केळशीची महालक्ष्मी

केळशी, ता. दापोली, जि. रत्नागिरी

केळशी हे रत्नागिरी जिल्ह्याच्या उत्तर टोकाला असलेले एक छोटेसे गाव. एका बाजूला नितांत सुंदर नितळ समुद्र किनारा दोन बाजूंना मोठ्या खाड्या अशा तीन बाजू पाण्याने वेढलेल्या; तर एका बाजूला गर्द वनराई असलेल्या अशा बेटवजा भूमीवर केळशी गाव वसलेले आहे. गावातील श्री महालक्ष्मीचे मंदिर हे एक जागृत स्वयंभू देवस्थान आहे. असे सांगितले जाते की हे स्थान शिवपूर्वकाळापासूनचे आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीची बहीण मानली जाणारी केळशीची महालक्ष्मी भक्तांच्या नवसाला पावते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

महालक्ष्मी मंदिर हे केळशी गावाच्या दक्षिणेकडे असलेल्या उटंबर गावच्या डोंगर पायथ्यापाशी आहे. हे स्थान हजारो वर्षांपूर्वीचे असले तरी सध्याच्या मंदिराचे बांधकाम हे पेशवेकाळातील आहे. मंदिराभोवती सुमारे पाच फूट उंचीची पोळी (दगडी तटबंदी) आहे. या पोळीला चार प्रवेशद्वारे आहेत. असे सांगितले जाते की येथील मुख्य प्रवेशद्वाराजवळ चौघडा असून पूर्वी त्या ठिकाणी सकाळी सायंकाळी चौघडा झडत असे. आता मात्र त्याची जागा सनईच्या रेकॉर्डरने घेतली आहे. मुख्य मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. मंदिराच्या उजव्या बाजूला गणपती आणि हनुमान यांची मंदिरे आहेत. गणपती मंदिराशेजारी एक धर्मशाळा असून त्यातही गणपती शिवपिंडी आहे. ही पिंडी तिळातिळाने वाढते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

मंदिराच्या प्रागणात वड, पिंपळ आदी पुरातन वृक्ष आहेत, तर एका बाजूला तलाव आहे त्यात उतरण्यासाठी घाटासारख्या पायऱ्या बांधलेल्या आहेत. हा प्राचीन तलाव अद्यापही सुस्थितीत असून त्यात बाराही महिने पाणी असते. शेकडो वर्षांपूर्वी उटंबरच्या डोंगरातून जिवंत झऱ्याचे पाणी या तलावात आणण्याची व्यवस्था केलेली आहे. ते पाणी ज्या ठिकाणी येते त्याला झरी असे म्हटले जाते. त्या काळातही जलव्यवस्थापन नळपाणी व्यवस्था अस्तित्वात होती, त्याचे उदाहरण म्हणजे ही झरी समजली जाते. हे पाणी डोंगरावर असलेल्या ज्या विहिरीतून येथे आणले जाते त्या विहिरीला दक्षिणमाडी असे म्हणतात. आजही येथील डोंगरावर ही दक्षिणमाडी पाहायला मिळते.

मंदिराच्या वास्तूत दाक्षिणात्य आणि मुघलकालीन स्थापत्याचा ठसा आढळतो. मंदिराला दोन घुमट असून एका घुमटाच्या खाली महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान आहे, तर दुसरा घुमट सभागृहावर आहे. सभामंडप गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. सभामंडपाला चार दरवाजे असून त्यापैकी तीन दरवाजे सभामंडपात प्रवेश करण्यासाठी, तर चौथा दरवाजा गर्भगृहातील महालक्ष्मीचे दर्शन घडवणारा आहे. सभामंडप गर्भगृहात काही बोलल्यास त्यावर असलेल्या मोठ्या घुमटांमुळे त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो. या घुमटांची उंची जास्त असल्यामुळे बाहेर कितीही ऊन असले तरी आतील हवा थंड राहते. गर्भगृहात एका चौथऱ्यावर महालक्ष्मीचे स्वयंभू स्थान असून बाजूला क्षेत्रपाल आणि सोमेश्वर यांच्या मूर्ती आहेत. वर्षातील काही दिवस सूर्योदयाची किरणे गर्भगृहातील महालक्ष्मीच्या मूर्तीवर, तसेच काही दिवस सूर्यास्ताची किरणे महालक्ष्मीच्या चरणांवर पडतील, अशी या मंदिराची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे.

असे सांगितले जाते की आता जेथे महालक्ष्मीचे स्थान आहे ते देवीचे एक पाऊल, तर दुसरे पाऊल मंदिराच्या पुढे काही अंतरावर घुमटी बांधलेली आहे तेथे आहे. त्यापुढे देवीने अंगठा टेकलेले स्थान आहे, तर त्यापुढे काही अंतरावर देवीने केस झाडल्याच्या खुणा आहेत. आजही या खुणा येथे दाखविल्या जातात. कोल्हापूरची महालक्ष्मी आणि ही देवी सख्ख्या बहिणी आहेत, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला बोललेल्या नवसाची येथे पूर्ती केली तरी चालते, अशी मान्यता आहे. काही अख्यायिकांनुसार आंबेजोगाईची देवी हीसुद्धा मूळ केळशीचीच आहे. केळशीची महालक्ष्मी अनेक कोकणस्थ ब्राह्मणांची कुलदैवत आहे.

चैत्र शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा या काळात येथे उत्सव साजरा होतो. यासाठी सर्व ग्रामस्थांकडून रस्त्यावर बिंदागण (घरासमोरील रस्ता शेणाने सारवणे त्यावर रांगोळ्या काढणे) घातले जाते. अनेक घरांतून ताज्या फुलांचीही रांगोळी काढली जातेएकादशीच्या दिवशी महालक्ष्मीच्या मूर्तीला सोन्याचा मुखवास (मुखवटा) घातला जातो. येथील ग्रामदैवत असलेल्या कालभैरवालाही यावेळी मुखवास चढविला जातो. याशिवाय सोमेश्वर क्षेत्रपाल यांना चांदीचे मुखवास घातले जातात. चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. ही यात्रा अगदी जुन्या गावगाड्याप्रमाणे चालते. प्रत्येक समाजाचा यात मान ठेवला जातो, तसेच त्या त्या समाजाला विशिष्ट कामे पूर्वापार वाटून दिलेली आहेत. येथील रथयात्रा प्रसिद्ध असून चैत्र पौर्णिमेला सकाळी सहा वाजल्यापासून ही रथयात्रा सुरू होते. पारंपरिक वाद्यांबरोबरच रथयात्रेत घंटानाद केला जातो. रथयात्रेदरम्यान फटाक्यांची आतषबाजी केली जाते. त्यानंतर मंदिरात आरती होते प्रसाद म्हणून भुईमुगाच्या शेंगा भाविकांना वाटल्या जातात. भुईमुगाच्या शेगांचा हा प्रसाद मिळवण्यासाठी हजारो भाविक येथे उपस्थित असतात.

केळशी येथे महालक्ष्मी मंदिरासोबतच एका लहानशा टेकडीवर असलेला बाबा याकुबसाहेबांचा दर्गा प्रसिद्ध आहे. हा दर्गा हिंदूमुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. बाबा याकुब हे महान संत होते. सिंध प्रांतातून आलेले बाबा केळशी येथे हमालीचे काम करीत असत. असे सांगितले जाते की ते हमाली करीत असताना त्यांचे ओझे डोक्यापासून अधांतरी राहत असे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी बाबा याकुब यांना आपले ११ वे गुरू मानले होते. शिवाजी महाराजांनी या दर्ग्याचा खर्च चालावा म्हणून ५३४ एकर जमीन दिल्याची नोंद आहे. या मुस्लिम संतांचे अनेक हिंदू भक्तही आहेत. येथे भरणाऱ्या उरुसाची सुरुवात एका हिंदू भक्ताच्या हस्ते केली जाते. त्यावेळी मुस्लिमधर्मियांसोबतच हजारो हिंदूधर्मिय या उत्सवात सहभागी होतात. या ठिकाणाला शिवाजी महाराजांनी दोन ते तीन वेळा, संभाजी महाराजांनी दोन वेळा थोरले बाजीराव पेशवे यांनी एक वेळा भेट दिल्याची नोंद आहे. याशिवाय गावात ग्रामदैवत श्रीकालभैरव, श्रीमहागणपती, श्रीलक्ष्मीनारायण श्रीराम यांची मंदिरे आहेत. या साऱ्या देवतांचे उत्सव येथे साजरे होतात.

केळशी येथील महालक्ष्मी मंदिर बाबा याकुब दर्गा हे जसे गावाची भूषणे आहेत. त्याचप्रमाणे या गावाने कॅमलिनचे संस्थापक काकासाहेब दांडेकर, आयटी क्षेत्रात अत्यंत लहान वयात साऱ्या जगात आपला ठसा उमटवणारे श्री. दीपक घैसास, प्रख्यात कलाकार डॉ. श्रीराम लागू, रिमा लागू अशी नररत्ने दिली आहेत. याशिवाय लोकमान्य टिळकांची आई, क्रांतिवीर वासुदेव फडके यांचे आजोबा पणजोबा हेही याच गावचे. हरिपंत फडके, केळकर, बिवलकर, लागू, जोग इत्यादी मराठेशाहीतील सरदारांची केळशी ही मातृभूमी होय

याशिवाय केळशीचे एक आकर्षण म्हणजे संपूर्ण कोकणातील एकमेव असलेली वाळूची टेकडी. ही टेकडी किनाऱ्यावरील इतर टेकड्यांपेक्षा वेगळी आहे. २८ मीटर उंचीच्या या टेकडीवर काळ्या पांढऱ्या वाळूचे थर दिसतात. टेकडीच्या माथ्यावर शंख शिंपले आढळतात. अभ्यासकांनी केलेल्या संशोधनानुसार १३ व्या शतकात झालेल्या त्सुनामीमुळे या टेकडीची निर्मिती झाली असावी. या टेकडीवर चढताना घसरणाऱ्या वाळूची मौज लुटण्यासाठी सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहण्यासाठी येथे अनेक पर्यटक येतात.

उपयुक्त माहिती:

  • केळशी गावापासून तीन किमी, तर दापोलीपासून ३५ किमी अंतरावर
  • दापोली येथून एसटीची सुविधा
  • खासगी वाहने थेट मंदिरापर्यंत जाऊ शकतात
  • मंदिर परिसरात निवास न्याहरीची व्यवस्था
  • संपर्क : श्री. बिवलकर, पुजारी : मो. ९६०४७९०३४९
Back To Home