विषमतेचा त्याग करून समतेचा पुरस्कार करणाऱ्या महानुभाव पंथाचा उदय संत ज्ञानेश्वरांच्या काही काळ आधी झाला. ‘तेजाने युक्त लोकांचा मार्ग तो महानुभाव पंथ’ अशी या पंथाची महती सांगितली जाते. मूळ ‘परमार्गी’ असे नाव असलेल्या या पंथास सर्वात प्रथम संत एकनाथ महाराजांनी ‘महानुभाव’ असे संबोधले, असे ज्येष्ठ अभ्यासक शं. गो. तुळपुळे नमूद करतात. सन ११९४ ते १२८२ हा चक्रधर स्वामींचा कालखंड महाराष्ट्राच्या वैभवाचा आणि समृद्धीचा काळ मानला जातो. त्याकाळी महाराष्ट्रावर यादवांची सत्ता होती. चक्रधर स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेले प्रत्येक स्थळ पुढे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्धी पावले. त्यापैकीच एक बीड जिल्ह्यातील पोहीचा देव येथील मंदिर हे चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान म्हणून ओळखले जाते.
चक्रधर स्वामींचे हे चरणांकित स्थान तेराव्या शतकातील आहे. या स्थानाबाबत अशी आख्यायिका प्रचलित आहे की प्राचीन काळी बाजार भरणाऱ्या या गावाच्या वेशीवर एक पाणपोई होती. एकदा चक्रधर स्वामी भ्रमण करत या गावात आले व पाणपोईजवळ विश्रांतीसाठी बसले. त्याच वेळी बाजारात वस्तू विकण्यासाठी आलेल्या जोडप्यातील एका चांभाराला चक्रधर स्वामींच्या दिव्य तेजाची भुरळ पडली. तो स्वामींच्या चरणी मग्न होऊन बसला. त्याची पत्नी हाका मारून थकली, तरी तो जागेवरून हलला नाही. शेवटी वैतागून तिने काडीमोड मागितला.
त्यास चांभाराने होकार दिला आणि ‘या गोष्टीस स्वामी साक्ष आहेत’ असे सांगितले. त्याच वेळी स्वामींनी चांभारास अनुग्रह दिला आणि ते तेथून निघून गेले. हा शिष्य मात्र पूर्णतः स्थितप्रज्ञ झाला. गावातील सवर्ण त्याला गुरू म्हणून पूजू लागले. एके दिवशी तो चांभार असल्याचे गुपित उघड पडल्याने गावातील लोकांनी त्याला जमिनीत गाडून देहांताची शिक्षा दिली; परंतु दुसऱ्या दिवशी तो पुन्हा आपल्या आसनावर बसलेला लोकांना दिसला. तेव्हा गाडलेली जागा उकरून पाहिली असता तो चांभार तसाच सजीव होता. त्याच्या गळ्यातील माळेतील फुलेही कोमेजली नव्हती. हा स्वामींचाच चमत्कार समजून लोकांनी त्याला गुरूस्थानी स्वीकारले. हा चमत्कार ज्या ठिकाणी घडला, तेच हे पोहीचा देव संस्थान मंदिर होय.
गावापासून जवळच असलेल्या या मंदिरापर्यंत पक्की सडक उपलब्ध आहे. मंदिरासमोर प्रशस्त वाहनतळ असून मंदिराच्या प्रांगणात पेव्हर ब्लॉकची फरसबंदी केलेली आहे. येथेच महानुभाव पंथाचा पांढरा ध्वज लावलेला ध्वजस्तंभ दिसतो. प्रांगणात पाणपोई आहे, तिथे शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनाला जाण्याची प्रथा आहे. मुखमंडप, सभामंडप व गर्भगृह अशी या मंदिराची संरचना आहे. प्रांगणापेक्षा उंचावर असलेल्या मुखमंडपासमोर पाच पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला सुरक्षा कठडे बसवले आहेत. मुखमंडपात पुढील बाजूला दोन चौकोनी स्तंभ असून त्यांवर छत आहे.
पुढे सभामंडपाचे प्रवेशद्वार आहे. सभामंडपाचे प्रवेशद्वार मुखमंडपापेक्षा उंचावर असल्यामुळे त्यासमोर सात पायऱ्या आहेत. सभामंडपाच्या लाकडी द्वारशाखांवर पानफुलांची नक्षी कोरलेली आहे आणि प्रवेशद्वारास नक्षीदार लाकडी झडपा आहेत. सभामंडपास उजव्या व डाव्या बाजूला आणखी दोन दरवाजे आहेत. बंदिस्त स्वरूपाच्या सभामंडपात उजेड व हवा येण्यासाठी वातायने आहेत. सभामंडपात भिंतींलगत नगारा ठेवलेला आहे. सभामंडपात भिंतींत चौकोनी स्तंभ आहेत आणि त्यांवरील तुळईवर छत आहे. पुढे सभामंडपातच स्टेनलेस स्टीलचे कठडे लावून अर्धखुल्या स्वरूपाच्या गर्भगृहाची रचना केलेली आहे. गर्भगृहात मधोमध आयताकृती चौथरा आहे. हेच चक्रधर स्वामींचे चरणांकित स्थान आहे. चौथऱ्यास चांदीचे आच्छादन केले आहे व सभोवती स्टेनलेस स्टीलचा कठडा आहे. चौथऱ्यावर चक्रधर स्वामींचा मुखवटा आहे. गर्भगृहाच्या मागील भिंतीलगत वज्रपीठावरील मखरात श्रीकृष्णाची मूर्ती आहे. सुंदर वस्त्रे व अलंकार ल्यालेल्या या मूर्तीच्या डोक्यावर चांदीचा मुकुट आहे. बाजूला मोरपीसांचा कुंचा ठेवलेला आहे. गर्भगृहाच्या छतावर चौकोनी शिखर आहे. शिखराच्या शीर्षभागी एकावर एक असे दोन आमलक आहेत. आमलकावर चांदीचा कळस आहे.
मंदिरात चैत्र शुद्ध चतुर्दशी हा चक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहाने साजरा केला जातो. यालाच ‘दवणापर्व’ असे म्हणतात. याशिवाय अक्षय तृतीया, गोकुळाष्टमी, दत्तजयंती व गोविंद प्रभू जयंती हे येथील मुख्य उत्सव आहेत. सर्व उत्सवांच्या वेळी मंदिरात भजन, कीर्तन, प्रवचन, ग्रंथवाचन आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते. या प्रसंगी परिसरातील अनेक भाविक दर्शनासाठी येतात. पहाटे ४ वाजता नामस्मरणाने दिवसाची सुरुवात होते. संध्याकाळी सामुदायिक ग्रंथपारायण केले जाते. गुरुवार, पौर्णिमा, अमावस्या इत्यादी दिवशी मंदिरात दर्शनार्थी भाविकांची मोठी वर्दळ असते.