मल्हारी मार्तंड मंदिर

परभणी, ता. परभणी, जि. परभणी

खंडोबा, खंडेश्वर, मार्तंड, मल्हारी आणि मल्लाना अशा विविध नावांनी ओळखला जाणारा हा देव महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील अठरा पगड जातींचा कुलदेव आहे. ‘मल्हारी माहात्म्य’ हा खंडोबाचा आद्य ग्रंथ समजला जातो. वीरपाळ यांनी १३८१ साली बांधलेल्या आणि १६३५ मध्ये राघो मंबाजी यांनी विस्तार केलेल्या जेजुरीच्या मुख्य मंदिराला चैतन्य महाप्रभू यांनी भेट दिली होती, तर नाना फडणवीस यांनी येथे एक लाखाचा नवस केला होता. महाराष्ट्रात गावोगावी खंडोबाची मंदिरे आहेत. परभणी शहराचे ग्रामदैवत असलेले मल्हारी मार्तंड मंदिर ‘प्रति जेजुरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जागृत देव नवसाला पावतो अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या यात्रेनिमित्त चंपाषष्ठीला परभणीत १९६० सालापासून स्थानिक प्रशासनातर्फे शासकीय सुट्टी जाहीर करण्याची परंपरा आहे.

अश्मयुगापासून ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेले हे शहर ‘दक्षिण गंगा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीच्या खोऱ्यात वसलेले आहे. प्राचीन काळी या गावाला ‘पर्वणी’ आणि ‘प्रभावती’ अशी नावे होती. येथे पूर्वी प्रभावती देवीचे भव्य मंदिर होते आणि त्यावरूनच या शहराला ‘प्रभावती नगरी’ हे नाव पडल्याचे सांगितले जाते. परभणी ग्रामनामाच्या व्युत्पत्तीबाबत सबळ ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, प्रभावती या नावाचा अपभ्रंश होऊन पुढे ‘परभणी’ हे नाव रूढ झाल्याचे मानले जाते. सध्या मनमाड-काचेगुडा आणि परभणी-परळी वैजनाथ या रेल्वे मार्गावरील हे एक महत्त्वाचे जंक्शन आहे. या शहरामध्ये बालाजी बैरागी मंदिर, बेलेश्वर महादेव मंदिर, बालाजी मंदिर, गौडी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, जबरेश्वर मंदिर आणि वारकरी संप्रदायातील संत तसेच ज्ञानेश्वरीचे अभ्यासक रंगनाथ महाराज परभणीकर यांचे समाधी मंदिर अशी अनेक धार्मिक स्थळे आहेत. या सर्व स्थळांमध्ये शहराच्या मध्यभागात उभे असलेले श्री मल्हारी मार्तंड मंदिर प्राचीन परंपरेचे मुख्य श्रद्धास्थान मानले जाते.

या मंदिराच्या स्थापनेचा इतिहास असा की पूर्वी या परिसरात कडुलिंबाचे एक मोठे झाड होते. हे झाड पूर्णपणे वाळल्यानंतर त्या जागेवर इ.स. १९५३ मध्ये स्थानिक ग्रामस्थांना जमिनीमध्ये खंडोबाची मूर्ती सापडली. त्यानंतर ग्रामस्थांनी लोकसहभागातून तिथे एक छोटे मंदिर उभारून या मूर्तीची शास्त्रोक्त प्रतिष्ठापना केली. या मंदिराची ख्याती पसरल्यामुळे परभणी जिल्ह्याच्या विविध भागांतील भाविक येथे मोठ्या संख्येने दर्शनासाठी येऊ लागले. पुढे भाविकांची गर्दी वाढल्यामुळे सुमारे वीस वर्षांपूर्वी या मंदिराचा जीर्णोद्धार करून आजचे हे मोठे मंदिर उभारण्यात आले. मंदिराच्या स्थापनेनंतर येथे सुरू झालेल्या यात्रेदरम्यान विविध लोककला आणि खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असत. १९६० च्या दशकातील वाघ्या-मुरळी यांच्या एका मोठ्या स्पर्धेत मूळचे जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील रहिवासी बन्सी ढगे यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. त्यांच्या या कलेमुळे प्रभावित होऊन परभणीचे तत्कालीन खासदार शेषराव देशमुख यांनी बन्सी ढगे यांच्याकडे मंदिराची जबाबदारी सोपवली. तेव्हापासून ढगे कुटुंबीय येथे खंडेरायाची सेवा करत आहे.

मुख्य सभामंडप आणि गर्भगृह अशी या मंदिराची रचना आहे. मंदिराचा सभामंडप अत्यंत प्रशस्त आहे. त्यापुढील मुख्य गर्भगृहात एका अर्धगोलाकार पीठासनाच्या चौथऱ्यावर खंडोबाची मुख्य मुखवटाधारी मूर्ती स्थापित आहे. डोक्यावर पारंपरिक पगडी परिधान केलेल्या या मुख्य मूर्तीच्या दोन्ही बाजूंना म्हाळसा आणि बाणाई या दोन्ही पत्नींच्या मूर्ती आहेत. या मूर्तींना पिवळे वस्त्र परिधान केलेले असते. मुख्य मूर्तीच्या डावीकडे अश्वारूढ खंडेरायाची पाषाणमूर्ती आहे आणि मूर्तीच्या पाठीमागे एक मोठे त्रिशूळ उभारलेले आहे. गर्भगृहावर उंच शिखर आहे. वरच्या बाजूने निमुळते होत जाणाऱ्या या शिखरावर अनेक देवकोष्टके आहेत आणि त्यामध्ये विविध देव-देवतांच्या मूर्ती स्थापित आहेत. शिखराच्या सर्वोच्च भागात वर्तुळाकार आमलक आणि त्यावर कळस आहे.

दरवर्षी चंपाषष्ठीला येथे मोठी जत्रा असते. इ.स. १९५३ पासून या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. पूर्वी ही यात्रा सलग पंधरा दिवस चालत असे आणि त्या काळात जिल्ह्याच्या विविध भागांतील वाघ्या-मुरळी खंडेरायाच्या जागरणासाठी येथे येत असत. कालौघात या यात्रेचा कालावधी आता तीन दिवसांवर आला आहे.

या उत्सवाची सुरुवात चंपाषष्ठीच्या आधी येणाऱ्या अमावस्येपासून होते. या दिवशी मंदिरात घटस्थापना केली जाते. चंपाषष्ठीच्या मुख्य दिवशी पहाटे ४ ते ६ या वेळेत मुख्य मूर्तींना अभिषेक आणि महापूजा करण्यात येते. त्यानंतर सकाळी ८ वाजता खंडेरायाच्या वारूची, म्हणजेच घोड्याची उधळण करण्यात येते. या दिवशी मंदिरात दिवसभर विविध धार्मिक विधी आणि कार्यक्रम सुरू असतात. चंपाषष्ठीला सकाळपासूनच येथे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून येणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी होते.

शेकडो भाविक यावेळी ‘यळकोट येळकोट जय मल्हार’च्या जयघोषात खंडोबाचे दर्शन घेतात. अनेक भाविक नवस फेडण्यासाठी मंदिर परिसरात स्वतःच्या पाठीवर चाबकाचे म्हणजेच आसुडाचे फटके मारून घेतात. सायंकाळी मंदिरातून देवाची पारंपरिक काठी मिरवणूक काढली जाते. या मुख्य दिवसानंतर पुढील दोन दिवस येथे उत्सव साजरा केला जातो. या यात्रेनिमित्त परिसरात ‘कुस्त्यांची दंगल’ देखील आयोजित करण्यात येते.

याशिवाय खो-खो, कबड्डी, लंगडी, लांब उड्या आणि दोरीवरील उड्या अशा पारंपरिक खेळांच्या स्पर्धा या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर होतात. या यात्रेचे महत्त्व ओळखून चंपाषष्ठीच्या दिवशी स्थानिक प्रशासनातर्फे परभणी शहरात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात येते. इसवी सन १९६० पासून या शासकीय सुट्टीची परंपरा अव्याहतपणे सुरू आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या मंदिरात भाविकांना दर्शन घेता येते.

उपयुक्त माहिती

  • परभणी एसटी स्थानकापासून २ किमी अंतरावर
  • राज्यातील अनेक शहरांतून परभणीसाठी एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीसाठी अनेक पर्याय

मल्हारी मार्तंड मंदिर

परभणी, तालुका परभणी, जिला परभणी

Back To Home