महाराष्ट्रात कोल्हापूरचे करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर हे देवीच्या साडेतीन पीठांपैकी एक आहे. कडेठाण येथे या महालक्ष्मी अंबाबाईचे उपपीठ आहे. ‘दुर्गा सप्तशती’ या ग्रंथानुसार सृष्टी निर्माणाच्या आधी ब्रह्मांडात केवळ एक तेजस्वी ऊर्जाशक्ती होती. त्या शक्तीने सगुण साकार रूप धारण केले. ते रूप म्हणजेच जगतजननी महालक्ष्मी होय. कडेठाण येथील महालक्ष्मी ही स्वयंभू व नवसाला पावणारी देवी आहे, अशी भाविकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रासोबतच आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक कुटुंबांची ती कुलदेवता आहे.
कडेठाण तथा कटिस्थान हे गाव अत्यंत प्राचीन स्थान आहे. या देवीच्या उपपीठाबाबत अशी आख्यायिका आहे की श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर सर्वजण आनंदी होते. मात्र जांबुवंत हा नाराज होता. ही गोष्ट हनुमानाने श्रीरामास सांगितली. तेव्हा श्रीरामाने जांबुवंताकडे विचारणा केली असता त्याने सांगितले की सर्वांना युद्ध करण्यासाठी योद्धा लाभला; परंतु मला बलाढ्य योद्धा लाभला नाही. तेव्हा आता तुम्ही माझ्याशी युद्ध करा. त्यावर श्रीराम म्हणाले की केवळ रावणाचा वध करण्यासाठी मी योद्धा झालो होतो. आता मी युद्ध करणार नाही; परंतु पुढील अवतारात तुझी इच्छा पूर्ण होईल. त्याप्रमाणे जांबुवंतास असे युद्ध करण्याची संधी भगवान श्रीविष्णू यांच्या कृष्णावतारामध्ये लाभली.
या अवतारात कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला होता. हा मणी द्वारकेत राहणाऱ्या सत्राजीत याच्याकडे होता. तो त्याला सूर्याच्या आराधनेतून मिळाला होता. त्यातून त्याला रोज सोने मिळत असे. तो मणी पाहण्याची इच्छा एकदा कृष्णाने व्यक्त केली होती. सत्राजीतने हा मणी त्याचा भाऊ प्रसेनजीत याच्याकडे दिला होता. एकदा तो अरण्यात शिकारीस गेला असता एका अस्वलाने त्याला ठार मारले व हा मणी अस्वलराज जांबुवंताकडे दिला. इकडे कृष्णावर हा मणी चोरून प्रसेनजीतला ठार मारल्याचा आळ आला. तेव्हा त्या मण्याच्या शोधात कृष्ण निघाला. माग काढत तो जांबुवंताच्या गुहेपर्यंत पोचला. ही गुहा कडेठाणपासून जवळच जामखेड येथे होती. तेथे कृष्ण व जांबुवंताचे तुंबळ युद्ध झाले. ते सतत २१ दिवस चालले होते. त्यात जांबुवंताचा पराभव झाला. तेव्हा माझा राम माझ्याजवळ असता तर मी हरलो नसतो, असे जांबुवंत म्हणाला. त्यावर कृष्णाने त्याला रामावतारात दर्शन दिले. या नंतर रामाच्या सूचनेनुसार जांबुवतांची कन्या जांबुवंती हिच्याशी कृष्णाचा विवाह लावून देण्यात आला. विवाहानंतर कृष्णाने जांबुवंतीसह महालक्ष्मी पूजन केले. त्या पूजेसाठी करवीर येथून स्वतः महालक्ष्मी कटिस्थान येथे अवतरली. तेव्हापासून कडेठाण येथे देवीचे उपपीठ आहे. या आख्यायिकेची खूण म्हणून महालक्ष्मी मंदिराच्या मागील बाजूस कोरलेली श्रीकृष्णाची मूर्ती दाखविली जाते.
कडेठाण गावाच्या मधोमध महालक्ष्मीचे हे प्राचीन मंदिर आहे. असे सांगितले जाते की हे मंदिर तेराव्या शतकात बांधण्यात आले होते. मंदिराभोवती कोट बांधण्यात आलेला आहे. त्यात पूर्वाभिमुख दगडी प्रवेशद्वार असून त्याच्या डाव्या बाजूस गरुडाची, तर उजव्या बाजूस हनुमंताची नमनमुद्रेतील प्रतिमा चितारण्यात आलेली आहे. द्वारपट्टीवर दगडातच श्रीगणेशाची शेंदूरचर्चित मूर्ती कोरलेली आहे. आत प्रवेश करताच समोर मुख्य मंदिर दिसते. मंदिराच्या प्रांगणात गोलाकार वेदिका असून त्यात एक चौकोनी शिळा आहे. महानुभाव पंथाचे संस्थापक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचे ते बसण्याचे ठिकाण होते, असे सांगितले जाते.
श्री चक्रधर स्वामी यांच्या चरित्रानुसार, त्यांच्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात प्रारंभी ते पैठणजवळ सुमारे दहा महिने राहिले होते. तेथून ते गोविंदप्रभूंच्या भेटीसाठी रितपूर येथे गेले. तेथे ते राहाटगाव, कडेठाण, सेंदुर्जन, आलेगाव, पातुरडी, सिंगणापूर, खोलापूर, खैराळा मार्गाने गेले होते व त्याच मार्गाने परत आले होते. या प्रवासादरम्यान त्यांनी कडेठाण येथे वास्तव्य केले होते. त्याबाबत ‘लीळाचरित्रा’मध्ये ‘कडेठणीं माहलखूमीए वस्ति’ अशी लीळा आहे. महानुभावांच्या त्या प्राचीन व पवित्र ग्रंथात असा उल्लेख आहे – ‘उदीयांचि गोसावीं कडेठणासि बीजें केलें : मार्गी आसन जालें : गोसावीं बाइसांकरवि सीळिका आणवीलीया :’ याच लीळेचा एक पाठभेद असा आहे की ‘गावां आग्न कोणीं मळा : तेथ वृक्षा एका तळीं गोसावीयांसि आसन जालें : तेथचि दुपाहाराची आरोगण जाली… पहुडु जाला : उपहुडु होउनि मग गावांआंतु महालक्ष्मीए वस्ति जाली :’ या दोन्ही पाठांनुसार सर्वज्ञ चक्रधरांनी महालक्ष्मी मंदिरात वस्ती केल्याचे स्पष्ट होते. त्यांनी त्यावेळी जेथे बैठक मांडली होती, ते स्थळ आजही जतन करून ठेवलेले आहे. तेथे पादुकांचीही स्थापना करण्यात आलेली आहे. मंदिर आवारात याच वर्तुळाकार स्थळाच्या दोन्ही बाजूंस उंच दगडी दीपमाळा आहेत.
महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर होमकुंड आहे. प्रवेशद्वार दगडी बांधणीचे असून त्यास महिरपी कमान आहे. सभामंडप व गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपात अनेक दगडी खांब आहेत व ते कमानीने एकमेकांस जोडलेले आहेत. सभामंडपाच्या छतावर मोठे वर्तुळाकार फूल कोरलेले आहे.
गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारास दगडी चौकटी आहे. उंबऱ्यावर यक्षमूर्ती कोरलेल्या आहेत. प्राचीन मंदिर वास्तूंमध्ये दिसणारी गाभाऱ्याच्या वास्तूच्या मधोमध मुख्य गर्भगृह अशी रचना येथे दिसते. आत भक्कम दगडी खांबांच्या मध्ये एक चौथरा असून त्यावर महालक्ष्मीचा तांदळा आहे. या तांदळ्यास मुख, नेत्र, नासिका आहे. नासिकेत नथही घालण्यात आली आहे. महालक्ष्मीच्या एका बाजूस महाकाली आणि दुसऱ्या बाजूस महासरस्वती यांच्या मूर्ती आहेत. दररोज सकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत भाविकांना या मंदिरात देवीचे दर्शन घेता येते.
महालक्ष्मी मंदिरास खेटून कटेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. आधी दगडी खांबांनी बांधलेली छोटी ओवरी, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. या मंदिराच्या गर्भगृहाचे प्रवेशद्वार हे कलात्मक दगडी खांबांनी सुशोभित केलेले आहे. त्यावर दोन्ही बाजूंस उभ्या सर्पाकृती चितारण्यात आल्या आहेत. द्वारपट्टीवर श्रीगणेशाची मूर्ती कोरलेली आहे. आत प्राचीन शिवपिंडी आहे. गाभाऱ्यात एक भुयारी मार्गही दाखवण्यात येतो.
मंदिराच्या बाहेरच्या बाजूने भिंतींमध्ये कोनाड्यांत विविध देवी–देवतांच्या पाषाण मूर्तीही बसवण्यात आल्या आहेत. येथेच शेषशायी विष्णूची मूर्तीही आहे. कटेश्वर मंदिराच्या बाजूला दगडी पायऱ्या असलेली बारव आहे. या मंदिरात राज्यातून तसेच परराज्यांतूनही अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिरात सकाळ, संध्याकाळी पूजा व आरती करण्यात येते. येथे नवरात्रोत्सवात देवीचा मोठा उत्सव साजरा केला जातो. या काळात येथे कथा, कीर्तन, प्रवचन, भजन, भारुड अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. नऊ दिवस सप्तशतीचा पाठ करण्यात येतो. विशेषतः तिसऱ्या, पाचव्या व सातव्या माळेला येथे भाविकांची प्रचंड गर्दी होते. या काळात नऊही दिवस मोठी यात्रा भरते.
या नवरात्रोत्सवाचे एक वैशिष्ट्य म्हणजे कडेठाणमधील तसेच पंचक्रोशीतील गावांतील घरटी एक व्यक्ती या काळात सलग आठ दिवस मंदिरातच मुक्काम करते. यात आबालवृद्ध महिला व पुरुषांचा समावेश असतो. ते मंदिरात पहिल्या माळेला येतात व अष्टमीच्या दिवशी होमहवन झाल्यानंतरच घरी जातात. या काळात ते मंदिराच्या बाहेर पायही ठेवत नाहीत. मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होण्याबरोबरच ते मंदिरात सेवाही देतात. कडेठाणमध्ये ही प्रथा वर्षानुवर्षे सुरू आहे. या भाविकांसाठी येथे स्वतंत्र निवासखोल्यांची, तसेच त्यांच्या स्नानापासून भोजनापर्यंतची व्यवस्था केली जाते. मंदिराच्या व्यवस्थापनाकडून येथे वर्षभर विविध धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. सामाजिक उपक्रमांत मोफत आरोग्य तपासणी, उपचार, आरोग्य शिक्षण यांचा समावेश असतो.