मांढरदेवची काळूबाई

मांढरदेवगड, ता. वाई, जि. सातारा

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात मांढरदेव येथे श्रीकाळेश्वरी म्हणजेच काळूबाई देवीचे मंदिर आहे. राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये हे एक महत्त्वाचे देवीचे स्थान मानले जाते. दररोज हजारो भाविक येथे देवीच्या दर्शनाला येतात. पौष पौर्णिमेपासून १० दिवस भरणारी येथील यात्रा ही जिल्ह्यातील मोठ्या यात्रांपैकी एक आहे. यावेळी लाखो भाविक मांढरदेव गडावर येतात. नवसाला पावणारी मनोरथ पूर्ण करणारी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाजातील अनेकांची ही कुलदेवी आहे.

काळूबाई देवीचे हे स्थान पुणे सातारा जिल्ह्यांच्या तसेच भोर, वाई खंडाळा या तालुक्यांच्या सीमेवर असून ते समुद्रसपाटीपासून ४६०० फूट उंचीवर आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये मांदार डोंगरावरील गर्द वनराईत देवी विराजमान आहे. या स्थानाला मांढरगड असेही म्हणतात. येथे येण्यासाठी सातारा जिल्ह्यातून वाईमार्गे, तसेच पुणे जिल्ह्यातून भोरमार्गे रस्ता आहे. येथून थेट वाहने मांढरगडावरील देवीच्या मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत येऊ शकतात. याशिवाय सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथून डोंगरावरील पायवाटेने येथे पोचता येते. या पायवाटेतून येताना म्हसोबाचे मांडव्य ऋषींची पत्नी मंडाबाईं (मंडी आई) यांची मंदिरे लागतात. असे सांगितले जाते की मांडव्य ऋषींच्या येथील वास्तव्यामुळे या डोंगराचे नाव मांढरगड गावाचे नाव मांढरदेव असे पडले.

काळूबाई देवीबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की द्वापारयुगात दैत्यराजा रत्नासुर याचा सेनापती लाख्यासुर याला महादेवाकडूनकोणताही देव माणूस तुला दिवसात मारू शकत नाही’, असा वर मिळाला होता. या वरामुळे लाखासुर उन्मत्त झाला होता. मांदार पर्वताच्या परिसरात त्याची सर्वत्र दहशत होती. या पर्वतावरील ऋषीमुनींच्या तपसाधनेमध्येही तो वारंवार अडथळे आणत असे. याचवेळी मांडव्य ऋषींचे पत्नी मंडाबाई हिच्यासह या पर्वतावर वास्तव्य होते. लाखासुराकडून ऋषीमुनींना देण्यात येणारा त्रास पाहून मंडाबाईने आदिमाया पार्वतीकडे हे संकट निवारण्यासाठी मदत मागितली. माता पार्वतीने मंडाबाईची विनंती मान्य केली तिने काळूबाईचे रूप घेऊन लाखासुराला युद्धाचे आव्हान दिले. सात दिवस चाललेल्या या युद्धात महादेवाच्या वरदानामुळे दिवसात त्याला काहीही होत नव्हते. त्यामुळे पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीने त्याचा अंत केला. युद्धानंतर देवीने सध्या जेथे मंदिर आहे ती जागा विश्रांतीसाठी निवडली. तेव्हापासून येथे देवीचे स्थान आहे.

काळूबाई मंदिराच्या स्थापनेबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. असे सांगितले जाते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हे मंदिर बांधले गेले आहे. या डोंगरावर महादेवाचे हेमाडपंती शैलीतील मंदिर आहे. ते यादवसम्राट सिंघण यांच्या कारकिर्दीतील (१२१० ते १२४७) आहे. काळूबाई देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून सभामंडप गर्भगृह अशा रचनेचे आहे. मंदिरासमोर दोन मोठ्या दगडी दीपमाळा आहेत. आटोपशीर सभामंडपात देवीचे वाहन सिंहाची मूर्ती आहे. तुलनेने मोठ्या असलेल्या गर्भगृहात काळूबाई देवीची शेंदूरचर्चित स्वयंभू उभी मूर्ती असून ती चतुर्भुज आहे. मूर्तीच्या उजवीकडील हातांमध्ये त्रिशूल आणि तलवार आहे. डावीकडील एका हातात ढाल आणि दुसऱ्या हातात दैत्याची मान धरलेली आहे. देवी उभी असून तिचा एक पाय दैत्याच्या छातीवर आहे. चांदीचा मुकुट, तेजस्वी डोळे, विविध दागिन्यांनी मढविलेले, हिरवी साडी चोळी परिधान केलेले, कपाळभर हळदीकुंकवाचे भळवट भरलेले देवीचे रूप भाविकांना भारावून टाकते. गर्भगृहात चांदीच्या पत्र्यावरील कोरीव काम वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिराच्या कळसावर गाय सिंह यांची शिल्पे आहेत.

पौष पौर्णिमेपासून येथे मोठी यात्रा भरते. यावेळी देवीची यथासांग महापूजा महाअभिषेक करण्यात येतो. या उत्सवाच्या वेळी देवीच्या चेहऱ्यावर सोन्याचा मुखवटा लावला जातो. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील मौजे बोपगावच्या फडतरे कुटुंबाला प्रथेप्रमाणे सासनकाठीचा पालखीचा मान दिला जातो. पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री देवीचा मुखवटा पालखीत ठेऊन वाद्यांच्या गजरात त्याची मिरवणूक (छबिना) काढली जाते. हा छबिना या यात्रोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे. या उत्सवाच्यावेळी गावोगावची भक्त मंडळी ताशा, हलगी, संबळ, झांज अशा वाद्यांच्या गजरात देवीचा जयघोष करीत डोंगर चढून येतात. या डोंगरवाटेवर यावेळी पूजा साहित्य, न्याहरी तसेच चहापाण्याची शेकडो दुकाने थाटली जातात. अधिकृत माहितीनुसार या दहा दिवसांत देवीच्या दर्शासाठी तीन ते चार लाख भाविक येतात. नवसपूर्तीनिमित्त भाविकांकडून यावेळी देवीला पुरणपोळीचा दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो.

मुख्य मंदिराच्या उजवीकडे गोंजीबाबा, तर डावीकडे मांगीरबाबा यांची मंदिरे आहेत. याशिवाय परिसरात लक्ष्मीमाता, मरीआई, गंगाजीबाबा, तेलीबाबा, तसेच धावजी पाटील यांची मंदिरे आहेत. त्यापैकी तेलीबाबांबाबत असे सांगितले जाते की देवीचे मंदिर बांधत असताना या तेलीबाबांचा मृत्यू झाला म्हणून त्यांच्या स्मरणार्थ येथे त्यांची समाधी बांधली गेली त्यावर तेल वाहण्याची प्रथा आहे. सकाळी वाजल्यापासून सायंकाळी पर्यंत भाविकांना या गडावरील मंदिरातील देवीचे दर्शन घेता येते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाकडून (एमटीडीसी) दुपारच्या वेळी येथे भाविकांना अल्प शुल्क आकारून महाप्रसाद दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • वाईपासून २२ किमी, तर सातारा शहरापासून ५६ किमी अंतरावर
  • वाई भोर येथून मांढरदेवसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिराजवळ असलेल्या वाहनतळापर्यंत जाऊ शकतात
  • गडावर न्याहरीसाठी अनेक पर्याय
Back To Home