रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील टेटवली येथील महामाई देवीचा ‘भक्तांच्या हाकेला धावणारी देवी’ असा लौकिक आहे. देवराईत नांदरुखाच्या झाडानजीक वसलेली ही देवी टेटवलीचे मुख्य ग्रामदैवत आहे. ही जागृत देवी दर तीन वर्षांतून एकदा पाच दिवस नजीकच्या गावतळे येथील झोलाई देवीकडे माहेरपणासाठी जाते. तिला माहेरपणाला पाठवण्यासाठी, तसेच पुन्हा मंदिरात आणण्यासाठीच्या होणाऱ्या सोहळ्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्यातील विविध भागांतून अनेक भाविक उपस्थित असतात.
या मंदिराची आख्यायिका अशी की परकी आक्रमणात विटंबना टाळण्यासाठी द्रविड राजांच्या सत्ताकाळात उभारलेल्या प्राचीन मंदिरातील सर्व मूर्ती घनदाट जंगलातील नांदरुखाच्या झाडाच्या ढोलीत लपवण्यात आल्या होत्या. कालांतराने देवीने एका ग्रामस्थाला दृष्टांत देऊन मला येथेच वास्तव्य करायचे आहे. या ठिकाणीच मंदिर उभारून माझी प्राणप्रतिष्ठा करा, असे सांगितले. त्यामुळे याच देवराईत नांदरुखाच्या झाडानजीक जांभ्या दगडांचे, कौलारू मंदिर बांधण्यात आले. काळाच्या ओघात येथील जंगल नष्ट झाले. २०१२ मध्ये झालेल्या जीर्णोद्धारानंतर मंदिराला सध्याचे स्वरूप आलेले आहे.
दापोली–खेड मार्गावरील वाकवली येथून उन्हवरेकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे मंदिर आहे. मंदिराभोवती जांभ्या दगडांची तटबंदी असून मंदिराचा आवार प्रशस्त आहे. आरसीसी बांधकाम असलेल्या या मंदिराची रचना दर्शनमंडप, सभामंडप, गर्भगृह अशी आहे. जमिनीपासून दोन फूट उंचीच्या जोत्यावर हे मंदिर स्थित आहे. येथील सभामंडप हा अर्धमंडप स्वरूपाचा आहे. गर्भगृहात एका उंच चौथऱ्यावर डावीकडून अनुक्रमे सोमया, महामाई, काळेश्री, मानाई, धाकटी काळकाई या देवींच्या पाषाणात घडवलेल्या मूर्ती आहेत. उभ्या स्थितीत असलेल्या या सर्व प्राचीन मूर्ती आयुधधारी आहेत. गर्भगृहावर मंदिराचा मुख्य कळस असून सभामंडपावरही छोटा कळस आहे.
मंदिरात नवरात्रोत्सव, शिमगोत्सव व गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात. या उत्सवांदरम्यान सर्व मूर्तींना चांदीची रूपे (मुखवटे) लावली जातात. या विधीला देवीस ‘लेणे चढवणे’ असे म्हणतात. उत्सवांदरम्यान मंदिराला आकर्षक रोषणाई केली जाते. नवरात्रोत्सवात विजयादशमीपर्यंत देवीचा जागर होतो. त्यासाठी गावातील सर्व वाड्यांना पाळ्या लावून देण्यात आल्या आहेत. या उत्सवासाठी गावातून लग्न होऊन गेलेल्या स्त्रिया आवर्जून येथे येऊन देवीची ओटी भरतात. यावेळी नवस केले व फेडले जातात. उत्सवादरम्यान भजन, कीर्तन, जाखडी नृत्य, गरबा असे कार्यक्रम होतात. विजयादशमीला ग्रामस्थ आधी देवीला सोने ठेऊन (आपट्याची पाने) मग एकमेकांना सोने वाटले जाते. शिमगोत्सवात देवीचा कौल मिळाल्यावरच देवीची पालखी गावात फिरते. येथे कौल लावण्यासाठी नर जातीच्या पपईच्या फुलांचे कळे लावले जातात. गावात भाजण, लाकूडफाटा, कवळतोडणी आदींसाठीही प्रथम देवीला कौल लावला जातो. तिचा कौल मिळाल्यानंतर या कामांना सुरुवात होते.
तीन वर्षांतून एकदा गावतळे येथील झोलाई देवीकडे माहेरपणासाठी पाठवण्याचा सोहळा येथील महत्त्वाचा सोहळा असतो. त्यासाठी देवीला विविध वस्त्रालंकारांनी सजवून विधीपूर्वक पाच दिवसांच्या माहेरपणासाठी गावतळे येथील झोलाई मातेच्या मंदिरात नेले जाते. पाच दिवसांच्या तेथील वास्तव्यानंतर वाजतगाजत तिला पुन्हा मंदिरात आणले जाते. या सोहळ्यासाठी सर्व ग्रामस्थांसोबतच नोकरी–व्यवसायानिमित्त राज्यातील विविध भागांत स्थायिक झालेले चाकरमानी आवर्जून गावात येतात.
मंदिरांसोबतच दापोली प्रसिद्ध आहे ते येथील थोर व्यक्तींमुळे! त्यामुळेच दापोली तालुक्याला ‘नररत्नांची खाण’ असे म्हटले जाते. दापोलीने लोकमान्य टिळक, साने गुरुजींची आई, स्वातंत्र्यवीर गणेश गोपाळ आठल्ये, महर्षी धोंडो केशव कर्वे, भारतरत्न पांडुरंग वामन काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई, सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई ही ‘रत्ने’ दिली आहेत.