बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यात वसलेले मलगी हे गाव मल्लिकार्जुन महादेवाच्या प्राचीन मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीत उभारलेले हे मंदिर सुमारे १२व्या किंवा १३व्या शतकातील असावे, असा अंदाज आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की श्रावण महिन्यात येथील गर्भगृहात अचानक दोन ते अडीच फूट पाणी साचते. हे आजवर न सुटलेले एक रहस्य मानले जाते. याशिवाय या मंदिराच्या शिखराच्या जागी संत तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाचा प्रसंग अतिशय सुंदररीत्या शिल्पांकित करण्यात आला आहे.
आध्यात्मिकदृष्ट्या मल्लिका म्हणजे माता पार्वती तर अर्जुन हे भगवान शंकराचे एक नाव आहे. या नावाचा पौराणिक संदर्भ प्रामुख्याने बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीशैलम येथील मल्लिकार्जुन मंदिराशी संबंधित आहे. पौराणिक कथेनुसार, कार्तिकेय आणि गणेश यांच्यातील पृथ्वीप्रदक्षिणेच्या स्पर्धेनंतर जेव्हा कार्तिकेय रुसून क्रौंच पर्वतावर गेले, तेव्हा त्यांना भेटण्यासाठी शिव आणि पार्वती तेथे गेले. माता पार्वतीने ज्या वेळी मल्लिका अर्थात मोगऱ्याच्या फुलांनी शिवाची अर्चना केली, तेव्हापासून या संयुक्त रूपाला मल्लिकार्जुन म्हणून ओळखले जाते. हे नाव शक्ती आणि शिव यांच्या अद्वैत मीलनाचे प्रतीक मानले जाते. मल्लिकार्जुन हे नाव सृष्टीतील प्रकृती आणि पुरुष यांच्यातील संतुलनाचे द्योतक आहे.
या नामाचा निरंतर जप केल्याने मनुष्याच्या मनातील चंचलता नष्ट होऊन त्याला आंतरिक शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते, अशी भाविकांची धारणा आहे.
चिखली तालुक्यातील मलगी येथील या मंदिरात मल्लिकार्जुन महादेवाच्या पिंडीची स्थापना कधी झाली, याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. प्राचीन काळी महाराष्ट्रातील अमरावती ते नाशिक हा पट्टा दंडकारण्याचा भाग होता. वनवासादरम्यान श्रीरामांनी सीतामाता आणि लक्ष्मणासह या मंदिरात चार-पाच दिवस मुक्काम केल्याची आख्यायिका सांगितली जाते. १२व्या किंवा १३व्या शतकात हेमाडपंती स्थापत्यशैलीत हे मंदिर उभारण्यात आले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येतो. या मंदिरात प्राचीन शिलालेखही आहे. काही वर्षांपूर्वी मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवून त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. चिखली-जालना मार्गावरील मलगी फाट्यापासून अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. गावाबाहेर असलेल्या या मंदिराला प्रशस्त प्रांगण आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना छोट्या बुरुजांच्या प्रतिकृती आहेत. मंदिरासमोर एक छोटे कुंड आणि त्यानजीक काही प्राचीन मूर्ती आहेत. या कुंडाला लागूनच दगडी बांधकाम असलेली प्राचीन बारव आहे. या बारवेमध्ये उतरण्यासाठी दगडी पायऱ्या करण्यात आल्या आहेत. येथून मंदिराकडे येण्यासाठी पायऱ्या आहेत. मंदिरासमोर असलेल्या नंदीमंडपात नंदीच्या दोन मूर्ती आहेत. त्यापैकी एक मोठी व एक लहान आहे.
अर्धखुला मंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. येथील मंडप हा मूळ मंदिरासमोर नंतरच्या काळात उभारलेला आहे. सभामंडपातील चार मुख्य स्तंभ दगडी स्तंभपादांवर उभे आहेत. प्रत्येक स्तंभावर विविध आकार कोरलेले आहेत. या सभामंडपातील भिंतींवर विविध देवी-देवता तसेच संतांची चित्रे रंगवण्यात आली आहेत. चार स्तंभांच्या मध्यभागी साधारणतः जेथे रंगशिला असते, तेथे प्राचीन शिवलिंग आहे आणि त्यावर पंचधातूच्या नागाने छत्र धरले आहे. येथून पुढे अंतराळातून आठ पायऱ्या उतरून खोलगट जागेत असलेल्या गर्भगृहात प्रवेश होतो. गर्भगृहात मध्यभागी अखंड पाषाणातील मल्लिकार्जुन महादेवाचे लिंग आहे. या लिंगावर नागाने छत्र धरले आहे. मागील बाजूकडील भिंतीवर कोरलेल्या देवकोष्टकामध्ये पार्वतीमातेची मूर्ती आहे. या देवकोष्टकाच्या दोन्ही बाजूंना द्वारस्तंभ आहेत. गर्भगृहात काही देवी-देवतांच्या मूर्तीही आहेत. असे सांगितले जाते की श्रावण महिन्यात या गर्भगृहात सुमारे अडीच फूट उंचीपर्यंत पाणी येते. मात्र, कितीही मोठा पाऊस झाला तरी येथील पार्वतीमातेच्या मूर्तीच्या चरणांना ते पाणी स्पर्श करत नाही.
मंदिराच्या शिखराच्या जागी संत तुकारामांच्या सदेह वैकुंठगमनाचा प्रसंग शिल्पांकित करण्यात आला आहे. येथील संत तुकाराम व गरुडाच्या मूर्ती जिवंत भासतात. मंदिराच्या उजव्या बाजूला गणेशाचे छोटेखानी मंदिर आहे व त्यात गणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती आहे. काही अंतरावरच असलेल्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिराजवळ यज्ञकुंड आहे. या मंदिरासमोर गरुडदेवाची मूर्ती आहे आणि त्याखाली कासव आहे. गर्भगृहातील चौथऱ्यावर विठ्ठल-रखुमाईच्या प्रसन्न मूर्ती आहेत. मंदिर परिसरात जुन्या मंदिराचे तसेच प्राचीन मूर्तींचे अवशेष पाहावयास मिळतात.
या मंदिरात चैत्र पौर्णिमेला मोठा उत्सव होतो. त्यावेळी या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते. या उत्सवानिमित्त येथे सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. त्यादरम्यान कीर्तन, भजन आदी धार्मिक कार्यक्रम होतात. सप्ताहाच्या सांगतेवेळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. महाप्रसादासाठी सुमारे बारा क्विंटल धान्याचा वापर करण्यात येतो. येथे महाशिवरात्र, आषाढी एकादशी, गोकुळाष्टमी या वेळीही अनेक धार्मिक कार्यक्रम होतात. श्रावण महिन्यात मंदिर परिसर भाविकांनी गजबजलेला असतो. या महिन्यातील प्रत्येक सोमवारी येथे महाआरती होते. या वेळी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध संस्थांमार्फत फराळाचे वाटपही केले जाते.