
मराठवाडा व खान्देश सीमेवर, अजिंठा डोंगररांगांच्या पायथ्याशी, बोरमाळ तांडा गावाजवळील खोल दरीच्या परिसरात मनुमातेचे जागृत व प्रसिद्ध मंदिर आहे. भाविकांच्या मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी देवी, असा या देवीचा लौकिक आहे. ही देवी मराठवाडा तसेच खान्देशातील अनेक कुटुंबीयांची कुलस्वामिनी आहे. हे मंदिर ज्या परिसरात आहे तेथील नैसर्गिक रचनेमुळे दिवसातून केवळ तीन तास येथे सूर्यदर्शन होते, हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिरातील देवीची आख्यायिका अशी की निजाम काळात येथून नजीकच असलेल्या कन्नड तालुक्यातील लोहगावातील गरीब कुटुंबात मनू नावाची मुलगी राहत असे.
घरच्यांनी ठरवलेल्या लग्नाला विरोध करत ती एके दिवशी घाटनांद्रा डोंगराच्या दिशेने निघून गेली. तिचा शोध घेण्यासाठी कुटुंबीय तसेच ग्रामस्थ तिच्या मागे गेले. त्यांनी पाहिल्यावर मनूने उंच टेकडीवरून उडी मारली. काही वेळाने खोल दरीत डोंगराच्या पायथ्याशी ती देवीच्या रूपात प्रकट झाली. त्यानंतर भाविक तिची मनोभावे पूजा–अर्चा करू लागले. ही देवी घाटनांद्राच्या जोगेश्वरी देवीची बहीण असल्याची मान्यता आहे. या मंदिरात पूर्वी तांदळा स्वरुपातील देवी होती. २०१४ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार व नूतनीकरण केल्यानंतर येथे देवीच्या नव्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरकडून सिल्लोड–भराडी–घाटनांद्रा या घाट रस्त्याने तसेच चाळीसगावकडून नागद–बनोटी–तिडका मार्गे मंदिरापर्यंत येता येते. बोरमाळ तांडा गावापासून दोन किमी अंतरावर अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिरापर्यंत जाण्यासाठी पायवाट आहे. मंदिर परिसरात गर्द झाडी असून तेथे हिंस्र पशूंचाही वावर असतो. त्यामुळे सायंकाळी व रात्रीच्या सुमारास येथे जाता येत नाही. दोन्ही बाजूने उंचच उंच डोंगर असल्याने येथे दुपारी १२ ते ३ या वेळेतच सूर्यदर्शन होते.
मंदिर परिसरात येताच मंदिराचे शिखर, त्यावरील कळसावर असलेली ध्वजपताका लक्ष वेधून घेते. मंदिरासमोरील प्रांगणात फुलझाडे लावण्यात आली आहेत. परिसरातील एका झाडाजवळ छोटे शिवलिंग व नंदीची मूर्ती आहे. परिसरात शनिदेवाचेही स्थान आहे.
खुला सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे मनुदेवी मंदिराचे स्वरूप आहे. फरसबंदी असलेल्या सभामंडपाजवळ यज्ञकुंड आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. गर्भगृहात एका चौथऱ्यावर मुकुटधारी, वस्त्रालंकार परिधान केलेली मनूमातेची मूर्ती आहे. देवीच्या दोन्ही बाजूला तिचे वाहन असलेल्या वाघाच्या मूर्ती आहेत. दर पौर्णिमेला देवीला स्नान घालून तिची वस्त्रे बदलण्यात येतात. नवसाला पावणारी असा लौकिक असल्याने विविध भागांतील भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. आषाढ महिन्यातील शेवटच्या मंगळवारी होणाऱ्या यात्रोत्सवाला भाविकांची मोठी गर्दी होते. यावेळी देवीचा भंडाराही होतो. शारदीय नवरात्रोत्सवादरम्यानही मराठवाडा, खान्देश, विदर्भासह राज्यातील अनेक भाविक येथे दर्शनासाठी येतात. नऊ दिवस येथे अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अष्टमीला होम–हवन होतो. नवरात्रोत्सवात हा परिसर मातेच्या जयजयकाराने दुमदुमून जातो.
मंदिरापासून काही अंतरावर तीनशे फुटांवरून कोसळणारा धबधबा भाविक तसेच पर्यटकांचे आकर्षण आहे. पावसाळ्यात हा धबधबा पाहण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात. खळखळून वाहणाऱ्या या धबधब्यामुळे येथील निसर्गसौंदर्यात आणखी भर पडते. मंदिराच्या वरच्या बाजूला एक मोठी कपार आहे. येथे पाण्याचे टाक आहेत, त्यामध्ये बाराही महिने थंडगार पाणी असते.