आहे

मर्दाडी देवी मंदिर

दूधा, ताल. बुलडाणा, जिला. बुलढाणा

Back To Home