महासिद्ध महाराज मंदिर

धानोरा, ता. जळगाव जामोद, जि. बुलडाणा

सातपुड्याच्या निसर्गरम्य कुशीत वसलेले धानोरा हे गाव ८४ सिद्धांपैकी एक असलेल्या श्री महासिद्ध महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेले जागृत श्रद्धास्थान मानले जाते. उज्जैनहून येथे आलेल्या महाराजांची नवसाला पावणारे दैवत अशी ख्याती आहे. पौष पौर्णिमेला होणारा त्यांच्या बहिणीचा, म्हणजेच जगदंबा मातेचा भेट सोहळा आणि माघ पौर्णिमेला महाराजांच्या पुनरागमनानंतर भरणारी जिल्ह्यातील दुसरी सर्वात मोठी यात्रा हे येथील मुख्य आकर्षण आहे. ३०० वर्षांची परंपरा लाभलेला काठी महोत्सव, कुंभारवाड्यातील ‘आवा लुटण्याचा’ आगळावेगळा विधी आणि पावसासाठी केली जाणारी गोवर्धन पूजा यांमुळे हे देवस्थान विशेष प्रसिद्ध आहे.

८४ सिद्धांपैकी एक मानले जाणारे महासिद्ध महाराज या ठिकाणी नेमके कधी आले, याबद्दल कोणतीही अधिकृत नोंद उपलब्ध नाही. मात्र ते उज्जैनहून येथे आले असावेत, असे गावातील जुन्या जाणत्या लोकांकडून सांगितले जाते. महासिद्ध महाराजांचे व्यक्तिमत्त्व अत्यंत सात्त्विक होते. पांढरी दाढी, शुभ्र वस्त्रे, डोक्याला फेटा आणि गळ्यात तुळशीची माळ, असा त्यांचा पेहराव असे. ते पांढऱ्या घोड्यावर बसून गावात फेरफटका मारत असत. महाराजांनी जेव्हा या ठिकाणी समाधी घेतली, तेव्हा सर्व भाविक अत्यंत दुःखी झाले. त्यानंतर भाविकांनी केलेल्या प्रार्थनेमुळे महाराज पुन्हा विशिष्ट रूपात येथे प्रकट झाले, अशी श्रद्धा आहे. हे मंदिर अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. साधारण ५० वर्षांपूर्वी या परिसरात दाट रान वाढले होते. मात्र गावातील लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून हा परिसर स्वच्छ केला आणि त्यानंतर झालेल्या जीर्णोद्धारामुळे मंदिराला सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

जळगाव जामोदपासून सुमारे सहा कि.मी. अंतरावर धानोरा हे गाव आहे. गावाच्या उत्तर दिशेला मंदिराचे ४० फूट उंचीचे महाद्वार आहे. या महाद्वारावर द्वारपालांची चित्रे आहेत. या दुमजली महाद्वारावर नगारखाना आहे. या द्वारातून आत मोठ्या प्रांगणात प्रवेश होतो. प्रांगणात उजवीकडे मंदिर विश्वस्त कार्यालय तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांच्या निवासाच्या सोयीसाठी बांधण्यात आलेले तीन भक्तनिवास आहेत. उजवीकडे एका मोठ्या झाडाच्या पारावर काही प्राचीन शेंदूरचर्चित पाषाण व शिवपिंडी आहेत. मंदिरासमोर सुमारे ३० फूट उंचीचा दीपस्तंभ आहे. खुला मंडप, सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे.

खुल्या मंडपात प्रदक्षिणा मार्ग सोडून मंदिराची रचना आहे. सभामंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ महासिद्ध महाराजांची मूर्ती आहे. सभामंडपात अंतराळाच्या दर्शनी भिंतीवरील देवकोष्ठकांत देवप्रतिमा आहेत. गर्भगृहात महासिद्ध महाराजांचे मोठ्या आकाराचे शेंदूरचर्चित स्थान आहे आणि त्यावर चांदीचा मुखवटा आहे. त्यावर चांदीचा फेटा आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर शिवलिंग आहे. येथील भिंतींवर अभंग तसेच ओव्या लिहिण्यात आल्या आहेत. मंदिराच्या गर्भगृहावर एक घुमटाकार शिखर व त्यावर कळस आहे आणि शिखराच्या चारही बाजूंनी मेघडंबऱ्या आहेत. या मंदिराच्या उत्तरेस महासिद्ध महाराजांचे समाधीस्थान आहे. येथे त्यांच्या पादुकांचेही दर्शन होते. या समाधीमंदिरातच उजवीकडे हनुमानाचे स्थान आहे. येथील हनुमानाच्या मूर्तीसमोर छोटे शिवलिंग व नंदी आहेत.

येथे दररोज पहाटेपासून पूजा-अर्चा केली जाते. परिसरातील शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भाविकांकडून येथे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात येते. महासिद्ध महाराजांच्या कृपेने अनेक असाध्य आजार बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मोताळा तालुक्यातील पिंपळगाव देवी येथील जगदंबा माता ही महासिद्ध महाराजांची बहीण मानली जाते. याच नात्यामुळे दरवर्षी पौष पौर्णिमेला महाराज आपल्या बहिणीला भेटण्यासाठी जातात. त्या दिवशी पहाटे महाराजांच्या मूर्तीवर विशेष अभिषेक केला जातो आणि रात्री त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून ते पिंपळगाव देवीकडे प्रस्थान करतात. माघ पौर्णिमेला महाराजांचे पुन्हा गावात आगमन होते आणि याच काळात येथे सात दिवसांची जत्रा असते.

या जत्रेदरम्यान महासिद्ध महाराजांचा नऊ दिवसांचा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवातील ‘काठी’ महोत्सवाला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे. यासाठी ४० फूट लांब काठी वापरली जाते. ही काठी सुरुवातीला मंदिर परिसरातील आसरा माता विहिरीवर नेऊन धुतली जाते. त्यानंतर तिला नवीन रंगीत कापड, झेंडे आणि मोरपिसांचा तुरा लावून पुष्पहारांनी सजवले जाते. सुमारे ६० भाविक ही काठी खांद्यावर घेऊन मिरवणुकीने मंदिराजवळ आणतात आणि दीपमाळेसमोर उभी करून तिची पूजा करतात. यात्रेच्या निमित्ताने मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन केले जाते. माघ पौर्णिमेच्या मध्यरात्री गावातील महिला घरासमोर सडा-रांगोळी काढून पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन मंदिरात येतात. मंत्रोच्चारांच्या जयघोषात महाराजांची महापूजा होते आणि सकाळी टाळ-मृदुंगाच्या गजरात महाराजांच्या पादुकांची मिरवणूक काढली जाते. दुपारी भाविक डफड्यांच्या तालावर मोरपिसे हातात घेऊन कुंभारवाड्यात जातात आणि तेथून ‘आवा’ लुटून मंदिरात आणतात. (‘आवा’ म्हणजे कुंभाराची मातीची भांडी भाजण्याची जी भट्टी व साहित्य असते, त्याची प्रतीकात्मकरीत्या लूट केली जाते.) त्याची नंतर विधिवत पूजा केली जाते.

या सात दिवसांच्या यात्रोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडतात आणि काल्याच्या कीर्तनाने याची सांगता होते. यात्रेदरम्यान येथे कुत्र्यांचा बाजार भरतो. याव्यतिरिक्त, गावात चांगला पाऊस पडावा यासाठी दरवर्षी जुलै महिन्यात वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी गोवर्धन पूजा केली जाते. या पूजेच्या आदल्या दिवशी मंदिरातून सर्वांना सूचना दिली जाते आणि दुसऱ्या दिवशी गावातील प्रत्येक घरातून गव्हाच्या पोळ्या व बाजरीच्या भाकऱ्या गोळा करून बैलगाडीतून वाजतगाजत मंदिरात आणल्या जातात. तेथील पूजेनंतर सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या छोट्या मंदिरात सर्व ग्रामस्थ आपल्या गुरांसह एकत्र येतात आणि तेथे गुरांची पूजा करून त्यांना जमा केलेल्या पोळ्या व भाकऱ्यांचा नैवेद्य दिला जातो.

उपयुक्त माहिती:

  • जळगाव जामोद येथून ११ किमी अंतरावर
  • बुलडाणा येथून ८० किमी अंतरावर
  • जळगाव जामोद येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहारीची सुविधा आहे

महासिद्ध महाराज मंदिर

धनोरा, ताल. जलगांव जामोद, जिला. बुलढाणा

Back To Home