महामाया कालिका माता मंदिर

कासरपाल, ता. डिचोली, जि. उत्तर गोवा

कासर म्हणजे तलाव आणि पाल हा पूर या अर्थीचा प्रत्यय. कासरपाल याचा अर्थ तलावांचे नगर. डिचोलीतील निसर्गरम्य परिसरातील हे तलावांचे नगर महामाया कालिका मातेच्या प्राचीन मंदिरासाठी सुप्रसिद्ध आहे. प्राचीन काळात काळंबा देवी म्हणून ओळखली जाणारी येथील कालिका ही दैवज्ञ ब्राह्मण समाजाची कुलदेवता आहे. कालिका देवी ही उग्र प्रकृतीची देवता असली, तरी येथे ती सौम्य व शांत स्वरूप धारण करणारी आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी येथे देवीची भव्य यात्रा भरते.

पौराणिक आख्यायिकांनुसार, कालिका हे महाकालीदेवीचे स्वरूप आहे. ‘कालिका पुराणा’मध्ये महामायेच्या कुशीतून कालिका देवीचा जन्म झाला असे म्हटले आहे. महाभारतातील उल्लेखानुसार, कालिका ही दक्षप्रजापतीची कन्या व कश्यप ऋषींची पत्नी होय. ‘देवी माहात्म्या’त असे म्हटले आहे, की मूळ प्रकृती आदिमाया भगवती महालक्ष्मीने तमोगुणांपासून महाकाली आणि सत्त्वगुणांपासून महासरस्वती ही दोन रूपे निर्माण केली. यानंतर महालक्ष्मीने महाकाली व महासरस्वती यांना आपापल्या गुणांनी योग्य अशा स्त्री-पुरुषांचा एकेक जोडा उत्पन्न करण्यास सांगितले. त्यातून पुढे विश्वाची व सृष्टीची निर्मिती झाली. अशा प्रकारे महाकाली ही जशी संहारिणी आहे, तशीच ती विश्वजननी व पोषिणीही आहे, असे मानले जाते.

कालिका मातेच्या येथील मंदिराच्या स्थापनेचा नेमका काळ अद्याप अज्ञात आहे. मात्र हे मंदिर पंधराव्या शतकातील वा त्या पूर्वीचे असल्याची एक नोंद सापडली आहे. सावंतवाडी संस्थानचे पोलिटिकल सुपरिटेंडेंट मेजर ली ग्रँट जेकब यांना म्हापसा येथील वैकुंठ बाबणी सावंत या कासार जातीच्या गृहस्थाकडून एक ‘तांब्यापट्टो’ (ताम्रपट) प्राप्त झाला. ११ जुलै १८५० रोजी त्यांनी तो मुंबई सरकारच्या स्वाधीन केला. ‘नागदेवाचा ताम्रपट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मूळ संस्कृतमधील ताम्रपटातील अखेरच्या भागात असा उल्लेख आहे – ‘…कांइदेवाचा बलवान मुलगा नागदेव । शंकराचा भक्त, बुद्धिवान, शंकराच्या ध्यानांत सदा निमग्न असणारा, (असा होता) ।। व त्याने पल्लिका (कांसरपाल) नामक गावात समस्त कासार महाजनांसमोर उभे राहून ।। वरडे गाव सर्वनमस्य करून दिले । श्रीनल संवत्सरे चैत्रमासे शके १३५८, श्री कालिका देवीच्या वराने झालेला पुत्र (जो) रुपसेटी, (त्याचा) पुत्र लक्ष्मणसेटी, यांस (दतंग्राहं?) ताम्रपट दिला… ।’ यावरून शके १३५८ म्हणजे इ.स. १४३६ या काळात येथे नागदेव सामंत नावाचा कुडाळदेशकर गौड ब्राह्मण ज्ञातीचा राजा राज्य करीत होता, हे स्पष्ट होते. त्याच प्रमाणे कासरपाल गावात इ.स. १४३६च्या आधीपासून कालिका देवीचे मंदिर होते व पुत्रप्राप्तीकरीता नवस करण्याएवढे देवीचे ते मंदिर प्रसिद्ध होते. काहींच्या मते, या मंदिरातील कालिका देवीची मूर्ती गुप्त काळातील शिल्पशैलीतील आहे. त्यामुळे हे मंदिर गुप्त काळातील, त्यातही द्वितीय चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या काळातील म्हणजे इ.स. ३८० ते ४१३ दरम्यानचे असल्याचे सांगण्यात येते. या चंद्रगुप्ताच्या पदरी महाकवी कालिदास होता व तो काली मातेचा भक्त होता आणि कालिका मातेची मूर्ती गुप्त शैलीतील आहे, यावरून हा कयास बांधण्यात आलेला आहे. इसवी सनाच्या दुसऱ्या-तिसऱ्या शतकापासून माळवा प्रांतात कालीदेवीची उपासना लोकप्रिय असली, तरी कालिदास हा कालीचा भक्त नव्हता, हे ‘कालिदास’ या चरित्रग्रंथात महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी दाखवून दिले आहे. यामुळे येथील मंदिराच्या स्थापनाकालाविषयीचा संभ्रम कायम राहिलेला आहे. असे असले, तरी या मंदिराचे प्राचीनत्व किमान सहा शतकांपर्यंत मागे जाते. कासरपाल या प्राचीन गावास व येथील या मंदिरास धर्मांध पोर्तुगीजांच्या अत्याचारांची झळ पोचली नाही. याचे कारण पोर्तुगीजांची ख्रिस्तीकरणाच्या मोहीमेची नांगी साधारणतः इ.स. १६०० पर्यंत मोडली होती. डिचोली व सत्तरी हे तालुके पोर्तुगीजांच्या ताब्यात इ.स. १७८१मध्ये आले. परिणामी येथील प्राचीन मंदिर अबाधित राहिले. वेळोवेळी झालेल्या जीर्णोद्धारानंतर त्यास सध्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

गावातील उंच टेकडीसम भागाच्या उतारावर हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर परिसरास लाल जांभ्या दगडात बांधलेले महाद्वार आहे. सन २०१६ मध्ये बांधलेल्या या कमानाकार द्वाराच्या वरच्या भागावर मंदिरातील घंटेच्या आकाराची तीन शिखरे आहेत. येथून आत येताच डाव्या बाजूस उंचच उंच असा आठ स्तरीय अष्टकोनी दीपस्तंभ आहे. उंच मनोऱ्यासारख्या असलेल्या या दीपस्तंभांच्या खालच्या स्तरावर, हाती दीप घेतलेली व्यालशिल्पे बसवलेली आहेत. हा स्तंभ जणू त्यांनी आपल्या मस्तकी पेललेला आहे, असा आभास निर्माण करण्यात आला आहे. त्याच्या वरील स्तरात सर्व बाजूंना चतुर्भूज सूरमूर्ती कोरलेल्या आहेत. या दीपस्तंभाची निर्मिती सन १९८६ मध्ये करण्यात आली.

येथून काही अंतरावर मंदिराची दुमजली भव्य वास्तू उभी आहे. दोन्ही बाजूंनी असलेल्या पायऱ्या चढून या मंदिराच्या मुख्य सभामंडपात प्रवेश होतो. सभामंडप अर्धखुल्या प्रकारचा आहे. समोरील बाजूस रंगमंच, दोन्ही बाजूंस कक्षासने, आतील दोन्ही बाजूस दगडी स्तंभरांग आणि त्यावर लाकडी तुळयांनी पेललेले उतरते छत अशी सभामंडपाची रचना आहे. येथे स्तंभांच्या वरील तुळया आणि छत यांमधील जागेत रंगीत तावदाने बसवलेली आहेत. येथून १७ पायऱ्या चढून मंदिराच्या अर्धमंडपात प्रवेश होतो. यातील पहिल्या पायरीवर मध्यभागी स्थानिक लोकदेवतेची देवळी आहे, तर पायरी मार्गावर मध्यभागी देवाची सपाट शिळा आहे. या अर्धमंडपासही मोठे प्रवेशद्वार आहे. अर्धखुल्या प्रकारच्या या अर्धमंडपास चारही बाजूंनी कक्षासने आहेत. येथून तीन पायऱ्या चढून उपसभामंडपात प्रवेश होतो. या उपसभामंडपात मधल्या बाजूस पानाफुलांचे नक्षीकाम केलेल्या रुंद लाकडी स्तंभांची रांग आहे. त्यांच्या वरच्या बाजूला लाकडी कठडा लावलेला सज्जा आहे. वरील तुळयांना तीन मोठ्या पितळी घंटा टांगलेल्या आहेत. त्याच प्रमाणे छतास बिलोरी काचांचे झुंबर टांगलेले आहे. उपसभामंडपात मध्यभागी काचेच्या कपाटात पितळी समई ठेवलेली आहे. उपसभामंडपाच्या दोन्ही बाजूंस असलेल्या मुखमंडपाच्या वर घुमटाकार शिखरे आहेत.

उपसभामंडपात समोर मध्यभागी मंदिराची अंतराळे आहेत. अंतराळाच्या बाह्यभिंती व स्तंभांवर चांदीचा नक्षीकाम केलेला पत्रा मढवण्यात आला आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस, तसेच अंतराळाच्या कडेच्या स्तंभांसमोर द्वारपालांच्या एकूण चार मूर्ती आहेत. प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात कालिकामातेची, तसेच लक्ष्मी व नारायणाची प्रतिमा लावलेली आहे. अंतराळात उजव्या बाजूस देवकोष्ठकात गणेशाची, तर डाव्या बाजूस शंकराची मूर्ती आहे. गर्भगृहामध्ये चांदीचा पत्रा मढवलेल्या व सिंह, यक्ष यांच्या प्रतिमांसह पाना-फुलांची नक्षी कोरलेल्या मखरात चांदीच्या सिंहासनावर कालिकादेवीची मूर्ती विराजमान आहे. देवीच्या उजव्या हातात खड्‌ग असून, डाव्या हातात ढाल आहे. देवीने वस्त्रालंकारांचा शृंगार केला आहे. मस्तकी मुकूट धारण केला आहे. मूर्तीच्या पाठीमागे चांदीची प्रभावळ आहे. सिंहासनासमोरील पायरीवर देवीच्या मूळ मूर्तीची प्रतिकृती असलेली धातूची छोटी मूर्ती विराजमान आहे. मखराच्या दोन्ही बाजूंना तीन-तीन उंच पितळी समया आहेत.

गर्भगृहावर गोमंतकीय स्थापत्यशैलीतील वैशिष्ट्यपूर्ण शिखर आहे. खालच्या बाजूस घुमटाकार, त्यावर बसक्या मनोऱ्यासारखा आकार, त्यावर छोटा घुमट, त्यावर आमलक आणि शीर्षस्थानी मोठा सोन्याचा कलश व त्यात नारळाचा आकार अशा प्रकारचे हे शिखर आहे. मंदिर परिसरात भूमिका देवी, श्रीपालनाथ, रवळनाथ, शेट्यो या पंचायतनातील दैवतांची मंदिरे आहेत. येथे कळंबादेवी संग्रहालय, अग्रशाळा (भक्तनिवास) आणि भोजनमंडपही आहे. संग्रहालयात जुनी वाद्ये, लामण दिवे, समया, कासाळी ढोल-ताशे आदी मंदिराच्या वापरातील पारंपरिक वस्तू ठेवलेल्या आहेत.

महामाया कालिका माता देवस्थानातील विविध महोत्सवांमध्ये शिशिरोत्सवाला विशेष स्थान आहे. फाल्गुन वद्य दशमी ते चैत्र शुद्ध द्वितीया अशा सात रात्री हा उत्सव साजरा केला जातो. यात दशमीच्या दिवशी देवीस पिवळ्या रंगाचे वस्त्र (हळदुले) परिधान केले जाते. भूमिका देवालयात परंपरेने चालत आलेली धार्मिक कृत्ये केली जातात. सुवारी वादन करून गणपतीस आवाहन केले जाते. दशमीच्या दिवशी देवालयाचे कारभारी महाजन नजीकच्या तलावावर भिंवरी नेतात. गोमंतकातील या एकमेक देवालयात जुन्या काळापासून चालू असलेला भिंवरीचा कार्यक्रम होतो, असे सांगण्यात येते. या मिरवणुकीत महिला नटुनथटून सहभागी होतात. उत्सवात चैत्र शुद्ध द्वितियेस होणारा गुड्यांच्या रथाचा कार्यक्रम हे भाविकांसाठी मोठे आकर्षण असते. या रथात देवी आरूढ होऊन भूमिका देवालयापर्यंत जाते व तेथून फिरून रथ मंदिराच्या पायऱ्यांच्या पायथ्यापर्यंत आणला जातो. तेथे सामुदायिक गाऱ्हाणे घातले जाते. नंतर देवीस गुलाल समर्पण केला जातो. यानंतर येथे एकमेकांवर गुलाल उधळण्याचा कार्यक्रम होतो. या उत्सवास पंचक्रोशीतील असंख्य भाविक उपस्थित असतात. देवस्थानात दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला रात्री शिबिकोत्सव होतो. या उत्सवात पालखीतून कालिका देवीची मिरवणूक काढण्यात येते. या शिवाय येथे नवरात्र व अन्य महत्त्वाचे सण व उत्सवही उत्साहाने साजरे केले जातात.

उपयुक्त माहिती:

  • डिचोली येथून ११ किमी आणि पणजी येथून ३३ किमी अंतरावर
  • डिचोली येथून राज्य परिवहन बस सुविधा आहे
  • खासगी वाहने मंदिरापर्यंत येऊ शकतात
  • परिसरात निवास व न्याहरीसाठी अनेक पर्याय
  • संपर्क : दीपक शिरोडकर, अध्यक्ष, मो. ९८२२४८३७७३
  • विनायक नागवेकर, उपाध्यक्ष, मो. ९३५९५९३०६७
Back To Home