मंगलमूर्ती मंदिर
नवगण राजुरी, ता. जि. बीड

हिंदू धर्मात गाणपत्य पंथाचा स्वतंत्र इतिहास आणि विशिष्ट पूजा पद्धती आहेत. या पंथात गणपती हे मुख्य दैवत मानले जाते आणि येथे गणेशाची अनेक रूपे पुजली जातात. त्यांपैकी चतुर्मुख गणेश ही उग्र देवता समजली जाते. हे दैवत संरक्षणकर्ता व भरभराटीचा दाता मानले जाते. तसेच तो ध्यान, विद्या, तेज आणि संपत्तीचा अधिपती आहे. चतुर्मुख गणपतीच्या मोजक्या मंदिरांपैकी एक प्रसिद्ध मंदिर बीड जिल्ह्यातील नवगण राजुरी गावात आहे. येथील मंदिरातील एकाच शिळेत चार दिशांना चार गणेशमूर्ती अशी रचना असलेली ही देशातील एकमेव आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती असल्याचे सांगितले जाते.

या मंदिराची आख्यायिका अशी की सृष्टीचे निर्माते असलेल्या ब्रह्मदेवांनी या भूमीवर एक महायज्ञ करण्याचे योजिले होते. जेव्हा त्यांनी यज्ञाला सुरुवात केली, तेव्हा असुरांनी त्यांच्या या कार्यात विघ्न आणण्यास सुरुवात केली. यज्ञाच्या अग्नीत अशुद्ध वस्तू टाकणे आणि ऋषिमुनींना त्रास देणे असे प्रकार सुरू झाले. या संकटातून मार्ग काढण्यासाठी आणि यज्ञाचे रक्षण करण्यासाठी ब्रह्मदेवाने गणेशाची आराधना केली. त्यानुसार गणपतीने या ठिकाणी अवतार घेतला आणि असुरांचा नाश केला. असुरांच्या विनाशानंतर ब्रह्मदेवाने गणेशाची स्थापना केली, जेणेकरून भविष्यात कोणत्याही धार्मिक कार्यात विघ्न येणार नाही. असे मानले जाते की या वेळी गणपतीने नऊ विविध रूपांमध्ये किंवा नऊ दिशांना आपले अस्तित्व प्रस्थापित केले, ज्यामुळे या स्थानाला ‘नवगण’ हे नाव प्राप्त झाले. ही नऊ स्थाने पुढीलप्रमाणे आहेत – १ ते ४ मंदिरातील गर्भगृहात पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण अशी चतुर्मुखी मूर्ती (एकत्रित ४ रूपे), पाचवी मूर्ती याच मंदिरातील उत्सव मूर्ती समजली जाते, सहावे स्थान पूर्व सीमेवरील तिप्पटवाडी येथे, सातवे पश्चिम सीमेवर राधाबाई परिसरात, आठवे स्थान उत्तर सीमेवरील शिरापूर येथे व नववे स्थान दक्षिण सीमेवरील संगमेश्वर येथील लिंबा गणेश हे आहे.

हे मंदिर गावातील वर्दळीच्या रस्त्याला लागून आहे. मंदिराभोवती रस्त्यापेक्षा काही इंच उंच चौथरा आहे. त्यावर सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपास समोरील बाजूने चार प्रवेशद्वारे आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला नक्षीदार स्तंभ आहेत. सभामंडपात प्रत्येकी आठ नक्षीदार चौकोनी स्तंभांच्या तीन रांगा आहेत. हा सभामंडप बंदिस्त स्वरूपाचा आहे. येथील डाव्या व उजव्या बाजूच्या रांगांतील स्तंभ भिंतीत आहेत. सर्व स्तंभ चौकोनी स्तंभपादावर उभे आहेत आणि त्यांच्या दंडावर पानाफुलांच्या नक्षी कोरलेल्या आहेत. सभामंडपात जमिनीवर काचबंद पेटीत चांदीचे कासवशिल्प आहे, तर वज्रपीठावर गणपतीचे वाहन असलेल्या मूषकाचे पितळी शिल्प आहे. मूषक शिल्पापुढे चांदीच्या पादुका आहेत. पुढे चारही बाजूंनी दरवाजे असलेले गर्भगृह आहे. गर्भगृहाच्या भिंतीवर स्तंभनक्षी आणि द्वारशाखांवर उभ्या धारेच्या नक्षी आहेत. चारही दरवाजांना नक्षीदार लाकडी झडपा आहेत. गर्भगृहात वज्रपीठावर गणेशाची चार रूपे एकाच शिळेत असलेली मूर्ती आहे. या शिळेत महामंगल गणराय (पूर्वाभिमुख), शेषाब्धिष्ठित गणराय (पश्चिमाभिमुख), मयुरेश्वर (दक्षिणाभिमुख) आणि उत्तिष्ठ गणराय (उत्तराभिमुख) आहेत. गर्भगृहात समोरील बाजूला आणखी एक लहान गणेश मूर्ती आहे. गर्भगृहाच्या बाह्य बाजूने प्रदक्षिणा मार्ग आहे. त्यावरून प्रदक्षिणा घालताना या चारही गणेशांचे दर्शन होते.

मंदिराच्या छतावर चारही बाजूंनी उतरता सज्जा आहे आणि त्यावर कठडा आहे. कठड्यात समोरील बाजूला चार देवकोष्ठके आहेत. त्यांत श्रीगणेश, महालक्ष्मी, सरस्वती व गौरीहर यांच्या मूर्ती आहेत. प्रत्येक देवकोष्ठकाच्या दोन्ही बाजूला लघुशिखरे व त्यावर कळस आहेत. गर्भगृहाच्या छतावर चार थरांचे द्रविडी शैलीतील चौकोनी शिखर आहे. या शिखराच्या प्रत्येक थरात चारही बाजूंना कुट व शाल रचना आहेत. चौथ्या थरात स्तूपिका असून तिच्या सभोवती सहा उरुशृंगी शिखरे व त्यावर कळस आहेत. स्तूपिकेवर मुख्य कळस आहे.

माघी गणेशोत्सव तसेच भाद्रपदातील दहा दिवसांचा पार्थिव गणेशोत्सव हे दोन मुख्य उत्सव येथे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. माघी गणेशोत्सवाची सुरुवात शुद्ध प्रतिपदेपासून होते. पहिल्या चार दिवसांत (प्रतिपदा ते चतुर्थी) द्वारपूजा केली जाते. त्यात गावाच्या चारही दिशांना असलेल्या चार रक्षक गणपतींची विधिवत पूजा केली जाते. पंचमीच्या दिवशी गणपतीचा ‘जन्मकाळ’ साजरा केला जातो. या दिवशी सायंकाळी कीर्तनाचे आयोजन केले जाते आणि जन्मोत्सवाचा सोहळा पार पडतो. अष्टमीच्या दिवशी गणपतीची पालखी निघते. ही पालखी संपूर्ण गावातून फिरवली जाते. यावेळी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, भजन, प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसाद आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. उत्सवांच्या वेळी हजारो भाविक दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी येतात. देवाला मोदक व पुरणपोळी अर्पण करून नवस फेडले जातात. याशिवाय संकष्ट चतुर्थी, विनायकी चतुर्थी, मंगळवार आदी दिवशी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी असते.

उपयुक्त माहिती:

  • बीड येथून १३ किमी अंतरावर
  • बीड येथून एसटी व खासगी वाहनांची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे
  • संपर्क : नवनाथ महाराज म्हस्के, पुजारी, मो. ८८८८१३१३४८
  • भगवान महाराज डमाळे, पुजारी, ८८८८१३१३८३

मंगलमूर्ति मंदिर

नवगन राजुरी, तालुका। जिला. बीड

Back To Home