मल्लिकार्जुन मंदिर

शिरंबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी 

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या शिरंबे गावातील मल्लिकार्जुन मंदिर हे जिल्ह्यातील एकमेव महाराष्ट्रातील मोजक्या जलमंदिरांपैकी एक आहे. कधीही आटणाऱ्या तलावाच्या पाण्याने वेढलेल्या या कौलारू मंदिरातील स्वयंभू शिवलिंगही पाण्यातच आहे. या तलावाच्या पाण्यात स्नान केल्यास त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या आवारात असलेल्या ग्रामदेवतेच्या मंदिरातील खांबाला सर्पदंश झालेल्या व्यक्तीला बांधून ठेवल्यास काही वेळातच त्याचे विष उतरते, अशी येथील ग्रामस्थांची श्रद्धा आहे.

मंदिराची अख्यायिका अशी की शिरंबेच्या सीमेवर असलेल्या पुर्ये गावातील एका शेतकऱ्याने महादेवाची आराधना करत माझ्या शेतातून भरपूर धान्य मिळू दे, अशी इच्छा व्यक्त केली. महादेवाच्या कृपेने शेतात नाचणीचे चांगले पीक आले. पीक काढल्यानंतर पायलीने (पूर्वी धान्य मोजण्यासाठी वापरले जाणारे साधन) नाचणीची मोजणी करून तो शेतकरी आपल्या घरातील कोठारात धान्य नेत होता; परंतु कितीही धान्य काढले तरी धान्याची रास कमी होत नव्हतीघरातील कोठार भरल्यानंतर शेजारीपाजारी धान्य देऊनही शेतातील रास तशीच होती. सूर्यास्त झाला तरीही धान्याची रास संपल्यामुळे शेतकरी दमला त्याने संतापाच्या भराने आपली पायली त्या राशीवर आपटली. त्यावेळी तिचे दोन तुकडे झाले. एक तुकडा पुर्ये गावात पडला, तो नाचणदेव म्हणून प्रसिद्ध आहे. शिरंबेत पडलेल्या दुसऱ्या तुकड्याचे स्वयंभू पिंडीत रूपांतर झाले. मळणीतून उठून शिरंबेत आला म्हणून त्यास मल्लिकार्जुन असे नाव पडले.

चिपळूणसावर्डे मार्गावरील वहाळ गावातून शिरंबे येथे जाता येते. गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मंदिराच्या सभोवती जांभ्या दगडांची तटबंदी आहे. मंदिराचे प्रवेशद्वारही जांभ्या दगडांनी बांधलेले आहे. भक्कम बांधणी असलेल्या प्रवेशद्वारावर कलश कोरण्यात आलेला आहे. प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मंदिराच्या प्रांगणात एक लहान कुंड आहे. तटबंदीच्या भिंतींना आतील बाजूने भाविकांसाठी दगडी आसनव्यवस्था आहे. मंदिरासमोर दोन छोट्या दीपमाळा आणि कलाकुसर केलेले तुळशी वृंदावन आहे. येथील मल्लिकार्जुन मंदिर हे ४० फूट बाय ४० फूट आकाराच्या एका तलावाच्या मध्यभागी आहे. मंदिरात जाण्यासाठी तलावावर एक साकव (लहान पूल) बांधलेला आहे. तलावाची बांधणी जांभ्या दगडाची आहे. मंदिराच्या दक्षिणेकडे असलेल्या झऱ्यांचे पाणी तलावात येते. येथील पाण्याची पातळी बाराही महिने कायम असते, ते कधीही आटत नाहीअनेकदा दुष्काळात परिसरातील गावांतील तलाव विहिरी आटल्या; परंतु येथील पाण्याची पातळी स्थिर होती.

असे सांगितले जाते की हा तलाव साफ करताना देवाला साकडे घातले जाते. त्यानंतर झऱ्यांतून येणारे पाणी थांबते. सफाई झाल्यावर देवाला पुन्हा साकडे घातल्यावर झरे पुन्हा सुरू होतात. येथील पाणी विशिष्ट पातळीपर्यंत आल्यावर ते पाणी आपोआप नजीक असलेल्या दुसऱ्या तलावात जाते. या तलावात अनेक पाणसर्प असून अनेकदा ते मंदिरातील शिवलिंगावर विराजमान असतात. त्यावेळी घेतलेले दर्शन पवित्र असते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

बाहेरून १६ खांब असलेल्या या मंदिराचे तलावाच्या पाण्यात पडणारे प्रतिबिंब सुंदर दिसते. तलावात असलेला मंदिराचा चौथराही जांभ्या दगडाचा आहे. खुला सभामंडप आणि गाभारा अशी मंदिराची रचना आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या कौलारू मंदिरातील सर्व खांब हे लाकडी आहेत. सभामंडपाला दोन फूट उंचीच्या अर्धभिंती असून त्यावर भाविकांना बसण्याची सुविधा आहे. गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ अखंड पाषाणातील नंदीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला काळ्या पाषाणातील संगमरवरी अशा दोन गणेशमूर्ती आहेत़, तर उजवीकडे पाषाणातील हनुमान मूर्ती संगमरवरी दत्तमूर्ती आहेत.

येथील गर्भगृह हे काहीसे खाली असून त्यात जाण्यासाठी लहानसे लाकडी प्रवेशद्वार आहे. येथील शिवलिंग हे तलावातील पाण्याच्या पातळीनुसार असल्याने ते निम्म्याहून अधिक पाण्यातच आहे. असे सांगितले जाते की हे शिवलिंग सुमारे १४०० वर्षे प्राचीन असून छत्रपती शिवाजी महाराजांनी विशेष रक्कम अदा करून या मंदिराचे बांधकाम केले होते.

मंदिराशेजारी गावदेवी वरदानदेवी गावदेवी चंडिकाई अशी दोन मंदिरे आहेत. जीर्णोद्धारानंतर ही दोन्ही मंदिरे आधुनिक स्वरूपाची झाली असली तरी मूळ मल्लिकार्जुन मंदिराच्या स्वरूपात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सभामंडप आणि गर्भगृह असे वरदानदेवीच्या मंदिराचे स्वरूप आहे. देवीची मूर्ती पाषाणाची असून बाजूला काही देवतांच्या मूर्ती, तसेच उजव्या बाजूला छोटे शिवलिंग आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या मंदिरातील एका विशिष्ट खांबाला बांधून ठेऊन नगारावादन केले जाते. त्याच्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर असलेल्या तळ्यातील पाणी ठेवले जाते. असे केल्यानंतर काही वेळातच त्या व्यक्तीचे विष उतरते, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. फाल्गुन महिन्यात होणारा देवाचा उत्सव, महाशिवरात्र तसेच श्रावणी सोमवारी येथील तलावात स्नान करण्यासाठी आणि मल्लिकार्जुनाचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक येतात

ठळक वैशिष्ट्य

  • संगमेश्वरपासून ३७ किमी, तर रत्नागिरीपासून ८० किमी अंतरावर
  • सावर्डे, रत्नागिरी संगमेश्वर येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची सुविधा नाही
  • संपर्क : ग्रामविकास मंडळ, राजेंद्र पवार, मो. ९६५७३२९७३०, रवींद्र पवार, मो. ९६०४६५४८६३
Back To Home