छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध हनुमान मंदिरांपैकी एक असलेले महारुद्र मारुती मंदिर गंगापूर तालुक्यातील गवळीशिवरा येथे आहे. हेमाडपंती स्थापत्यशैलीतील या मंदिराला भिंती नाहीत, हे येथील वैशिष्ट्य आहे. येथील स्वयंभू दक्षिणमुखी मारुती जागृत आणि नवसाला पावतो, या भावनेतून दररोज हजारो भाविक त्याच्या दर्शनासाठी येतात. या मारुतीरायाला नवस केल्यास निःसंतान दाम्पत्याला अपत्यप्राप्ती होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. हनुमान जयंती तसेच वैशाखातील पंचमी उत्सवाला हजारो भाविक येथे येऊन नतमस्तक होतात.
मंदिराबाबत असे सांगितले जाते की प्राचीन काळी गावाच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका पिंपळ वृक्षाखाली दक्षिणमुखी मारुतीची स्वयंभू मूर्ती प्रगट झाली. हे समजल्यावर दर्शन घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. कालांतराने नवसाला पावणारे दैवत, अशी या मारुतीची ख्याती झाली. दिवसेंदिवस भाविकांचा ओघ वाढू लागला. त्यामुळे या मारुतीरायासाठी मंदिर उभारण्याचे ग्रामस्थांनी ठरविले. मात्र त्यासाठी करण्यात येणारे सर्व प्रयत्न फोल ठरत होते. मंदिरासाठी लाकडी खांब उभारण्यात येत असताना तो खांब एका सुताराच्या अंगावर पडला. या घटनेनंतर देवाला लाकडी खांबांचे मंदिर आवडत नसावे, या भावनेतून पक्की भिंत असलेले मंदिर उभारण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. मात्र भिंतीचे काम सुरू असतानाच ती कोसळली. त्यामुळे ग्रामस्थांनी तेव्हा मंदिर उभारणीचा आपला निर्णय रद्द केला.
१९७८ च्या सुमारास ग्रामस्थांनी पुन्हा मंदिर उभारणीचा निर्णय घेतला. त्यानुसार विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली. प्रथम मूर्ती असलेल्या पिंपळ वृक्षाच्या पाराचे सुशोभीकरण करण्यात आले. मूर्तीसमोर दोन ओटे बांधण्यात आले व त्याभोवती जाळ्या लावण्यात आल्या. काही काळ लोटल्यानंतर, ग्रामस्थांनी २००७ मध्ये इंदूर येथील अन्नपूर्णा आश्रमातील एका महाराजांच्या हस्ते येथे सप्तकुंडीय महायज्ञ केला. त्यानंतर देवाचा कौल घेतल्यावर पिंपळाचे जीर्ण झालेले झाड तोडण्यात आले, तसेच महाराजांच्या सांगण्यानुसार येथे भिंत नसलेले हेमाडपंती स्थापत्यशैलीत मंदिर उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्यासाठी राजस्थानमधून बन्सीलाल पाटा या प्रकारचा दगड आणण्यात आला. कारागिरांनाही तेथूनच आणण्यात आले. २०१३ ला मंदिर उभारणीचे काम पूर्ण झाले. २०१४ ला अतिरुद्र महायज्ञ केल्यानंतर मंदिराचा कलशारोहण सोहळा पार पडला.
लासूर रेल्वे स्थानकापासून सुमारे आठ किमी अंतरावर गवळीशिवरा गाव आहे. या परिसरात पूर्वी गवळीबहुल वस्ती होती. गवळ्यांचे शिवार म्हणून गावाला गवळीशिवार असे नाव पडले. पुढे त्याचेच गवळीशिवरा झाले. गावच्या कमानीतून आत येताना दूरवरूनच मंदिराचे शिखर नजरेस पडते. या मंदिरात येण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. त्यापैकी दोन मागील बाजूस तर एक पुढील बाजूस आहे. प्रांगणात मुख्य मंदिराशिवाय गणेश, महादेव तसेच विठ्ठल–रखुमाई यांची मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिरावर कलाकुसर असलेले शिखर आहे. प्रांगणात भक्त निवासही आहे. या प्रांगणात भाविकांना बसण्यासाठी दगडी बाकड्यांची सुविधा आहे. मंदिरात येणाऱ्या भाविकांचा ओघ पाहता मंदिरासमोर नव्याने सभामंडप बांधण्यात आला आहे. मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गावर मुंजोबाचे स्थान आहे.
अनेक खांबांवर असलेला खुला सभामंडप, गर्भगृह आणि प्रदक्षिणा मार्ग असे या मंदिराचे स्वरूप आहे. सभामंडपातील प्रत्येक खांबांवर नक्षीकाम आहे. या खांबांजवळ स्टीलचे रेलिंग लावण्यात आले आहेत. गर्भगृहातील हनुमानाच्या मूर्तीभोवती मोठ्या काचा लावण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाविकांना गर्भगृहाच्या चारही बाजूंनी मारुतीरायाचे दर्शन होते. महारुद्र मारुतीची मूर्ती शेंदूरचर्चित असून त्यावर कोरीव काम केलेला चांदीचा मुकुट आहे. मुकुटाच्या खालील बाजूस दोन्हीकडे मासोळ्या आहेत. मारुतीरायाच्या मूर्तीवर चांदीचे छत्र व खालील बाजूला चांदीची गदा आहे. असे सांगितले जाते की सध्या असलेले मारुतीरायाचे सिंहासन हे मूर्तीला स्पर्श न करता बनवण्यात आले आहे. आकर्षक नक्षीकाम असलेल्या सिंहासनाच्या दर्शनी भागांत दोन्ही बाजूंना सिंह तर मागील भागात दोन्ही बाजूंना हत्ती आहेत. उत्सवांदरम्यान मूर्तीभोवती फुलांची आरास करण्यात येते. त्यामुळे तिचे रूप अधिकच सुंदर भासते. दररोज सकाळी ६ व सायंकाळी ६ वाजता आरती होते.
वैशाखात होणारा पंचमी उत्सव हा येथील प्रमुख सोहळा असतो. पाच दिवस चालणाऱ्या या उत्सवादरम्यान नवस करण्यासाठी हजारो भाविक येतात. उत्सवाच्या प्रत्येक दिवशी रात्री येथे खान्देशी तमाशा होतो. पुरुष कलाकारांकडून सादर होणाऱ्या या तमाशाचा मूळ हेतू मनोरंजनाबरोबरच लोकप्रबोधन करणे हा असतो. १९७३ पासून येथे ही परंपरा सुरू आहे. या तमाशात नाचा म्हणून काम करणारे कलाकार भाविकांच्या लहान मुलांना कडेवर घेऊन नाचतात. एक महत्त्वाचा धार्मिक विधी म्हणून याकडे पाहिले जाते. हनुमान जयंतीलाही येथे उत्सव साजरा केला जातो. या दिवशी सकाळी महाआरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले होते. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत लघुरुद्राभिषेक होतो. परिसरातील गावांमधून अनेक दिंड्याही येथे येतात. दिवसभर येथे भजन, गवळण आदी कार्यक्रम होतात. या दिवशी परिसराला यात्रेचे स्वरूप येते. मंदिरावर आकर्षक रोषणाईही करण्यात येते. मंदिर संस्थानतर्फे यावेळी भाविकांना फराळाचे वाटप केले जाते. रात्री काल्याचे कीर्तन झाल्यावर उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप होते. दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या सुरक्षेसाठी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केलेला असतो.
श्रावण महिन्यातील शनिवारी येथे हजारोंच्या संख्येने भाविक येतात. श्रावणातील प्रत्येक शनिवारी मंदिरात सकाळी षोडशोपचार पूजा–अभिषेक होतो. भाविकांच्या हस्ते महाआरती होते. अनेक भाविक येथे सत्यनारायणाची पूजा तसेच भंडाऱ्याचेही आयोजन करतात. या दिवशी परिसरात काही सामाजिक संस्थांच्या वतीने रक्तदान, आरोग्य व नेत्रतपासणी शिबिरेही होतात.